भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्कृत आणि अन्य भाषा यांचा तौलनिक अभ्यास केलेल्या आणि 'इंडो युरोपीय भाषाकुल’ हे नाव देणाऱ्या विल्यम जोन्स यांच्यावर एक चांगला लेख:

https://www.loksatta.com/vishesh/sanskrit-and-other-languages-comparativ...

निमित्त की निमित्य? वाक्यात उपयोग करतांना, "निमित्ताने' की "निमित्त्याने" बरोबर?
आमचे एक प्रवचनकार बोलता बोलता 'निमित्याने' अस म्हणतात .. मला ते लगेच कानाला खटकतं.

२०२२ : आगामी

‘भाषासूत्रे’ हे नवे सदर २०२२ मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘विचार’ पानावर असेल.
ते आकाराने छोटेसेच असले तरी यास्मीन शेख (लिखित वाक्यरचना) , भानू काळे (शब्दांची व्युत्पत्ती), डॉ. माधवी वैद्य (म्हणी), डॉ. नीलिमा गुंडी (वाक्प्रचार), डॉ. निधी पटवर्धन / सायली कर्लेकर (पर्यायी मराठी शब्द) असे कसलेले सूत्रधार हे भाषासूत्र कथन करणार आहेत.

https://www.loksatta.com/mumbai/reading-tourism-of-rich-regions-editoria...

स्वागत आणि प्रतीक्षा !

मराठी लेखनात जेव्हा आपण स्त्रीला संबोधित करतो, तेव्हा अगं असे बहुसंख्य वेळेला लिहिले जाते.

अगं या शब्दात ग वर अनुस्वार देणे चूक आहे; त्याची गरज नाही.

ही रोचक माहिती वाचा भाषापंडित यास्मिन शेख यांच्याच शब्दात इथे:

https://www.loksatta.com/navneet/frequent-mistakes-in-writing-and-speaki...

“Quarantine”

गेली दोन वर्षे हा शब्द बहुचर्चित आहे. त्या शब्दाची व्युत्पत्ती, इतिहास आणि बदलते अर्थ रंजक आहेत. म्हणून या विषयावर जरा वाचन केले. त्यातील काही टिपणे :
Quarantineकडे जर आपण शब्दशः पाहिले तर त्याचा अर्थ निव्वळ ४० दिवस इतकाच होतो.

१. पंधराव्या शतकात या शब्दाचा मूळ अर्थ, ‘जिथे जीझसने चाळीस दिवसांचे उपवास केले ती जागा, असा होता.

२. पुढे सोळाव्या शतकामध्ये त्याचा वापर एका वेगळ्याच कारणासाठी होत असे. एखादा पुरुष वारल्यानंतर त्याच्या विधवेला त्या कुटुंबातील ठराविक आर्थिक हिस्सा मिळवून दिला जाई. ती सर्व प्रक्रिया 40 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागे. ती होईपर्यंत त्या विधवेला वडिलोपार्जित घरात राहण्याचा हक्क असे.

३. पुढे सतराव्या शतकात ‘40 दिवस’ हा अर्थ पक्का झाला. परंतु हे दिवस ठराविक शिक्षा किंवा सेवा देण्यासाठी असायचे. (‘lent’ चे उपवास ४० दिवस असतात).

४. आधुनिक काळातील या शब्दाच्या छटा पाहता त्याचा अर्थ फ्रेंच इटालियन या दोन्ही भाषांतून मिळून जन्मलेला दिसतो. जेव्हा प्लेगची साथ संपूर्ण जगभर जोरात होती त्याकाळात इटलीत प्रथम त्याचा वापर रोगसंसर्ग टाळण्यासाठी लोकांच्या हालचालींवर घातलेले निर्बंध असा होता. सुरुवातीस असे निर्बंध(विलगीकरण) फक्त ३० दिवस होते (trentino = ३०)
पुढे कालांतराने बहुदा धार्मिक कारणांसाठी 30 चे 40 करण्यात आले.

