मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..) Landscape Photography..

Submitted by अ'निरु'द्ध on 18 October, 2020 - 08:31

मुखपृष्ठ :

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..

फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. Wink )

जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा ही निसर्गृश्य जास्त प्रमाणात क्लिक केली जातात, याचं कारण असं की..
फोटो काढण्यासाठी ती सहज उपलब्ध असतात…
स्थिर असतात..
डोळ्यांना, मनाला आनंद देतात…
आपल्या सहलीच्या स्मृती अगदी सहज जिवंत ठेवतात..
इतरांना दाखवायला आणि त्यांनाही बघायला आवडतात..
ह्या सृष्टी सौंदर्याच्या आवडीशी आपली एक नैसर्गिक नाळ जोडली गेलेली असते..

ह्या धाग्यामधे आपण आपली अशीच विविध निसर्गदृश्य देऊ या, पाहू या..

ह्या निसर्गचित्रात (लँडस्केप) मधे काय असेल..
तर.. कुठलाही डोंगर, टेकडी, तलाव, नदी, समुद्र, समुद्रकिनारा, जंगल, कुरण, वनश्री, बर्फाच्छादित प्रदेश आणि अगदी वाळवंटही..
अशा गोष्टींची नयनरम्य प्रकाशचित्रं (दूरचित्र/ Long Shots..) असतील..
लहानपणी आपण डोंगर, नदी, गावं, छोटी छोटी घरं असं चित्र काढायचो, तसे फोटोही चालतील..

सूर्योदय आणि सूर्यास्त हे ही खरं तर यातच मोडतात पण त्यासाठी आपला वेगळा धागा आहेच.

Wild Life Photography चे Long Shots ही खरं तर निसर्गदृश्यात मोडू शकतात पण ते ही आपण शक्यतो टाळणार आहोत.

निसर्गाचित्र/दृश्य ही निसर्गाशी संबंधित असली तरी निसर्गामधलं एकटं झाड, झुडूप, फळ, फुल, फुलं यांचे क्लोजअप्स यात मोडणार नाहीत.

आपलं प्रकाशचित्रं देताना त्याचं ठिकाण तर सांगाच..
पण त्या ठिकाणाची, फोटो काढतानाची काही खास आठवण असेल तर ती ही जरुर सांगा..
मग ती आपली शाळेची/काॅलेजची सहल असेल, मधुचंद्राच्या वेळी गेलेल्या हिल-स्टेशनचे फोटो असतील (दुसरा, तिसरा मधुचंद्रही चालेल कारण त्यावेळेला कदाचित फोटोग्राफीकडे आपलं जास्त लक्ष असेल Wink ) किंवा जिवलग मित्रांसोबतचं धमाल गेट टुगेदर असेल..
काही जण ट्रेकला गेले असतील किंवा काही एकांडे शिलेदार एकटेच अन-वाईंड व्हायला..

त्या तेव्हाच्या आठवणी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा जाग्या होतील..

हे फोटो काढताना काही स्पेशल सेटींग्ज वापरली असतील, कुठले फिल्टर्स वापरले असतील तर ते ही जरुर कळवा..
अशा फोटोग्राफीच्या काही टिप्स आणि/अथवा ट्रिक्स असतील तर जाणकारांनी त्याबाबत इथे मार्गदर्शन केलं तर नवोदित फोटोग्राफर्सना नक्कीच त्यातून काही घेण्यासारखं असेल..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

आणि सर्वात महत्वाचं : हा धागा फक्त बेफाट सुंदर फोटो काढणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्व मायबोलीकरांसाठी आहे.

हल्ली बहुतेकांकडे कॅमेरे असतील.
सगळ्यांकडे मोबाईल तर असतोच ज्यामधूनही चांगले चांगले फोटो येतात.
ते बिनधास्त इथे द्या. शेवटी बघणारे सर्व आपलेच मायबोलीकर असणार आहेत.

कधी फोटो सुंदर असेल, कधी त्याच्या आठवणी सुंदर असतील.. तर कधी दोन्हीही सुंदर असेल..

तेव्हा निसर्गदृश्याचे प्रचि आणि आठवणी द्यायला विलंब करु नका..
(आणि जरी सर्व निसर्गचित्र/दृश्य "Landscape" या Term ने ओळखली जातात आणि म्हणून बहुतांशी Landscape म्हणजे आडव्या Format असतात तरी उभ्या स्वरुपातल्या निसर्गदृश्यांचही स्वागत आहे..)

नमुना प्रचि :

काबो-दे-रामा किल्ल्यावरुन बेतिलबेतिम (South Goa) ला परत येणाऱ्या रस्त्यावर ही खाडी लागली.
पुलावरुन (Assolna Bridge बहुतेक) गाडी चालली होती, सूर्य मावळतीला आला होता आणि पुलावरुन जाताना सहज खाली नजर गेली तर ही एवढी नारळाची झाडं हारीने उभं राहून पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब निरखत होती...


