रसाच्या पोळ्या

Submitted by मनीमोहोर on 21 March, 2015 - 08:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

नाव बुचकळ्यात पाडणारे आहे खरे. पण कोकणात आमच्याकडे हेच नाव आहे ह्या पोळ्यांचे, म्हणून मी ही हेच दिले आहे. वाचा पुढे म्हणजे उलगडा होईल.

जनरली पाडव्याचं पक्वान्न म्हणजे श्रीखंड. पण आमच्या़कडे पाडव्याला आमरस करायची प्रथा आहे. पहिला आमरस पाडव्याला होतो. आंबे घरचे असल्यामुळेच हे शक्य होतं. एखाद वर्षी आंबा मागास असला, म्हणजे पाडव्याला आमरस करण्याएवढे आंबे नसतील, तर मग आम्रखंड करायचं आणि तेवढे ही नसतील आंबे एखाद्या वर्षी तर ह्या रसाच्या पोळ्या करायच्या पाडव्याला. पण आंब्याचचं काहीतरी करायचं पाडव्याला.

हा रस म्हणजे आंब्याचा आटवलेला रस. मे महिन्यात हा रस केला जातो आणि पुढे वर्षभर खाल्ला जातो. बाजारात हल्ली आंब्याचा मावा म्हणून एक प्रकार मिळतो तो हाच असावा असं वाटतं. कारण मी तो अ़जून बघितलेला नाहीये.

आंब्याचा रस काढुन त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एका भल्या मोठ्या परातीत तो चुलीवर ठेऊन आटवायला घ्यायचा. हा मी नेहमी मोठ्या प्रमाणावरच केलेला पाहिला आहे. रस चुलीवर ठेवला आणि उकळायला लागला की तो फार उडतो सगळीकडे आणि त्यात असलेल्या साखरेमुळे हातावर उडला तर चांगलचं भाजतं म्हणुन चुलीपासून लांब उभं रहायचं आणि लांब दांड्याचा कालथा वापरायचा ढवळण्यासाठी. तसेच हा सारखा ढवळत रहावा लागतो नाहीतर खालुन लागतो. भरपूर कष्टाचं काम आहे हे पण कामवाल्या बायका असतात हाताशी म्हणूनच जमतं. मोठी परातभर रस आटायला चांगले दोन तीन तास लागतात. रस साधारण आटत आला की त्यात थोडी साखर घालायची प्रिझर्वेटिव म्हणून आणि पुन्हा थोडा आटवायचा. साधारण मऊ गूळाएवढी कंसिस्टंसी असते ह्याची. अगदी गार झाला की मोठया मोठ्या चीनी मातीच्या बरणीत भरायचा. वर परत टिकण्यासाठी म्हणून थोडी पिठीसाखर भुरभुरवायची आणि दादरा बांधुन बरणी ठेऊन द्यायची. ह्याचा रंग फार सुंदर येतो आणि चवीलाही छानच लागतो. असा तयार रस मुलाना खाऊ म्हणून कधीही देता येतो. उपासाच्या दिवशी हा रस खाऊन वर दूध प्यायले तर पोट मस्त भरतं. हा रस आणि भाजलेले शेंगदाणे हा आजच्या काळातही आवडता खाऊ आहे आमच्या घरातल्या लहान मुलांचा. तसचं ह्यापासून आंब्याच्या वड्या आणि आता मी सांगणार आहे त्या पोळ्या सुद्धा छान होतात.

नमनाला चांगलं लिटर भर तेल घालुन झालं आहे आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू या .

साहित्य:
सारणासाठी
एक वाटी आटवलेला रस
एक वाटी साखर ( मिक्सर मध्ये दळून )
एक चमचा तूप आणि थोडी वेलची पावडर.

कव्हर साठी

दोन वाट्या कणीक
दोन चमचे डाळीचं पीठ ( पोळ्या खुसखुशीत होतात या मूळे)
दोन चमचे गरम तेलाचं मोहन आणि किंचित मीठ.

पोळ्या लाटण्यासाठी तांदळाची पीठी. ( कणीक शक्यतो घेऊ नये. पीठीच घ्यावी. )

क्रमवार पाककृती: 

प्रथम कणकेमधे बेसन, तेल आणि मीठ घालुन आपण नेहमी पोळ्यांना भिजवतो त्या पेक्षा थोडी घट्ट भिजवून मुरण्यासाठी झाकून ठेवावी.

रस किसणीवर किसून घ्यावा आणि पिठीसाखर त्यात मिसळून नीट एकत्र करावे. नंतर हे मिश्रण मिक्सर मधुन फिरवून घ्यावे म्हणजे रस आणि साखर चांगल मिक्स होईल. आता ह्यात एक चमचा साजुक तूप, वेलची पावडर घालावी आणि दुधाचा हात लावून लावून मळून मळून त्याचा गोळा करावा. एकदम दूध घालु नये. साधारण आपण गूळ पोळीचा गूळ करतो तसा रसाचा गोळा तयार करावा.

