मराठी : वाचन घडते कसे ?

Submitted by हेमंतकुमार on 30 April, 2023 - 22:32

आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

यंदाच्या २७ फेब्रुवारी रोजी आपण इथे मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा केला. त्या दरम्यान मराठी भाषेच्या अनेक पैलूंना आपण स्पर्श केला. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने नवा लेख लिहिण्याचा मानस नाही परंतु एक वेगळी कल्पना मनात आली.

मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न करावा म्हणतो. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:

* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके

या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. हा धागा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ललित विभागात काढलेला आहे. कृपया सहकार्य करावे.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.

वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
*************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी पुस्तकांच्या किमतीही अवाच्या सवा झाल्या आहेत.
मी इथेच कुठे तरी लिहिले होते, की बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांप्रम्माने मराठी अभिजात साहित्त्याच्या पल्प आवृत्या का निघत नाहीत. बहुतेक कमी पणा चे वाटत असावे.
काही वर्षांपूर्वी असा प्रयात्न झाला होता पण त्याचा पूर्ण संच विकत घ्यावा लागत होता. तेव्हा मी मामा वरेरकरांनी भाषांतरित केलेल्या शरत्चन्द्रांच्या पुस्तकांचा एक सेट विकत घेतला होता.

मराठी पुस्तकांच्या किमतीही अवाच्या सवा झाल्या आहेत >>>
मी गेल्या वर्षी मराठी पुस्तकं घेतली होती. एका पुस्तकाची साधारण किंमत ३०० रुपये असावी.
एका चित्रपटाच्या तिकिटाची किंमत ही ह्यापेक्षा जास्त असते/ किंवा हॉटेल मधील एक डिश सुद्धा ह्यापेक्षा महाग असते.
:|

बाहेर रस्त्यावर बडा पाव आणि चहा पंचवीस रुपयात मिळतो मी त्याची गोष्ट करतोय.>>>
सार्वजनिक वाचनालये, नगर वाचनालयातून पुस्तके आणून वाचावी.
ही वाचनालये agabi माफक शुल्क आकारतात/ मोफत असतात..

मी अशी एक लायब्ररी जॉईन केली होती. पण ते एक पण नवीन पुस्तक विकत घेत नव्हते. मी फटाफट पुस्तक वाचत असे ते ही त्याना आवडत नसे. मग सोडून दिली.
चांगल्या लायब्ररी ची वर्गणी पण कामी नसते.

केशवकूल, सहा डिसेंबरला चैत्यभूमीत पुस्तकंही विकायला असतात. आणि ती मोठ्या संख्येने विकली जातात.
अर्थात सगळीच पुस्तके आपल्याला महाग वाटतील अशा किमतीची नसतात.

सध्या तुम्ही सगळीकडे तुमच्या सरांचा हात डोक्यावर पडल्यासारखे लिहिताय ते ठरवून की आपोआप?

पुन्हा तेच. मी सरांचा डू आय आहे ना म्हणून असेल. Lol

सतीश तांबे हे लेखक आहेत. बालगंधर्व रंगमंदीर मधे अक्षर मानवच्या स्टॉलबाहेर भेट झाली होती. ते म्हणाले कि वाचन सर्व जगभरात कमी होतंय ही ओरड आहे. पण लोकांच्या सवयी बदललेल्या अहेत. डिजीटल मजकूर वाचायची सवय लागली कि प्रिंटेड मजकूर वाचणे जड जाते. स्क्रीन अ‍ॅडिक्ट असणे हा प्रॉब्लेम त्यांनी सांगितला होता.
अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली होती. परदेशात जे के रोलिंगची पुस्तकं रांग लावून घेतली जातात. पण आपल्याकडे तिच्यावर टीका झाली. कारण यामुळे लहान मुलांची अभिव्यक्ती बिघडते. ते म्हणाले कि लहान मुलांच्या आवडीनिवडी किती बदलल्या आहेत याची कल्पनाच नाही.

हॅरी पॉटर पुस्तकं भारतातही लाखांनी खपली. इथेही रांगा लागायच्या. भारतीय भाषांतले अनुवाद मोजले तर ती संख्या आणखी वाढेल.

मराठी पुस्तके महाग आहेत किंवा सहज उपलब्ध नाहीत म्हणून वाचक नाहीत हे तितकेसे खरे नसावे.

