इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमंत यांच्या स्टाईलमध्ये -
व्यावहारिक-भांडवलवादी जगात गरीब-श्रीमंत, सत्ताधारी-सत्ताहीन एवढ्याच जाती असतात. बाकी सगळे फालतू वाद असतात चघळण्याचे. खिसा जड असेल आणि थोडीफार ऑथॉरिटी असेल जवळ तर तुमचे कुठे काही अडत नाही. प्रत्येकाने जातीय-धार्मिक वादात शक्ती क्षय करण्यापेक्षा चार पैसे जास्त कसे मिळतील यात लक्ष घातले तर स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होईल.

उदय, +१
हा जातीचा किंवा धर्माचा मुद्दा आला की आपण एकदम पर्सनल होतो! पण त्याची काही गरज नाहीये. तटस्थ विदा गोळा करणे आणि ज्या समाजाचं प्रतिनिधीत्व कमी आहे त्यांना किमान कलेच्या प्रांतात शिकण्याची, अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हे तर करता येईल. आजच माझ्या ओळखीत एक जण ग्रामीण भागातल्या मुलींच्या शाळेत (शाळेचे वसतिगृह पण आहे) दोन हार्मोनियम देऊन आल्या. तिथे जाऊन मुलींना गायन, पेटीवादन आणि नृत्याचे धडे देण्याचा प्लॅन आहे.
एक छान वाक्य ऐकलं इतक्यात - talent is everywhere, opportunity is not. तेव्हा या वादाच्या निमित्ताने हे थोडेसे आत्मपरीक्षण घडले आणि त्यातून काही नवीन लोकांसाठी संधी निर्माण झाली तरी खूप चांगला बदल असेल.

स्वातीला अनुमोदन !
मी लिहिण्याने आणखी फाटे फुटतील. >>>> धन्यवाद आणखी स्ट्रोमन आरग्यूमेंट न लिहिल्याबद्दल...

"कलाक्षेत्रात विविधता असेल तर त्याने कलेच्या विकासात नक्कीच सकारात्मक योगदान ठरेल" - कला-क्रीडाक्षेत्रातली विविधता ही कला-क्रीडा-अविष्कारातली असली तर कलेचा विकास होतो. त्याचा जात-पात-धर्म ई. गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. कलेचा विकास कलाकारांनी केलेल्या
विविध प्रयोगातून होतो, चर्चेतून नाही.

"तेव्हा या वादाच्या निमित्ताने हे थोडेसे आत्मपरीक्षण घडले आणि त्यातून काही नवीन लोकांसाठी संधी निर्माण झाली तरी खूप चांगला बदल असेल." - आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे हा. नाशिकमधे होणार्या कार्यक्रमाविषयी भारतात आणि भारताबाहेर रहाणार्या लोकांनी - ज्यांचा कलाक्षेत्राशी संबंध असेलच असं नाही - ते डिसीजन मेकर्स असतीलच असं नाही - अशा लोकांनी सोशल मिडीयावर केलेल्या चर्चेतून नविन लोकांसाठी संधी निर्माण होतील ह्याचं कनेक्शन लागत नाहीये.

"कलाकारांची (किंबहुना कुणाचीही) जात बघणे यालाच तीव्र आक्षेप आहे!!" - टोटल सहमत! जात-धर्म ई. मॅनमेड गोष्टींवरून, किंवा अगदी निसर्गनिर्मीत लिंगभेदावरूनसुद्धा डिस्क्रिमिनेशन करणं, माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणं ह्या गोष्टींना नुसता आक्षेपच नाही तर तीव्र आणि शक्य तिथे अ‍ॅक्टीव्ह विरोध आहे.

