मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

धोरण जाहीर केल्याबद्दल धन्यवाद, अ‍ॅडमिन-टीम. बाकी नीट वाचून प्रतिक्रिया देतो. पहिल्यांदा वाचल्यावर तरी योग्यच वाटते आहे. कोणत्याही सोशल नेटवर्क/वेब साईट चे प्रशासन यापेक्षा वेगळे काही अधिकृत धोरण राबवू शकेल असे वाटत नाही.

मी काही फोटो काळा घोडा उत्सवात गर्दीचे ,स्टॉलवर
च्या खरेदी करणाऱ्यांचे काढले होते आणि नेटवर टाकले होते ते पण काढून घ्यावे का ?

नील
तुम्हाला नक्की कसली माहिती हवीये? मी सिरियसली विचारतेय.
कसा दुरुपयोग करतात म्हणजे? दुरुपयोग केलेलं एखादं चित्र इथे कुणी पोस्ट करावं अशी तुमची अपेक्षा आहे का अशी कामं करणार्‍या (असे मॉर्फिंग केलेले फोटो/व्हिडिओ पोस्ट करणार्‍या) वेबसाइट्स च्या लिंक हव्यात?

फोटोशॉप वापरून एखाद्या फोटोमध्ये एका धडावर दुसरा चेहरा लावणं खूप सोप्पं आहे. तुमच्या-आमच्यासारख्या फोटोशॉपमधल्या अडाण्यांनासुद्धा १-२ प्रयत्नात जमू शकेल.

अशा विषयावरही लोकांचा आक्षेप असू शकतो? Uhoh
जे बरोबर आहे ते बरोबरच आहे. तुम्हाला या धोरणाचा अर्थ कळत नसेल तर नकाच टाकू फोटोज इकडे. नाहीतरी अतीच झाले आहे फोटोंचे पेव.. इतक्या सिंपल, बेसिक व बरोबर गोष्टीला आक्षेप व इतका विपर्यास! Uhoh

तुणतुण नै माझ्याकडे, मी आलो तर तम्बोरा/गिटार/सतार वगैरे भारदस्त घेऊन येईन. पण आत्ता वेळ नाही.
प्रश्न महत्वाचा आहे. प्रशासनाने त्यान्ची भुमिका योग्य मान्डली आहे.
चर्चा चालू आहे ती ही की "परवानगीचा" मुद्दा कुठ वर ताणत न्यायचा! किती ताणायचा अन किती नाही याचे निकष कोण ठरविणार.

अ‍ॅडमिननी धोरण जाहीर केल्यापासून माबोवर प्रकाशचित्र प्रकाशित करणारे जुने बाफं खणून खणून चित्रं काढून टाकत आहेत. मला वाटत नाही ह्याची गरज आहे. पूर्वी धोरण/नियम वेगळे असतांना किंवा ते आजिबातच अस्तित्वात नसतांना टाकलेली प्रचि आज काढण्यात काय हशील आहे?
ईथून पुढे धोरणानुसार आणि जबाबदारीने प्रचि काढले आणि प्रकाशित केले म्हणजे झालं, माबो प्रशासनाचीही तशीच अपेक्षा असावी.

मृण्मयी आणि मैत्रेयीने मांडलेला मुद्दा अजूनही ज्यांना खरंच कळला नसेल किंवा ज्यांना त्या मुद्द्याबद्दल शंका असेल त्यांनी स्वतःला एक सोपा प्रश्न विचारायला हरकत नसावी.
मायबोली ९९.९९% सभासदांनी आपल्या प्रोफाईलवर आपले स्वतःचे प्रकाशचित्र लावलेले नाही. का?
बहूतेक ९०% लोकांनी आपली खरी नावंही दिली नाहीयेत. का?

