स्त्री-लैंगिकतेचे गूढ

Submitted by कुमार१ on 4 April, 2022 - 00:44

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शरीरशास्त्रीय ( anatomical) विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत).
.........................................................................................................

स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :

उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.

बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.

सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे एक उत्तर असे आहे : पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.

पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :

1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.

हा कळसबिंदू सरासरी ३० सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ज्यांना या बिंदूचा अनुभव उत्तम येतो त्या स्त्रियांना तो अल्पकाळात संपल्याची रूखरूखही लागते.

वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :

1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.
2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. तर काहींच्या बाबतीत शरीराचे अन्य अवयव देखील निकट स्पर्शातून चेतवावे लागतात.
3. पण काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.

या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.
stree laingik.jpg

ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !

यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.

यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.

१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये डॉ. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही.
या द्वयीच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे असे प्रारूप तयार झाले :

लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.

स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. अशा क्रीडांसाठी द्यावा लागणारा बराच वेळ हा देखील महत्त्वाचा घटक आहे. हे सर्वच जोडप्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.

इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.

संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.

सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.

सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.

मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.

त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.
.........................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रीच्या इंद्रियाच्या आकाराबद्दल विचारत आहे
>>>
शिस्निकेच्या ताठरपणाबाबत संशोधकांमध्ये दुमत आहे :

१.काहींच्या मते त्या अवयवात ताठर होणारे स्नायू नाहीत.

२. ज्यांच्या मते आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार घटना अशा घडतात :
ताठरता >> रक्तप्रवाह वाढून कंजेशन होणे>> चेतातंतूना संदेश आणि उत्कटबिंदू .

यावरून एक लक्षात येते की त्या अवयवाच्या मूळ आकाराला महत्व नसून लैंगिक चेतावणी दरम्यान ते किती मोठे होऊ शकते याला अधिक महत्त्व आहे.

कित्येक लोकं तर याच न्यूनगंडाने पछाडलेले असतात.
>>>
होय. याला कारण म्हणजे अशास्त्रीय लैंगिक साहित्य आणि दृश्यपटांमधून दाखवले जाणारे अतिरंजित प्रकार !

चांगला लेख आणि संयमित प्रतिक्रिया. हेमंतसरांना वाळीत टाकले ते योग्य वाटले नाही. त्यांचे मुद्दे खरोखर विचार करण्याजोगे आहेत आणि चर्चेस पूरक आहेत.

उपाशी बोका
प्रत्येक प्रतिसादात हा अज्ञानीपणाचा कळस आहे, संशोधकांना काय कळते, सर्व्हे करणार्‍यांना संशोधक कसे म्हणायचे ?, कुमार सरांकडे काहीच माहिती नाही , अमूक विषयावर काय चर्चा करता तमूक विषयावर करा. हा मुख्य विषय नाही तो मुख्य विषय आहे अशा छापाच्या प्रतिसादांना तुमचा पाठिंबा आहे काय ?
(मत मांडले म्हणून कुणीच वाळीत टाकत नाही).

खूप मुद्देसूद आणि टॅबू विषया वर ची चर्चा आणि काही प्रतिसाद खूप अभ्यासपुर्ण आहेत.
स्त्री सभासदांचे प्रतिसाद बघून छान वाटले Happy

आपल्या एकुणच समाजाची रचना व सांस्कृतिक जडणघडण अशी करून ठेवली आहे की स्त्रीला सेक्शुअली फुलेस्ट किंवा समृद्ध जगताच येऊ नये
>>>>>

+७८६
सेक्शुअली फुलेस्ट किंवा समृद्ध यावरून आठवले,
एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत परस्परसंमतीने संबंध ठेवणार्‍यांनाही आपल्या समाजात, संस्कृतीत कॅरेक्टरलेस समजले जाते.

संजय दत्तचा एक पिक्चर होता, झिंदा नावाचा. त्यात त्याचे अपहरण करतात आणि बारा-पंधरा वर्षांपर्यंत त्याला एका कोठडीत डांबून ठेवतात. आणि रोजच्या रोज निव्वळ हॉटडॉग नावाचा एकच पदार्थ खाऊ घालतात. कल्पनाही करवत नाही की आपल्यावर अशी वेळ आली तर रोजच एक पदार्थ कसे काय खाऊ शकू. भले मग तो कितीही आवडीचा का असेना.