"जात सर्वांच्याच किती रक्तात भिनली आहे यापलीकडे काहीही सिद्ध होत नाही त्याने." - +१. ह्यातून काहीही सिद्ध होत नाही आणि एस्टॅब्लिश्ड कलाकारांनी स्वतःच्या स्ट्रगलच्या काळातल्या अशा अनुभवांचं भांडवल करण्याने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत. किंबहूना त्यातून सामाजिक तेढ वाढतच जाते.,

फेरफटका, ही चर्चा करणारे, वाचणारे लोक कलेच्या क्षेत्रातले आणि डिसिजन मेकर्स असतील की नाही अशी शंका का येते? उलट मायबोलीवर कला आणि साहित्याची अभिरुची असणारे कलाकार आणि रसिक श्रोते आहेत आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा जागृत आहेत असे मला मनापासून वाटते.

अमेरिकेत ज्यू 2 टक्के असतील. पण साहित्य मीडिया प्रशासन फायनान्स सायन्स टेक्नोलॉजी सगळीकडे खूप जास्त आहेत. नोबेल पुरस्कारात तर वाईल्डली ओव्हररिप्रेझेंटेड आहेत. सो?
ज्यू लोक 2 टक्के आहेत तर सर्वच क्षेत्रात त्यांनी 2 टक्केच असायला हवं, नाहीतर त्यांच्यावर विशिष्ट 'कारवाई' करण्यात काहीच गैर नाही ही हिटलर, नाझी मानसिकता आहे.

डायव्हर्सिटी नक्कीच असावी, त्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि कोणालाही संधी नाकारली जाऊ नये हे मान्य आहेच. पण ओव्हर रिप्रेझेंटेशन असेल तर दर वेळी तो गुन्हा/फ्रॉडच आहे असं समजणेही झेपत नाही.

समजा एक काल्पनिक कम्युनिटी आहे. त्यांच्याकडे स्त्रीपुरुष समानता आहे. घरटी एखादंच मूल असतं. मुलगा मुलगी काहीही असो, आनंदाने वाढवतात, शिकवतात. स्त्रियांना करियर करायला प्रोत्साहन असतं. त्याचवेळी स्त्रियांना प्रोटेक्ट करायला हवं ही conservative भावनादेखील असल्यामुळे स्त्रियांना फ्रीडम आणि संरक्षण दोन्ही मिळत असतं. लग्नात हुंडा नाही, साधी लग्न त्यातही खर्च वाटून घ्यायचा. कुणाला लग्न करायचं नसेल किंवा मूल नको असेल किंवा डिव्हीर्स घ्यायचा असेल तर त्याबद्दल फार त्रास देत नाहीत. धर्म कर्मकांड यात फार गुंतत नाहीत आणि अगदीच सोडूनही देत नाहीत. आंतरजातीय लग्न केलं तर जीव घेत नाहीत. गे मुलगा असेल तर ओपनली तसा राहू शकतो. पाश्चात्य प्रभाव असतो, परदेशात जाण्याची आवड असते मग अगदी एक आठवड्याची ट्रिप का असेना.
आता हे लोक मग काही बाबतीत जास्त सक्सेसफुल होणारच आहेत. इस्टेटीच्या वाटण्या नाहीत- concentration of resources, प्रोग्रेसिव्ह विचार, शिक्षणाचं महत्व, कलांबद्दल आस्था , work ethic, global worldview, पुरुषांनी आळशीपणा न करता घरची आर्थिक जबाबदारी उचललीच पाहिजे हे conditioning याचे बेनिफिट मिळणारच आहेत. दुसरीकडे त्यांची लोकसंख्येची टक्केवारी कमी कमी होत जाणारच आहे. आणि ठराविक क्षेत्रातील प्रतिनिधित्व आणि लोकसंख्येची टक्केवारी यात time lag (कदाचित एक दोन पिढ्यांइतका) असणार आहे. भविष्यात जसे पारसी आणि अँग्लो इंडियन्स ओव्हर रिप्रेझेंटेशन कडून disappearance पर्यंत पोचले तसंच इथेही होणार पण त्याला जरासा वेळ लागणार. So basically they are doing all the right things and still getting blamed. Then they just want to go live somewhere else and then 'अरे बघा हे परदेशात जाऊन बसले बंगले बांधून राहिले' असे फुत्कार.
आणि मग स्वतः परदेशात जाऊन बसलेल्या, मुलाबाळांची परदेशात सोय केलेल्या कोणीतरी आपल्याच कम्युनिटीला जोरदार दोष वगैरे देऊन टाळ्या मिळवायच्या हा एक तमाशा.
सव्वाशे करोडच्या देशात चार पाच पिढ्या एकाच कुटूंबाला सत्ता असावी यासाठी मायबोलीवर त्या कुटूंबाचा दिवसरात्र प्रचार करणाऱ्यांनी इथे प्रतिनिधित्व वगैरे ज्ञानमय घेवड्याची भाजी परतायची हा अजून एक तमाशा.
असो. मी जाऊन आता युट्युबवर मधूबनमे राधिका लावणार आहे. गीतकार शकील बदायुनी, संगीत नौशाद , गायक रफी आणि पडद्यावर युसूफसाब.