कुणालाही दुखवायचा किंवा offend करायचा हेतू नाही पण एक प्रयोग म्हणून ३० किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुंबई-पुणे-नाशिक सारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरात राहाणाऱ्या समृद्ध घरच्या मराठी मुलांना “गेल्या एका वर्षात कोणते “मराठी” पुस्तक वाचले?” असा प्रश्न विचारून बघा. पुस्तक त्यांनी विकत घेतलेलेच असावे असेही नाही.

अक्षरशः हजारो मराठी मुलांनी पाठ्यक्रमात असलेल्या सक्तीच्या मराठी पुस्तकाव्यतिरिक्त एकही मराठी पुस्तक वाचलेले नसते हे कटू सत्य. खुद्द मराठी भाषा शिकणारे- शिकवणारे मराठी पुस्तके वाचत असतील थोडीफार पण त्यांची संख्या ?

वाचकांची पसंती बदलते आहे हे एक सत्य आहेच. A total paradigm shift here. Most writers are flagrantly unaware. Exceptions are too few and far between.

बाकी वाचनतृष्णा नसण्याची कारणे, प्रश्न, उत्तरे सर्वांनाच माहिती आहेत. त्यावर काय बोलायचे ?

मराठी पुस्तके महाग आहेत किंवा सहज उपलब्ध नाहीत म्हणून वाचक नाहीत हे तितकेसे खरे नसावे. >>>कदाचित तुम्ही म्हणता तसेही असेल. माझी तक्रार माझ्यासाठी, माझ्या गरिबीची द्योतक असावी.

चांगली साधकबाधक चर्चा. ‘मराठी पुस्तके महाग असतात’ हा मुद्दा जरी सापेक्ष असला तरी तो दुर्लक्ष करता येण्याजोगा नाही. सध्याचे मराठी पुस्तकांचे एक दुष्टचक्र असे झालेय :
वाचक कमी झाले >>> आवृत्ती कमी प्रतींची >>>> म्हणून किंमत जास्त>>>> विकत घेणारे वाचक अजूनच कमी.

ही जाचक समस्या असल्याचे रत्नाकर मतकरींनीही त्यांच्या “कायमचे प्रश्न “या पुस्तकात लिहिले आहे आणि त्यासाठी काही चांगले उपाय पण सुचवले आहेत. त्यांच्याच शब्दात :
“मराठी प्रकाशकांनी स्वार्थ थोडा बाजूला ठेवून एकापेक्षा अधिक प्रकाशाकांनी एकत्र येणे; आणखी पैसा बँका, व्यक्ती व उद्योगसमूह यांच्याकडून उभा करणे आणि योग्य ती गुंतवणूक करून ऑक्सफर्ड-पेंग्विनसारख्या मोठ्या संस्था उभारण्याचे ध्येय नजरेपुढे ठेवायला हवे”.
. .
माझी वार्षिक पुस्तक खरेदीची तरतूद एक हजार रुपयांची ठरलेली आहे. त्यात तीन रीतसर मराठी पुस्तके आणि एखादी पुस्तिका एवढे बसते व मला तेवढे वाचन पुरते. काही मराठी तरुणांशी मी जेव्हा पुस्तक खरेदी या विषयावर बोललो तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, एका मराठी पुस्तकाच्या किंमतीत दोन इंग्लिश (सामान्य बांधणीची) पुस्तके व्यवस्थित बसतात. मग आमचा पुस्तकांवरचा वार्षिक खर्च जो काही असेल त्यात आम्हाला अधिक इंग्लिश पुस्तके वाचायला मिळत असतील तर आम्ही प्राधान्याने इंग्लिश पुस्तके का विकत घेऊ नयेत ?

मला आठवते : सुमारे वीस वर्षांपूर्वी एखाद्या मराठी पुस्तकातील पानांची संख्या आणि त्याची रुपयातली किंमत हे साधारण समसमान असायचे. अलीकडे ते गुणोत्तर पार बिघडलेले आहे. यंदा मी एक 182 पानी पुस्तक घेतले त्याची किंमत 300 रुपये आहे. त्यामुळे वाचकाने या दृष्टीने विचार केल्यास तो गैर मानता येणार नाही. तसेच एखाद्याची आर्थिक परिस्थिती आणि त्याची पुस्तक खरेदीसाठी असलेली तरतूद या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात.