सेक्सबाबतही आपल्याकडे हेच अपेक्षित ठेवले जाते. एकच पार्टनर आयुष्यभरासाठी. मग तो जो काही बारीक-जाडा-काळा-गोरा-ऊंच-बुटका मिळेल तोच आयुष्यभर चालवावा. नो व्हरायटी. भले नैसर्गिकरीत्या फिलींग्स एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल आल्या तरी ती प्रेरणा दाबूनच जगा.
हो, त्यातल्या त्यात लहानपणापासून याच संस्कारांचा मनावर पगडा असल्याने आपले विचारही तसेच झाले असतात. त्यामुळे हे नियंत्रण जमते बहुतांश जणांना. ज्यांना जमते ते आदर्श झाले. ज्यांना नाही जमत ते समाजाच्या दृष्टीने वाह्यात झाले. कदाचित ही पोस्टही काहीजणांना तशीच वाटेल Happy

अर्थात हे स्त्री-पुरुष दोघांनाही लागू असले तरी यातही एक भेद आहेच. म्हणजे एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणार्‍या पुरुषाला समाज एकवेळ चालवून घेतो. पण तेच स्त्रियांनी केले तर आदर मिळवणे आणखी अवघड होऊन जाते.

सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !

भले नैसर्गिकरीत्या फिलींग्स एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल आल्या तरी ती प्रेरणा दाबूनच जगा. >>> +११

Hemant 33 तुमचे प्रतिसाद हा लेख कसा चुकिचा आहे असे लिहित आहात . तुम्ही कुठेहि ही माहिती तुम्हाला कशी मिळाली ते लिहिले नाही . हे मुद्दाम चुकीची माहीती पसरवण्याचे प्रयत्न थांबवा. तुमचे सगळे प्रतिसाद अप्रकाशित केले आहे. सहकार्याची अपेक्षा .

स्त्रियांमध्ये पण छोटीशी प्रोस्टेट असते >>

मागील पानांवर स्त्रियांच्या द्रवस्खलनाबद्दल मी लिहिले आहे. हा विशिष्ट द्रव अनेक छोट्या ग्रंथींमध्ये तयार होतो. त्या ग्रंथी मुत्रछिद्राच्या आसपास विखुरलेल्या असतात. त्यांना एकत्रितपणे “बायकांची प्रोस्टेट” असे टोपण नाव काही वैज्ञानिकांनी दिले आहे.

अन्य काही जण त्यांना Skene किंवा 'क्ष' ग्रंथी असेही म्हणतात. या विषयावर एक स्वतंत्र पुस्तकही निघालेले आहे आणि जालावर अशा संशोधनाचे पीडीएफ उपलब्ध आहे.
https://www.amr-seminar.org/seminar/76/Zaviacic%20Female%20prostate.pdf

चांगली चर्चा होतेय इथे. सीमंतिनी, देवकी यांचे प्रतिसाद , बाकीचेही नवीन माहिती देणारे आहेत.

भले नैसर्गिकरीत्या फिलींग्स एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल आल्या तरी ती प्रेरणा दाबूनच जगा.
हो, त्यातल्या त्यात लहानपणापासून याच संस्कारांचा मनावर पगडा असल्याने आपले विचारही तसेच झाले असतात.>>> +११

खरंच आहे. एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर राहणे हे एका पॉईंटला खरंच बोअरींग वाटू शकते. फक्त सेक्सच्या गरजेसाठीच नाही, overall सगळ्याच बाबतीत. त्यामुळे आपल्याकडे दर पाच वर्षांनी नवीन पार्टनर शोधायची काही योजना असती तर कसं झालं असतं असं वाटतं कधी कधी Lol . आधीच्या पिढ्यांना जमून गेलं ते कायम एकत्र राहणं पण आताच्या गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत. असो. हा विषयच वेगळा आहे.

समारोप:
अभिप्राय, पूरक माहिती आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्व सहभागी मंडळींचे आभार !

