फणसाचे सांदण..

Submitted by MSL on 13 June, 2021 - 06:14
phansache sandan
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाट्या फणसाचा रस..
2 वाट्या तांदळाच्या कण्या..
दोन चमचे गुळ
एक चमचा लोणी
अर्धा चमचा हळद
सोबत नारळाचा रस करण्यासाठी ::
एक वाटी गूळ
1 वाटी ओले खोबरे
चवी पुरते जायफळ पूड..

क्रमवार पाककृती: 

1..पिकलेल्या बरक्या फणसाचा रस चाळणीवर गाळून घ्यावा.
2. तांदुळाच्या कण्या बंद गॅस वर 5ते 7 मिनिट भाजून घेणे..
3. गॅस बंद करून जेवढ्या कण्या तेवढेच कोमट पाणी ओतणे..
4. या मिश्रणात हळद लोणी मीठ गूळ हे सर्व घालून घेणे आणि चांगले ढवळून घेणे..
5. 10 मिनिट ठेवून देणे..आणि लगेच इडली पात्रात तुपाचा हात फिरवून सांदन लावणे..
6. 15 मिनिटांनी / आडवी वाफ आल्यावर गॅस बंद करावा..
7. ओल्या खोबऱ्यात कोमट पाणी घालून मिक्सरवर फिरवून घेणे .. गाळून घेणे...या रसात गुळ घालून विरघळवून घ्यावा..
चवीनुसार जायफळ पूड घालने..
8.. फणसाची सांदणे आणि नारळाचा रस तयार..

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

++ फणस जर जास्ती गोड असेल तर गुळ अगदी कमी प्रमाणात किंवा नाही घातला तरी चालतो..
++ ओल्या नारळाचा रस उपलब्ध नसेल तर नुसत्या दुधाबरोबर / तूप लावून ,देखील हे सांदण खाल्ले जाते..

माहितीचा स्रोत: 
सासर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद या पाककृती साठी. बरका फणस मिळाल्यास करून बघेन. पण काही शंका आहेत.
क्रुती नंबर २ मध्ये कण्या 'बंद ' गॅस वर भाजायच्या ? म्हणजे ?
फणसाचा रस किती घ्यावा आणि कधी कण्यांमध्ये मिसळायचा?
२ वाट्या कण्या + २ वाट्या कोमट पाणी - यात रस किती वाट्या?
इडली रवा वापरता येईल का?

छान!
मंद गॅसवर असणार. Happy
माझी आई इडली रवाच वापरते. चांगली होतात.

व्हॉईस टायपिंग मुळे काही चुकीचे टाईप. झाले आहे..
1. मंद गॅसवर कण्या भाजून घ्या..
2.गॅस बंद केला की त्या कण्यात कोमट पाणी घालावे..
3. या कृतीमध्ये दोन वाटी फणसाचा रस, 2 वाटी कण्या, n त्या कण्या पूर्ण भिजतील एवढे कोमट पाणी घालावे..साधारण 2 वाटी पुरते...
4. आता कण्या आणि पाणी हे मिश्रण तयार झाले..त्यात लगेच 2 वाटी फणसाचा रस + हळद चमचाभर + गुळ चवी नुसार + 1 चमचाभर लोणी + चवीला मीठ...सगळं घालून ढवळायचे...
5. हे मिश्रण 10 मिनिट ठेवून ,लगेच इडली पात्रात किवा डब्यात सांदाने लावायला घ्यावीत..
6. इडली रवा वापरता येईल..अम्ही घरीच जात्यावर कण्या काढतो, त्यामुळे त्या वापरतो...

मस्त..
बरका फणस आणला होता पण यावेळी सगळा नुसता खाऊन संपला.
पुढच्या वेळी आणला की या कृतीने सांदण करेन.

भारीच. रंग आणी पोत अगदीच सुरेख आहे.
पण हे आता मिळणे आणी खाणे एक स्वप्नच झालेय Sad

मी पण दरवर्षी करते फणसाचे सांदण.. वटपौर्णिमेच्या वेळेला मुंबईत बऱ्याच ठिकाणी फणसाचे ट्रक येतात.. त्यावेळी घेते असा फणस.

स्नेहमयी.. २४ जून ला वटपौर्णिमा आहे.. त्याच्या २/३ दिवस आधी ट्रक येतात मुंबईत.. ठाण्यात पण येतच असतील..

आंब्याचे सांदण खूपच मस्त दिसताहेत...

श्रवू ...छान.दिसताहेत...काकडीची पण मस्त लागतात...जरा जून अशी काकडी ,तिला तवसे म्हणतात इकडे...तवशाची धोंडस किंवा सांदण..एकदम चविष्ट...त्यात खोबऱ्याचे काप, शेंगदाणे असे काही घालतो..तूप ओतून च खातो त्यावर..भारी लागत...त्याचे अम्ही पण चौकोन करतो..तुमच्या फोटो सारखेच..
...

सर्वांचे सांदणं फोटो सुरेख.

सांदणे मला फार आवडत नाहीत पण कोकणातली माझी आजी, तिची लगबग, फणस सांदण दरवळ यानिमित्याने हे सर्व आठवतं, माझी सडसडीत आजी जशीच्या तशी आठवते, नातवंडांसाठी करण्याचा तिचा उत्साह आठवतो .

सासरी इडली आकारात करतात, माहेरी वड्या आकार असायचे.

MSL, आज या क्रुतीने सांदण केले.
काल भाजीवाल्याने बरक्या फणसाचे म्हणून दिलेले गरे काप्या फणसाचे निघाले. तरीही मिक्सरमध्ये वाटून वापरले.
सांदण घरी आवडले. पण मला व्यक्तीशः त्याचा शिजतेवेळीचा घमघमाट जास्त मोहक वाटला.
या रेसिपी साठी धन्यवाद.

वर्णिता कोकणात खूप वर्ष राहून नाही खाल्लास का हा प्रकार, एखाद्या मैत्रिणीने वगैरे किंवा शेजाऱ्यांनी पण नाही दिला का कधी.

कोकणात कधीतरी जाऊन हे मात्र बघितलं आहे की काही केलं किंवा एखादी भाजी जरी आपल्या अंगणातल्या मांडवात पिकवली आणि शेजाऱ्यांकडे जरी ती भाजी किंवा स्पेशल पदार्थ केला असेल तरी आपल्याकडचं शेजारी किमान दोन घरात तरी नेऊन देतात. तसंच आपल्याकडेही येतं त्यांच्याकडून.

अंजू, अग मी कोकणात राहिलेय पण कॉलनीत ज्या गावांपासून 15,20 किमी लांब डोंगरात असायच्या. तिथे वेगवेगळ्या राज्यातील लोक शेजारी. प्युअर कोकणी असे नाही . आणि एप्रिल सुरू झाला की घाटावर यायचो ते जून अखेरपर्यंत. फणस/आंबा पोळ्या घरी बनवलेल्या आठवतायत पण सांदण नाही कधी.