कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण...७

Submitted by अस्मिता. on 4 July, 2020 - 17:49

या आधीचे भाग इथे वाचू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण...१
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण...२
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण...३
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण...४
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण...५
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** षष्ठम चरण...६

इथून पुढे......

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण

शरदपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी नारायणी परत जाणार आहे हे सख्यांना कळाल्यावर त्यांनी शरदपौर्णिमा नित्यापेक्षा अधिकच उत्साहाने साजरी करायचे ठरवले. त्यासाठी सर्वच सख्या स्वतःकडील सर्वात सुंदर वस्त्र व अलंकार नारायणीने परिधान करावा असा आग्रह देखील करू लागल्या. त्यांचे ते निष्पाप, निर्व्याज प्रेम पाहून नारायणीला गहिवरून आले. तिच्याकडे असलेल्या वस्त्रालंकारात ती संतुष्ट आहे हे त्यांना पटवून द्यायला तिला बरेच प्रयास करावे लागले.

पुढचे दोन सप्ताहांत गुणवंती मावशीने तिला एकाही कामाला हात लावू दिला नाही. उलट गोडाधोडाचे भरवून खूप लाड पुरवले. याच काळात तिने तातांनी पाठवलेल्या वस्त्रांपैकी एक श्वेतशुभ्र वस्त्र निवडून त्याचा घागरा सीवन केला.
दीपगौरिकेच्या आग्रहाप्रमाने त्याला चंदेरी-रजत रंगाचे काठही शिवले. शरदपौर्णिमेच्या रासाच्या कार्यक्रमात ह्या वस्त्रामुळे ती पौर्णिमेच्या चंद्रमासम लखलखणार होती.

ह्या रासाच्या कार्यक्रमाला सर्वच लहानथोर वृन्दावनवासीला आमंत्रण होते. तशी शरदपौर्णिमेची परंपराच होती वृन्दावनात. नारायणी सुद्धा त्यांच्या इतक्याच उत्साहाने त्यात सहभागी होणार होती. उर्वरित दिवसांच्या अविस्मरणीय स्मृती निर्माण करण्यासाठी ती झटत होती. रोज संध्याकाळच्या ध्यान व दर्शनाने तिचे जीवन नाही पण आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच बदलला होता. या नुतन दृष्टिकोनामुळे स्वतःच्या आव्हानांकडे त्रयस्थासारखे बघून त्यात मार्ग काढायला तिला हळूहळू जमू लागले होते. तिच्या आयुच्या मानाने हे मोठेच दिव्यावदान होते.

आनंदाचे दिवस हरणाच्या गतीने जातात म्हणून की काय बघता बघता शरदपौर्णिमेचा दिवस आला. तो संपूर्ण दिवस ती व तिच्या सख्या रात्रीच्या रासाच्या तयारीत व्यग्र होत्या.

पौर्णिमेचा चंद्र उगवला तशी ती नवे वस्त्र परिधान करून कार्यक्रमाच्या स्थानी आली. संख्यांच्या अंदाजाप्रमाणे खरोखरच चंद्रमाच तिच्या रूपाने तिथे आला आहे असे सर्वांना वाटले. सर्वांच्या विविधरंगी वस्त्रांमध्ये नारायणीचे रजतकाठाचे शुभ्र वस्त्र उठून दिसत होते.

हळूहळू रासाचा खेळ रंगायला लागला. दूर कुठेतरी कुणाशीतरी टिपऱ्या खेळणाऱ्या कान्हाकडे तिची दृष्टी वारंवार जाऊ लागली. या मोठ्या रिंगणात आपण कधी त्याच्यासोबत खेळू शकणार अशी प्रतिक्षा ती करू लागली.

कान्हा सर्वांना प्रिय असल्याने प्रत्येकाला त्याच्याशी खेळायचे होते. नवीन गोपगोपी येत गेल्या व रिंगण अधिकच मोठे होऊ लागले. तिचे धैर्य संपत आहे असे तिला वाटू लागले.