लैंगिक जागरुकता या उद्देशाने हा लेख लिहिला. या नाजूक विषयाबद्दल आपण सर्वांनी केलेली चर्चा रंजक आणि माहितीप्रद होती.

आपणा सर्वांना दीर्घकाळ उत्तम लैंगिक आरोग्यसुख लाभो !

अतिशय सुंदर आणि अभ्यासपुर्ण लेख , संयत प्रतिसाद कुमार सर,लेख आणि बहुतांश प्रतिसाद वाचताना खूप छान माहिती मिळाली,

>>>>आणि जालावर अशा संशोधनाचे पीडीएफ उपलब्ध आहे.>>> ह्या लिंक मध्ये छान माहिती मिळाली. धन्यवाद
जरा अवांतर विचारतो
स्त्रियांच्या समलैंगिकते मागे कोणते जीवशास्त्रीय घटक असतात?

धन्यवाद.
....
स्त्रियांच्या समलैंगिकते मागे कोणते जीवशास्त्रीय घटक असतात?

>>>
मुळात (स्त्री अथवा पुरुष) समलैंगिकता का निर्माण होते हा गहन प्रश्न आहे. त्याचे ठाम असे उत्तर सापडलेले नसल्याने विविध जैविक थिअरीज मांडल्या गेल्या आहेत :
१. व्यक्तीच्या X गुणसूत्रावरील डीएनए संबंधित विशिष्ट रचनेतील भेद.
२. गर्भावस्थेत असताना आईच्या हार्मोन्सचा झालेला कमी अधिक प्रभाव.

तूर्त एवढेच म्हणता येईल.

https://www.sciencealert.com/case-study-shows-it-s-possible-to-orgasm-th... >>>
इथे जी केस दिली आहे ती अन्य काही दुव्यांवरही आहे. (https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2050116122000095#bib0025).
त्या स्त्रीने योग आणि अन्य काही तंत्राच्या साह्याने अशाप्रकारे बिंदूचे सुख अनुभवले आहे.

या संदर्भात पूरक माहिती :
स्त्रीचा कळस बिंदू दोन प्रकारे येऊ शकतो:
१. जननेंद्रिय, स्तनाग्रे किंवा शरीराचे अन्य अवयव चेतवल्यामुळे

२. लैंगिक स्पर्शाविना चेतावणी. याची विविध कारणे अशी :
a. स्वतः कल्पनाविलास करून लैंगिक भावनांनी युक्त अशी प्रतिमासृष्टी मनात उभी करणे.
b. काही स्त्रियांना स्वप्नात बिंदूचे सुख मिळालेले आहे.

c. एक केस अशी वाचण्यात आली की जिच्यात असे कुठलेही विचार मनात न आणता देखील जननेंद्रिये चेतवली जात होती (वाहनातून प्रवास करताना जाणवलेल्या स्पंदनांमुळे). त्यानंतर उत्कटबिंदू यायचा परंतु त्यानंतरही ‘मोकळे’ झाल्याची भावना झाली नाही. उलट असे सातत्याने घडत राहिल्याने तो त्रासच वाटू लागला. आता हे मात्र निरोगी सदरात मोडत नाही. इथे संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
अशा प्रकारचे काही लैंगिक आजार असतात.

अशा प्रकारचे काही लैंगिक आजार असतात. >> Grey's Anatomy मालिकेत अशी एक Persistent genital arousal disorder (PGAD) ची केस दाखविली आहे.
ही हार्मोनल डिसॅार्डर असते का?