कारण आपण सज्ञान आहोत आणि आपल्याला आपली प्रायवसी प्रिय आहे. अनोळखी (भलेही त्यांच्याशी वर्षोनुवर्षे गप्पा मारत असू किंवा हिरहिरिने वाद घालत असू) माणसांना आपले नाव कळू नये चेहरा दिसू नये म्हणून आपण खबरदारी घेतो. का? तर जगात सगळेच लोक चांगला आणि नेक हेतू घेऊन वावरत नाहीत ह्यावर आपला विश्वास आहे. मग जसे आपल्यापुरते हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार आहे तसे दुसर्‍याची अशी माहिती ऊघड न करणेदेखील आपले कर्तव्य आहे. आणि जर असे दुसरे निरागस बालके, कुणा तिसर्‍यांचीच मुले असतील तर आपली जबाबदारी अजून वाढत नाही का? आपण कसे म्हणू शकतो की 'क्ष व्यक्तीला ज्ञ व्यक्तीच्या निरागस मुलांची प्रकाशचित्रे प्रकाशित करण्यास परवानगी असावी ह्यात मला 'य' ला काहीही वावगं नाही'. असे परस्पर विधान करण्याचा मला काय अधिकार किंवा माझा काय संबंध?

नील, तुझ्या एकंदर त्राग्यावरून तुला ह्यातली बरीच माहिती आहे असे दिसतेय. आम्ही अडाणी आहोत असे धरून तूच हि माहिती सर्वांबरोबर शेअर का करत नाहिस ? तसे केल्याने तुझा हा मुद्दा "माहिती अपुर्ण असल्याने त्याबद्दल प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अंदाज बांधतो." पूर्णपणे निकालात निघेल. कोणी कसलेही अंदाज बांधू शकणार नाही. कसला विपर्यास होण्याची संधी हि निघून जाईल. If this is a valid concern, you will be providing solution to it as well.
After all you agreed to the main point here "विनापरवानगी फोटो प्रसिद्ध न करण्याचा मुद्दा बरोबर आहे...", didn't you ?

अगदी सोप्या भाषेत उत्तर द्यायचं तर-
रस्त्यावरून आपण कार घेऊन चाललो असता आपली चूक नसताना एखादा अपघात होऊ शकतो .
याचा अर्थं असा नव्हे की गाडी चालवूच नये.
याचा अर्थं इतकाच की गाडी चालवताना आपल्याकडून कुणाचे वाईट होऊ नये याची मॅक्सिमम काळजी घेणे.

प्रत्येकवेळी फोटोचा गैरवापर पॉर्नोसाठीच होईल असे नाही.
पण उदाहरणार्थ आज मी एखाद्या शाळेत जाणार्या मुलींच्या ग्रूपचा फोटो कौतूकाने नेटवर टाकला, आणि उद्या कुणी हाच फोटो
'महाराष्ट्रातील मुलींना शाळा सोडून करावा लागतोय वेश्याव्यवसाय' या किंवा अश्याच हेडींगखाली कॉपीपेस्ट करून वापरला तर मला नक्कीच वाईट वाटेल.
मलासुद्धा तिर्हाईत व्यक्तीचे फोटो संमतीशिवाय (इनफॉर्म्ड कंसेंटशिवाय ) टाकू नयेत असे वाटते.
इतकंच काय फेसबुकवर उगाच कुणी स्वतःकडच्या फोटोत मला टॅग करू नये असे वाटते.
जिप्सी आणि इतर फोटोग्राफर माबोकर, आम्हाला तुमच्याबद्दल नितांत कौतुक आहे.
या धाग्यावर सुरू झालेली चर्चा व्यक्तिगत न घेता एका नविन धोरणाला सुरूवात अश्या प्रकारे घ्या.
मला आठवते आहे की मागे माबोवरच कवितांच्या रसग्रहणाच्या निमित्ताने साहित्याच्या कॉपीराईटविषयी चर्चा झाली होती.
त्यावेळीही आत्ताच का, माझ्याच धाग्यावर का असा वाद झाला होता.

बाकी मी माझ्या दोन्ही मुलांचे फोटो माबोवर प्रकाशित केले आहेत आणि त्याचे जे काही परिणाम होतील (झालेच तर) त्याची पूर्ण जबाबदारी माझी असेल माबोची नाही याची कल्पना आहे.

