कृष्णडोहाच्या पैलतीरी**षष्ठम चरण...६

Submitted by अस्मिता. on 3 July, 2020 - 18:06

या आधीचे भाग इथे वाचू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण...१
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण...२
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण...३
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण...४
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण...५

इथून पुढे......

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** षष्ठम् चरण
beautyvishnu.jpg

सर्व सख्या त्यांच्या भोजनसामग्रीचे वाडगे व स्वच्छ वस्त्राच्या गाठोडीत बांधलेल्या दशम्या घेऊन निर्धारित समयावर एकत्र निघाल्या.

मुग्ध व मधुर हितगूज करत त्यांची नाजूक पावलं यमुनेच्या काठाकाठानी पडत होती. प्रत्येकीने चौघींना पुरेल इतकी शिदोरी घेतली होती. उत्साहाने जरा जास्तच घेतल्या गेले हे त्यांना बोलताना लक्षात आले. कुणी बालगोपाल दिसले तर त्यांच्यासह हा खाऊ वाटावा असे त्यांच्या मनात आले.

सुचरितेच्या तातांनी तिला मथुरेहून नवीन वस्त्र आणले होते. चैत्र पौर्णिमेला आणले होते पण त्याचा घागरा सीवन करण्यात श्रावण उजाडला. पीत-हरी रंगाच्या घागऱ्याचे सर्व सख्यांनी कौतुक केले. त्यावर जपाकुसुमाच्या रंगाचे नक्षीकाम खूपच अप्रतिम जमले होते.

यावरून कुणाला कुठला रंग आवडतो याची चर्चा सुरू झाली. त्याची कारणेही सांगण्यात येऊ लागली. तसे नारायणी म्हणाली, " मला तर श्वेतरंग सोडून सर्वच रंग आवडतात. कारण श्वेतरंग हा रंगच नाही मुळी तो तर रंगाचा असणारा अभाव आहे. नीलवर्ण मात्र मला विशेष प्रिय आहे. जर माझ्या मनाला रंग असता तर ते नीलवर्णी असते !" तसे दीपगौरिका म्हणाली , " म्हणजे तुला आमचा नीलवर्णी कान्हाही खूप आवडेल ".

विषय कुठलाही असला तरी गप्पा नकळत कान्हाकडे वळायच्या. "कान्हा" अतिरिक्त दुसऱ्या गोष्टींविषयी बोलताना प्रयास करावे लागायचे , हे त्यांचे त्यांनाही माहिती नव्हते.

यमुनेला या वेळच्या पर्जन्यवृष्टीने भरपूर जलौघ होता. या गोपींच्या सारङगजमुखासमान चरणखुणा पळभरासाठी रेतीत उमटायच्या. कधी यमुनेच्या स्नेहल लाटा या चौघींच्या चरणांना अलवार स्पर्शून जायच्या. वातावरणात अवर्णनीय अनुराग होता. बरेच दूर आल्यावर व ठरल्याप्रमाणे चरण दुखू लागल्यावर त्यांनी विश्राम करून आपला वनभोजनाचा कार्यक्रम उरकायचे ठरवले.

शेवटी गर्द झाडी असलेल्या भाग लागला आणि एक भला मोठा वटवृक्ष दिसला. त्याच्या छायेत बसून भोजनाचा कार्यक्रम करण्याचे ठरले. त्याप्रमाणे गोपी सर्व शिदोरी मांडायला लागल्या क्षुधा लागलेली होतीच.

हसतखिदळत आस्वाद घेत गप्पा चालल्या होत्या. एकमेकांना आग्रह करत ताव मारणे सुरू होते. चिमणीचिमणी पोटं लगेच भरली. आता उरलेल्या भोजनसामग्रीला परत न्यायचे नाही हे ठरवल्याप्रमाणे त्या बाळगोपाळांना शोधणार तर त्यांनाच आवाज आला.

