स्त्री-लैंगिकतेचे गूढ

Submitted by कुमार१ on 4 April, 2022 - 00:44

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शरीरशास्त्रीय ( anatomical) विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत).
.........................................................................................................

स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :

उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.

बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.

सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे एक उत्तर असे आहे : पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.

पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :

1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.

हा कळसबिंदू सरासरी ३० सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ज्यांना या बिंदूचा अनुभव उत्तम येतो त्या स्त्रियांना तो अल्पकाळात संपल्याची रूखरूखही लागते.

वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :

1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.
2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. तर काहींच्या बाबतीत शरीराचे अन्य अवयव देखील निकट स्पर्शातून चेतवावे लागतात.
3. पण काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.

या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.
stree laingik.jpg

ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !

यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.

यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.

१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही.
या द्वयीच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे असे प्रारूप तयार झाले :

लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. अशा क्रीडांसाठी द्यावा लागणारा बराच वेळ हा देखील महत्त्वाचा घटक आहे. हे सर्वच जोडप्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.

इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.

संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.

सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.

सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.

मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.

त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.
.........................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीसाठी धन्यवाद.
>>> कामजीवनाला जीवनशैलीचं ग्रहण>>> लेख आवडला व पटला. त्यात लैंगिक ताठरता आणि हृदयाचे आरोग्य ही नवी माहिती मिळाली

पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे.
Ok म्हणजे स्त्रीची सृजन शक्तीच तुम्ही काढून घेताय!

हा संदर्भ : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3894744/

In men, orgasms are under strong selective pressure as orgasms are coupled with ejaculation and thus contribute to male reproductive success. By contrast, women's orgasms in intercourse are highly variable and are under little selective pressure as they are not a reproductive necessity.
........
तुमचा उत्क्रांतिवाद >> 'माझे' काही नाही. वैज्ञानिकांचे मत आहे ते.
अन्य मते वेगळी असू शकतात.

स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता तिच्या बीजांडामुळे आहेच. मुद्दा हा आहे की,
सृजनासाठी स्त्रीला उत्कट बिंदू येण्याची गरज नाही.
पुरुषाला मात्र तो आला नाही तर सृजनासाठी आवश्‍यक असलेले शुक्राणू उपलब्ध असणार नाहीत.

सर्वांना धन्यवाद .
........
वरील चर्चेत अशी सूचना आलेली आहे की स्त्रीच्या मानसिक अवस्थेचा कळसबिंदूशी असलेल्या संबंधावरही विवेचन व्हावे. त्यानुसार या विषयाचे काही प्राथमिक वाचन केले.
विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. तूर्त काही महत्त्वाचे मुद्दे :

लैंगिकक्रिये साठी सहज उत्तेजित होणे आणि त्यातूनच पायरीपायरीने कळसबिंदूस पोचणे अशी एकंदरीत प्रक्रिया आपण पाहिली आहे. यासंदर्भात स्त्रियांची ढोबळमानाने दोन गटात विभागणी करता येईल :

A. बिंदूचे सुख मिळण्याची अधिक शक्यता खालील प्रवृत्तीच्या स्त्रियांमध्ये आढळते :
१. स्व-मादकतेची जाणीव
२. आत्मविश्वास व धिटाई
३. दुसऱ्यावर वचक ठेवणारा स्वभाव
४. इतरांचे लक्ष आपल्याकडे नेहमी वेधले जाईल या अनुषंगाने केलेले आकर्षक राहणीमान
५. संभोगातून मिळणाऱ्या आनंदानुभावाची नित्य उत्सुकता

B. या उलट दुसर्‍या गटामध्ये बिंदूचे किंवा एकंदरीतच संभोग प्रक्रियेचे सुख मिळण्याची शक्यता कमी राहते. त्या स्त्रियांची स्वभाववैशिष्ट्ये अशी असतात :
१. सतत चिंता/ काळजी करणे
२. निराशावादी वृत्ती आणि ताणतणाव सहन करण्याची क्षमता कमी असणे
३. संभोगाबद्दल तिरस्काराची भावना
४. प्रत्यक्ष क्रियेदरम्यान कौशल्याचा अभाव
५. जोडीदारा संबंधी मनात असणाऱ्या अप्रीति, राग इत्यादी भावना.