अल्पना,

मी गेली १७ वर्ष जहिरात क्षेत्रात काम करतोय. फोटोशॉप पण वापरतोय. आपल्या माबोच्या वविच्या जाहिराती ही मीच बनवतोय गेली काहि वर्ष. त्यामुळे कसं काम करतात ते माहिती आहे मला. मला जाणुन घ्यायचा होतं कि इथल्या किति लोकांना ते माहिती आहे.

मी पुन्हा लिहितोय पुर्वपरवानगी घेउन फोटो टाकणे हे योग्यच आहे.. त्याला मी नाहि म्हणत नाहि. पण चाइल्ड पॉर्नोग्रफिची जी भीती घातली जाते आहे ती खुप जास्त टोकची भुमिका आहे असे माझे मत आहे. आजच्या जगात प्रत्येकाचे खिश्यात कॅमेरा आहे.. परदेशात तर रस्त्यावर, चौक चौकत कॅमेरे आहेत. त्यामुळे तुमच्या नकळत तुमचे चित्रिकरण कुणीही करु शकतं. ते ही चुकिचेच आहे. पण आपण ते टाळू शकत नाही.

आता फोटो एडिट करण्याबद्दल..
माबो वर टाकले जाणारे फोटो हे अत्यंत लो रेसोल्युशन चे असतात. ते अशा गोष्टींसाठी वापरले जाण्याची शक्यता नाहि. आणि एखादा फोटो असला तर व्हिडिओ मध्ये वापरला जाउ शकत नाहि.

अ‍ॅडमिननी धोरण जाहीर केल्यापासून माबोवर प्रकाशचित्र प्रकाशित करणारे जुने बाफं खणून खणून चित्रं काढून टाकत आहेत. मला वाटत नाही ह्याची गरज आहे.

आता मात्र कहर झाला..याची गरज नसेल तर मायबोलीच्या धोरणाची आणि त्या दरम्यान घडलेल्या चर्चेचीही काही गरज नाही असे म्हणायला पाहीजे...
इथे केव्हापासून जो धुमाकुळ सुरु आहे त्यात मुद्दामच काही सहभाग घेतला नव्हता पण आता डायरेक्ट उल्लेख केल्यावर माझी बाजू सांगणे मला भाग आहे.
मला वाटतं इथली चर्चा तुम्ही वाचलेली दिसत नाही. इथे टाकलेली प्रचि ही परवानगीशिवाय आहेत आणि त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे असा आक्षेप घेण्यात आला आहे. मग गैरवापर करणारे काय मायबोली धोरण अमंलात आणल्यानंतर टाकलेल्याच प्रचिंचाच गैरवापर करणार आहेत का....
इथे सर्वांनीच माहीती दिली आहे की फोटोंचा चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी वापर केला जातो, जी बाब माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे तातडीने मी असे फोटो काढून टाकले...मला असे मुळीच वाटत नाही की त्या फोटोंचा गैरवापर होण्यात आपला अर्थाअर्थी काही संबध असावा....
तुमच्या माहीतीसाठी ज्या फोटोंमध्ये व्यक्ती होत्या असेच बहुतांश फोटो उडवले गेले आहेत. भटकंतीचे, डोंगरांचे नाही. आणि त्या व्यक्तींच्या पूर्वपरवानगीशिवायच ते फोटो इथे प्रकाशित केले होते. त्यामुळे इथल्या चर्चेचा आणि माबोच्या धोरणाचा आदर करतच ते फोटो काढले आहेत. यात कसलाही आक्रस्ताळेपणा किंवा भावनेच्या भरात केलेला वेडेपणा नाही...
पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आहे. आणि यापुढे असा एकही फोटो माबोवर येणार नाही याची दक्षता घेईन असेही सांगितले आहे...
या पलिकडे काय अपेक्षा आहे तुमची