५. सन १८०४ मध्ये या शब्दाचे क्रियापद सुद्धा निर्माण झाले आणि त्याचा वापर संसर्गजन्य आजार वगळता इतर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला. जसे की, आर्थिक किंवा राजकीय बहिष्कार, सामाजिक विलगीकरण, इ.

मुद्याचा/गुद्यामुळे

वरील लेखनामध्ये काय चूक झाली आहे ते लक्षात येते आहे का? बऱ्याच जणांकडून ती होऊ शकते

यासंबंधी इथे वाचा :
https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/remember-the-meaning-of-...

जानेवारीपासून यास्मिन शेख
यांचे हे चांगले सदर सुरू झालेले आहे.

हे " माझ्या वाट्याला जाऊ नका," हल्ली मालिकांमध्ये ऐकू येतं.
मी तुझी मदत करतो हे तर राजमान्य होऊ घातलंय. मायबोलीवरपण नको तिथे डोकं फोडलं होतं यावरून.

तुझी मदत मला पूर्वी खटकायचे. आता वाचले तर एक दोन क्षण लागला लक्षात यायला. बहुतेक अलीकडे मी सुद्धा "तुझी मदत" असे वापरले असेल.

"तुझे धन्यवाद" (तुला ऐवजी) असे ही खूप वापरात दिसते आता.

व्हॉट्सऍप वापरा पासून मी गुगल कीबोर्ड वापरू लागलो, त्यात इंग्रजी अक्षर टाइप करून मराठी शब्द तयार होतो, तो निवडतो. यामुळे मग बऱ्याच चुका होतात, ऱ्हस्व दीर्घाच्या तर हमखास. (काही माहीत/आठवत नसूनही होतात त्या वेगळ्याच.)

अजून एक शब्द: निक्षून ऐवजी कटाक्षाने हा शब्द वापरलेला बऱ्याचदा दिसतो, मी सुद्धा त्या अर्थाने वापरला आहे, पण जेव्हा वापरला तेव्हा ते खटकले.
कटाक्षाने याचा अर्थ निक्षून असा खरंच आहे का?

यावरून एक प्रश्न - 'तुला शुभेच्छा' हे बरोबर आहे का? शुभ 'इच्छा' ही केली जाते किंवा व्यक्त केली जाते. इच्छा कुणाला दिली जात नाही. त्या अर्थाने 'माझ्याकडून शुभेच्छा' - हे जास्त बरोबर वाटतं.

मानव
कटाक्षचा हा पण एक अर्थ दिलेला आहे :

कणखरपणा; सोशिकपणा; (श्रम वगैरेचा) काटकपणा. [सं. काष्ठ + अक्ष = आंस; प्रा. कट्ट + अक्ष?]
दाते शब्दकोश
*लाक्षणिक अर्थाने hardiness असे पण आहे.

निक्षूनची अर्थछटा वेगळी आहे, बरोबर.

ह पा
माझ्याकडून शुभेच्छा' - हे जास्त बरोबर वाटतं.
+१११

कटाक्षाने टाळणे, पाळणे

आणि निक्षून सांगणे
असेच प्रयोग पाहिले आहेत.
निक्षूण-न—क्रिवि. स्पष्टपणें; उघडपणें; हडसून खडसून. (क्रि॰ सांगणें; बोलणें; करणें; नाकारणें). [सं. नि + क्षुण्ण]

कटाक्ष - डोळ्याच्या कोपर्‍यांतून पाहणें. कटाक्षाने-चा अर्थ बारकाईने, नीट लक्ष देऊन टाळणे / पाळणे असा असावा.

भाषासूत्र : प्रकाशनविश्वात मराठी
https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/proof-copy-proofreading-...