PGAD >>>
नाही. हार्मोन्सचा बिघाड नसतो. परंतु खालीलपैकी काही कारणांमुळे तो आजार होऊ शकतो :

1. मेंदू अथवा ओटीपोटातील चेतातंतू अतिसंवेदनक्षम असणे
2. संबंधित रक्तवाहिन्यांचे कंजेशन
3. मानसिक ताणतणाव
4. नैराश्यावरील औषधांचे दुष्परिणाम
5. मूत्राशयाची अवाजवी कार्यक्षमता

@कुमार हे खूप मागे आहे trust me हे अनादी काळापासून आहे,का? मला माहित नाही,यावरही वाद हो शकतो
धर्म उदयाला आले त्या पूर्वी एकच गोष्ट होती स्त्री आणि पुरुष

प्रीती,रती, शृंगार, प्रणय या उत्तम वैवाहिक सहजीवनाच्या पायऱ्या लुप्त होऊन सेक्स ही फक्त उरकून टाकण्याची गोष्ट होत चालली आहे का, अशी शंका यावी असा अनुभव अनेकांना येतो आहे. याचं कारण ठरते आहे ती बदलती जीवनशैली. बिंज ड्रिंकिंग, कामातील, जगण्यातले वाढते ताणतणाव, बाहेरचं खाणं, व्यायामाचा अभाव, झोपेचं विस्कटलेलं चक्र, यामुळे वाढलेले शारीरिक-मानसिक आजार, याशिवाय समाजमाध्यमं, पॉर्न साइट्स, गेमिंग अ‍ॅप्स आणि ओटीटी प्लॅटफॉम्र्समुळे आभासी विश्वात रमण्याचं वाढतं प्रमाण, याचा थेट परिणाम जोडप्यांच्या कामजीवनावर पडतो आहे. तो कसा, या विषयीचा विविध तज्ज्ञांशी बोलून घेतलेला हा निरंजन मेढेकर यांनी घेतलेला धांडोळा..

कामजीवनाला जीवनशैलीचं ग्रहण

सहमत आहे प्रकाशजी,
मागे मी सुद्धा एका धाग्यात हे निरीक्षण नोंदवलेले.
https://www.maayboli.com/node/73059
आधुनिक आणि प्रगत मनुष्य प्रजननशक्ती गमावतो आहे का?

कामजीवनाला जीवनशैलीचं ग्रहण
>>>
लेख वाचला. सुरेख आढावा.

आज सकाळी मला असे वाटले होते की आतापर्यंत या धाग्यावर सर्व इच्छुक मंडळी येऊन गेली आहेत आणि चर्चाही पुरेशी झाली आहे. म्हणून मी समारोप करून टाकला होता. परंतु त्यानंतरही लोक येत आहेत आणि या विषयाचे नवे पैलू समोर येत आहेत याचा आनंद वाटतो.
सर्वांना धन्यवाद !

उत्तेजीत होणे आणि संतुष्ट होणे ह्या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत आणि दोन्ही शब्दांचा अर्थ पण वेगळा आहे.
असे मला वाटत.
Bule film बघताना पुरुष खूप उत्तेजीत होतात.
स्त्रिया पण होत असाव्यात.
पण जास्त उत्तेजीत होणे = शीघ्र पतन
असे सूत्र मांडता येईल.
इथे संतुष्ट माणूस होईल च असे सांगता येत नाही.
पण सेक्स ची क्रिया पुर्ण होण्यासाठी उत्तेजीत होणे पण गरजेचे आहे.
ती प्राथमिक गरज आहे.
Dr नक्की कसे balance मत व्यक्त करता येईल ह्या वर.
थोडक्यात .
भावनिक होणे आणि भावना विवेश होणे .
ह्या मधील सीमा रेषा जशी सांगता येत नाही तस काही तरी.
मला नक्की योग्य शब्दात मांडता येत नाही.

धन्यवाद.
Grey's Anatomy ही मालिका कुठल्या ओटीटी प्रकारावर असते ?>>> नेटफ्लिक्सवर ही मालिका आहे. २००५ ला सुरू झाली. आता १८वा सीजन चालू आहे.

Dr नक्की कसे balance मत व्यक्त करता येईल ह्या वर.
>> मुद्दा समजला. मला असे वाटते :
१. नीलफित पाहताना : उत्तेजना + कल्पनाविलास ही पातळी येते.

२. स्वतः प्रत्यक्ष लैंगिक कृती करताना उत्कट बिंदूस पोचल्यावर : आनंद + सुख + तृप्ती + समाधान या सर्व भावनांचे जे काही मिश्रण होते ते मेंदूत नोंदले जाते.
...

सोनाली, धन्यवाद.
मग मला नाही पाहता येणार..

Pages