मी मध्यंतरी दर महिन्याला एक पुस्तक घ्यायचा क्रम चालू ठेवला होता. पण फिक्शन टाईप मधे एकदा पुस्तक वाचलं कि ते अडगळ बनून राहतं.
फुकट वाचणारे घेऊन जातात ते परत देत नाहीत. मग विकत घ्यायच्या पुस्तकांबाबत जर ते संदर्भ म्हणून लागत असेल तरच घ्यायला सुरूवात केली. ही महाग असतात त्यामुळं आता वर्षा सहा महिन्यातून एकदा !

वाचनालय मलाही जमत नाही. मुद्दाम वाकडी वाट करून जायचं आणि आपल्याला हवी ती पुस्तकं, नवीन पुस्तकं लाडक्या ग्राहकांसाठी लपवलेली असणं किंवा त्यांना मुद्दाम फोन करून देणं हे चालतं काही ठिकाणी. रसिक , मॅजेस्टीक मधे पुस्तक विकत घ्यायचं आणि वेळेत दिलं कि ७५% परत मिळतं. म्हात्रे ब्रीज च्या डीपी रोडला होतं तेव्हां घराजवळच असल्याने बरीच पुस्तकं वाचून झाली. पण शेवटी एक अगदीच बंडल पुस्तक गळ्यात पडलं. आता त्यांचं ते आउटलेट बंद झालंय.

* अभिजात साहित्त्याच्या पल्प आवृत्या, वाचकांची पसंती बदलते आहे हे एक सत्य,..
>>> या मुद्द्यांचा विचार जरूर व्हायला हवा.
. . .

अरुण नेरूरकरांनी त्यांच्या ‘भाषा . . . हरवलेल्या . .” या पुस्तकातील ‘भाषा आणि वाचक’ या लेखातही या मुद्द्याचा चांगला उहापोह असा केला आहे,
“पुस्तके सर्वसाधारण वाचकांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हायला हवीत. वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचणार नसेल तर पुस्तके त्याच्यापर्यंत पोहोचायला हवीत. पुस्तके आकर्षक आणि वाचनीय असली तरी ती विकत घ्यावी आणि संग्रही ठेवावी असे कितीही वाटले तरी प्रत्येकाला ते शक्य होत नाही. पुस्तकांच्या किमती आणि राहत्या घरातील अपुरी जागा हे त्यातले प्रमुख अडथळे आहेत".

(माझे एक निरीक्षण : आतापर्यंत पुस्तके ठेवायला जागा या विषयावर ज्या कोणी लेखकांनी लिहिले होते ते बरेचसे मुंबईकर असतात ! त्यांचा मुद्दा बरोबर).
घरातील अपुऱ्या जागेवर इ- पुस्तके हा उपाय लगेच सुचवता येतो. परंतु सध्याची मनापासून मराठी वाचणाऱ्यांची पिढी ही मध्यमवयीन आणि जेष्ठ नागरिकांची आहे आणि ते अजूनही छापील पुस्तकांनाच पसंती देताना दिसतात. वाचनाची दांडगी भूक असणाऱ्यांनी इ-वाचनाकडे यावे हे तर उत्तमच, परंतु सामान्य ते मध्यम वाचन असणाऱ्या सर्वच लोकांना किंडलसारखी साधने आवडतात असे नाही (ज्या त्या पिढीच्या सवयी).
. .
* मी अशी एक लायब्ररी जॉईन केली होती. पण ते एक पण नवीन पुस्तक विकत घेत नव्हते. >>>>> +११
ग्रंथालये आणि त्यात सहजगत्या मिळणारी पुस्तके हा तर फार मोठ्या चर्चेचा विषय आहे. तो नंतर कधीतरी .

* फिक्शन टाईप मधे एकदा पुस्तक वाचलं कि ते अडगळ बनून राहतं. >>>> +१२३
फार थोडी पुस्तके संग्राह्य आणि पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी असतात. अन्यथा पुस्तक प्रेमापोटी अनेक पुस्तकांचा संग्रह केला असता कालांतराने लक्षात येते की आपण त्यातल्या कित्येकांना कित्येक वर्ष हात लावत नाही. म्हणजेच, कितीही 'समृद्ध' असली तरी ती अडगळच होते. Happy त्यातून कुटुंबातील वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्ती जर अल्पसंख्य असतील तर मग इतरांच्या दृष्टीने तर ती अजूनच अडगळ.
...
कौटुंबिक पातळीवर पाहता,
एका वेळेच्या हॉटेलातल्या जेवणाचा , कपड्यांच्या खरेदीचा आणि दीर्घकालीन टिकणाऱ्या अन्य काही वस्तूंवरचा खर्च हे सर्व एका बाजूस आणि पुस्तकखरेदी दुसऱ्या बाजूस धरली तर पहिल्या गटाची दुसऱ्या गटाशी तुलना करणे खरंच कितपत बरोबर आहे ? मला संदेह वाटतो. अशा वेळी दोन असमान पातळीवरील गोष्टींची तर आपण तुलना करत नसतो ? ( Apples to oranges?)

