कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण...३

Submitted by मी_अस्मिता on 29 June, 2020 - 18:32

या आधीचे भाग इथे वाचू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण

**************************************

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण

नारायणी व मावशी शिळोप्याच्या गप्पा मारत बसल्या. मावशीने तिला फिरून सगळा वाडा दाखवला. वाडा खूप भव्य नव्हता पण अंगण चांगले प्रशस्त होते. उजव्या बाजूला पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती . जुई , मालती, वासंती , कदंब, केवडा, चंपा, वैजयंती व तुळस याने सर्व अंगण बहरले होते. डावीकडे गोठ्यात चार पाच पुष्ट गायी, वासरे व बैलजोडी होती. श्रीमंती नव्हती पण टापटीप व स्वच्छतेचा स्नेहस्पर्श होता.

वाडा दुमजली होता. वरच्या मजल्यावर दोन मोठे कक्ष होते. एका कक्षाला लागूनच सज्जा होता. सज्जाच्या एका खांबाभोवती खालून वर चढत आलेला व तिथेच पसरलेला जुईचा वेल होता. सज्जात उभे राहिले असता दुरवर यमुनेची नागमोडी रेघ दिसायची. तो कक्ष नारायणीला आवडल्याचे गुणवंती मावशीला ध्यानात आल्यामुळे तिनेच नारायणीला तो कक्ष वापरावा असा आग्रह केला. नारायणीनेही आनंदाने त्याचा स्विकार केला.

आपल्या श्रीहरीसाठी आधीपासूनच स्वच्छ असलेल्या भिंतीतल्या कोनाड्याला तिने अधिकच निर्मळ केले. तिथे श्रीहरीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यासाठी तिने अंगणातील पुष्प व पर्ण आणून तो कोनाडा छान सजवला. तिने रत्नपुरीहून आणलेला चंदनाचा धूप लावून पुजन केले. शिवाय मनोमनी , या नुतन अनुभवास स्विकार करण्याची माझी तयारी आहे असे आर्तही केले. उर्वरित सामान तिने योग्य जागी लावले. मावशी व काकाश्रींना त्यांच्यासाठी आणलेले उपहार व भेटी दिल्या. संध्याकाळी थोडेसे भोजन करून ती निद्राधीन झाली.

भल्या प्रातःकाळी तिला जाग आली. अतिशय प्रसन्न मनाने ती जागी झाली. आज तिचा इथला प्रथम दिवस होता. तो कसा घालवावा व मावशीला कशी कशी सहाय्यता करावी हे विचार तिच्या मनात होते. तसेच घागरा सावरत ती सज्जात येऊन उभी राहिली. बाहेर थोडे धुके पसरले होते. यमुनामाई त्या निहारमय वातावरणात अदृश्य झाली होती. खालच्या गोठ्यातील बैलांच्या गळ्यातल्या घंट्यांची नाजूक किणकिण कानावर येत होते.

जुईचा मंद सुवास घेत , किणकिण ऐकत नारायणी कित्येक पळं धुकं कमी होण्याची प्रतिक्षा करत उभी होती. खूप खूप शांत वाटत होतं. अशी शांती तिने बाळपणी मातेच्या कुशीत अनुभवलेली. हळूहळू सुर्योदय होऊन धुके विरले यमुनामाईचे सुरेख वळण स्पष्ट दिसायला लागले. ते दृश्य पोटभर बघून ती खाली आली व आन्हिक उरकून मावशीने दिलेला गोरस पीत बसली.

गुणवंती मावशीने तिला अंबिकेच्या दर्शनासाठी लवकरच निघू असे सांगितले. कारण अंबिकेच्या आशीर्वादाने नारायणीचा इथला गृहवास सुखाचा होईल अशी श्रद्धा होती मावशीची. शिवाय रोज प्रातःसमयी पुष्कळ स्त्रिया व कन्या अंबिकेच्या दर्शनासाठी यायच्या. त्यांच्याशी नारायणीचा परिचय करून द्यावा असाही हेतू होता. तशा दोघी आवराआवर करायला लागल्या. नित्याची काम केली व स्वयंपाकाची सिद्धता करून , कमळाला जुजबी सूचना देऊन त्या निघाल्या.

अंबिकेच्या मंदिराला दगडी सोपान मार्ग होता. ह्या पायऱ्या चढून गेल्यावर काळ्या पाषाणाचे अंगण होते. फार विशाल किंवा फार लहानही नसलेले हे मंदिर अगदी पुरातन वाटत होते. आत गेल्यावर समोरच शीतल वाटावे असा गाभारा होता. काळ्याभोर पाषाणातच घडविलेला अंबिकेचा अर्चाविग्रह नारायणीला फारच रेखीव वाटला. अंबिकेच्या रजताच्या कुमुदिनीनेत्रात सर्व जीवसृष्टीसाठी जननीचा अपार स्नेह दाटून आला आहे असेही तिला वाटले.