प्रतिसाद देणार नव्हतो तरी देतो.
तुम्ही क्रम चुकवलात.
Exa
गाडी पूर्ण तयार केली आहे.पॉवर फुल इंजिन,tubeless tyre, प्रखर हेड लाईट.
गाडीचे acceleration (kiti वेळात किती वेग पकडेल) average .
सर्व काही.
सर्व अती उत्तम आहे.
पण .
इंजिन स्टार्ट होण्यासाठी इंधन नी पेट घेण्यासाठी स्पार्क होणे गरजेचे असते.
खूप लहान घटना वाटत असेल पण खूप महत्वाची असते.
स्पार्क नाही इंजिन सुरू होणार नाही.
तुमच्या सर्व गुण संपन्न गाडीचा काही उपयोग नाही.
सेक्स चे पण तसेच आहे .
मेंदू मध्ये सेक्स ची ईच्छा निर्माण होत नाही तो पर्यंत सेक्स शी सबंधित कोणत्याच अवयव ना काही किंमत नाही.

मेंदू मध्ये सेक्स ची ईच्छा निर्माण होत नाही तो पर्यंत सेक्स शी सबंधित कोणत्याच अवयव ना काही किंमत नाही.

>> १. रेप होत असतानाही सेक्स होतो. त्यावेळी स्त्रीच्या मनात काय भावना असतात? त्यांच्या मनात सेक्स ची भावना असते का? ती नसल्याने सेक्स व्हायचा राहतो का?

२. सेक्स वर्कर्स च्या मनात प्रत्येक क्लाएंट विषयी भावना निर्माण होत असतील का? नसतील होत तर त्याने सेक्स व्हायचा राहतो का?

वरील प्रश्नांची उत्तरे स्त्रीच्या दृष्टिकोनातून द्या. कारण धाग्याचा विषय स्त्री लैंगिकता हा आहे. वरील दोन्ही केसेसमध्ये पुरुष उद्दीपित होता हे सांगू नका.

तर तुम्ही म्हणताय तो सो कॉल्ड स्पार्क स्त्रीच्या बाजूने नसतानाही सेक्स झाला त्यामुळे कृपया इथे 'सेक्सची भावना' याचा केवळ एक aspect म्हणून कुमारजी विचार करत आहेत तसा त्यांना करू द्यावा. कारण किमान पहिल्या केस मध्ये स्त्री च्या मेंदूत तुम्ही म्हणताय तसे न होऊनही तिच्या सेक्स संबंधित अवयवांना महत्व आलेले आहे.

इति लेखनसीमा.

अवांतर : रेप होत असताना / झाल्यावर स्त्री कळसबिंदू ला पोहचू शकते का? Orgasm या अर्थाने? की कळसबिंदू ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच बाब आहे? स्त्रीच्या consent ने सेक्स झाला तरच तिथपर्यंत पोचता येते? याविषयी काही संशोधन झाले आहे का?

बलात्कार होत असताना / झाल्यावर स्त्री कळसबिंदू ला पोहचू शकते का? Orgasm या अर्थाने?
>>>
हा चांगला प्रश्न आहे. त्याचे उत्तर होय असे आहे
या संदर्भात काही संशोधन झालेले आहे. एक चांगले पीडीएफ मी वाचत आहे. ते पूर्ण वाचून झाल्यानंतर त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहीन

बलात्कार >>>
लैंगिक क्रियेने उत्तेजित होण्यासाठी चेतासंस्थेत दोन प्रकारच्या यंत्रणा असतात :
१. उत्तेजन वाढवणाऱ्या आणि
२. ते दाबणाऱ्या.
यापैकी कुठली यंत्रणा प्रभावी असावी हे व्यक्तीसापेक्ष आहे. ज्या स्त्रीत उत्तेजन दाबणारी यंत्रणा दुबळी असते, तिच्या बाबतीत बलात्काराच्या दरम्यानसुद्धा लैंगिक उत्तेजना होते आणि कळसबिंदू येऊ शकतो.