थोड्याशा दूरवर असलेल्या पिंपळवृक्षाच्या ओट्यावर काही बालगोपाल लपाछपी खेळताना दिसले. मधुमंगलवर राज्य आले होते. बाद झालेले काही गडी त्याला इतर गडी शोधण्यासाठी मदत करण्याचा आव आणून आणखी गोंधळ वाढवत होते. गोपसख्या उर्वरित सर्व शिदोरी त्यांच्यासाठी घेऊन तिथे गेल्या.

तशी ती भुकेली बाळं उत्सुकतेने धावतच आली त्यांच्याकडे. तेही अर्धा डाव व बरेच गुप्त गडी तसेच सोडून. मग 'अरे खर्वस पण आहे का, सुचरिता ताई मिठाई दे ना , काकी इंदुमतीच्या हातची खोबऱ्याची चटणी म्हणजे वाह , पूर्ण वृन्दावनात काकी गुणवंतीसारख्या मऊसुत दशम्या कुणी नाही बनवू शकत. ' असे वेगवेगळे संवाद ऐकायला आल्याने बाकीचे लपलेले गडीपण बाहेर आले.

बघता बघता भोजनाचा फन्ना उडायला सुरू झाला . सर्व सख्यासुद्धा पुनःपुन्हा आग्रह करत होत्या. अचानक कुणाला तरी लक्षात आले की कान्हाही लपला होता आपल्यासोबत . मगं काय प्रत्येक जण हाक मारतयं , 'अरे गोविंदा बाहेर ये, कान्हा खेळ संपला आता, मुकुंदा कुठे बरे लपलास , मोहना ये आता , मुरलीधरा येतोस का संपवू तुझा खर्वस ? '

नारायणीला वाटले एका मुलाला एवढी वेगवेगळी नावं , तिही अर्थपूर्ण त्याच्या वेगवेगळ्या गुणांमुळे , आश्चर्य आहे. आपण ज्याच्या वेणूवादनाने मंत्रमुग्ध होतो, स्वतःला विसरतो तो कसा बरा असेल. आपल्याला आवडणारा नीलवर्ण आहे म्हणे त्याचा ,खरे असेल का हे....

...तोच खळाळणाऱ्या झऱ्यासारखे हास्याचा आवाज येऊन त्याच पिंपळवृक्षाच्या वरच्या शाखेवरून कृष्णाने त्यांच्या पुढ्यात उडी मारली. दचकलेच सगळे !!

नारायणी तर पहातच राहिली. त्याचा सावळा निळसर वर्ण , भव्य कपाळ , खांद्यावर रूळणारे किंचित कुरुळे केस , केसात खोवलेले मोरपीस, कमरेला बांधलेली मुरली, मोती सांडावेत असे खट्याळ निर्व्याज हसू , असे नेत्र तर तिन्ही लोकी कुणाचेही नसतील असे तिला वाटले. सहस्त्रसूर्याचे तेज व सहस्त्रचंद्रांची शीतलता असलेले ते नेत्र होते. खरंच माझ्या श्रीहरीने जर साकाररूप घेतले तर ते असेच असेल याबद्दल तिला शंकाही राहिली नाही.

नित्यप्रभेने विचारले सुद्धा "तू इथेच लपला होतास तर आम्हाला आभासही कसा नाही झाला. मोठा द्वाड आहेस की कान्हा तू तर !"

त्यावर गालातल्या गालात हसत नारायणीकडे बघत कृष्ण म्हणाला " मी नित्य तुमच्या समीपच असतो पण कोणी मला समीप शोधतच नाही. जे माझे स्मरण करतात त्यांचा वियोग तर मलाच सहन होत नाही. ही निकटता मलाही तितकीच प्रिय आहे. जिथे मी असतो तिथे वियोग व दुःखाला थाराच नाही मुळी."