हळूहळू या प्रतिक्षेने व दर्शनाने तिचे मन इतके एकाग्र झाले की सर्व गोपगोपींमध्ये तिला तिचा श्रीहरी-श्रीकृष्ण परमात्मा दिसायला लागला. अगदी स्वतःतही तिने कान्हाला पाहिले. कान्हाशिवाय काही उरलेच नाही. ती खऱ्या अर्थाने परमानंदी झाली. प्रतिक्षा कायमची संपली. सच्चितानंद केवळ उरला. उद्याचा , कालचा काय काळाचाच विसर पडला. काही तरी कालातीत प्राप्त झाले. गोलोक वृन्दावनातली ती कायमस्वरूपी झाली. आता ती कोण , रत्नपुरी कुठे, मातेचा वियोग , उद्याचे प्रस्थान , नारायणी नावाची कुणी गोपी आहे आणि तिला तिचे जन्मोजन्मीची प्रिय व वृन्दावनभूमी , तिच्या इथल्या सख्या व तिचा अत्यंत प्रिय कान्हा यांना सोडून जावे लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी केवळ मिथ्या वाटू लागल्या.

या रासात हरवलेला तिचा श्रीकृष्ण शोधताना तिला तिच्यातला श्रीकृष्ण परमात्मा प्राप्त झाला. आता कधीच वियोगाचे दुःख तिच्या श्रीहरीच्या वियोगाचे दुःख तिला जाळू शकले नसते , कधीच . एकरूपतेला कसला वियोग !!

त्या क्षणी तिच्याशी रास खेळणारा व तिच्यातील रास खेळणारा कान्हा म्हणाला.

"तुझ्या अंतरी मी असताना कसला वियोग. श्रीरंगाच्या रंगात रंगण्यासाठी आधी अंतरंग नितळ व्हावे लागते. शुद्ध शुभ्र व्हावे लागते. कारण श्रीरंगही आहे तुझ्या समीप व शुभ्रताही.
त्या शुभ्रतेला शोधा , "त्या" श्रीरंगाला शोधा. समीप आहे, स्वत्वातच आहे.
तू नर आहेस आणि नारायणीही ! तुझी माझी यात्रा नित्य आहे , अनंत आहे. सहज आहे, निर्धारितही आहे. तू यात्रेला आरंभ कर."

मार्ग मी गंतव्य मी !
स्वत्व मी ईश्वरत्व मी !
चिरंतन मी आणि काळ मी !
आरंभ मी आणि अंत मी !

व्यक्त मी तरी गुप्त मी !
आदी मी अनादी मी !
अंत मी अनंत मी !
सृजन मी भेदन ही मी !
निमित्त मी प्राक्तन ही मी !

सुक्ष्म मी आणि स्थूल मी !
नित्य मी अनित्य मी !
अ-क्षरही मी आकार मी !
ओंकार मी हुंकार मी !

नाद मी आणि गर्भ मी !
संगीत मी आणि नीरव मी !
उत्सवही मी एकांत मी !
गृहीही मी मंदीरीही मी !

अचिंत्य मी आणि नाम मी !
राघवही मी शबरीही मी !
नरही मी नारीही मी !
तूही मी आणि मीही मी !

तूही मी आणि मीही मी !

तूही मी आणि मीही मी !

तूही मी .................

।। शुभं भवतु ।।

**************************************
*******चिरंतनात विलीन/ समाप्त***********

टीप. सर्व हक्क लेखकाधिन.

शब्दसूची .
आयु..वय
दिव्यावदान..दैवी कामगिरी किंवा यश ..divine achievement
व्यग्र..व्यस्त
परिधान..नेसणे
मिथ्या..असत्य
अ-क्षर.. अविनाशी
प्राक्तन..प्रारब्ध
सृजन..निर्मिती
अचिंत्य..ज्याचे चिंतन करणे अवघड
नीरव..शांतता

**************************************

धन्यवाद Happy !

विश्वरूपदर्शन स्फुट...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता, सगळे चरण वाचले आणि आवडले. कथेतली निसर्गाची वर्णनं विलोभनीय आहेत. कविता आणि कथेचा शेवट तर केवळ अप्रतिम!! पुलेशु !

हा पूर्ण भाग अप्रतिम लिहीला आहे. एकेक वाक्य विचार करण्यायोग्य आणि अजिबात कृत्रिम नाही. कविता विशेष आवडली.

