कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण...२

Submitted by अस्मिता. on 28 June, 2020 - 17:09

या आधीचा भाग इथे पाहू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण

---------

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण

नारायणीच्या मनसरितेस मात्र पूर आला होता. मोठ्या कष्टाने तो तिला आवरावा लागला. तांबडे फुटायच्याही अर्धा प्रहर आधी ती सज्ज झाली होती. पुनःपुन्हा ती आपल्या कक्षातल्या भिंतींवरून हात फिरवत होती. त्यावर तिने व तिच्या मातेने काढलेले तिचे आवडते चित्र होते. फुलांच्या ताटव्यात बसलेली वीणावादन करणारी देवी श्री सरस्वती. त्यातल्या रंगांसाठी तिने आणि तिच्या मातेने रत्नपुरीहून कित्येक योजने दूर असलेल्या वनी जाऊन दुर्मिळ पुष्पे व पर्णं आणली होती. जाताना मातेच्या मधुर आवाजातील गीतं व सुभाषितं ऐकायला तिला फार फार आवडले होते.

अश्या कित्येक गोष्टी होत्या तिच्या या घरात. तिची जुनी खेळणी होती. एक लाकडी हत्ती होता. जो ती दशवर्षाची असताना तातांनी तिच्यासाठी इशान्येकडील राज्यातून आणला होता. एक क्षण नारायणीला वाटलं देखिल घ्यावा का हत्ती सोबत. नकोच ते हत्तीवरच्या झुलीवरून हात फिरवतं ती मनाशी म्हणाली. काय काय नेऊ मी ती चित्राची भिंत, हा हत्ती का माझे सर्व घर, तात , सख्या की मत्प्रिय रत्नपुरी. त्यापेक्षा काहीच नको. मातेची जुनी शाल तेवढी घेतली तिने. त्यातली मायेची ऊब तिला आत्ता या क्षणी फार हवीहवीशी होती.

शेवटी सगळे घर पुन्हा पुन्हा हिंडून झाले. सगळे सामान पुन्हा पुन्हा बांधून झाले की तातांची हाक तिच्या कर्णी आली. दोघाही पिता पुत्रीने गडबडीने न्याहारी उरकून घेतली. रथ द्वारी सज्ज होताच. श्रीहरीची मूर्ती नमस्कार करून आपल्या हातात घेऊन तिच्या अनंताच्या प्रवासाचा आरंभ झाला.

अनंताचा प्रवास अंतरायापासून सुरू होतो. हे एकदा तिला तातांनीच सांगितले होते. जो प्रवास किंवा किंवा आयुष्याच्या प्रवासातील एक भाग अत्यंत दुःखाचा व कष्टाचा वाटतो तो आपल्याला परमेश्वराच्या म्हणजेच अनंताच्या निकट नेतो. रथात बसून दोन प्रहर लागावेत इतक्या दूर असा प्रवास तिने कधीच केला नव्हता. हा प्रवास फार प्रदीर्घ वाटल्याने तिने मनात "अनंताकडे की अंताकडे नेतो आहे हा प्रवास मला " अशी चिडचिडही करून झाली. परत लवकर येऊ याची शाश्वती नसल्याने तिला यत्किंचितही उत्साह नव्हता. शिवाय काल झालेल्या मानसिक श्रमाने व वाहणाऱ्या शीतल वाऱ्याने तिला लवकरच झोप लागली.

जवळजवळ अर्धा-पाऊण प्रहर ती झोपूनच होती. रथाला वारंवार लागणाऱ्या धक्क्यांनी तिला जाग आली व तिला लक्षात आले की आता मार्ग लवकरच बदलणार आहे. वाटेवर एक बैलगाडी त्यांची प्रतिक्षा करताना त्यांना आढळली. त्यांनी सामानसुमान रथातून बैलगाडीत काढून सारथ्याचे आभार मानूण पुढचा प्रवास बैलगाडीतून आरंभ केला. पुढचा मार्ग यमुनेशेजारून जाणारा असल्याने रथांच्या अश्वासाठी आव्हानात्मक होता म्हणून पंतांनी पूर्वसूचना देऊन तशी सोय करून घेतली होती. मागच्याच मासात त्यांच्या परिचयाचे गृहस्थ वृन्दावनी विवाह समारंभानिमित्त येऊन गेले होते. त्यांच्या हस्ते देवदत्त काकाश्रींना पत्र व निरोप गेलेला होताच. त्यांनीच प्रसन्नतेने ही तजवीज केली होती. गाडीवान मोठ्या आनंदाने त्यांना गुजगोष्टी सांगत रमवत होता. लवकरच यमुना नदीचे विशाल पात्र त्यांना दिसू लागले. आजूबाजूला तुळशीचे दाट बन, "अरे म्हणूनच तर हे वृन्दा-वन" नारायणीने मनाशी वदले. काही ठिकाणी गर्द आमराई शीघ्र ह्यांना छोटी छोटी आम्रफलेही लागतील असा विचारही आला. त्याखाली मोर विसावा घेत होते. तुळशीच्या सौम्य सुवासाने वातावरण अगदी आल्हाददायक झाले होते.

