कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण...४

Submitted by अस्मिता. on 30 June, 2020 - 20:17

या आधीचे भाग इथे वाचू शकता.
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** द्वितीय चरण
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण

इथून पुढे.....
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** चतुर्थ चरण

आता नारायणी वृन्दावनात रूळायला सुरवात झाली. तिच्या मनाप्रमाणे तिने तिची दिनचर्याही करून टाकली . त्यातील बराचसा वेळ सख्यांसोबत यमुनेकाठी जायचा. सकाळ सगळी मावशीला घरकामात मदत करण्यात जायची. नवीन नवीन पाककलेतील धडे घेण्यात व देण्यातही अर्थात हे मावशीचे मत होते. देवदत्त काकाश्री गायीवासरांच्या काळजी घेण्याबाबत बराच अभ्यास घ्यायचे. दर पौर्णिमेला भरणाऱ्या मथुरेच्या बाजारी जाताना तिला काही नवे वस्त्र किंवा अलंकार हवे असल्यास आवर्जून सांगावे असेही ते म्हणायचे. आताशा या अल्पसंतुष्ट तरीही कसलीही तक्रार नसलेल्या वृन्दावनवासींसोबत राहून नारायणीलाही भौतिक गोष्टींचा मोह राहिला नव्हता. त्याशिवायही जीवन परिपूर्ण व प्रसन्न असू शकते हे लक्षात यायला लागले होते.

चैत्र महिना बघता बघता सरला. वैशाखाचा उष्मा जाणवायला लागला. दिवसही दीर्घ झाले.
वसंत ऋतूच्या स्थिरावण्याने यमुनेकाठचा परिसर अगदी बहरला होता. छोट्या कैऱ्या आता मोठ्या झाल्या होत्या. त्या खात खात गप्पा मारत आम्रवृक्षाखाली प्रतिदिन सुचरिता, नित्यप्रभा व दीपगौरिका नारायणीला भेटायच्या.

लहानगे गोपाळ गाईवासरांसह परत निघाल्यानंतरही यांचे चरण काही तिथून निघायचे नाहीत. प्रतिदिन सख्यांशी बोलत पुष्प गोळा केल्यानंतर नारायणी तुळशीच्या बनात जाऊन बसायची. तिथल्या काही मंजुळा सुद्धा परडीत टाकल्या जायच्या. हे सगळे होत असताना फारच ऊष्णता जाणवल्यास यमुनाकाठच्या घाटावर असलेल्या पायदंड्यांवर बसून पाण्यात पाय सोडून उरलेले हितगूज व्हायचे. त्या नादात घागऱ्याचे काठ रोज ओले व्हायचे, पण कोण चिंता करतेय !! संध्यासमयी सुरभीगोत्रांच्या गळ्यातील घंट्यांची गोड किणकिण व गोपाळांचे आवाज ऐकून सर्व सख्या लगबगीने स्वगृही परतायच्या.

हे सगळे आता नारायणीला आवडायला लागले होते जणू ती नेहमीच इथे होती. आज गृही परतल्यावर मावशीने तात खुशाल असल्याचे व त्यांचे देशाटन आखल्याप्रमाणे निर्विघ्न होत असल्याचे पत्र आल्याचे कळवले. हे ऐकल्यानंतर हर्षित होऊन नारायणी नित्याप्रमाणे सायंपूजेला लागली. वनातून आणलेले कदंब पुष्प व मंजुळा तिने श्रीहरीच्या चरणी अर्पण केले व बाकीच्या वैजयंती पुष्पांची माला बनवून श्रीहरीच्या गळ्यात घातली.

आजचे वैजयंती पुष्प तिच्या उल्हसित मनाप्रमाणे स्मित करत होते. तिने ऐकू जाईल न जाईल इतपतच आवाजात प्रार्थना सुरू केली.

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोप..........

श्रीहरीचे पुजनविधी संपलेही नव्हते की तिचे चित्त एका बासरीच्या नादाने विचलित झाले. एवढे सुंदर, मोहक असे वेणूवादन तिने कधी रत्नपुरीच्या संगीताच्या कार्यक्रमी सुद्धा श्रवण केले नव्हते.

काय होते त्या वेणूत किंवा असे म्हणावे काय नव्हते त्या स्वरांत !!!