तशी सुरचिता म्हणाली , " बरं बाबा, खाऊन घे आधी , भुकेजला असशील नं, तूच राहिला आहेस खायचा. तुझे प्रवचन आपण एकादशीला अंबिकेच्या मंदिरात ठेवू मगं तर झालं. "

"माझ्या प्रियजनांनी खाल्ले की मी तृप्त होतोच गं , पण माझ्या मातांनी स्वहस्ते बनवलेल्या रूचकर भोजनाचा पण मी त्याग नाही करू शकतं." यावर सगळ्यांना हसू आले , नारायणीलाही.

हे मोहक दर्शन अत्यंत प्रिय वाटले नारायणीला, कितीही पाहिले तरी मन अतृप्तच रहात होते. सर्व शंका कुशंका त्या दैवी हास्यात विरघळून गेल्या. तिने स्वहस्ताने कान्हाला तिच्या श्रीहरीला भरविले.

आपल्या सर्व प्रतिक्षा संपल्या. उरले केवळ आनंद, प्रेम ,भक्ती, समर्पण. यातच वृद्धी करणे आपली नियती. प्रथमच आपले आयुष्य दिशाहीन नाही असेही तिला वाटले.

इथे पहिल्यांदा येताना ती नौकेत बसली होती , तेव्हा तात जे म्हणाले होते त्याचा गर्भितार्थ तिला कदाचित कळला होता किंवा कळणार होता. " कृष्णडोहाच्या पैलतीरी " , याच पैलतीरावर मला जायचे आहे ज्याचा मार्गही कृष्ण व गंतव्यही कृष्णच !!

तिच्या दिनचर्येत आता नित्य कृष्णदर्शनाचीही भर पडली. संध्यासमयी श्रीहरीचे पुजनविधी आटोपून सज्जात उभे रहायचे व नीलबिंदू दूरवर दिसतो आहे का पहायचे. तो दिसायचा, जवळ येत जायचा अधिक स्पष्ट व मोठा होत वळताना दिसले की खाली यायचे व अधिकच सुस्पष्ट दर्शन जास्तीत जास्त वेळ घ्यायचे. मनाचे समाधान होईपर्यंत !!

याआधीही ती इथे कैकदा उभी रहायची पण ज्ञात नव्हते की ह्रदयातील अस्वस्थता कुठल्या अपूर्णत्वामुळे आहे. नेमका कशाचा शोध लागल्यावर हे रणरण कमी होऊन जीवाला विसावा मिळणार आहे. कशाच्या दर्शनाची आस आहे. तात म्हणतात तेच उचित , 'योग्य समय यावा लागतो '.

नित्य ध्यान व दर्शन या क्रमाने तिचे मन शांत व शीतल झाले. अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळत गेली. मातेच्या वियोगदुःखाचे तीक्ष्ण टोक बोथट झाले. जीव विसावला.

एकेदिवशी नित्यासारखे ताक घुसळत असताना तातांचे पत्र कुणीतरी घेऊन आला. त्यातील मजकूराप्रमाणे दोन सप्ताहानंतर तात येणार होते व ठरल्याप्रमाणे तिचा वृन्दावनवास संपत आला होता. तसेच नारायणीस निघण्याची तजवीज करण्याबाबत सूचनाही दिली होती. त्या पत्रासोबत काही वस्त्र, अलंकार व उपहार सुद्धा होते. त्या क्षणी ते बघण्याची तिची मनःस्थिती राहिली नाही.

या पत्राने नारायणीला आभाळ कोसळल्यासारखे वाटले. ती इथे काही मासांपूर्वी आली होती. अश्विनपौर्णिमा काही सप्ताहांवर आली होती. कृष्णदर्शनाशिवाय ती कशी प्रसन्न राहू शकेल असे तिला वाटायला लागले. काही तरी चमत्कार व्हावा व माझे जाणे लांबणीवर पडावे असे तिला वाटू लागले.

