स्त्री-लैंगिकतेचे गूढ

Submitted by कुमार१ on 4 April, 2022 - 00:44

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शरीरशास्त्रीय ( anatomical) विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत).
.........................................................................................................

स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :

उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.

बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.

सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे एक उत्तर असे आहे : पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.

पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :

1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.

हा कळसबिंदू सरासरी ३० सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ज्यांना या बिंदूचा अनुभव उत्तम येतो त्या स्त्रियांना तो अल्पकाळात संपल्याची रूखरूखही लागते.

वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :

1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.
2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. तर काहींच्या बाबतीत शरीराचे अन्य अवयव देखील निकट स्पर्शातून चेतवावे लागतात.
3. पण काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.

या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.
stree laingik.jpg

ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !

यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.

यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.

१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही.
या द्वयीच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे असे प्रारूप तयार झाले :

लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. अशा क्रीडांसाठी द्यावा लागणारा बराच वेळ हा देखील महत्त्वाचा घटक आहे. हे सर्वच जोडप्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.

इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.

संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.

सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.

सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.

मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.

त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.
.........................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर, दोन सिनेमे इथे संकलनार्थ देते. दोन्ही अ‍ॅकडेमिक इंटरेस्टचे किंवा सत्यघटनांवर आधारीत आहेत पण लिंका हापिस-सेफ नाही.
https://youtu.be/pKgdLjDZ6ig
https://youtu.be/QhJ5-cNHSM8 (हा स्त्री-पुरूष लैंगिकतेवर आहे.)

खूपच शास्त्रीय स्वरूपाची माहिती आहे. वेळ लागतोय. तुम्ही सोपे करून लिहिले आहे. तुमची हातोटी आहेच ती. अर्धा राहिला आहे अजून..

सर्व प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
..
दोन सिनेमे इथे संकलनार्थ >>> सवडीने दुवे पाहतो.

छान लेख

स्टोरीटेल वर सेक्स वर बोल बिनधास्त अशी एक पॉडकास्ट मालिका पत्रकार व लेखक निरंजन मेढेकर चालवतात. त्या लैंगिकते चे वेगवेगळे विषय नामवंत सेक्सॉलॉजिस्ट यांच्याशी चर्चा घडवून एपिसोड दिले आहेत. डॉ प्रसन्न गद्रे, डॉ निलिमा देशपांडे, डॉ निकेत कासार, डॉ राजेंद्र साठे अशा तज्ञांशी लैंगिकतेचे वेगवेगळॆ पैलू अतिशय सुंदर मांडले आहेत. लैंगिक साक्षरतेचा प्रसार व प्रचार केल्यास समाजाचे लैंगिक आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल. र.धों. कर्व्यांनी हे काम शंभर वर्षांपुर्वी केले. त्यात त्यांना काय सोसावे लागले हे आपण समाजस्वास्थ्य मधे पाहिले आहेच.
स्टोरीटेल वर लैंगिकतेचा उत्कांती जन्य इतिहास, संस्कृती, व वैज्ञानिक संशोधन यावर निरंजन घाटे यांचे सेक्सायन हे पुस्तक देखील अप्रतिम आहे.
डॉ उर्जिता कुलकर्णी यांचे सेक्सबद्दल सारे काही या पुस्तकाचे भाग ही उत्तम आहेत.
>>>>त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. <<<<< हा तुमच्या लेखातील कळीचा मुद्दा आहे. संस्कार व अज्ञान यातून अनेक मुलींची स्त्रियांची जडणघडण या पद्धतीने घडते. यातून काही स्त्रिया पुरुषद्वेष्ट्या देखील बनतात.
हे पॉडकास्ट, पुस्तके सगळं वाचलं ऐकल्यानंतर आपले लैंगिकते विषयी ज्ञान फार ठोकळेबाज व उथळ होते असेच मला वाटले. र.धोंनाही काळाच्या मर्यादा होत्याच. असो. परत लिहिन.