श्रीसृष्टीचे आर्त होते
अवनीचे गीत होते
युगाचे अभ्यादान होते
ओंकाराचे संवेदन होते

मोहक आमंत्रण होते
धुंद संमोहन होते
प्रार्थनेचे पावित्र्य होते
योग्यांचे वैराग्य होते

श्रीहरीचे भजन होते
मातेचे आलिंगन होते
प्रत्येका भासावे जणू
ममैव हे वादन होते

या आणि अशा कित्येक भावना तिच्या मनी दाटून आल्या. भावविभोर होऊन ती खाली धावत आली. त्या गडबडीत ठेचही लागल्याचे लक्षात नाही आले तिला ! तशीच भावावस्थेत ती मावशीला विचारू लागली , " कोण वाजवतोय गं पावा, अगदी स्वर्गीय माधुरी आहे ह्या सुरांत ?" . हे बोलताना तर तिला धाप लागली.

"अगं ते बासरीवादन रोज संध्यासमयी आमच्या मुख्यप्रधानांचा पुत्र करतो. "कृष्ण" नाव आहे त्याचं. मोठा गोड मुलगा आहे. वनातून गुरेढोरे घेऊन परतीच्या वाटेवर प्रतिदिनी वाजवतो तो. किमया आहे खरं त्याच्या स्वरांमध्ये."

" अगं पण प्रतिदिन वाजवतं असता तर मला नसते का ऐकू आले. मला तर एक मासाहून अधिक काळ लोटला इथे येऊन !! " नारायणीने विचारले.

" तू आज व्रजवासी झाली असशील म्हणून !"
असे काही तरी असंबद्ध बडबडत मावशी निरांजन लावायला देवघरात गेली.

नारायणीच्या मनात आले , आज मी व्रजवासी झाली म्हणजे नेमके काय झाले. मगं या आधी मी रत्नपुरीवासी होते आणि त्याचा या स्वर्गीय वेणूवादनाशी काय संबंध? तो या पूर्वी का नाही ऐकू आला. आता पुन्हा उद्या ऐकू आला तर बघू असा विचार तिने केला. संध्यासमयीच्या भोजनाच्या तयारीसाठी ती स्वयंपाकघरात गेली.

आजचा दिवसही कालच्या दिवसासारखाच गेला असता परंतु ही नवीन प्रतिक्षा तिच्या मनात होती. प्रातःकाळी कामं आटोपून लवकरात लवकर सख्यांना भेटून हे विचारायचे असे तिने ठरवले.

।। शुभं भवतु ।।
**************************************
क्रमशः
शब्दसुचीः
सुरभीगोत्र. गाय बैल
पायदंड्या. पायऱ्या
आम्रवृक्ष. आंब्याचे झाड
अवनी. प्रुथ्वी
अभ्यादान. आरंभ
ममैव. केवळ माझ्यासाठी

टीप. सर्व हक्क लेखकाधिन.
धन्यवाद Happy

पुढचा भाग इथे वाचू शकता.

कृष्णडोहाच्या पैलतीरी **पंचम चरण...५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीसृष्टीचे आर्त होते
अवनीचे गीत होते
युगाचे अभ्यादान होते
ओंकाराचे संवेदन होते
>>>
ही तुमची कविता आहे का? फारच सुंदर.

सुरभीगोत्र :आवडला शब्द.

वैजयंती पुष्प म्हणजे कोणते फूल? मी आत्तापर्यंत वैजयंतीमाला म्हणजे तुलसीमाला समजत होते (विष्णुप्रिया म्हणून)

सुरेख
>>>" तू आज व्रजवासी झाली असशील म्हणून !"<<< अशा सु्क्ष्म तपशिलांतून लेखकाचं कौशल्य दिसतं बघ Happy जियो

हो माझेमन माझीच कविता आहे. मी कधी करत नाही पण सहज सुचली म्हणून लिहिली. धन्यवाद Happy
वैजयंती पुष्प श्रीविष्णू व श्रीकृष्ण या दोघांना प्रिय आहे असे म्हणतात. ते वेगळे आहे. फोटो मिळाल्यास टाकते.
धन्यवाद रुपाली.
धन्यवाद अवलताई.
धन्यवाद सामो.

2657125738_126d19cdc7.jpg

हे फूल आहे असे गुगल सांगते. मी कधी पाहिले नाही प्रत्यक्ष.
मावशीच्या वाड्यातली सर्व फूलं ही श्रीविष्णूची आवडती आहेत असे मलाही लिहीताना इंटरनेटवर कळले.
काही संस्कृत शब्द मराठी शब्दांना पर्याय म्हणून वापरले आहेत. संस्कृत शब्दकोशाचा आधार घेऊन.

खूप शोधले तरी हेच दिसले होते देवकी. तुम्हाला माहिती असेल कसे दिसते तर फोटो टाका प्लीज. कर्दळी मी पाहिलेले आहे.