मराठी : वाचन घडते कसे ?

Submitted by कुमार१ on 30 April, 2023 - 22:32

आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

यंदाच्या २७ फेब्रुवारी रोजी आपण इथे मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा केला. त्या दरम्यान मराठी भाषेच्या अनेक पैलूंना आपण स्पर्श केला. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने नवा लेख लिहिण्याचा मानस नाही परंतु एक वेगळी कल्पना मनात आली.

मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न करावा म्हणतो. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:

* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके

या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. हा धागा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ललित विभागात काढलेला आहे. कृपया सहकार्य करावे.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.

वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
*************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जालावर धडाधड प्रसिद्ध होऊ लागली. >> मी लिहितो याच्यावर. त्या निमित्ताने एरन श्वार्त्झ याच्याबद्दल लिहिता येईल.

भारतात पुस्तकांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावरील जीएसटी 12 वरून 18% करण्यात आला असल्याने पुस्तके महागण्याचे संकेत आहेत.
या प्रकरणी त्या व्यावसायिकांनी केंद्र सरकारला पत्रही पाठवले आहे.

मराठी वाचक
साप्ताहिक साधनातील नितीन कोत्तापल्ले यांच्या लेखातून विचार करण्याजोगा खालील मजकूर :
“. . . एका बाजूला लेखक, कवी आणि प्रकाशकांची बेसुमार वाढलेली संख्या आणि त्याच प्रमाणात घटलेली वाचकांची संख्या चिंतेत टाकणारी बाब आहे.. .
. . . ज्या भाषेमध्ये मूळ भाषेत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांपेक्षा अनुवादित पुस्तकांचा खप खूप जास्त असतो त्या समाजाचे भाषिक आणि सांस्कृतिक आरोग्य ठीक नसते. दुर्दैवाने मराठीमध्ये असेच घडते आहे . ..”
. . .मराठीमध्ये प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची आवृत्ती देखील आता सर्वसाधारणपणे शंभर ते तीनशे एवढ्या प्रतींवर आलेली आहे. या पुस्तकांचा मुख्य ग्राहक प्रामुख्याने काही ग्रंथालये आणि अत्यंत मोजके मराठी वाचक एवढाच आहे . . ."

https://www.weeklysadhana.in/view_article/Marathi-school-is-the-prestige...

गंभीर चिंतन आहे..
माझ्या कडूनही वाचन होत नाही. काव्य शास्त्र विनोद जो आधीच्या पिढीने सांगितला तोच मनावर गारूड करून आहे. त्यांची जागा आपणच आपल्या पिढीतल्या कुणाला देत नाही.
मागच्या पिढीत सुद्धा नंतरच्या लेखकांना स्ट्रगल करावा लागला. मी असे ऐकले आहे की व पु काळेंना सुरूवातीला सहजासहजी स्विकारले नव्हते.
सुहास शिरवळकरांना कादंबरी लेखनाकडे वळल्यावर सुद्धा स्विकारले नव्हते.
ही माझी मतं नाही. फेसबुकवर जे लेखक मंडळींचं वर्तुळ आहे त्या चर्चेत असं माहिती होत जातं. शिरवळकरांकडे शैली होती, घाट चमत्कृतीपूर्ण असायचा पण कंटेट त्याखाली लपून जायचा.
आता पटायला लागलंय.

पुनर्वाचन करण्यात आनंद हा मुद्दा मला पटला नाही.
.........
कागदावरचा जीएसटी वाढवला..... बरे झाले. आता लोक छापील पुस्तकांऐवजी इलेक्ट्रानिक्स डिजिटल वाचण्याची सवय करून घेतील. पूर्वीच्या भूर्जपत्रांवरच्या ग्रंथांकडे आपण पाहतो तसे पुढील चौथी पिढी आताच्या छापील पुस्तकांकडे पाहील.

आता लोक छापील पुस्तकांऐवजी इलेक्ट्रानिक्स डिजिटल वाचण्याची सवय करून घेतील. >>> डिजीटल प्लॅटफॉर्मवरचं वाचन कमी करायला हवं. डोळ्यांचे आजार, मणका, पाठीचे आजार. पोश्चर नीट न राहिल्याने उद्भवणारे आजार. पुस्तक कुठेही कॅरी करता येतं. त्याला वीज लागत नाही. इंटरनेट लागत नाही. वाय२के सारखा प्रॉब्लेम आला तरी पुस्तकांना फटका बसणार नाही. शंभर वर्षांनी विंडोज, उंबटू हे कदाचित कालबाह्य होतील. आजचा डेटा कालबाह्य होईल. त्या वेळी आजच्या ज्या फॉर्मॅट मधे पुस्तकं साठवली आहेत, त्यातली जी पुस्तकं नव्या स्वरूपात साठवलेली असतील तीच उपलब्ध होतील.