अशुचँप, +१०००००००००००००००००००००००००

नील,
पण चाइल्ड पॉर्नोग्रफिचा मुद्दा फार फेच्ड असेल पण 'बेटर बी सेफ दॅन सॉरी' असं प्रत्येक पालकाला वाटत असेल की नाही. नसेलही तशी काही भिती पण एखाद्या तिसर्‍याच्याच फोटोसाठीकिंवा विडीओ क्लिपसाठी ती आहे किंवा नाही हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण? 'मास हिस्टेरिया' कसं काम करतो हे तुम्ही आम्ही कसं सांगणार. म्हणूनच सगळे म्हणत आहेत की हे फक्त सज्ञान मनुष्या त्याच्या स्वतःबद्दल किंवा पालक आपल्या अंडरएज पाल्याबद्दल ठरवू शकतात, अश्या रिस्कची जबाबदारी घेऊ शकतात.

लहान मुलाला चॉकोलेट देणे ह्यात आपल्याला प्रेम दाखवणे असू शकेल, पण त्या मुलाला चॉकलेट पासून एखादी जीवघेणी अ‍ॅलर्जी आहे की नाही हे तुम्हाला माहितच असू शकत नाही. म्हणून पालकांचा कन्सेट महत्वाचा. ईतकेच. चॉकलेट खाल्याने त्याला एमर्जन्सीत न्यावे लागेलंच असे काही नाही किंवा म्हणून तुम्ही लहान मुलांना चॉकलेट ऑफर करूच नये असेही काही नाही.

आता फोटो एडिट करण्याबद्दल..
माबो वर टाकले जाणारे फोटो हे अत्यंत लो रेसोल्युशन चे असतात. ते अशा गोष्टींसाठी वापरले जाण्याची शक्यता नाहि. आणि एखादा फोटो असला तर व्हिडिओ मध्ये वापरला जाउ शकत नाहि.
<<<

नील, माहितीबद्दल धन्यवाद. एडिटींग करण्यासाठी फोटो किमान किती रिसॉल्यूशनचा असणे आवश्यक असते?

आशुचँप,
तुमच्या एवढ्या मोठ्या पोस्टीला एकाच प्रश्नाने ऊत्तर देतो.
जुने फोटो काढून टाकावे अशी अपेक्षा किंवा हुकूम माबो प्रशासनाने केला आहे का?

आज नियम बनवला तो ईथून पुढे लागू होईल असे एक जनरल लॉजिक असते. चर्चा झाली, धोरण बनले, तुम्हाला पटले, तुम्ही जबाबदारी घेऊन पावलं ऊचलली ह्यात आनंदच आहे.
गैरवापर करणारे माबो धोरणाची वाट बघत नाहीत हे ही बरोबरच आहे पण म्हणून जुने काही ऊडवण्याची गरज आहेच असे मला वाटत नाही. (असे माझे मत). धोरणानुसार जसे प्रचिबद्दलचे अधिकार फोटोग्राफरचे आहेत तशीच त्याबद्दलची जबाबदारीही. तुम्हाला तुमची जबाबदारी मोठी वाटत असल्यास त्याबरहुकूम तशी अ‍ॅक्शन घेण्यास तुम्ही स्वतंत्र आहात.

गजानन, माबोवर टाकले जाणारे फोटो हे ६०० पिक्सेल (width) मध्ये रिसाइझ होतात..
हे रेसोल्ञुशन खुप कमी आहे.. असे फोटो एडिटींग साठी नाहि वापरले जात कारण मिक्सिंग साठी चांगले रेसोलूशन असावे लागते नाहितर इमेज ब्लर होते. आणि अशा ब्लर्ड इमेजेस खराब दिसतात.
ना ही या साइझ मधले फोटो प्रिन्ट साठी वापरले जाउ शकत..

चमन,
तुमचा मुद्दा योग्य आहे. पण कोणत्या गोष्टीचा किती त्रागा करायचा याला काहि मर्यादा हवी कि नको.

