राघवदास लाडू

Submitted by भास्कराचार्य on 30 December, 2021 - 10:19
राघवदास लाडू
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

(१) अर्धा किलो खवा
(२) पाऊण किलो पिठीसाखर
(३) दीडशे ते दोनशे ग्रॅम बारीक रवा (अगदी प्रमाणात घ्यायचा असेल तर पावणेदोनशे ग्रॅम)
(४) सव्वाशे ग्रॅम तूप (त्यापेक्षा थोडे जास्तच घेऊन ठेवावे)
(५) दूध (कृतीत सांगितल्यानुसार; एखादा कप पुरेसा व्हावा)
(६) दोन-तीन ग्रॅम केशर
(७) सव्वाशे ग्रॅम बदाम (तोडलेले)
(८) सव्वाशे ग्रॅम बेदाणे
(९) पाच ग्रॅम वेलदोड्याची पूड

क्रमवार पाककृती: 

'सूपशास्त्र' हे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी लिहिलेलं आणि रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी छापलेलं मराठीतलं आद्य पाकपुस्तक. 'किताबकल्हई' ह्या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यात प्रस्तावना, टिपा, विश्लेषण, अशी बरीच मजा नव्याने घातलेली आहे. ती वाचायला मजा आली. परंतु पाकपुस्तक ते पाकपुस्तक. मग त्यातलं काहीतरी करून बघायला हवं. पण हा योग काही येत नव्हता. शेवटी काल 'किचन कल्लाकार' ह्या झीवरच्या कार्यक्रमात अभिजीत सावंतला नारायणदास लाडू करायला लावले, आणि मला हे राघवदास लाडू आठवले. मग लगेच आज करून टाकले. ती ही कृती.

(१) सगळा रवा घेऊन त्यात रव्याचे मुटकुळे होतील, इतपत तूप चोळावे.

(२) खललेले केशर निम्मे घेऊन ते दुधात मिसळून त्या दुधात वरील रवा कालवावा. घट्ट भगरा होईल इतपतच दूध घ्यावे. पातळ करू नये. (चमच्या-चमच्याने घालावे.)

269873829_4897886853583090_6546316603134508684_n.jpg
दूध रव्यास लावत असतानाचा फोटो. केशराचा रंग रव्यास छान लागतो.

(३) सव्वाशे ग्रॅम तूप घेऊन त्यात वरील रवा तळावा / भाजावा. (प्रमाणात घेतल्यास मस्त होतो, तरीही कोणाला तूप कमी करायचे असल्यास आधी कमी घेऊन, नंतर कोरडे वाटल्यास लाडू वळताना थोडे वरून घालता येते. ह्यासाठी तूप घरचे घेतल्यास उत्तम.)

270234784_4897886866916422_7528092055699226976_n.jpg
तुपात रवा भाजतानाचा फोटो.

(४) चांगला खरपूस रंग आणि वास आल्यावर त्यात सर्व खवा घालावा. पुन्हा ५-१० मिनिटे भाजून चुलीवरून उतरवावा. थंड झाल्यावर त्यात सगळी पिठीसाखर घालावी. (ह्यातही चवीनुसार, आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. माझ्या मते एकदम परफेक्ट प्रमाण कृतीत आहे.)

269601190_4897886876916421_976251659983301283_n.jpg
खवा घालून भाजतानाचा फोटो.

(५) ह्यात सगळे बदाम, बेदाणे, वेलदोड्याची पूड घालून एकजीव करावे. उरलेले केशर त्यात घालून लाडू वळायला घ्यावेत.
269983397_4897886856916423_1867787702468887604_n.jpg

राघवदास लाडू तयार!

वाढणी/प्रमाण: 
उपरोक्त साहित्यात साधारण ३० लाडू झाले.
अधिक टिपा: 

(१) हे खव्याचे लाडू आहेत, असं म्हणायला हरकत नाही. (रव्याचे नव्हेत!) त्यामुळे खवा जास्त हवा. घरच्यांना ह्याचं फार आश्चर्य वाटलं. पण फायनल प्रॉडक्ट खाऊन सर्वांना फार आवडलं. पण तरी तुम्हाला आवडत असल्या-नसल्यास रवा जास्त घेऊ शकता. पण मग तूपही तसं जास्त लागेल, अन्यथा लाडू कोरडे होतील. खव्याची आफ्टरटेस्ट जिभेवर मस्त राहते.

(२) केशर मस्ट आहे. फार सुंदर वास आणि चव आली. वेलदोडाही.

(३) मूळ कृतीमध्ये काजू नव्हते. पण तेही छान लागतील. पुढच्या वेळेस घालून बघणार आहे.

(४) हे बिनपाकाचे लाडू आहेत. हा प्लस पॉईंट असावा.

(५) फिल्टरमुळे फोटोंमधले रंग वगैरे थोडे बदललेले आहेत. साधारण कल्पना यावी.