त्या लघुलेखातील हे शब्द आवडले:

शीर्षकपान’, ‘प्रकाशनमुद्रा’ ‘प्रशस्ती’, ‘पुस्तकओळख’ ‘टंक’, ‘मुद्राक्षरे’, ‘अक्षरजुळणी', ‘परिचयओळी’, ‘चित्रओळ’ .

वाचनखूण आणि प्रताधिकार आपण इथे वापरतोच.

आता सह्याद्री वरील बातम्यात अहमदाबाद प्रकरणासंबंधी बातमी सांगताना "आरोपींना आजन्मठेपेची शिक्षा" असा शब्दप्रयोग वापरला.

आजन्मठेप हे बरोबर आहे ?
पटत नाही
आ = पर्यंत

आजन्मठेप असा शब्द नाही>>+१
जन्मठेप ही मरेपर्यंत असते हे अध्याहृत आहे त्यामुळे ही शब्दरचना/द्विरुक्तीची मोडतोड विचित्र आहे.

आजन्मठेप >> काहीही! 'आजन्म' असा शब्द आहे, पण त्याचा अर्थ 'जन्मापासून' असा होतो. आजन्मठेप चा शब्दशः अर्थ जन्मापासून ठेपेपर्यंत असा होईल. आसेतुहिमाचल किंवा आपादमस्तक यांप्रमाणे. किंवा 'जन्मठेपेपासून' असा होईल.

जन्मठेप ही मरेपर्यंत असते हे अध्याहृत आहे
>>>
हे वाक्य निव्वळ भाषेनुसार बरोबर आहे. परंतु माझ्या अल्प ज्ञानानुसार कायदेशीर वास्तव वेगळे आहे.

भारतात सर्वसाधारण जन्मठेप वीस वर्ष (किंवा चांगल्या वर्तणुकीनुसार कमी सुद्धा) ' भोगायची ' असते

मरेपर्यंत जन्मठेप असे निकाल विशिष्ट गुन्ह्यांच्या बाबतीत दिले गेलेले वाचले आहेत. तसेच प्रस्तूत निकालामध्ये आहे असे दिसते.

मराठी भाषा खरंच अभिजात आहे का यासंबंधी एक वेगळा विचार :

आज असंख्य मराठी जनांची मराठी ही ‘बोली’ आहे. तिला ‘अभिजात’ म्हणणे एका परीने या बोलीला ‘बोल’ लावल्यासारखे होईल!

https://www.aksharnama.com/client/article_detail/5874
"अभिजात हे विशेषण आंग्ल भाषेतील ‘classical’ याचा मराठी (संस्कृत) पर्याय आहे. ग्रीक व लॅटीन भाषा, साहित्य, शिल्प, संस्कृती यांसाठी ते वापरले जाते. भारतीय वैदिक संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात आहेत. इसवी सनोत्तरात अस्तित्वात आलेली माझी मराठीमाय अभिजात कशी असेल? "

लोकसत्तातील आजच्या भाषासूत्रात अर्थभ्रंशाची 3 सुंदर उदाहरणे दिली आहेत. ( अर्थभ्रंश हा पण एक छान शब्द).

अपरोक्ष , विरोधाभास, राजीनामा

जरूर पहा : https://www.loksatta.com/navneet/complicated-word-marathi-meaning-marath...

जर परोक्ष हा शब्द पर:+अक्ष असा बनला असेल तर त्यात अवग्रह चिन्ह हवे. परोsक्ष (माझ्या कळपाटावर ते चिन्ह नसल्याने s वापरला). ते नंतरच्या काळात गायब झाले काय? वरच्या लेखात पर+अक्ष लिहिलंय, ते बरोबर वाटत नाही. त्याचं पराक्ष झालं असतं.

परोक्ष parōkṣa ad (S पर & अक्षि Eye.) Behind one's back; in the absence of. Used by the ignorant in the sense In the presence of; and अपरोक्ष is created to express In the absence of.
(मोल्सवर्थ शब्दकोश)

इतके मिळाले
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...

Pages