कोणी सांगावे.

... आर्थिक परिस्थिती आणि त्याची पुस्तक खरेदीसाठी असलेली तरतूद या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात....

त्या तश्या असतात, आहेतच. रोटी-कपडा-मकान नंतर बाकी शौकमौज हे माबो टर्मिनॉलॉजीप्रमाणे 'अध्याहृत' च आहे ना ?

शक्य / परवडण्यासारखे असूनही फार कमी मराठीजन 'मराठी' पुस्तके वाचतात असा माझा मुद्दा होता. असो.

कितीही 'समृद्ध' असली तरी ती अडगळच होते >>> ओ SS पन !! Lol

अशा वेळी दोन असमान पातळीवरील गोष्टींची तर आपण तुलना करत नसतो ? >> बरोबर.

अनिंद्य,
तुमचा मुद्दाही योग्यच आहे. थोडं वेगळ्या अंगाने लिहिले इतकेच.
. .
सर्वांचेच विचार जुळतील असे बिलकुल नाही; मतभिन्नता असावीच, परंतु या चर्चेत आपण पुस्तक खरेदी/ वाचन या विषयाचा सर्वांगाने विचार करतो आहे हे फार चांगले वाटले.

माझा एक अनुभव असा आहे कि पुस्तकी किडा असलेले काही जण व्यवहारात शून्य असतात. यांना कुठे काय बोलावं याचंही भान नसतं. जिथे तिथे आपलं दांडगं वाचन दाखवून सर्वांना प्रभावित करायचा प्रयत्न करत असतात. नको तिथे अलंकारिक वाक्ये, पाल्हाळिक गप्पा सुरू करतात.

आमच्या बिल्डींगच्या री डेवलपमेंटच्या मिटींगला एक आर्किटेक्ट बिल्डरला घेऊन आलेले. तिथे हे साहित्यिक भाषेत बोलत होते. सगळे वैतागलेले होते. माझं तर मत असं झालंय कि आपल्या प्रापंचिक जबाबदार्‍या पार पाडून, सर्व कर्तव्ये , जबाबदार्‍या व्यवस्थित सांभाळणाराच उत्तम साहित्यिक किंवा वाचक होऊ शकतो.

सतत माझं वाचन असं दांडग आहे हे जगाला सांगणे हे एकवेळ ठीक, पण बाकिच्यांना कमी लेखणे हा आजारच आहे.
सॉरी कुमार सर, थोडं तीव्र मत मांडलं. क्षमा असावी.

शक्य / परवडण्यासारखे असूनही फार कमी मराठीजन 'मराठी' पुस्तके वाचतात असा माझा मुद्दा होता. असो.
Submitted by अनिंद्य on 24 August, 2025 - 14:3
हे वाचून मला वूडहाउस च्या एका पुस्तकात एक लॉर्ड तक्रार करतो ते आठवले. तो म्हणतो की लोकाना वाटते की मी किती श्रीमंत आहेम एव्हढी मोठी इस्टेट आहे, इत्यादि पण खर सांगायचं तर टॅक्स भरायला पैसे नाहीत....
आपल्या "श्रीमंत" मध्यम वर्गाची स्थिती थोड्या फार फरकाने अशीच असावी. हौसिंग लोन, कार लोन, मुलांच्या फिया, बायकोचे कॉस्मेटिक्स, अनिश्चित भविष्य काळासाठी सेविन्ग्स - नोकरी कधी जाईल त्याची शाश्वती नाही, असा सगळा डोलारा उभारला आहे.
मी नगद पैसे भरून विकत घेतलेली पुस्तके किलोच्या भावाने विकली आहेत तेव्हा काय वाटले असेल ते माझे मलाच ठाऊक.

आपल्या "श्रीमंत" मध्यम वर्गाची स्थिती थोड्या फार फरकाने अशीच असावी...

शक्य आहे. किंवा माझा सॅम्पलसेट पुरेसा मोठा नसावा. आणि माझे व्यवहारज्ञानही यथातथाच आहे.