टीप : मायबोलीच्या प्रकाशचित्रांविषयक धोरणानुसार :

इथे दिलेले प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहायला मिळेल - https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषय निरु.
हा फोटो लडाख भागातल्या 'स्टोक कांगरी' ट्रेक च्या वेळेस काढला आहे, ह्या ट्रेकला सुरुवात केल्यावर फोनला रेंज मिळत नाही पण ह्या फोटोत दिसणारी जी टेकाडं आहेत तिकडे चढल्यावर फोनला रेंज मिळते त्यामुळे आमच्या गटसोबत असलेली स्थनिक माणसे भराभर वर चढून गेली आणि घरच्यांशी बोलून परत खाली आली.
IMG_20170902_095025.jpg

निरु, तुम्ही टाकलेला फोटो सुरेखच आहे पण मला वाटते प्रतिबिंब हा एक वेगळाच विषय होऊ शकतो.
सॉरी किशोर माझ्या पहिल्याच फोटोत हिरवाई अगदीच नावाला आहे

हर्पेन, सुंदर फोटो..
आणि निसर्ग फक्त हिरवाच असतो असं थोडंच आहे.
म्हणून आता वरच्या यादीत वाळवंटाचाही समावेश केला आहे.
Desserts are Beautiful almost all times.
तुम्ही म्हणता तसं प्रतिबिंब हा नक्कीच वेगळा विषय होऊ शकतो..
पण त्याला किती प्रतिसाद मिळेल, माहिती नाही..
सध्या सुरुवातीला Broder Classifications करायचा विचार आहे.
जसे फोटोज् येतील आणि त्यावर प्रतिसाद येतील त्याप्रमाणे मग पुढचे विषय ठरत जातील.

<<<वाव्ह. मस्तच धागा. हिरव्यागार निसर्ग छायाचित्रांची मेजवानी मिळणार.>>>
@ किशोर मुंढे, हो. मेजवानी तर मिळायला हवी.. मायबोलीकर हातभार लावतीलच..

लक्षद्वीप येथील काल्पेनी बेटावरून टिपलेले एका दूरवरील बेटाचे छायाचित्र. बेटे कार्टूनफ़िल्ममधे दाखवतात अगदी तस्सेच दिसत होते Lol
मग मीच या बेटाचे नामकरण केले. 'My Fairy Island'
IMG_20201019_105815.JPG

(अवान्तर: हा फोटो माझ्या google album मधे बर्याच दिवसापासून आहे. सहजच google lens वापरून check केले असताना काही travel componies नी वापरलेला दिसला. काय करता येईल?)

मस्त धागा निरु!
धाग्याच्या हेडरमध्ये लिहलेला मजकूरही आवडला.... काय चालेल, काय चालणार नाही याबद्दल जरा स्पष्टता आली.

निरु.... हेडर मधला फोटो उत्तम!
हर्पेन आणि मनिम्याऊ.... खुपच सुंदर फोटो!

धन्यवाद निरु आणि स्वरुप.

औंधाच्या यमाईकडे जातानाच्या वाटेवर काढलेला हा फोटो. ऐन उन्हाळ्यातील भर दुपारच्या उन्हाला अटकाव करणारी गारेगार सावली देणारी ही झाडे रस्ता रुंदीत जाणार होती म्हणे Sad
DSC02400.jpg

मनिम्याऊ : मस्त प्रचि.. ट्रॅव्हल कंपन्यांना पण घ्यावासा वाटला यात सगळं आलंच.. Happy
तुमच्या काल्पेनी मुळे माझीही लक्षद्विप यात्रेची आठवण ताजी झाली.
टिपू सुलतान बोटीने आम्ही ५ बेटं केली होती. माझेही फोटो टाकतो.
अर्थात ते भयंकर जुने आहेत, १९९२ सालचे.. त्यामुळे दर्जा यथातथाच असणार आहे.. आणि काही छान आठवणीही देतो..

स्वरुप : धन्यवाद... आणि नुसते धन्यवाद नकोत.. आम्हालाही कौतुक करायची संधी पुन्हा पुन्हा द्या.. Lol

हर्पेन : मस्त रस्ता आणि मस्त फांद्यांचा विस्तार.. असे रस्ते घाट ओलांडून पुणे मागे टाकले की बऱ्याचदा दिसतात.. मला सध्या पन्हाळ्याचा रस्ता आठवतोय.. झब्बू देणारच..

Manoman, सुंदर Autumn प्रचि.. ठिकाणही सांगा नं प्लीज..

वासोट्याला जाताना, साधारण तासभर, बोटीतून प्रवास करावा लागतो. त्यावेळी जाताना काढलेला हा फोटो.