ईर्शाद आणि हा जातीवाचक "शोध" यात काहीही फरक नाही. दोन्ही सोशल नेटवर्कवरच होते. दोन्हीकडे भरपूर पब्लिकने त्या त्या टार्गेट ला झोडले होते. प्रत्यक्षात कोठे तोडफोड वगैरे झालेली नाही. दोन्हीकडे भाषा/धर्म/जात ई. बद्दल अर्धवट माहितीवर पब्लिकने फेबु, व्हॉअ‍ॅ वर कायच्या काय लिहीले होते.

पण दोन्ही घटनांचे इव्हन इथले पडसाद बघितले त्यातील फरक लगेच लक्षात येइल Happy तुम्ही जर खरे लिबरल असाल तर चूक ते चूक म्हणा. अनक्वालिफाइड. "पण त्याचबरोबर..." वगैरे न लावता.

टण्या - तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याबाबतीत देऊ शकतो. लहानपणीचा मित्रांचा ग्रूप ते सध्याची भारतातील आणि अमेरिकेतील भारतीय मित्रमंडळी हे सगळे मिक्स ग्रूपच आहेत. फक्त ब्राह्मण वगैरे नाही.

पण दोन्ही घटनांचे इव्हन इथले पडसाद बघितले त्यातील फरक लगेच लक्षात येइल  तुम्ही जर खरे लिबरल असाल तर चूक ते चूक म्हणा. अनक्वालिफाइड. "पण त्याचबरोबर..." वगैरे न लावता. >>>>> प्रचंड अनुमोदन ! इथे एक अमित वगळता कोणीही निसंदिद्घ निषेध केलेला दिसला नाही.

Whitehat ह्यांची नवीन पोस्ट म्हणजे विषय काय लिहितात काय प्रकारची आहे!

स्वाती, हा धागा चालू घडामोडी मध्ये हलवता येईल का ?

मला बदलता येत नाहीये आता ग्रूप. अ‍ॅडमिनना विनंती करते.

>>> डायव्हर्सिटी नक्कीच असावी, त्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि कोणालाही संधी नाकारली जाऊ नये हे मान्य आहेच. पण ओव्हर रिप्रेझेंटेशन असेल तर दर वेळी तो गुन्हा/फ्रॉडच आहे असं समजणेही झेपत नाही.
अनुमोदन.

>>कला-क्रीडाक्षेत्रातली विविधता ही कला-क्रीडा-अविष्कारातली असली तर कलेचा विकास होतो. त्याचा जात-पात-धर्म ई. गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. कलेचा विकास कलाकारांनी केलेल्या
विविध प्रयोगातून होतो

Couldnt agree more!!
You nailed it!!