धन्यवाद.
संस्कार व अज्ञान यातून अनेक मुलींची स्त्रियांची जडणघडण या पद्धतीने घडते. यातून काही स्त्रिया पुरुषद्वेष्ट्या देखील बनतात.
>>> योग्य मुद्दा. +११
....
प्राइम व्हिडिओवर “मास्टर्स ऑफ सेक्स” ही दीर्घ जालमालिका आहे. नुकतीच मी ती बघायला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत तिच्या पहिल्या मोसमातील २ भाग बघितले. विषय सुंदर हाताळला आहे.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पश्चिमी देशांमध्ये सुद्धा ‘लैंगिकतेवर संशोधन’ या विषयाची टिंगल-टवाळी होत होती. प्रसूतीशास्त्र तज्ञ असलेल्या डॉ. मास्टर्स यांना, लैंगिकता हेदेखील एक विज्ञान आहे हे रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांच्या गळी उतरवायला किती कष्ट पडले, हे त्यात दाखवले आहे. विविध लैंगिक प्रयोग, त्यासाठी त्यांनी स्वतः तयार केलेली विविध उपकरणे हा भाग कौतुकास्पद आहे. एकंदरीत मालिकेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून नग्न आणि संभोगदृश्यांची रेलचेल असणार आहे याची झलक मिळाली.

मालिका खूप मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण बघण्यासाठी वेळ देता येणे अवघड वाटते.

वैयक्तिक शरीरं सुख हे अस्तित्वात च नाही.
पुनरुत्पादन आणि सेक्स ह्याचा संबंध नसेल तर सेक्स साठी लागणारे अवयव ,सेक्शुअल भावना असूच शकणार नाहीत.

हेमंत जी , सेक्स चा निसर्गाला अभिप्रेत असलेला हेतु हा पुनरुत्पादन आहे. परंतु मानव त्याच हेतुने समागम करतो असे नाही. त्यातून त्याला शरीरसुखही मिळते. तुम्हाला असे म्हणायचे आहे की निसर्ग सेक्स ही भावना माणसात निर्माण करतो ते फक्त पुनरुत्पादन या उत्कांतीजन्य जैविक प्रक्रियेतुनच. शरीरसुख हे निसर्गाला अभिप्रेत नाही. ते बायप्रॉडक्ट आहे.
बरोबर?

एक समांतर उदाहरण देतो. निसर्गाने आपल्याला तोंडामध्ये जीभ दिलेली आहे. आता आपण जर असे म्हणालो की, जिभेचे काम म्हणजे फक्त तिच्यावर आलेला अन्नाचा घास खाली अन्ननलिकेत ढकलणे, तर ते बरोबर होईल का?

जिभेवरती काही प्रकारच्या रुचिकलिका सुद्धा दिलेल्या आहेत. अन्न खाताना त्याची चव आणि आस्वाद घेत ते खावे, असेच निसर्गाला अभिप्रेत नाही का ?

तीच गोष्ट प्रस्तुत विषयाला लागू होते. पुनरुत्पादन हा महत्त्वाचा निसर्गहेतू आहे हे बरोबर. परंतु शरीरसुख हा देखील हेतू अभिप्रेत आहे, हे माझे मत.

आजवर झालेल्या संशोधनाबाबत माहितीपूर्ण व चांगले विवेचन असणारा लेख आहे.
स्त्रियांच्या लैंगिकतेवर मानसिक व भावनिक आकर्षणाचा तर पुरुषांच्या लैंगिकतेवर शारीरिक आकर्षणाचा प्रभाव असतो असे वाचले आहे आणि ते पटण्यासारखे आहे. त्या अनुषंगाने पाहता कळसबिंदूवर सुद्धा त्याचाच प्रभाव असावा असे वाटते. त्यामुळे शारीरिक दृष्टीने केलेल्या संशोधनांचा निष्कर्ष 'अतिसुलभीकरणं' हे अपेक्षितच होते. मानसशास्त्रीय दृष्टीने ओझरते उल्लेख आलेत. लांबी रुंदी आणि ते पुढचे अल्ट्रासाउंड एमआरआय इत्यादी. हे सगळे कळसबिंदूबाबत relevent आहे का? कि शरीरशास्त्रापेक्षा याचे उत्तर मानसशास्त्रत सापडेल? असे मनात येत राहिले.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
.....
हे सगळे कळसबिंदूबाबत relevent आहे का? कि शरीरशास्त्रापेक्षा याचे उत्तर मानसशास्त्रत सापडेल?
>>>
चांगला प्रश्न. याचे उत्तर दोन्ही शास्त्रांशी संबंधित आहे. मानसशास्त्र हा फार मोठा विषय असल्याने इथे घेतला नाही; किंबहुना त्याचा बराच अभ्यास केल्याशिवाय त्यावर काही लिहिणे बरोबर नाही.

