गूळपोळी

Submitted by मनःस्विनी on 7 January, 2010 - 02:40
gulpoli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः
अर्धा वाटी गूळ किसलेला नाहीतर चुरा गूळ,
चार चमचे बारीक बेसन,
१ चमचा दूध,
२ चमचे शुद्ध तूप,
२ चमचे सफेद तीळ,
२ चमचे सुखे पांढरे खोबरे(काळी पाठ नसलेले) नाहीतर चुरा,
२ चमचे खसखस्(एच्छिक आहे. सर्वच जण टाकत नाहीत)
वेलची,
केसर,
तव्याला चुना

पारी:
१ वाटी कणीक,
२ चमचा बारीक रवा,
४ चमचे बारीक बेसन
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन,
पाणी लागेल तसे,
मिठ चवीला.

क्रमवार पाककृती: 

पारी कृती:
१. सगळी पिठ व रवा एक करून मध्ये खड्डा करून मिठ घालून मध्ये मोहन घालायचे व मस्त क्रम्स करायचे.
२. मग पाणी लागेल तसे घालून घट्ट भिजवून झाकून अर्धा एक तास तरी ठेवावे. रवा भिजतो.
३. एक तासाने हाताला जरासेच तेल घेवून एकदम मळायचे मस्त. तेल ओतायचे नाही पुन्हा. रवा एक्जीवे झाला पाहिजे. पुन्हा झाकून ठेवायचे.

सारणः
१. तीळ, सुखे खोबरे कीस, खसखस कोरडे असे वेगवेगळे मंद आचेवर जरासेच भाजून घ्यायचे,रंग बदलला नाही पाहिजे. बेसन ही तूपात खरपूस भाजावे वास येइपर्यन्त. मग जरासाच दूधाचा हबका मारावा.
२. मग सर्व(बेसन व गूळ सोडून) बर्‍यापैकी थंड करायचे व वाटायचे वेगवेगळे. ह्याचसाठी वेगळे वाटायचे की तेल सुटून मिक्सी खराब होवू शकतो. मध्ये मध्ये थांबून चमचा फिरवून अंदाज घेत वाटायचे नाहीतर तेल निघून पातं अडकते व मिक्सी खराब होइल. हि पूड तयार ठेवणे.
३. आता आधी गूळ व बेसन हातानेच वेगळा मिक्स करून घेवून मळणे व वरील पूड टाकणे. फूड प्रोसेसर असेल तर मस्त. पण खूप फिरवू नये गूळ उष्णतेने वितळेल. व मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते. असे गोळे करून झाकून ठेवावे. कोरडे करू नये.
४. वेलची पूड्,केसर कुस्करून टाकावे.

लाटणे:
एकतर उंडा करून मध्ये भरून लाटणे.
पण ह्याच्यापेक्षा दोन पातळ चपाती करून सारण सर्व बाजूने पसरवायचे पण कडे पर्यन्त मिश्रण भरू नये. गूळ वितळून बाहेर येतो. मग आधी कडेकडेने लाटावे.( साधनाच्या मांडे कृती मध्ये दाखवलेय ना तसेच).
१.कडेने पातळ असा उंडा करायचा. त्याने कडा पातळ रहातात.
gupo1.jpg
२.मोदकासारखा उंडा करून जितके ज्यास्त सारण भरता येइल तितके भरायचे,
gulpoli.jpggupo2.jpg
३. हातानेच मग मोदकासारखा जवळ आणून तोंड बंद करून हातानेच जरा चपटा करायचा कडेने पातळ ठेवत.
gupo3.jpg
४.मग हलक्या हाताने लाटायचा, मी पातळच लाटते. गूळ जर मस्त मिक्स असेल तर नाही येत बाहेर.
gupo4.jpg
५. पोळी एका बाजूने भाजली की पलटायची.
gupo5.jpg
६. मस्त फुगते.
gupo6.jpg
७. खुसखुशीत पोळी मध्ये तोडून बरी पडते..
gupo9_0.jpggupo8.jpg

अधिक टिपा: 

१.तवा हा खूप गरम नाही पण योग्य गरम पाहिजे. नाहितर चिकटते. दिनेश ह्यांनी मला गेल्यावेळेला चुना लावायला सांगितला तव्याला. मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. फक्त गॅस नीट ठेवायचा व तव्याचे तापमान नीट सांभाळायचे. एक बाजू भाजली की दुसरी पलटून भाजायची. ज्यास्त वेळा उलट पलट करु नये. गूळ बाहेर आल्याने चिकटतो व उलटत नाही गॅस खूपच गरम झाला तर व पोळी कच्ची रहाते.
एकदा सवय झाली दोन तीन पोळी झाली की होते मग नीट.
२. गूळ कडक असेल तर स्टील डब्यात घालून कूकरमध्ये शिटी शिवाय १० मिनीटे घालायचा व मग लगेच बाहेर काढून फोडायचा.
३. तीळाचे प्रमाण व खोबरे आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करु शकतो.
४.जर तीळ्,खसखस ,खोबरे भाजले ना की आपोआप तेल सुटते वाटताना मग गूळ अ‍ॅड केला की लगेच ते तेलच बाईंडिंग सारखे काम करते. मी बघ असे लाडू वळून ठेवलेत. मस्त तेलकट व आपोआप वळतात. मग पोळीत लाटले की पसरतात देखील मस्त जराशा दाबाने.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्षी इथे कोळीच कसे फिरकले नाहीत ?

आजकाल तयार केलेला गूळ दुकानांमधे (पुण्यात तरी जिकडे तिकडे मिळतो) उप्लब्ध असल्यामुळे , पुरण पोळीच्या मानाने या पोळ्या करणे सोपे सुट-सुटीत झाले आहे !

पोळी भाजताना , गूळ बाहेर येउन तव्यावर जळतो त्याचा वास तर फारच खमंग !

आली का वर..
>>>इथे कोळीच कसे फिरकले नाहीत ?<<<
कोळी? ते कशाला येतील इथे? Wink

मी बर्‍याच आया मावशींकडून एकले हि रेसीपी , प्रत्येकाची पद्धत वेगळी असते हे मान्य पण , रवा न्हवताच त्यां एकलेल्या रेसीपीमध्ये.
सहज फिरत आले व आठवले म्हणून हि पिंक( मताची).

मनस्विनी, सिंडी आणि मंजूडी तिघींच्या पाककृती आणि टीपा वाचून आज फायनली गुळपोळीचे धाडस केले.
तिघींचेही मनापासून आभार.

नेहमीच्या पोळ्या प्रायोगिक तत्वावर होत असताना फक्त पहिली गुळपोळी तव्याला चिकटली आणि बाकीच्या छान झाल्यामुळे डायरेक्ट सुगरण झाल्यासारखे वाटतेय.

चला चला संक्रांत आली! धागा वर काढण्याची वेळ झाली!

धागा आधी वाचून त्यावरची सगळी चर्चा वाचुन मग करु की नको, करु की नको असे करत करत गुळपोळीची तयारी करावी. संक्रांतीला छान पोळ्या करून खुष व्हावे! शास्त्र असतं ते!

जुन्या मायबोलीवर पण एक रेसिपी होती, मला मिळाली नाही आता.

मी गेले काही वर्ष अन्नपूर्णामधली रेसिपी फॉलो करते आहे. चांगल्या होतात त्या पद्धतीने.

Pages