<< >>कला-क्रीडाक्षेत्रातली विविधता ही कला-क्रीडा-अविष्कारातली असली तर कलेचा विकास होतो. त्याचा जात-पात-धर्म ई. गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. कलेचा विकास कलाकारांनी केलेल्या
विविध प्रयोगातून होतो >>

------- कलेचा विकास कलाकारांनी केलेल्या विविध प्रयोगातून होतो, सहमत. या विविध प्रयोगात अपेक्षित असलेल्या विविधतेची व्याप्ती तसेच खोली वाढविण्यासाठी कलाकार हे समाजाच्या सर्व थरातून आलेले असणे जास्त उपयुक्त आहे. विविधता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन दिल्याने रसिकांचा फायदाच होणार आहे आणि कलेचा आदर/ प्रसार होत आहे त्यापेक्षा झपाट्याने होईल.

<<<<कलेचा विकास कलाकारांनी केलेल्या
विविध प्रयोगातून होतो, चर्चेतून नाही.>>>>
पण काही लोकांना नुसती फुकटची चर्चा करायला आवडते. कलेतले ओ का ठो कळत नाही, मग उगीचच विषय भरकटवून त्यात राजकारण, जात पात असले विषय काढायचे नि बरळायचे!

"मायबोलीवर कला आणि साहित्याची अभिरुची असणारे कलाकार आणि रसिक श्रोते आहेत आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा जागृत आहेत असे मला मनापासून वाटते." - जिज्ञासा, अशी चांगली अभिरूची असणारे, चोखळ, रसिक, दर्दी आस्वादक मायबोलीवरच नाही तर सगळीकडे आहेत. पण अश्या आस्वादकांचं नविन संधी निर्माण करण्याशी कनेक्शन मला कळलं नाही. असो. माझी समज कमी पडत असेल असं मी समजतो (ह्यात उपरोध वगैरे नाही.)

"या विविध प्रयोगात अपेक्षित असलेल्या विविधतेची व्याप्ती तसेच खोली वाढविण्यासाठी कलाकार हे समाजाच्या सर्व थरातून आलेले असणे जास्त उपयुक्त आहे. " - दलित साहित्याचा प्रवाह मराठी साहित्यात आल्यावर जसा एक वेगळा आलेख आला, नविन जाणीवा निर्माण झाल्या त्या अर्थानं म्हणत असाल तर मान्य आहे.

पण ते लेखक केवळ समाजाच्या वेगळ्या स्तरांतून आले म्हणून ते उल्लेखनीय साहित्य निर्माण करू शकले असं नाही. तर त्यांच्या जाणीवा जिवंत होत्या, अनुभवविश्व समृद्ध होतं आणि साहित्यिक जाण होती म्हणून ते साहित्य प्रभावी ठरलं. केवळ सर्वसमावेशकता हवी असा निकष कला-क्रीडा क्षेत्रात लावता येत नाही. तिथे केवळ गुणवत्ता हाच निकष हवा. चांगली कलाकृती - मग ती कुणीही निर्माण केलेली असली तरी तिचा उचित आदर व्हायला हवा आणि त्या कलाकृतीचं मूल्यमापन कलेचे च निकष लावून व्हायला हवं. परत एकदा दलित साहित्याचंच उदाहरण घेतो. एकदा
तो साहित्यप्रकार यशस्वी ठरल्यावर अनेकांनी ती शैली कॉपी करायचा प्रयत्न केला आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीला ग्रहण लागलं. एक सचिन तेंडुलकर यशस्वी झाला म्हणून तशी बॅटवरची ग्रीप ठेवून खेळणारे बाकी कुणी तेंडुलकर होऊ शकेल नाहीत. किंवा आडव्या हाताने बॉलिंग करणारे कुणी मलिंगा होऊ शकले नाहीत. तेव्हा कला-क्रीडा क्षेत्रात केवळ कला-क्रीडा क्षेत्राच्या गुणवत्तेचेच निकष असावे. त्याच बरोबरीनं गुणवत्ता असलेल्या कुणालाही कला-क्रीडा क्षेत्राबाहेरच्या कारणांमुळे संधी नाकारली जाऊ नये.