माफ करा मी तुमचं उदाहरण देतोय. जर तुम्हाला एखादा मुलगा आहे आणि त्याचा फोटो काढताना तुम्ही तुमच्या बायकोला सांगितलत कि मी याचा फोटो काढुन एका सोशल साईट वर टाकतोय पण कदाचित या फोटोचा वापर चाइल्ड पॉर्नोग्राफी करणारे करु शकतील... तर तुमची बायको तरी तो फोटो काढायला परवानगी देइल का? तर नाही. अगदी आपले नातेवाईक ही अस सांगितल्यावर परवानगी देणार नाहित त्यांच्या मुलांचे फोटो काढायची.

काहि चुकले असेल तर क्षमस्व.

आता अशुचँप आणि जिप्सी बद्दल...
त्यांनी काढलेले कोणते फोटो इथे ठेवायचे आणि कोणते काढायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल कुणी त्यांना अडवू शकत नाही.

जुने फोटो काढून टाकावे अशी अपेक्षा किंवा हुकूम माबो प्रशासनाने केला आहे का?

मला काय अर्थच कळत नाहीये तुमच्या बोलण्याचा....मी अतिशय स्पष्टपणे सांगितले की माझ्या इथल्या कुठल्याही फोटोचा गैरवापर होऊ नये यासाठी मी इथून फोटो काढून टाकले. यात प्रशासनाच्या अपेक्षा आणि हुकुम यांचा संबंध येतोच कुठे.
ज्या गोष्टीवर इथल्या बहुतांश लोकांचा आक्षेप आहे की परवानगी न घेता लहान मुलांचे फोटो प्रकाशित का केले...
आता केले ते केले असे म्हणून कसे चालेल....गैरवापर करणार्यांना असे म्हणू का...यापूर्वीचे फोटो घेऊन त्याचा गैरवापर करू नका बरं....
किती हास्यास्पद आहे हे...

ओके नील.

इथल्या फोटोंच्या साइझचा आणि क्वालिटीचा मुद्दा लक्षात आला नव्हता.

पण इथे धिरणामध्ये अ‍ॅडमिननी पण दुरुपयोगाबद्दल जसं लिहिलं आहे तसंच प्रायव्हसी आणि सुरक्षा याबद्दलही लिहिलं आहेच. माझ्या आत्तापर्यंतच्या याबाबतच्या पोस्ट बघितल्या तर त्यातही प्रायव्हसीचाच उल्लेख आला आहे. इनफॅक्ट अ‍ॅडमिननी पण प्रकाशचित्र टाकायला नाही म्ह्टलं नाहीये तर फक्त परवानगीबद्दल लिहिलंय आणि साजिरा म्हणतोय तसं हक्क आहेत म्हणून जबाबदारीही असेल इतकंच म्हटलंय.. म्हणजे त्यांनीही प्रायव्हसी या मुद्द्यालाच जास्त प्राधान्य दिलंय ना.

नील, हल्ली बरेच जण चांगल्या दर्जासाठी पिकासावर फोटो अपलोड करून त्याची मोठ्या आकारातली लिंक इथे देतात. (गुलमोहरातल्या प्रकाशचित्र विभागात चक्कर टाकली तरी याची अनेक उदाहरणे दिसतील) त्यांचेही रिसोल्यूशन ६०० मध्ये रिसाईझ होते का?

कमी रिसोल्यूशन मुळे होणारे ब्लरींग, लो प्रिंटींग व्कालीटी हे पटले.

पण म्हणून कमी रिसोल्यूशन असलेले फोटो चाईल्ड पॉर्नोग्राफिसाठी निषिद्धच मानले जात असतील, हे माझ्या मनाला पटत नाही. (माझ्यामते चेहर्‍याचे क्लोजअप्स असलेले फोटो ६०० किंवा ८०० च्या रिसोल्यूशन्स मध्येही बर्‍यापैकी पुरेसे असावेत एडिटींगसाठी). प्रत्येकाचा अनुभव, ऐकीव, लिखित माहिती, यानुसार प्रत्येकाचे मत, त्याची तीव्रता वेगवेगळ्या पातळीवरची असू शकते. त्यामुळे माझे धोरण इतरांपेक्षा वेगळे असू शकते.