सर्व स्त्रियांशी नारायणी मोकळेपणाने बोलली. काकी सुनंदिनी, काकी इंदूमतीने तर तिला भोजनाचे आमंत्रणही दिले. काकी शारदा व काकी सुभाग्या तिच्यासाठी उद्या येताना खर्वस आणते असेही म्हणाल्या. ती नको नको म्हणत असताना !

नारायणीची पूर्वपिठीका त्यांना मावशीकडून कळलेली होतीच. याकारणास्तव सर्व प्रौढ स्त्रिया मातेचा हरवलेला स्नेह तिला परत मिळावा यासाठी स्वपरिने धडपडत होत्या. सर्वांना तितकाच आदर ,स्नेह आपल्या आचरणातून व्यक्त करताना नारायणीचा गोंधळ उडाला. पण तातांचा तिला इथे आणून सोडण्याचा निर्णय कसा योग्य होता ह्याचे ही तिला आकलन झाले.

सगळ्या मातांच्या परिचयानंतर पुष्कळच मधुरभाषिणी कन्याही तिच्या सख्या झाल्या. कुणाला तिचे हास्य आवडले, कुणाला तिची वाणी तर कुणाला तिचे कानाचे डूल !! सर्वांशी परिचय झाला पण विशेष गट्टी जमली त्या तिघींशी. त्या होत्या सुचरिता , नित्यप्रभा व दीपगौरिका. या तिघींशी झालेला परिचय मात्र जन्मोजन्मीचे मैत्र वाटला . दुसऱ्या दिवशीच पुन्हा भेटायचे ठरवून सगळ्या स्वगृही गेल्या.

नारायणीची माता गेल्यापासून तिचा प्रसन्न स्वभाव कुठेतरी हरवल्यासारखा झाला होता. आपल्या जीवनरथाचे चाक गहिऱ्या वालुकामय भूमीत रुतून बसलयं जे कितीही प्रयत्नांनी सुद्धा बाहेर निघत नाहीये असे बहुतांश वेळा तिला वाटायचे. अंतरायाशिवाय आयुष्यात अध्यात्मिक वा वैचारिक प्रगती नाही हेच खरं. नकळतच पण तिच्या इथे येण्याने तिच्या आयुष्याचा रथ मार्गस्थ झाला होता. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य समय येणे अनिवार्य आहे .

रत्नपुरीतल्या तिच्या सख्या , तिथल्या संगीत व नृत्यनाटिका हे सगळे ती स्वतःच्या करमणुकीसाठी नाही तर स्वतःच्या पीडेचे निराकरण करण्यासाठी करायची. कधी कधी यश मिळायचे, कधी विन्मुख व्हावे लागायचे.

नारायणीला असा आनंद हवा होता की जो आपोआपच ह्रदयातून येईल कुठल्याही मनधरणी व विमर्शनाशिवाय. जो चिरंतन असेल जो शाश्वत असेल व ज्याला स्थळाकाळाचे व योग्य परिस्थितीचे बंधन नसेल.

अशी प्रसन्नता तिला श्रीहरीची अर्चा करताना मिळायची. पण अर्चनविधी संपले की ती पुन्हा "तिच" नारायणी असायची. वियोगाचे दुःख बाभळीच्या काट्यासारखे रुततेय हे जाणवायचे. ह्यावर तिला प्रश्न पडले होते. उत्तरं हवी होती पण कुठे व कशी शोधायची कळत नव्हते. कधी तरी अशा आशंकाही मनात यायच्या की मुळात हे प्रश्न तरी आहेत की आपल्या मनाचेच खेळ. "मोठेच कृष्णकोहल आहे की हे मन आपले " असा विचार ती करायची. या सगळ्या विचिन्तेवरून कालिंदेचे पाणी वहायला लागले. क्लेशाचा बाभूळकाटा सैल होण्यास आरंभ झाला.

।।शुभं भवतु।।

क्रमशः
*************************************

शब्दसूचीःः

निहारमय. धुक्याचे आवरण असलेले
आन्हिके. सकाळची कामं
गोरस. दूध
सोपान. पायऱ्या
अर्चाविग्रह. मूर्ती
रजत. चांदी
कुमुदिनी. कमळ
नेत्र. डोळे
कृष्णकोहल: लबाड

टीप.सर्व हक्क लेखकाधिन.
या पुढील भाग इथे वाचू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण

धन्यवाद Happy !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा व तिसरा दोन्ही भाग आवडले.

अर्चाविग्रह, कृष्णकोहल शब्द माहीत नव्हते. निहारचा अर्थ माहीत नव्हता.