काही वेळात हाही रस्ता संपून यमुनेचा किनारा लागला. पूर्वीप्रमाणेच इथेही एक नौका त्यांची प्रतिक्षा करतच होती. त्यांनी गाडीवानाचे आभार मानले व ते सामानासह नावेत चढून बसले. नावाडी तर गाडीवानापेक्षाही गप्पिष्ट निघाला. तो रमणीय डोह आजूबाजूचे निसर्गसौंदर्य याचा आनंद घेताना नारायणीच्या मनात विचार आला की ह्याच कृष्णडोहाच्या पैलतीरी माझे गंतव्य आहे काय. वृन्दावन रमणीय आहे खरे !!

निरनिराळे वृक्ष व त्यावर विविध मोहकरंगी पक्षी त्याबाजूने मेघवर्णी कालिंदी खळाळणारी.
" यमुनाच ती बरंका पुत्री पण तिच्या मेघवर्णी डोहामुळे तिला कालिंदी असे सुद्धा म्हणतात. याठिकाणी तुझा काळ मोठ्या प्रसन्नतेने जाणार बघं." तातांनी सांगितले.

तो कृष्णवर्णी डोह, ते मोर, ते बहुरंगी व मधुर कूजन करणारे पक्षी नारायणीला संमोहित झाल्यासारखे वाटले. काही क्षण ती स्वतःला विसरून या सावळ्या निळाईस मंत्रमुग्ध झाल्यासारखी बघत राहिली. नावाड्याची भाबडी बडबड पण नको वाटली तिला त्या क्षणी.

"बरं का पंत, अहो एकदा या यमुनेच्या डोहात भलामोठा विषधारी नाग आला होता. आम्ही भयभीत होऊन इकडे येणे टाळत होतो. पण आमच्या मुख्यप्रधानांच्या मुलाने त्याला पिटाळून लावले. मोठा लाघवी कुमार आहे तो " इति नावाडी. नारायणीचा अर्थातच विश्वास बसला नाही व तिने विहङगम निसर्गाचा आनंद घेणे सुरुच ठेवले.

नौका यमुनेच्या पैलतीरावर पोहोंचल्यावर किनाऱ्यावर पाण्यात खेळणारी लहान मुले दिसली, काही गोप स्त्रिया धुतलेल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर घेऊन लगबगीने जाताना दिसल्या, काही गोपाळ हसतखिदळत आपल्या गायीवासरांना स्नान घालताना दिसले. सर्वांनी जुनी ओळख असल्यासारखे हसून चौकशी केली. कुठलाही अभिनिवेश नसलेले हे स्वागत नारायणीला फार आवडले. काही लहानग्या गोपाळांनी तर पळत पुढे जाऊन देवदत्त काकाश्रींना यांच्या येण्याची वर्दी देण्याची तयारी दाखवली.

त्यांच्या या भाबड्या उत्साहाची तिला मोठीच गंमत वाटली. तिचे काही किंतु परंतु या त्यांच्या उत्साहात कधी विरघळले तिच्या ध्यानातही आले नाही. ग्रामाच्या दिशेने चालताना तिचे मन नित्यासारख्या छोट्या छोट्या योजना बनवू लागले.

लवकरच मुख्य ग्रामाची कमान व अंबिकेचे मंदिर आले. तिथे दर्शनासाठी प्रतिदिन यायचे असे तिने मनोमन ठरवून टाकले. शिवाय यमुनेच्या डोहाच्या भोवताली असलेल्या वनसौंदर्याची तिथल्याच वल्लरीवरील सुरेख पुष्पांचे रंग बनवून विविधांगी चित्रे काढायची ह्याचेही स्वप्न ती पाहू लागली. नुकतेच तिने गोमलाने भूमी सारवणे शिकून घेतले होते. ते ती किती उत्तमरीत्या करू शकते हे गुणवंती मावशीस दाखवून तिला चकित करून सोडायचे हेही तिच्या मनात आले.

गुणवंती मावशीच्या वाड्यात पोचेपर्यंत बरेचसे वृन्दावनवासी भेटूनही झाले आणि अर्धे संवत्सर हा फार प्रदीर्घ काळ नाही असेही पळभर तिला वाटले.

गुणवंती मावशी पहाटे पासून यांची वाट बघत वाड्याच्या आतबाहेर करतच होती. शेवटी कंटाळून तिने गोवऱ्या थापायला घेतल्या की ही मंडळी दरवाज्यात उभी दिसली, तशी ती धावतच आली. गोमयाने बरबटलेल्या हाताने आपण प्रिय नारायणीच्या इडापिडा काढतोय हेही तिच्या लक्षात आले नाही. शेवटी नेत्र मोठे करून देवदत्त काकाश्रींना खूणवावे लागले मगं कुठे तिच्या लक्षात आले. तशी ती ओशाळत हात धुवून आली आणि परत स्वागताला लागली.