माहितीचा स्रोत: 
सूपशास्त्र, आणि थोडेफार माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

हे काय झालं?????????!!!! भास्कराचार्य धागा म्हणल्यावर कायतरी क्लिष्ट टाकायचं तर हे मला अख्खं समजलं!!!
छान आहे पाककृती.

छान पाककृती. आवडते लाडू. ह्यातील खवा थोडा जास्त भाजलेला हवा, त्याचा वासच ह्या लाडूची ओळख आहे.

सगळ्यांचे आभार!

सी, लंपन, दत्तात्रयजी, भास्कराचार्यांसाठी हेच क्लिष्ट आहे. Proud

रमड, थँक्स! फार मस्त लागतात.

आग्या१९९०, अगदी. खवा मस्त खरपूस भाजला गेला पाहिजे. थोडा आधीच भाजून घ्यायला हरकत नाही.

ब्लॅककॅट, ते प्रत्येकाच्या मुठीच्या आकारावर अवलंबून असलेलं त्रैराशिक म्हणून दिलेलं गणित समजा.‌ Proud

मी क्षणभर विचारात पडलो, राघवदास लाडू नावाचे गणितज्ञ? मग पाकृ ग्रुप मध्ये आहे हे लक्षात आलं.
नव्हते माहीत हे लाडू.
छान दिसताहेत लाडू.

मी करून बघेन, पण खवा न घालता दूधात मिल्क पावडर घालून त्याचा मावा बनवायची कल्पना कशी वाटते? म्हणजे ते लाडू वळण्यासाठी इनफ आहे का?

रेसिपी छान आहे. मी एकदा रव्याचेच पण अगदी सैल हाताने तूप, सुकामेवा आणि मिल्क पावडर थोडीच, असे केले होते अमेरिकेत असताना. तिथल्या आमच्या नातेवाईकांना आवडले होते. मावशीने तेव्हा राघवदास लाडवांची आठवण काढली होती.

पण अवांतर - दहा ग्रॅम केशर? भारतात चांगल्या प्रतीचं केशर २३०/- प्रतिग्रॅम पासून पुढे आहे!

प्रज्ञा, बरोबर आहे. मी सूपशास्त्रकारांच्या प्रमाणात बदल केला, त्यात चोप्य-पेस्तमध्ये हे चुकून जसंच्या तसं लिहिलं. Proud ह्या साहित्यासाठी २-३ ग्रॅम पुरेसं आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

छान दिसताहेत.
का कोण जाणे, आमच्याकडे रवा-नारळ (नो खवा) पाकातल्या लाडवांना राघवदास म्हणतात.

नाव ऐकलं होतं. नक्की कसले याबद्दल गोंधळ होता.
मीही ते पुस्तक घेतलंय. अजून काही करून पाहिलेलं नाही.
लाडू मस्त दिसताहेत.

मस्त दिसतायत लाडू! या राघवदास नावाच्या मागे काही गोष्ट आहे का सूपशास्र पुस्तकात? पुस्तक पण विकत घ्यावसं वाटतंय.

का कोण जाणे, आमच्याकडे रवा-नारळ (नो खवा) पाकातल्या लाडवांना राघवदास म्हणतात. >> अमितव + 1 आम्ही ही.

रवा खवा पाकातले लाडू ऐकून माहीत आहेत , बिनपाकाचे हे प्रथमच पहातेय.

एवढा खवा आणि एवढं तूप म्हणजे तुपकट नाही होत का ? की तुपकटच असतात आणि तसेच चांगले लागतात ? बदाम आणि बेदाणे प्रमाण ही बदलायचं राहिलं आहे का केशराप्रमाणे ?

लाडू दिसतायत खूप सुंदर पण कठीण आहे करणं कारण इथे विकतचा खवा वापरणं सोडल्याला अनेक वर्षे झाली आहेत. डेअरिंगच होत नाही खवा आणण्याच.

पण कधी कधी कोकणातून ( आलं कोकण Happy )घरचा खवा इकडे धाडला जातो तसा आला की नक्की करून बघीन. तूप असलं तरी पाक नाही हा प्लस पॉईंट.

लाडवांचा फोटो मुख्य चित्र म्हणून डकवलयात म्हणून बरं झालंय हो नाहीतर धागा उघडल्यावर धक्काच बसला असता. ( हलके घ्या )

पुन्हा एकदा तेच , पुरुष आयडींच्या रेसिप्या बघितल्या की खूपच भारी वाटत.

हे नाव ऐकलं होतं. बऱ्याच वर्षात खाल्लेला नाही. हे नाव कुठून आलं बघायला पाहिजे.

मारूती लाडू >> हा हा, हे ही चालेल. राघवदास म्हणजे मारुतीच.

हरबरा डाळीचा रवा घेऊन त्याला दूध चोळून मग पाकातले रवा लाडू करतात तसे करतात त्याला राघवदास म्हणतात असं मी ऐकलं होतं. खखोदेजा

Pages