पण मूळ वाद/विरोध मुस्लिमांबद्दल सर्वसमावेषकता दाखवण्याबद्दल, मुस्लिम साहित्याचा आग्रह धरण्याबद्दल आहे ना?
मग आता काय म्हणत आहेत.. कवी आणि कार्यक्रम ईतर 'हिंदू' जातींबद्दल सर्वसमावेषक नाही म्हणून?
सर्वसमावेषकता सीमारेषा धर्मापुरतीच मर्यादित ठेवायची असा सर्वसमावेषकतेचा आग्रह आहे का?

फेरफटका, तुम्ही "माबो सारख्या सोमि वर होणाऱ्या या चर्चेतून नविन लोकांसाठी संधी निर्माण होतील ह्याचं कनेक्शन लागत नाहीये." असं लिहिलं आहे. त्यावर माझं मत सांगितलं की माबोवर येणारे वाचक, सदस्य हे कलासक्त आणि सामाजिक भान राखणारे आहेत. या चर्चेमुळे एखाद्याला काही तरी नवीन करण्यासाठी प्रेरणा मिळेलही ज्यातून हौशी धडपडणाऱ्या पण सांस्कृतिक किंवा सामाजिक भांडवल नसणाऱ्या कलाकारांना संधी मिळेल.

फेफ - चांगली पोस्ट!

जिज्ञासा - पण काही अ‍ॅनेलिसिस करायचा असेल तरी त्याला काहीतरी बेसिस पाहिजे ना? एक रॅण्डम फेबु पोस्टवरून काहीतरी समाजाला आरसा वगैरे दाखवल्याचा भाव देण्याइतके त्यात काही नाही. काही लोकांनी एकत्र येउन कविता/गाणी वगैरे ठरवली, इतकेच. उद्या चला हवा येउ द्या च्या एखाद्या एपिसोड मधे अमुक जातीचे लोक दिसत नाहीत म्हणून एखाद्याने रॅण्डम रँट मारावी व कंपन्या एखाद्या सिरीयस घटनेतून डायव्हर्सिटी प्रोग्राम सुरू करतात तसे करायची मागणी केल्यासारखे झाले.

ईर्शादला विरोध करणार्‍यांना तुमच्या कोथरूड बबल मधून बाहेर पडा. तिकडे आसाम बिसाम मधे हिंदू स्त्रियाही टिकल्या लावत नाहीत ई. जितके ठणकावून सांगितले जाते तितकेच असल्या पोस्ट्सनाही "अभ्यास वाढवा, जरा संमेलनातीलच इतर माहिती वाचा" हे सांगण्यात काही चूक नाही.

किमान मराठी चित्रपट व संगीतात विविधता ऑलरेडी आहे. गेली अनेक दशके आहे. त्यात "सर्व" जातींचे प्रतिनिधित्व नसेल, विशेषतः दलितांचे. पण ते ही होत आहे. टॅलेण्ट शोज वगैरे मधून ती प्रक्रिया आणखी जोर धरत आहे.

बाकी सर्वसमावेशकता नसेल ती कदाचित शास्त्रीय संगीतात व वाद्यसंगीतात. खरे म्हणजे तेथेही मुस्लिम्स भरपूर आहेत. पण यात डबल ढोलकी चालते. एका बाजूने "काही ठराविक लोक सोडले" तर इतर पब्लिकला त्यात इंटरेस्ट नाही म्हणायचे, आणि नंतर पुन्हा त्यात इतरांना प्रतिनिधित्व नाही म्हणायचे.