तिला स्वतःचाच क्रोध यायला लागला. इकडे येताना पण आपण स्वतःच्या मनाशी संघर्ष केला आणि आता जातानाही समान अस्वस्थता!! मावशी व काकाश्रींना सुद्धा उदास वाटले. कधी कधी काही घटना पूर्वनियोजित असूनही त्या प्रत्यक्ष व्हायला लागल्या की आपल्याला अप्रिय वाटतात.

धावतच जाऊन तिने ही बातमी सख्यांना दिली. त्या गोपींनाही नारायणी आधी आपली सखी नव्हती याचेच विस्मरण झाले होते. त्यांनाही उद्विग्न वाटले. परंतु दर पौर्णिमेला वृन्दावनी येऊन त्यांना भेटायचे हे वचन नारायणीकडून घेतल्यावरच त्या शांत झाल्या.

उर्वरित दोन सप्ताह नारायणीसोबत जास्तीत जास्त समय व्यतित करायचा हेही त्यांनी ठरवले.

।। शुभं भवतु ।।

**************************************

क्रमशः

टीप. सर्व हक्क लेखकाधिन.

शब्दसूची .
जपाकुसुम. जास्वंद
जलौघ..पाण्याचा प्रवाह
सारङगजमुखा..हरणाच्या चेहऱ्यासारख्या
क्षुधा..भूक
नियती.. नशीब
**नीलबिंदू..अध्यात्मिक नेत्र (अधिक माहितीसाठी खाली बघू शकता )
पूर्वनियोजित..पूर्वनिश्चित

********************************************

** Neelbindu or blue pearl ...

Siddha yoga guru, Swami Muktananda, referred to the blue pearl as “the light that illuminates the mind, that illuminates everything.” It has also been described as containing the entire universe and divinity within the individual.

And

The Blue Pearl

… the Blue Pearl [is] the subtlest covering of the individual soul....

When we see this tiny blue light in meditation,
we should understand that we are seeing the form of the inner Self.
To experience this is the goal of human life.

[The Blue Pearl] is tiny, but it contains all the different planes of existence.

- Swami Muktananda (1)

Through meditation, some have experienced visions of the blue pearl outside of their bodies, while others have seen the light with their eyes closed. These visions are believed to be a glimpse into the innermost Self.

Thanks,

https://www.yogapedia.com/definition/6658/blue-pearl

https://www.souledout.org/healing/bluedot/bluedot.html

फोटो आंतरजालावरून साभार.
धन्यवाद Happy !
पुढील भाग इथे वाचू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण...७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर!!
कधी कधी काही घटना पूर्वनियोजित असूनही त्या प्रत्यक्ष व्हायला लागल्या की आपल्याला अप्रिय वाटतात.<<<अगदीच खरे आहे.
कृष्ण दर्शनाचं वर्णन फारच सुंदर.

खूप छान हा भाग सुद्धा .. भाषेवरचं प्रभुत्व पाहून खूप कौतुक वाटतं तुमचं...

धन्यवाद kashvi , महाश्वेता आणि रूपाली Happy !
कृष्णकृपेने थोडेफार सुचले, माझे काही नाही यात.

कृष्णडोहाच्या पैलतीरी " , याच पैलतीरावर मला जायचे आहे ज्याचा मार्गही कृष्ण व गंतव्यही कृष्णच !!

>>> सुंदर.

निर्धारित समयावर >>>
माफ करा, हे मात्र “११२०३ डाऊन गोरखपूर एक्सप्रेस अपने निर्धारीत समयसे ३ घंटे देरीसे चल रही है” टाइप्स वाटतयं.
काही काही वाक्प्रचार हे इतके डोक्यात बसलेत की इतर ठिकाणी कितीही सुयोग्य असले तरी खटकतात.

धन्यवाद माझे मन...
नियोजित, निश्चित हे शब्द रिपीट होऊ नये म्हणून निर्धारित (सर्वांनी मिळून ठरवलेल्या ). तुमचेही बरोबर आहे Happy !