भविष्यात जर पेनमधे प्रोजेक्टर आले, पेनमधेच युएसबी ड्राईव्ह, स्मार्ट मेमरी असे काही असेल तरच ते टिकेल. हार्ड कॉपीला पर्याय नसेल. कागदावर नसेल तर कदाचित दुसर्‍या कशावर तरी असेल.

वरील चर्चेत ज्या अक्षरनामावरील लेखाचा उल्लेख आहे या त्याचे शीर्षक बोलके आहे
छापील पुस्तके विरुद्ध किंडल : जुना रोमान्स विरुद्ध नवा रोमान्स!

दोन्ही पद्धतीत +/- आहे. ज्याला जो आवडेल त्याने तो रोमान्स करावा; वाटल्यास दोन्हीकडे करावा !

वाचन अनुभवांच्या बाबतीत सध्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही उपक्रमांची गरज भासते. प्रत्येकाची बलस्थाने वेगवेगळी आहेत.
मध्यंतरी मी एका वाचन कट्टा कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एका वेळी चार लोकांनी भिन्न पुस्तकांचे परिचय सादर केले. वेळेच्या मर्यादेमुळे अन्य लोकांना त्यावरील चर्चेसाठी वेळ असा राहत नाही पण प्रत्यक्ष भेटीगाठी होतात हा फायदा.

उलट आपल्या संस्थलामध्ये एखादा विषय चर्चेसाठी कायमस्वरूपी खुला राहतो त्यामुळे त्यावर कधीही लिहिता येते. मुख्य म्हणजे जे काही ऐकलेलं/ वाचलेले असतं त्यावर विचार करून नीट लिहिता येते.

वरील ऑनलाइन/ऑफलाइन तुलना व चिंतन फार आवडले. वेगवेगळ्या पैलूंचा तुम्ही विचार करता डॉक्टर. वाचन-मनन ८०% आणि लिखाण २०% असे दिसते एकंदरीत. बुद्धीमान आहात. नो वंडर वैद्यकिय पेशा आहे तुमचा. पर्टीक्युलरपणा, अचूकपणा, सिन्सियॉरिटी - लक्षात येते ना नेहमी.

सामो, धन्स !
आपण सगळेच बुद्धिमान आहोत; प्रत्येकाच्या बुद्धीचे पैलू वेगळे इतकच.
या संदर्भात मला आईन्स्टाईनकृत खालील अवतरण खूप आवडते :

"Everybody is a genius. But if you judge a fish by its ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid".

चांगलं काय वाईट काय हे शेवटी अर्थशास्त्रच ठरवतं.
आम्हाला कुठलाही मोबाईल, घर, कपडे आवडू द्या शेवटी "बजेट काय तुमचं?" या वाक्यावरच दुकानदार योग्य माल दाखवतो. तो घेऊन येतो आपण.

* ग्रेट कोट ! >>> त्याचे श्रेय त्या महामानवालाच !

काही वर्षांपूर्वी याच अवतरणाचे मराठीकरण आणि त्यासोबत एक सुरेख हास्यचित्र पाहिले होते; कुठे ते आठवत नाही (छापील)
एकीकडे पाण्याचा तलाव, दुसरीकडे ते झाड आणि एक मुलगा असे ते सुंदर होते.

या संदर्भात मला आईन्स्टाईनकृत खालील अवतरण खूप आवडते :
>>>>
अब्राहम लिंकन म्हणाला होता की इंटरनेटवरच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका !

आता नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव उपक्रमात देव माणूस असा एक उपक्रम होता.
आता खालील दोन व्यक्तींविषयी मी जे लिहीणार आहे ती खरंतर ती तुमच्या आमच्या सारखीच, पण एक वेगळा वसा आणि ध्यास घेतलेली. त्यांच्या या ध्यासापायी अनेकांचं निश्चित भलं झालं असणार आहे, कित्येकांना नवीन जग, नवीन स्वप्न, थोडा विरंगुळा, माहिती असं एक वेगळं विश्व गवसलं असू शकतं.
पुस्तकांचा खप कमी होणे, पुस्तकांचे वाचन कमी होणं, त्यानंतर वाचनालयं, ग्रंथालयं यांची संख्या कमी होत जातं वगैरे अनंत अडचणींचा पाढा आपण वाचत/ ऐकत असतो.
पण ही दोघेजणं अशी आहेत की ज्यांतील एकाने समाजातील एका वंचित घटकाला, तर दुसऱ्याने कदाचित मध्यमवर्गीय समाजाला पुस्तकालय किंवा वाचनालय किंवा ग्रंथालय उपलब्ध करून दिलं त्या दोघांची ही थोडक्यात गोष्ट/ परिचय.