उच्च गुणवत्ता आणि समृद्ध अनुभवविश्व अंगी बाणवण्यासाठी ती नसलेल्या लोकांनी काय केलं पाहिजे?
हे सर्व १०० % अंत:स्फूर्ती आणि अंत: प्रेरणेवरच अवलंबून असतं का?
त्यासाठी पोषक वातावरण, (घर, पालक, शाळा,मित्रमंडळी,समाज, exposure, उत्तेजन इत्यादि) पोषक घटकांची गरज अजिबात नसते का?

>>त्यासाठी पोषक वातावरण, (घर, पालक, शाळा,मित्रमंडळी,समाज, exposure, उत्तेजन इत्यादि) पोषक घटकांची गरज अजिबात नसते का?<<
बँगऑन!

बाकि, एखाद्या क्षेत्रात सोकॉल्ड उच्चवर्णियंच का आढळतात याचं समर्थन, त्यावर माना डोलावणारे यांच्या सोशो-एकनामिक आकलनाबद्दल केवळ कींव व्यक्त करु शकतो. चालू द्या...

फा, या एका प्रसंगावरून निष्कर्ष काढणं चूक आहे हे मी आधीच म्हटले आहे. पण किमान "तटस्थ विदा गोळा करणे आणि ज्या समाजाचं प्रतिनिधीत्व कमी आहे त्यांना किमान कलेच्या प्रांतात शिकण्याची, अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हे तर करता येईल." असं मी आधीच्या पोस्टमध्ये लिहिलंय.
मात्र मला माहित आहे की जे इर्शादला विरोध करत होते किंवा आज या कार्यक्रमाला विरोध करत आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा करता येणार नाही.

माझी पहिली पोस्ट आणि टवणे सरांच्या पोस्टमधला संबद्ध भाग पुन्हा पोस्ट करतो.

ट्रोल करणारे ब्रिगेडी आहेत की सर्वसमावेशकतेची अपेक्षा ठेवणारे आहेत हे माहीत नाही. वर एका मराठी दिग्दर्शकाचा उल्लेख आला आहे. मलाही तो मुद्दा आठवला होता. यांना अजिबात घेऊ नका असं ते म्हणताहेत की फक्त हेच का घेता असं विचारताहेत?

माझी पोस्ट - अमेरिकन, ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रम पाहताना मला जाणवलेली एक गोष्ट लिहितो. व्हाइट कॉलर, कॅसल, बोन्स यासारख्या क्राइम बेस्ड मालिकांत पात्रे /कलाकार वर्ण, वंश, लैंगिकता यांत विविधता साधलेली दिसते.
विल & ग्रेसमध्ये सगळे व्हाइट आहेत. दोन्ही पुरुष पात्र गे आहेत. ग्रेस ज्यू आहे आणि या सगळ्यांवर भरपूर विनोद असतात
मास्टर शेफ ऑस्ट्रेलियात मूळ ऑस्ट्रेलियन्सपेक्षा स्थलांतरित , निर्वासित जास्त दिसतात.

टीप - अमुक व्यक्ती अमुक जाती धर्माची आहे या कारणासाठी टारगेट करणं मला मान्य नाही. या गोष्टीचा कायम निषेध असेल.

टवणे सर - मी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहीन. महाराष्ट्रात ब्राह्मणांची संख्या ५-६% समजू (१०च्या आत हे नक्की). हा काव्यवाचन + संगीत असा कार्यक्रम आहे. संगीत कला ही सर्व समाजात इक्वली डिस्ट्रिब्युटेड आहे हे गृहीत धरण्यास हरकत नसावी. या कलाकारांनी हे जातीय समीकरण डोक्यात ठेवून (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे) हे केले नसावे असे धरून चालू. असे असताना एका कार्यक्रमात सर्व कलाकार हे एकाच जातीचे असणे हे कशाचे लक्षण असावे? हे अजुनही आपला समाज सामाजिक दृष्ट्या एकसंध नसल्याचे लक्षण आहे असे मला वाटते...
....जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुद्दाम झाले नसले तरी केवळ उच्चवर्णीयच कलाकार असतील तर त्याविरुद्ध असा सूर निघणे मला अयोग्य वाटत नाही. दुसर्‍या बाजुचा विचार करताना स्वतःला दलित/ओबीसींच्या जागी ठेवून याचा विचार करणे गरजेचे आहे. आणि तसा विचार केला तर प्रत्येकच कार्यक्रम, उपक्रम आयोजित करताना सर्व समाजाचे प्रतिनिधित्व होते आहे की नाही हे तपासून पाहणे आपसूक होइल. त्याचा दूरगामी परिणाम नक्कीच कल्याणकारी असेल."