दोन महत्त्वाच्या संशोधनांमध्ये अशा केसेस मध्ये कळसबिंदु येण्याचे प्रमाण ४ ते ५ टक्के असे नोंदवले आहे. परंतु या आकडेवारीमध्ये एक महत्त्वाची गोची आहे. मुळात अशी निंद्य आणि भयंकर घटना घडल्यानंतर संबंधित स्त्री मुलाखत द्यायला उत्सुक नसते. समजा, दिलीच तर ती बऱ्याच वेळा प्रश्नांची खरी उत्तरे देत नाही. किंबहुना, कळसबिंदू वगैरे काहीही झाला नाही असे उत्तर देणे तिला अधिक सोयीचे वाटते.

हे वर जे काही सगळे लिहिले आहे त्यामध्ये मेंदूच्या दुय्यम भागातली (sub-cortical) यंत्रणा कार्यरत राहते. त्यामुळे मेंदूची सर्वोच्च केंद्रे (cortex) जरी अशा प्रसंगात फारशी काम करत नसली तरी खालच्या पातळीवर केंद्रांमधून पुढच्या सर्व घटना नियंत्रित केल्या जातात.

या सर्व संशोधनाचा अशा संदर्भातील न्यायालयीन खटल्यांमध्ये चांगला उपयोग होत असतो.
विषय खूप मोठा असल्याने इथे थांबतो.

पुरुष पेक्षा खूप च वेगळं स्त्री बाबत घडतं .स्त्री आणि पुरुष मध्ये हा फरक आहे .पुरुषांना ईच्छा नसेल किंवा एकध्या स्त्री विषयी तिरस्कार असेल तर पुरुष ना उत्तेजना येत नाही(सरासरी .काही अपवाद असू शकतात)

धाग्याच्याच विषयावर एक मराठी पुस्तक नव्याने प्रकाशित होत आहे.
इच्छुकांसाठी त्याच्या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण :

agabaee book.jpg

>>> एकध्या स्त्री विषयी तिरस्कार असेल तर पुरुष ना उत्तेजना येत नाही(सरासरी .काही अपवाद असू शकतात)>>> बलात्कार ????

मास्टर्स ऑफ सेक्स मालिकेचा 12 भागांचा पहिला मोसम बघून संपवला. केवळ सुंदर ! अतिशय उत्कृष्ट चरित्रपट मांडला आहे. मालिकेत दाखवलेले संशोधन मूळ संशोधनाच्या बऱ्यापैकी जवळ जाणारे असावे असे वाटते.

1960 च्या दशकातली अमेरिका छान चितारली आहे. जेव्हा डॉ. मास्टर्स चित्रफितीसह हा विषय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्‍टरांसमोर सादर करतात त्या सभेतच कुलगुरू त्यांच्यावर उखडतात, “हे योग्य नाही, अश्लील आहे. इथे बायकाही बसलेल्या आहेत” वगैरे. या सर्वाची परिणती डॉक्टर मास्टर यांची हॉस्पिटलमधून हकालपट्टी होण्यात होते.

मास्टर्स ऑफ सेक्स पहिला मोसम चांगला वाटला होता. पण पुढचे मोसम फार रटाळ वाटले. त्यात मूळ कथा सोडून त्यांच्या वैयक्तिक प्रेमकथेवर भर दिल्यामुळे मी ते भाग पुढे पळवले आणि मधूनच बघणे सोडून दिले. पहिला मोसम आवडला एवढे मात्र खरे.