चमन, पुर्वी ड्कवलेले फोटो खणून काढून उडवायची गरज नाही हे लॉजिकल असले (आणि माबो प्रशासनाची तशी अपेक्षा नसावी हे बरोबर असले) तरीही आशुचँपच्या च्या म्हणण्यानुसार ही तशी खुप गंभीर बाब आहे आणि हा फॉलो थ्रू (शोधून काढून फोटो डिलिट करणे) न केल्यास बेसिक इंटेटलाच धक्का बसतो हे ही बरोबर आहे. थोडक्यात इथून पुढे फोटो डकवले नाही पण पुर्वी डकवलेल्या फोटोंचा गैरवापर झाला तर काय?
आशुचँप तुमचा निर्णय खरच खुप चांगला आहे आणि इतरांनीही तशी तयारी दाखवली तर फारच उत्तम.

तुमचा मुद्दा योग्य आहे. पण कोणत्या गोष्टीचा किती त्रागा करायचा याला काहि मर्यादा हवी कि नको. >> नील मुद्दा हा आहे कि त्रास झाला तर तो भोगावे लागणारे वेगळे आहेत. त्यांना होउ शकणार्‍या त्राग्याचे काय ? त्याची मर्यादा इतर कशी काय ठरवणार ? तो अधिकार फक्त त्यांचाच आहे.

तुम्ही resolution बद्दल जे म्हटले आहे ते योग्य वाटते पण काहीच दिवसांपूर्वी हपो वर मोबाईल वरून घेतलेल्या फोटोंबद्दल ते रिव्हेंज पॉर्न मधे वापरले होते अशी बातमी होती, तेंव्हा rather err on side caution बरोबर नाहि का ?

आशुचँप तुमचा निर्णय खरच खुप चांगला आहे >> +१

I rather err on side caution.>>>> +१! ब्लर्ड असले तरी तिथ पर्यंत मजल जायलाच नको!

अल्पना,
माझा हाच मुद्दा होता... की पुर्ण माहिती लक्शात न घेता उगाच त्रागा करण्यात अर्थ नाहि.
अहो कहि लोकंची एक्स्ट्रीम मतं पाहिली म्हणुन मी ही तशीच टाकली होती.
फरक हा आहे की मला माहिती होता की मी अगदीच एक्स्ट्रीम बोलतोय... Happy

आणि समजा जिप्सिनी जुन्या काहि थीम्स मध्ये १० फोटो टाकलेत आणि आता नव्या धोरणानुसार त्यातले ३-४ काढावे लागणार असतील तर ती थीम त्याच्यासाठी अपुर्ण रहाते. अशावेळी सर्व फोटो काढले तर चुकले काय?
हे म्हणजे पुर्ण जमलेल्या कवितेतली दोन कडवी काढण्यासारखा आहे.

गजानन, ते फोटो ही ८०० पिक्सेल होतात.

असामी, हल्लि मोबाइल कॅमेरर्‍यात पण ४२ मेगापिक्सेल आला आहे.. अगदी साढ्यातल्या साध्या मोबाइल मध्ये पण ३.५ मेगपिक्सेल कॅमेरा असतो म्हणजे जवळपास ११०० पिक्सेल..

मला कुणीच त्रागा करताना दिसत नाहीये. म्हणणारे हेच म्हणत आहेत की परवानगीशिवाय फोटो काढू नका किंवा प्रसिद्ध करू नका. काउंटर ऑर्ग्युमेंट करणारे मात्र दुरुपयोग होतो का, मग कुठेच फोटो देवू नयेत, रादर काढूच नयेत असे म्हणत आहेत.

तुम्हाला पटलंय ना की परवानगी शिवाय फोटो काढणं/प्रसिद्ध करणं इथिकल नाही. बस्स. तेवढाच तर मुद्दा होता/आहे.

Pages