आता झालेल्या ट्रोलिंगच्या निमित्ताने आलेले विचार मांडले आहेत. गोळ्या झाडलेल्या नाहीत किंवा उपदेशही केलेला नाही. माझी किंवा टवणे सरांची पोस्टही त्या एका कार्यक्रमाला टार्गेट करून आहे असं वाटतंय का? तो कार्यक्रम , ट्रोलिंग हे निमित्त आहे.

तेवढ्यासाठी तो कार्यक्रम पाहणार नाही, असंही नाही. फेसबुकवर संमेलनाचं प्रक्षेपण लाइव्ह होणार आहे. वेळा जमत असतील पाहणार आहे. कार्यक्रम पाहताना कलाकाराची जात समोर येत नाही हे सांगायची गरज नसावी.

टीप - अमुक व्यक्ती अमुक जाती धर्माची आहे या कारणासाठी टारगेट करणं मला मान्य नाही. या गोष्टीचा कायम निषेध असेल. हे वाक्य मी लिहिलं होतं. स्पेसिफिक निषेध करायची गरज वाटली नाही. तरीही लेबल लागणार असेल तर हरकत नाही. त्यासाठी तोंडदेखला निषेध करायची गरज मला वाटत नाही.

आता सर्वसमावेशकतेबद्दल थोडं आणखी - दक्षिण आफ्रिकी क्रिकेटची कलर पॉलिसी. समावेशकतेसाठी त्यांच्या देशातले गुणवान खेळाडू देश सोडून गेले तरी ती किंमत मोजायला ते तयार आहेत.

जातिद्वेष सगळ्याच जातीच्या लोकांत असतो, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे . मीही याआधी अनेकदा लिहिलंय. एकाच जातीतल्या पोटजातींतही उच्चनीचता मानली आणि पाळली जाते हेही .

<गुणवत्ता, कलागुण, विकली जाणारी कला विशिष्ट जातीकडेच असते का? इतर जातींत ती नसते असं म्हणायचंय?> त्या वाक्यात हा अर्थ नसताना मी तो काढला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चर्चेच्या ओघात झालं.

कोणत्याही जातीधर्माच्या हाडाच्या कलाकाराला उद्विग्नता आणि आयुष्याची निराशा यावी , इतकी दुर्दैवी चर्चा आणि विचार.

एका गाण्याच्या कार्यक्रमात एका सुप्रसिद्ध निवेदकाने दोन विनोद केले होते. मध्यंतरात कुणा स्थानीक नेत्याचा सत्कार होता तर "मोठ्या मुलीच्या लग्नात जशी लहान मुलाची मुंज उरकून घेतले जाते तसा गाण्याच्या या कार्यक्रमात हा सत्कार.... " , व व्यासपीठावरील वदकांच परिचय करून देताना तबलजी च्या नावबरोबर गोत्रही सांगितले व "मध्यंतरात अनेक लोक आत येऊन चौकशी करतात, म्हणून इथेर जाहीर केले" दोन्ही विनोदावर मी हसलो पण आज लक्षात येतेय त्यातले सटल गृहितक, बहुसंख्य प्रेक्षकांना हा विनोद रिलेट होईल हे.