पहिला मोसम चांगला वाटला होता. पण पुढचे मोसम फार रटाळ वाटले >>> +१११

पटले. सध्या मी पण ती पाहणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नंतर वाटलं तर बघू.

सामि त्या सिनेमात सुरेश ओबेरॉय आहे का? अलिकडचा आहे सिनेमा की जुना आहे?

मी मध्य प्रदेशात गेले होते दोन आठवड्यांपुर्वी खजुराहोची मंदिरे बघून आले. सोबत गाईड बाई होती. ती मला मंदिर दाखवता दाखवता सांगत होती. कामवासनेच्या इतक्या वेगवेगळ्या पद्धती आहेत की वेगवेगळ्या वयात किंवा वेगवेगळ्या स्त्रि पुरुषांना संभोग करताना वेगवेगळ्या पद्धती मानवत असाव्यात. माझ्या सोबत एक फ्रेन्च कपल होते. ते लगेचं उत्तरले - यस यस नो डाउब्ट.

वैद्यकीय अभ्यासक्रमात फक्त योनीद्वारे होणाऱ्या संभोगाला नैसर्गिक व इतर लैंगिक क्रियांना अनैसर्गिक संबोधले जात होते. आता यापुढे असे वर्गीकरण करता येणार नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमातील ‘एलजीबीटी’ समुदायाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. वैद्यक आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अरुणा वाणीकर यांनी त्या अनुषंगाने एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. यात डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. विजेंद्रकुमार (दिल्ली), डॉ. प्रभा चंद्रा (बंगळूरू) व डॉ. सुरेखा किशोर (गोरखपूर) या तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने ‘अनैसर्गिक’बाबतचा आपला अहवाल दिला आहे.

https://www.loksatta.com/maharashtra/national-medical-commission-removed...

धन्यवाद.
चांगली माहिती. समितीच्या चर्चा चालू असल्याचे मध्यंतरी कानावर होते

दोन वर्ष लिव्हइनमध्ये राहून त्यांनी नुकतीच आत्ता एंगेजमेंटही केलीय. स्वागत करूया लीना नायर आणि ऋजुता जामगावकरचं! अतिशय उत्तम मुलाखत आहे एक वेगळाच पैलू आपल्या नजरेसमोर येतो.
https://www.storytel.com/in/en/books/sex-var-bol-bindhast-s03e09-1710186

योगायोग !
@ प्र घा
नुकताच तुम्ही वरील संदर्भ दिला होतात.
आज मी प्राईम व्हिडिओवर नव्याने आलेली Modern लव्ह मुंबई ही कथामालिका पाहण्यास सुरुवात केली. त्यातील दुसरी ‘बाई’ नावाची कथा समलैंगिक पुरुषांच्या प्रेमाबद्दल असून त्यात त्या दोघांचा विवाह झालेला दाखवला आहे.

कथा तरल आहे.

जरा अवांतर, पण लैंगिकते संदर्भात असल्याने इथे लिहितो.

"चुंबन घेणे हा लैंगिक गुन्हा नाही! ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण, आरोपीला जामीन मंजूर"

https://www.loksatta.com/mumbai/kissing-fondling-not-unnatural-bombay-hc...

नक्की काहीतरी असणार त्या खटल्यात, जे बातमीत आलेलं नाही. चुंबन घेणे हा गुन्हा नाही, पण इथे प्रश्न कन्सेंटचा आहे. त्या मुलाच्या मनाविरुद्ध ते कृत्य असेल तर तो गुन्हा नाही का? की हे परस्पर-संमतीने झालेले कृत्य होते आणि लक्षात आले तेव्हा वडिलांनी तक्रार दाखल केली?

बरोबर.
बातम्यांमध्ये बर्‍याचदा अर्धवट माहिती असते.

Pages