* आपल्या प्रापंचिक जबाबदार्‍या पार पाडून, सर्व कर्तव्ये , जबाबदार्‍या व्यवस्थित सांभाळणाराच उत्तम साहित्यिक किंवा वाचक होऊ शकतो.
>>>> अगदी अगदी ! क्या बात है !!
. . .
किंचित अवांतर जातो.
करमणुकीबरोबरच प्रबोधन वगैरे असावे हे तत्वतः बरोबर. परंतु प्रबोधन होण्याचे वाचन हे काही एकमेव साधन नाही. मागे एकदा डॉ. मोहन आगाशांची मुलाखत ऐकली होती. तेव्हा ते म्हणाले की, एक पारंपरिक घट्ट समज असा आहे की शिक्षण व प्रबोधनाचे साधन म्हणजे वाचन आणि करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट.
त्यांनी या विधानाला हरकत घेतली आणि म्हणाले की, एखाद्या दिग्दर्शकाने चित्रपटातून प्रबोधन करायचे ठरवल्यास तो देखील उत्तम पद्धतीने ते करू शकतो. चित्रपटाची एका वेळेस लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता निर्विवाद आहे

सधन व्यक्ती पुस्तक खरेदी का करत नाही, असा जो मुद्दा वर आला आहे त्या संदर्भात त्या संदर्भात आगाशेंचा मुद्दा विचार करण्याजोगा वाटला. समाजातील प्रत्येकाचीच वाचन ही आवड असणार नाही. इतिहासात डोकावता, कोणत्याही वेळेस वाचक ही जमातच अल्पसंख्य असल्याचे निरीक्षण काही अभ्यासकांनी पूर्वी मांडलेले आहे.

कुमार सर, छान चर्चा घडवून आणता.
पुन्हा जमवूयात मैफिल.
(अवांतर - गुगल डॉक मधे क्रोम मधून व्हॉइस टायपिंगचा यशस्वी प्रयोग केला त्याबद्दल तुमचे आभार. फक्त एखादी कथा टायपायसाठी एकांत मिळत नाही. चार ओळी झाल्या कि आई शेजारी येऊन उभी राहते ऐकायला) Lol

* . चार ओळी झाल्या कि आई शेजारी येऊन उभी राहते ऐकायला
>>> Lol
अगदी बरोबर ! दीर्घ टंकन करायचे असेल तेव्हा मी सुद्धा घरात सांगून मग खोलीचे दार लावून बसतो. शेजारी येऊन कोणी उभे राहिले तर आपली एकाग्रता जाते. आपला मजकूर गुपित वगैरे अजिबात नसला तरीही आपण बोलताना तो कोणी ऐकू नये असेच वाटते.

पुस्तकातील पानांची संख्या आणि त्याची रुपयातली किंमत हे साधारण समसमान असायचे. अलीकडे ते गुणोत्तर पार बिघडलेले आहे. >>

हे तर अजिबात पटले नाही. पानांची संख्या, गुणवत्ता आणि किंमत याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पानांची संख्या आणि किंमत हा हिशोब करू नये. आणि मग तीच पुस्तके किलोच्या भावात रद्दीत विकली जातील, तेव्हापण त्याचा हिशोब आणि हळहळ करावी लागणार नाही.

* फिक्शन टाईप मधे एकदा पुस्तक वाचलं कि ते अडगळ बनून राहतं. >> खरे आहे.
फार थोडी पुस्तके संग्राह्य आणि पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी असतात.>> पटल किंवा मी पण तसेच करते.
मॅजेस्टिक चा पुस्तके वाचून परत करून दुसरी पुस्तके ( अर्थात काही किंमत वजा करून ) हा एक चांगला पर्याय आहे.
**""
बरेच प्रतिसाद आले आहेत.. आता वाचायला वेळ नाही पण जेव्हढे वाचले त्यावरच्या नोंदी / प्रतिक्रिया.

चांगली चर्चा सुरु आहे!
वरील नवीन प्रतिसाद वाचले आणि ते पटलेही! केकूशेठ, रानभुली आणि अनिंद्य ह्यांनी प्रतिसादात मांडलेले मुद्दे विचारप्रवर्तक आहेत. त्यावरुन जवळपास सहा वर्षांपूर्वी तुमच्याच 'वाचून झाल्यानंतर …..' ह्या लेखावर मी दिलेला एक दिर्घ प्रतिसाद आठवला आणि त्यातला काही भाग सदर चर्चेच्या कक्षेत बसत असल्यासारखे वाटल्याने तो खाली पेस्टवत आहे...