गुणवंती मावशीचे सुद्धा तिच्या सुमतीअक्काच्या स्मृतींनी नयन भरून आले. स्वतःवर नियंत्रण ठेवत ती पुन्हा पुन्हा नारायणीच्या मुखावरून हात फिरवतं राहिली. नारायणीलाही गहिवरल्या सारखे होऊन तिने 'माँ' असे म्हणून मिठीच मारली. "हो गं बाळा, आता तुझी माताही मीच आणि मावशीही मीच " असे म्हणून मावशी तिला थोपटत राहिली.

"चला बरं आत आता, सुस्नात होऊन घरात प्रवेश करा. अरे मुलांनो ही गाठोडी उचलायला तुमच्या काकाश्रींना सहाय्यता करा. ही पोरं ना तुम्हाला सांगते ,खव्याच्या पोळ्या खायला पुढं आणि गाठोडी उचलायला मात्र मागं !! आवरा बरं लवकरं, भुका लागल्या असतील, का हो भावोजी तब्येत का वाळलेली दिसते आहे तुमची, तुम्ही पण काय नाथ, पोरांना सांगा जरा काय कुठे ठेवायचे ते . कमs ळे ए कमs ळे पानं घ्यायला लाग हळूहळू , शुद्ध तूप शिंक्यावर वेगळे ठेवले आहे , ते घ्यायला विसरू नकोस. मी पण काय बोलत बसलेय, आत या बरं " असे वेगवेगळे संवाद वेगवेगळ्या व्यक्तींना उद्देशून मावशीने तिचा आनंद व उत्साह दाखवला.

शिळ्या भाकरीचा तुकड्याने ओवाळून घेऊन व पायावर पाणी घेऊन पाहुणे मंडळी अंगणात आली व स्नानादि उरकून घेऊन जेवायला बसली.
आज भोजनात सगळे पदार्थ नारायणीच्या आवडीचे होते. कढी, पातळ भाजी, वडे , दशम्या शिवाय खव्याच्या पोळ्या व घट्ट बासुंदी सुद्धा होती. सगळे वितृप्त झाले. जरावेळ आराम करायला बसले.

राजशेखर पंतांना मात्र परत गडबडीने मथुरेला निघायचे होते. त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेतला.

"काही चिंता करू नका भावोजी , हिच्या रूपाने मला अक्काचा व लेकीचा असा दोन्ही नात्यांचा सहवास मिळणार आहे. मला याचेच समाधान , श्रीहरीचा आशीर्वादच म्हणायचा हा. " मावशी पंतांना म्हणाली.

"हे आहेच हो गुणवंती , पण ही नारायणी जरा हट्टी आहे , तुमच्या अक्कासम, सांभाळून घ्या "

" हट्टी कुठली निग्रही म्हणा " असे मावशी म्हणाल्या तसे सर्वांच्या अधरावर हसू फुटले.

पुन्हा एकदा अश्रुभरल्या नेत्रांनी नारायणीला आशीर्वाद देत राजशेखर पंत मथुरेला प्रस्थान करण्यास निघाले. देवदत्त काकाश्रीं त्यांना निरोप द्यायला ग्रामाच्या मुख्य कमानी पर्यंत गेले.
*******************************************************
।शुभं भवतु।

क्रमशः
****************************************************************************

टीप. सर्व हक्क लेखकाधिन .

*शब्दसूची
योजन . साधारण बारा ते पंधरा किलोमीटर
अंतराय. विघ्न किंवा बाधा
आल्हाददायक. प्रसन्न
आम्रफल. आंबा
गंतव्य. मुक्कामाचे स्थान किंवा ध्येय
वल्लरी. वेल
पुष्प. फुलं
विहङगम . नयनरम्य
---------------------
धन्यवाद Happy !

यापुढील भाग इथे वाचू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण...३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग हि सुंदरच... कथेत वर्णन इतकं छान केलं आहे की वृंदावनाची आणि यमुना तटाची सैर केल्यासारखं वाटलं.

आवडला हा भागही ... Happy

>>>>" यमुनाच ती बरंका पुत्री पण तिच्या मेघवर्णी डोहामुळे तिला कालिंदी असे सुद्धा म्हणतात. याठिकाणी तुझा काळ मोठ्या प्रसन्नतेने जाणार बघं." तातांनी सांगितले.

हे माहीत नव्हते.

यात एक गीत असावं असं सारखं वाटू लागलंय.
वाचताना मनात रुंजी घालतंय....
असं का होतंय वाचताना ?
लेखणीची कमाल आहे ही.