१. शोभा बोंद्रे
यांच्या ‘वाचनाचा तास: हा उपक्रमाविषयीची माहिती मला अगदी योगायोगाने फेसबुकवर मिळाली.
अक्षर सरिता या संस्थेद्वारे हा उपक्रम राबवला जातो. ह्यात सामील झालेल्या शाळेत, पुस्तकांचे कपाट ठेवलेले असते. ज्यात अनेक विषयांवरची अवांतर पुस्तके मुलांना उपलब्ध करून देतात. आठवड्याला एक तास असतो, वाचनाचा तास. ह्यावेळी मुलांना पुस्तके वाचायला मिळतात, गोष्टी, कविता, निबंध, काडी कोणी पाहुणे असे कार्यक्रमही त्या तासाला होतात.

आता असे ५० हून अधिक वाचन वर्ग आहेत ज्यांचा लाभ २५०० हून जास्त विद्यार्थ्यांना मिळतो आहे.

त्यांच्या दिवे लागण या लेखमालिकेतून त्यांनी या दरम्यान मुलांचे आलेले काही अनुभव सांगितले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जा.

https://www.facebook.com/100001481081291/posts/pfbid02htNAGrpJi1YbMipqqP...

२. ना वा काळे -
ह्यांनी पन्नास वर्षांपूर्वी एक सहज म्हणू उपक्रम सुरू केला, अगदी मर्यादित स्वरूपात, दोन ट्रकांपासून - त्यांच्या राहत्या सोसायटीतील रहिवाशांसाठी, दिवाळी अंकांची लायब्ररी.

हे छोटं बीज त्यांनी रोवलं त्याला हळू हळू अनेक लोकांचे, हितचिंतकांचे, वाचन प्रेमींचे हातभार लागले. त्याचं कालांतराने पुस्तकालयातं (प्रदीप लायब्ररी‌त) रूपांतर झाले. सोसायटीने त्यांच्या बिल्डिंगमध्ये असलेली एक जास्तीची खोली त्यांना यासाठी वापरायला दिली. लोकांनी उस्फूर्तपणे वर्षाकाठी काही पुस्तके, क्वचित कधी कपाटे आदी गोष्टींची मदत करायलाही सुरुवात केली.
आज त्यांच्या पुस्तकालयात १०,००० हून अधिक पुस्तके आहेत. ज्यांचा लाभ काही हजार सदस्य घेत आहेत.
गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं अर्थात त्यांनी लावलेला हा वृक्ष वृद्धिंगत होतोच आहे आणि त्याची फळे अनेकाना मिळत आहेत. त्यांच्या स्मृतीस अनेक वंदन!

* शोभा बोंद्रे व ना वा काळे >>>> हार्दिक अभिनंदन !
+
श्याम जोशी हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ग्रंथसखा नावाचे ग्रंथालय चालवतात. त्यांनीही खूप मोठी पदरमोड करून या संदर्भात मौलिक कार्य केलेले आहे :
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4...

तीन-चार मराठी पुस्तके विकत घेऊन वाचायची माझी इच्छा आहे. परंतु गेली पाच वर्षे मी अक्षरधारा व बुकगंगा या दोन्ही ठिकाणी दरसाल चौकशी करूनही ती मला मिळत नाहीत. अशी पुस्तके बाजारात का नसतात याचे उत्तर मला आजच्या मटातील भूषण कोलते यांच्या लेखातून मिळाले. त्यातला हा निवडक भाग :

“ . . . बरेचसे प्रकाशक बऱ्याच मराठी पुस्तकांची दुसरी आवृत्ती छापण्यास उत्सुक नसतात कारण त्या आवृत्तीला पहिल्यासारखी मागणी असणार नाही अशी त्यांची भीती. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे लेखक आणि वाचक बहुतेक एकाच काळातले आढळतात. एखाद्या पुस्तकाची आवृत्ती पाच वर्षात संपली तर त्या पुस्तकाचे भविष्यात वाचक तयार होण्याची शक्यताच संपुष्टात येते. अशा कितीतरी पुस्तकांच्या शोधात वाचक पुस्तकदुकानात शिरतात आणि निराश होऊन परततात. . . “

(स्वानुभव !)

18% as they fall under 'Digital Products' Category, If print version of the book exists in market then it's 5% GST on Ebook.