>>" लेख, विजय तेंडुलकरांचा प्रसंग आणि रवींद्र पिंगेंचा सिद्धांत सर्वच आवडले! त्याचबरोबर एडवर्ड बर्नेज यांच्या ‘प्रोपगंडा’ या पुस्तकाचीही आठवण झाली.

"लोकांच्या सवयी आणि मते यांना अत्यंत हुशारीने आणि जाणीवपूर्वक वळण देणे हा लोकशाही समाजातील एक महत्त्वाचा भाग असतो."

या वाक्याने सुरुवात होणाऱ्या ह्या पुस्तकात लोकांच्या मतांना आणि सवयींना वळण द्यायचे, ‘स्पिन’ देणे हेच प्रोपगंडा पंडिताचे काम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

१९३० मध्ये बर्नेज Harcourt Brace, & Co, Simon & Schuster अशा काही प्रकाशकांसाठी काम करीत होते. ह्या प्रकाशकांना पुस्तकांचा खप वाढवायचा होता. तेव्हा बर्नेज ह्यांनी हेच केले. लगेच वर्तमानपत्रांतून प्रतिष्ठित व्यक्ती पुस्तकांचे सांस्कृतिक महत्त्व सांगू लागल्या. आर्कीटेक्ट, बांधकाम व्यावसायिक आणि इंटिरियर डेकोरेटर्स यांच्या संघटनांना त्यांनी हाताशी धरले. ही सर्व मंडळी घरात बुकशेल्फ/ पुस्तकांचे कपाट असणे कसे गरजेचे ते सांगू लागली. पुस्तकाचे कपाट असणारे घर प्रतिष्ठित ठरू लागले.
आता कपाट आले म्हणजे त्यात ठेवायला पुस्तकांची खरेदी करणे आले! हे सारे ‘गरज निर्माण करणे’ होते. यात विकली जात होती ‘संस्कृती’ आणि खप वाढत होता पुस्तकांचा.

मुठभर अभ्यासकांची/लेखकांची आवड किंवा गरज असलेल्या वैयक्तिक पुस्तक संग्रहाला अशाप्रकारे प्रतिष्ठेशी/संस्कृतीशी जोडून पेश केले गेले आणि त्यात प्रचंड यशही मिळाले हे आत्ता आत्तापर्यंत आपण पाहतच आहोत 😀 कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच त्या प्रोपगंडाला बळीही पडले आहोत!>>"

एका वेळेच्या हॉटेलातल्या जेवणाचा , कपड्यांच्या खरेदीचा आणि दीर्घकालीन टिकणाऱ्या अन्य काही वस्तूंवरचा खर्च हे सर्व एका बाजूस आणि पुस्तकखरेदी दुसऱ्या बाजूस धरली तर पहिल्या गटाची दुसऱ्या गटाशी तुलना करणे खरंच कितपत बरोबर आहे ? मला संदेह वाटतो. अशा वेळी दोन असमान पातळीवरील गोष्टींची तर आपण तुलना करत नसतो ? ( Apples to oranges?) >>>

वर मराठी पुस्तके महाग होतात याविषयी तक्रारीचा सूर होता.

गेल्या वीस वर्षांमधील बघितलं, हॉटेल, कपडे, सिनेमा (हे वर वर बघता ऐच्छिक खर्च आहेत.) ह्यांच्या किमतीही कित्येक गुणे वाढलेल्या आढळतात. त्यामानाने पुस्तकांच्या किंमती तेव्हढ्या प्रमाणात वाढलेल्या नाहीत.
कितीतरी वेळा आपल्या प्राधान्य क्रमात पुस्तकं अगदी तळत, किंवा नसतात च त्यामुळे मग त्यांच्या किमतीची सबब पुढे केली जाते का?
हा मुद्दा आहे.

गवयाला , नटाला, कलाकाराला मागेल ती किंमत(?) - थोड awkward होतं हे - दिली जाते, जे लोकमान्य असते. मराठी चित्रपट / नाटके ह्यासाठी अनुदाने मिळतात..
पण मग लेखकाला / प्रकाशकाला पुस्तके महाग झालीत असे म्हणणे , त्यासाठी इतर पातळ्यांवर प्रयत्न न होता, हे बरोबर आहे का?

आम्ही कौटुंबिक पातळीवर वर्षाला ठराविक (किमतीची) पुस्तके आणि वाचनालय ह्यांचा मेळ घालतो. लहानपणी आईबाबांनी पण तसेच करताना अनुभवले आहे.

Pages