शरीररचना संदर्भात लांबी-रुंदी इत्यादी जे काही उल्लेख केले आहेत त्याचे महत्त्व सांगतो. एकंदरीत या प्रकारात अनुभवभिन्नता भरपूर आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत लैंगिक ज्ञान, उत्तम मनस्थिती, सुंदर सहजीवन... इत्यादी सर्व अनुकूल घटक असतानादेखील त्यांना कळसबिंदूचे सुख मिळत नाही. मेरीबाईंच्या संशोधनाचा रोख मुख्यत्वे अशा स्त्रियांवर होता. ( खुद्द त्याही त्यातल्याच).

शरीररचनेत मुळातच काही अंतराचे वगैरे वेगळेपण असेल, तर मग इतर अनेक घटक अनुकूल असले तरी तो मोठा अडथळा ठरतो.

छान माहितीपुर्ण लेख आणि उत्तम भाषेत नेहमीप्रमाणेच.

फोअरप्ले आणि G पॉईंटबद्दल माहीत होते. संभोगातून मिळणारा आनंद असो वा कुठल्याही प्रकारचा. तो नेहमी गिव्ह अ‍ॅण्ड टेक पद्धतीनेच द्विगुणित होतो. त्यामुळे पुरुषांनी खरे तर याची जास्तीत जास्त माहिती घ्यायला हवी. तसेच त्यांच्या जोडीदारानेही याबाबत त्यांना सांगायला हवे की नक्की काय केल्याने ती चरमसीमा गाठता येते.

वरील चर्चेतील पुनरुत्पादन हाच संभोगाचा मुख्य हेतू हा मुद्दा बिलकुल पटले नाही. बिचारे समलैंगिक संबंधांनाही याच मुद्द्यावर अनैसर्गिक आणि विकृत ठरवले जाते Sad

मला इतकेच म्हणायचे आहे .फुलं मध्ये गंध परागीकरण व्हावे म्हणून आहे.त्याच प्रमाणे सेक्स मध्ये सुख प्राप्ती ची भावना .
हेतू एकच पुनरुत्पादन.

आणि सेक्स ची उत्पती ही भावनिक आहे .सर्व अवयव कार्यक्षम असतील आणि भावना नसेल तर सेक्स होवू शकत नाही
समजा मला एकद्या स्त्री विषयी तिरस्कार आहे तर त्या स्त्री शी मी सेक्स करूच शकणार नाही .
पण दुसऱ्या स्त्री विषयी मला सेक्स करावा अशी भावना आहे .
तर मी तो यशस्वी पने करू शकतो.
अवयव सक्षम नसेल तर ती शारीरिक विकृती आहे .
शारीरिक विकृती ही सर्रास नसते .
दुर्मिळ असते.

सेक्स ची भावना आणि पुनरुत्पादन ह्यांचा संबंध आहे तो कोणी नाकारू शकत नाही
>>>>>
तो ईथे कोणीच नाकारला नाहीये,
पण
पुनरुत्पादन हा एकच हेतू असता तर चुंबन घेण्यात मजा आली नसती Happy

असो, वाचतोय ईथल्या पोस्ट ...

>> उत्तम मनस्थिती, सुंदर सहजीवन... इत्यादी सर्व अनुकूल घटक असतानादेखील त्यांना कळसबिंदूचे सुख मिळत नाही.
... संशोधनाचा रोख मुख्यत्वे अशा स्त्रियांवर...

अच्छा. धन्यवाद कुमार सर स्पष्टीकरणासाठी.

धन्यवाद.
बिचारे समलैंगिक संबंधांनाही याच मुद्द्यावर
>>> चांगला मुद्दा.

याच धर्तीवर मी अजून एक मुद्दा मांडतो. जशी मुलेमुली वयात येतात तेव्हा सर्वप्रथम कुठली कृती घडते ? तर हस्तमैथुन - एकट्याच व्यक्तीने एकटेपणी आणि स्वतःशीच मिळवलेला आनंद. आता ही सर्व प्रक्रिया निसर्गानेच दिली ना ? का दिली असावी ? घरबसल्या हस्तमैथुनाचा नैसर्गिक हेतू तर पुनरुत्पादन नक्कीच नाही. ( स्त्रीच्या मैथुनाबाबत तर हा प्रश्नच उद्भवत नाही !)