भा. रा. भागवत यांनी Walter Scott च्या Kenilworth या कादंबरीचे किल्ल्यातील कारस्थान या नावाने रुपांतर केले होते. कोणाकडे हे पुस्तक आहे का किंवा कुठे मिळेल याची माहिती मिळू शकेल का? मी अनेक ठिकाणी प्रयत्न केले अगदी याचे प्रकाशक गिरगावमधील लाखाणी बुक डेपो येथेही चक्कर टाकली पण कोणालाच काही माहिती नाही. दुसरी आवृत्ती बहुतेक न काढल्यामुळे दुकानात मिळायची शक्यता आता जवळजवळ शून्यच वाटते आहे.

पुस्तकं विकत घेऊन एकदा वाचून झाली कि काय करावं हा प्रश्न असतो?

आमच्या वडिलांनी आम्हाला उत्तमोत्तम पुस्तकं विकत आणून वाचायची सवय लावली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि महाराष्ट्र सेवा संघ यांच्या कार्यकारिणीवर ते तहहयात सदस्य म्हणू कित्येक वर्षे कार्यरत होते.

पण आता माझ्याकडे आणि माझ्या भावाकडे भारंभार पुस्तके झालीआहेत. मुंबईत पुस्तकासाठी जागा ठेवणे हे दिवसेंदिवस परवडेनासे झालेले आहे. त्यातून माझ्या मुलीचे वाचन अफाट आहे. तयामुळे तिने दोन पेटारे भरून इंग्रजी क्लासिक पुस्तकांचा संग्रह घरी ठेवला आहे. ती लग्न करून दिल्लीला गेली असली तरी हे ग्रंथ कुणाला देऊन टाकण्याची तिची तयारी नाही. त्यातून लोक तुमच्याकडे पुस्तके वाचायला मागतात आणि ती परत येत नाहीत. तुम्ही सहा महिन्यांनी मागितली तर "ते अजून वाचून झालेलं नाही" अशी उत्तरे मिळतात . यामुळे कुणी पुस्तके वाचायला मागितली तरी ती द्यावी का हा संभ्रम पडतो

माझ्या भावाने घर बदलले तेंव्हा नव्या सोसायटीत स्वतःची ५५० पुस्तके देऊन वाचनालय सुरु केले आहे तेथील उत्साही सदस्य हे वाचनालय फुकट चालवतात.

अशा परिस्थिती असताना माझ्या दोन्ही मुलांनी मला जुलै मध्ये वाढदिवसाला १३ इंची टॅबलेट दिला आहे त्यावर मी किंडल चे सदस्यत्व घेतले आहे. १६९ रुपये महिना भरून कितीही पुस्तके वाचा. अगोदरपासून माझ्याकडे किंडल रीडर आहे पण त्याचे वजन कमी आहे हे सोडले तर पुस्तके वाचायला थोडे कठीण जाते.

या उलट टॅबलेट मध्ये पुस्तक वाचताना त्यात आलेले असंख्य संदर्भ सहज चाळता येतात. आताच मी "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे पुस्तक तिसऱ्यांदा वाचले परंतु पूर्वी पेक्षा आता दोन विंडो उघडून प्रत्यक्ष युद्धाचे डावपेच नकाशाच्या साहय्याने फार उत्तम रित्या समजून घेता आले.

या सॅमसंग टॅबलेट मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्भूत असल्यामुळे त्यातील एस पेन वापरून पटकन एखाद्या गोष्टीचे आकलन करता येते. हा फार मोठा फायदा. कारण कोणतेही पुस्तक बाजारात येईपर्यंत त्यातील संदर्भ बदललेले असतात. उदा. नागा प्रदेशाबद्दल किंवा नक्षलवादी चळवळी बद्दल वाचन केल्यानंतर बदललेले संदर्भ ताबडतोब समजून घेता आले.

असे वाचन करताना प्रत्यक्ष पुस्तकांपेक्षा जास्त चांगले ससंदर्भ स्पष्टीकरण मिळते याशिवाय त्या पुस्तकात असलेलं संदर्भ पुस्तक लगेचच किंडल वर डाउनलोड करून वाचता येते. गेल्या तीन महिन्यात मी १०० च्या वर वेगवेगळी पुस्तके वाचली आहेत.

हा प्रयोग अतिशय यशस्वी होतो आहे असे वाटते कदाचित आता मला परत पुस्तके विकत घ्यावी लागणार नाही असे वाटते.

दोन्ही पद्धतीत +/- आहे. ज्याला जो आवडेल त्याने तो रोमान्स करावा; वाटल्यास दोन्हीकडे करावा !
>>>> १०००+++

Pages