एकच शंका - ह्या रासाच्या कार्यक्रमाला की ह्या रासेच्या कार्यक्रमाला? आपण ती रासलीला म्हणतो ना?

धन्यवाद चंद्रा, धन्यवाद प्रज्ञा, धन्यवाद माझेमन, धन्यवाद महाश्वेता, धन्यवाद प्रणवंत, धन्यवाद रूपाली.

ह्या रासाच्या कार्यक्रमाला... बरोबर आहे.
रासलीला ही बरोबर आहे पण मला ते अभिप्रेत नव्हते. श्रीकृष्ण करायचा त्या रासलीला ....इतरांना तो रासाचा कार्यक्रम असे मला वाटते. (प्रत्येक गोपीला तो आपल्यासोबतच रास खेळतोय असा आभास व्हायचा . तशा लीला....)

ही वरील कविता मला अजूनही सुचत गेली पण इथे कथांत लांबला असता म्हणून पूर्ण टाकली नाही. विश्वरूपदर्शन स्फुट... असे वेगळे ललित लेखन म्हणून टाकणार आहे.
धन्यवाद !!

अस्मिता, हे गाणे ऐक. एक सन्याशी आहे एका मंदीराच्या बाहेर उभा राहून तो सर्वांना सांगतो आहे - काय वाटेल ते झाले तरी वृंदावनच्या बाजूलाही वाट वाकडी करुन जाउ नका. आणि जर तिकडे गेलातच तर निदान कुंज गली पासून दूर रहा. आता जर यमुना तीराच्या त्या कुंज गलीत गेलाच तर, एक काळा सुंदर पोरगा तुमच्या नजरेस पडेल. त्याच्या कडे डोळे उचलून पाहूही नका. आता जर पाहीलेच, जर त्याच्याशी मैत्री झालीच तर ज्या क्षणी तो बासरी वाजवण्यास सिद्ध होइल, त्या क्षणी दूर पळा . आणि जर तुमच्या कानात ती बासरीची सुरेल धून पडलीच तर मग सत्यानाश आहे. मग माझ्यासारखा तू वेडा होशिल आणि मग या आजारावर उपचारच नाही.

फार गोड भजन आहे. विविधभारतीवरती ऐकले.

https://www.youtube.com/watch?v=xti0fJQMRzk

जे काही लिहीले आहे ते जबरी आहे. मी आज याचे पारायण करणार आहे. नितांत सुंदर कथा जमुन आली आहे अस्मिता.
प्लीज अजुन एक प्रसंग सांगते त्या प्रसंगावर लिहीशील का जमले तर - राधा उदास आणि म्लानमुखी अशी विरहाग्नीत पोळत असताना, तिच्या द्वारी एक 'गोंदणकाम' करणारी वृद्धा येते. हळूहळू राधा कमलिनीसारखी उमलत जाते व शेवटी रहस्यभेद होतो - ती वृद्धा अन्य कोणी नसून साक्षात हरी असतो.
मी खूप प्रयत्न केला परंतु इतकी गोड कथा आहे, मनात विचार चालू असतानाच गुंगी येउ लागते : ) खरच!!

सामो 18nth March 9:33
संस्कृतमध्ये असाच थोडासा एक श्लोक आहे :
मा यात: पांथा: पथि भीमरथ्या:
दिगंबरो कोs पि तमालनील:
विन्यस्तहस्तेsपि नितंबबिंबे
चित्त: समाकर्षति पांथिकानां

अच्छा हीरा त्या गाण्याशी मिळणारा अर्थ आहे ना? थोडा थोडा कळला. पण प्लीज सांगाल का?
अस्मिता लिंक नाही गं. फार पूर्वी हिंदीमध्ये, वाचली होती ही कथा.

वरील श्लोकाचा अर्थ: हा शब्दश: नाही केलेला मुद्दामच.
हे यात्रिकांनो, भीमरथीच्या वाटेला अजिबात जाऊ नका. तिथे एक काळासावळा (काळा बेंद्रा) अर्धनग्न असा माणूस राहातो. तो मारे कमरेवर हात ठेवलेला असा बिचारा निरुपद्रवी वाटला तरी, लक्षात ठेवा, तुम्हाला भूल घालेल आणि तुमचे मन खेचून घेईल.