जर निसर्गानुसार पुनरुत्पादन हाच एकमेव हेतू असता, तर मग मेंदूमध्ये हस्तमैथुनाच्या सुखाची रचना करण्याचे निसर्गाला काय कारण होते ?
अन्यथा, जेव्हा फक्त भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात तेव्हाच उद्दीपन व्हावे अशी काहीतरी रचना मेंदूत झाली असती.

खूप लोकांना चुंबन घेण्यात रस नसतो.डायरेक्ट समागम करण्यात असतो .
ह्या विषयी काय मत्त व्यक्त कराल.
सेक्स वर्कर कडे लोक जातात.तेव्हा ना त्या स्त्री ल चुंबन घेण्यात रस असतो ना पुरुषाला.
सेक्स हा मानसिक आहे .
मेंदू वर अवलंबून आहे .
पण तो साध्य करण्यासाठी अवयव सक्षम हवेत ..
पण तो नंतर चा प्रश्न आहे

अहो,
भिन्नलिंगी व्यक्ती समोर हजर नसताना सुद्धा माणूस हस्तमैथुन करतो त्याबद्दल मी लिहितो आहे.
तुम्ही ठरवून गाडी रुळावरून घसरवत आहात.
अशीच पुढे घसरत नेणार असल्यास तुमच्याशी चर्चेत रस नाही.
धन्यवाद

डॉ कुमार, हा अवघड विषय तो ही मराठीत मांडण्यासाठी सर्वप्रथम अभिनंदन.
लेख माहितीपूर्ण आहेच. पण कुठेही पातळी सोडलेली नाही हे ही विशेष.

(बाकी मायबोलीवर येऊन तुम्हाला अवधी झाला आहेच तर इथला अनुल्लेख हा गुणधर्म तुम्ही काही प्रतिसाद आणि कर्त्यासोबत अनुसरावा ही सुचवणी )

अभिप्राय पूरक माहिती आणि सूचनाबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

हा अवघड विषय तो ही मराठीत मांडण्यासाठी
>>>
होय, मिश्र स्त्री-पुरुष समूहांमध्ये या विषयावर अनौपचारिक गप्पा मारताना मला या विषयावर लेखन करण्याचे महत्त्व जाणवले.

उत्तम लेख डॉक्टर..! माहितीत चांगली भर पडली.
((एक कुतुहल आहे, कदाचित अवांतर वाटल्यास माफ करा.. पण तरीही विचारतो.. समजा एखाद्या मुलीला/ स्त्रीला सेक्सनंतर लगेच पार्टनरशी बोलत किंवा कुजबुजत किंवा उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहावंसं वाटत असेल, तर ते तसं का असतं?? त्यापाठीमागे काही कारण असतं का?))

@ पाचपाटील,
कदाचित असे होत असेल. सेक्स झाल्यावर पुरुष पार्टनरचा मूड एकदम निघून जात असेल, समोरच्या स्त्रीमधील ईंटरेस्ट काही काळापुरता नष्ट होत असेल. अर्थात ही नैसर्गिक गोष्ट असावी. पण त्यामुळे त्याला सोबतच्या स्त्रीचे नॉर्मल बोलणेही इरीटेटींग वा नकोसे वाटत असेल. याला ऊपाय म्हणजे उठावे, बाथरूममध्ये जावे, फ्रेश होऊन यावे Happy

Your most powerful sexual organ is between your ears.
>>>>>>सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
रंजक आहे.

पुरुषांना पडणारीओली स्वप्ने (वेट ड्रीम्स ) आणि स्त्रियांनी झोपेत कळसबिंदू अनुभवणे, यात फरक काय आहे?

खूप छान पद्धतीने माहिती देताय कुमार सर.

पाचपाटील यांचा प्रतिसाद किती डिसेंट आहे. त्याला ऋन्मेष सर उत्तर देताहेत. असा विषय आल्यावर सर सुटतात हा अनुभव आहे. अवांतर वगैरे फाट्यावर. त्यांनी आणि त्यांना तुल्यबळ एका आयडीने आंबटशौकाचा धागा बनवण्याचा प्रयत्न चालवलाय. आवरा ओ ऋन्मेष सर !

Pages