>>>
त्या एका कार्यक्रमाला टार्गेट करून आहे असं वाटतंय का? तो कार्यक्रम , ट्रोलिंग हे निमित्त आहे.
तेवढ्यासाठी तो कार्यक्रम पाहणार नाही, असंही नाही.
<<<
मग दुर्दैवाने you chose a poor example असं म्हणेन मी, जे कुठल्याही causeसाठी मारक असतं. हा साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार झाला इथे.

>>> डायव्हर्सिटी नक्कीच असावी, त्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि कोणालाही संधी नाकारली जाऊ नये
याबाबत या चर्चेत दुमत दिसलं नाही मला.

मजा म्हणजे 'सैराट' आला तेव्हा त्याचं भरभरून कौतुक झालं - इथे मायबोलीवरही अगदी स्वतंत्र बाफ काढून झालं. तेव्हा कोणाच्याही मनात 'ब्राह्मणांना रिप्रेझेन्टेशन मिळालेलं दिसत नाही यात' असलं काहीही आल्याचं आठवत नाही मला - आणि तेच योग्य आहे.
मंजुळ्यांचं कौतुक निखळ हवं पण खर्‍यांचं नको, असं का?

मुळात काव्य-गायन-वादन सर्वसमावेशक नाहीत असं ठरवण्यामागे काही ठोस विदा आहे का? हे उपरोधाने नाही, खरंच विचारते आहे.

मलातरी लहानपणापासून माडगूळकर/भटांच्या जोडीनेच शांताबाईंची गाणी कौतुकाने ऐकल्याचं आठवतं आहे आणि ग्रेसांच्या कविता कळल्या नाहीत तरी अजून त्यांच्याशी झटापट करायला आवडते. शाहीर साबळे आणि उमपांना गीतरामायणाइतक्याच प्रेमाने ऐकलं आहे आणि बहिणाबाईंच्या रचना अजून नव्याने उलगडतात. संतवाङ्मय वाचताना हा माळी का कुणबी का वाणी का महार अशी गणितं सुचत नाहीत.

उलट 'ही नावं ब्राह्मणेतर आहेत' अशी यापूर्वी कधीही न झालेली दुर्दैवी जाणीव या चर्चेच्या निमित्ताने झाली याचं मला व्यक्तिश: दु:ख वाटतंय.

"उच्च गुणवत्ता आणि समृद्ध अनुभवविश्व अंगी बाणवण्यासाठी ती नसलेल्या लोकांनी काय केलं पाहिजे?" - हा प्रश्न उपरोधिक नाही असं गृहीत धरून उत्तर देतो. गुणवत्ता - टॅलेंट -ही नैसर्गिक देणगी आहे. त्या टेलेंट ला पैलू पाडणं, त्यासाठी लागणारी नियमितता, सातत्य, सराव ह्या गोष्टी बाह्य आहेत.

तेंडुलकरकडे क्रिकेट चं टेलेंट होतं. त्याला त्याने सरावाची, मेहनतीची जोड दिली. ह्यासाठी पोषक वातावरणाची गरज असणं समजू शकतो, पण नैसर्गिक गुणवत्ता ही असते किंवा नसते. तसंच अनुभवविश्व म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगाचे येणारे अनुभव. हे प्रत्येकालाच येतात. कुठलीही पोषक पार्श्वभुमी नसणार्या बहिणाबाईंच्या कविता / ओव्या हे नैसर्गिक गुणवत्तेतुन आपल्या आजूबाजूच्या अनुभवविश्वाचं समर्थ आणि अर्थवाही शब्दांकन करण्याचं उत्तम उदाहरण आहे. बहिणाबाईंच्या कविता त्या कवितेतल्या अस्सल दर्जामुळे लोकप्रिय झाल्या, विषम सामाजिक परिस्थितीमुळे नाही.

बाकी ज्यांना विषयाचंच आकलन झालेलं नाही, त्यांनी लोकांची कीव करण्याचा आव आणणं हास्यास्पद आहे.

Pages