IMG_20171126_090215.jpg

आरण्यक मधे रात्र काढल्यावर बारवी डॅमच्या जंगलात गेलो होतो.
हा बारवी डॅमच्या बॅकवाॅटरचा फोटो.
हिवाळ्यातली भर दुपार होती.. पानगळीला आलेली पानं, रखरखीत लालसर मातीची जमीन पण डोळ्यांना थंडावा देणारं बारवीचं निळं-हिरवं गहिरं पाणी..
आणि त्यातली ती तरंगती नांव म्हणजे Cherry on the Top..


@ निरु
Manoman, सुंदर Autumn प्रचि.. ठिकाणही सांगा नं प्लीज..>>
स्कॉटलंडमधील आहे हा प्रचि .

IMG_20201019_135423.jpg

हा एक अतिशय आवडता फोटो। कोकणातला भोगवे किनारा। भोगवे किल्यावरून उजवीकडे खाली पाहिलं की हा सुरेख किनारा दिसतो। सोनेरी वाळूचा स्वच्छ विस्तीर्ण पसरलेला किनारा, सोबत पसरलेला निळाशार समुद्र आणि धरेचा गोलवा स्पष्ट करणारे क्षितिज!

मनिम्याव त्या कंपनींना एक इमेल टाकून सांग की हा तुझा फोटो आहे अन परवानगी न घेता कसा टाकलात?
एक उपाय हा की वॉटरमार्क टाकणे। अन्यथा निरु म्हणतात तसं गोड वाटून घ्यायचं Happy इदं न मम हा मंत्र नेहमी सोमि बाबत लक्षात ठेवावाच लागतो। एकदा एंटर केलं की संपली मालकी Wink

स्वित्झर्लंड मधल्या इंटरलाकेन स्टेशनवरुन लुसर्न शहरात गोल्डन पास रेल्वे रुटवरुन जाताना हा Sarnen तलाव लागतो.
रेल्वेमार्ग उंचावर आहे आणि गाव ह्या तलावाच्या काठी, डोंगराच्या कुशीत वळणदार रस्त्यावर वसलंय..

Turquoise Blue रंगाचा तलाव, तलावाच्या अलिकडच्या आणि पलीकडच्या काठांवरची छोटी छोटी घरं, काही घरं तर अगदी डोंगरावर.. एक छोटंस चॅपेल, डोंगरतळाची हिरवाई, सुंदर आखलेला रस्ता आणि चक्क पांढऱ्याशुभ्र रेतीची छोटीशी चौपाटी.. अजून काय हवं
विलक्षण सुखद थंडी होती ती मात्र प्रचितून दिसणार नाहीये..


हर्पेन अशी झाडे पुणे सातारा रोडवर होती.... मस्त वाटायचे तेंव्हा प्रवास करायला.... उन असे काही जाणवायचेच नाही!

वासोट्याचा फोटो कमाल क्लास! बामणोली वासोटा भागात अशी अचानक पाण्यातून वर आलेली झाडे दिसतात.... मुळात ते कोयनेचे बॅकवॉटर असल्यामुळे पाण्याची पातळी खाली वर होत असते..... कधीकधी आख्खे झाड पाण्याखाली असते तर कधी अगदी खालपर्यंत बुंधे दिसत असतात झाडाचे.... पाणी ओसरल्यावर तयार झालेल्या बेटांवर तात्पुरती हॉटेल्सही टाकतात स्थानिक लोक!

बारवी डॅमच्या फोटोतली होडी कसली टिपिकल आहे निरु!

मिस रेल पार्कच्या तलावाचा गोलाकार काठ बघून मरीन ड्राइव्हची आठवण झाली

भोगवे-निवती वगैरे लिस्टवर आहे!

IMG_7664.JPG

नक्की गाव किंवा तलाव कुठला आहे हे आठवत नाहिये पण कोल्हापूरहून राधानगरी मार्गे खाली सिंधुदुर्गकडे उतरताना वाटेत लागलेला हा स्पॉट..... एका फॅमिली ट्रीपमध्ये मस्त झाडाखाली पंगत मांडून घरुन आणलेले डबे खाल्ल्लेले या तलावच्या काठी!

IMG_5547.JPG

हा जंजिऱ्याच्या बुरुजावरुन घेतलेला फोटो!
जंजिऱ्याला बोट लागताना उडी मारुन किल्ल्यात आणि परत येताना बोटीवर अचूक उडी मारणे म्हणजे खायचे काम नाही!

जबलपूरवरून कान्ह्याला रस्त्याने जाताना लागलेल्या गावात ह्या रंगाची बरीच घरे होती पण ह्या घराशेजारी असलेले मोहरीचे शेत मात्र सगळीकडे नव्हते. हे म्हणजे खरे तर शेतातलेच घर!

DSC00019-001.JPG

Pages