कणीक आणि रस असे दिसेल

From mayboli

मग कणकेच्या दोन छोट्या लाट्यांमध्ये एक रसाची लाटी ठेऊन कडा बंद कराव्यात आणि आपण गूळाची पोळी लाटतो तशी ही पोळी लाटावी आणि मंद गॅसवर दोन्ही बाजुनी खरपूस भाजावी. ही अगदी ट्म्म फुगते आणि हलकी होते.

ही घ्या तयार पोळी

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे पण ह्या पुपो प्रमाणे जड होत नाहीत.
अधिक टिपा: 

मंद गॅस वरच भाजावी.
लाटताना रस कडेपर्यंत जाईल हे पहावे.
अगदी हलक्या आणि खुसखुशीत होतात. मुलांना हातात धरून खाता येतात.
खाताना साधारण पातळ केलेले तूप यावर घातले तर ह्यांची चव अजून खुलते.
पाडव्यासाठी म्हणून दारची पांढर्‍या चाफ्याची फुलं आणि कडुनिंबाची पानं यांनी सजावट केली आहे.

माहितीचा स्रोत: 
कोकणातील पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे हे. पोळ्या कित्ती खुशखुशीत दिसत आहेत. सुरेखच.
आमच्याकडे कोल्हापुरला खव्याच्या पोळ्या करतात त्या सारख वाटल हे. आंब्याऐवजी दुध आटवून . Happy
करायला भयंकर नाजुक प्रकरण त्यामुळ आई लोकच करतात फक्त. पण आता गेले कि फोटो काढुन टाकते.

काय मस्त दिसतंय. एक लिटर तेल पण पोषकच वाटलं.आमरस घरी करत नाही, फक्त आंबे कापून खातो. पण हा प्रकार चांगला रेडिमेड मिळाला तर पोळी करेन.

पण हा प्रकार चांगला रेडिमेड मिळाला तर पोळी करेन.>>>

योजकची प्रॉडक्टस् मिळत असतील तर आंबा मावा म्हणून मिळेल अनु.
मी आणून ठेवलाय महत्वाकांक्षा म्हणून… शिवाय घरी बेत डिक्लेअर केला नसल्यास मावा मिल्कशेक, आईस्क्रीम, आम्रखंड वगैरे सोप्या गोष्टी करून संपवता येतो.

मस्त रेसिपी!
आंबे खूप झाले की मे महिन्याच्या शेवटाला आई / आजी पूर्वी करायच्या आटव लेला रस... मग त्याच्या वर्षभरात कधीतरी वड्या किंवा तुम्ही सांगितलंत तसा नुसता खायचा..
पण पोळ्या नव्हत्या बनवल्या कधी... चांगली रेसिपी मिळाली.

अरे वा! मला वाटलं रसाची पोळी म्हणजे ऊसाचा रस.
माझ्याकडे असा आटवलेला रस आहे आंब्याचा गोळा स्वरूपातच. फार उत्साह आणि वेळ असला तर करून बघते.
एक प्रश्नः तव्यावर पोळी भाजताना गुळ फुटतो तसा हा रस फुटत नाही ना?

माझ्याकडे असा आटवलेला रस आहे आंब्याचा गोळा स्वरूपातच. ...... असा कसा राहू शकतो? केव्हाच गट्ट झाला असता.
लहानपणी गावावरून कधीतरी यायचा.मलिंदा/मलिदा म्हणायचे त्या आटवलेल्या रसाला.आम्ही नुसता खाऊन संपवायचो.

https://eyojak.com/
ही वेबसाईट. कर्वेनगर व सदाशिव पेठेत एकेक आऊटलेट आहे असं जस्टडायलवरून दिसतंय. पिसौमधे माहित नाही.

धन्यवाद सर्वांना...
सामो धागा वर काढल्याबद्दल स्पेशल थँक्यु.

एक प्रश्नः तव्यावर पोळी भाजताना गुळ फुटतो तसा हा रस फुटत नाही ना? >> अंजली, रस ही गुळ फुटतो तसा फुटतो. रस बाहेर येणे, किंवा कडे पर्यंत न पसरणे हे चॅलेंजेस येऊ शकतात. रसाची आणि कणकेची कंसीटन्सी सारखी ठेवणे हा एक उपाय आहे त्याला.
मी अजून विकतचा रस आणलेला नाहीये त्यामुळे योजक कसा आहे वगैरे ला माझा पास , पण चांगला असू शकेल. मी हा रस थोडा दूधात कालवून शिरा, खीर , केशरी भात ह्यात ही घालते. रंग आणि स्वाद दोन्ही छान येतो.

मस्त पाककृती. कधीतरी खाऊन बघायला आवडेल.
आमच्या कडच्या एका फर्साण /मिठाया विकणार्‍या दुकानात आटवलेला आमरस मिळतो. नुसता हापूसचा. हापूस पायरी मिक्स. तो दोनतीनदा आणला होता. मनीमोहोर म्हणतात तसाच रसाचा गोळा असतो. त्यापासून इथे आलेल्यांतली खास पाककृती केली नाही. मिल्क शेक, आम्रखंड केलं असावं.
एकदा या रसाच्या पोळ्या रसाची पोळी करून बघायला हवी. बर्फीची कृती कोण देतंय?

>>>>>>मी हा रस थोडा दूधात कालवून शिरा, खीर , केशरी भात ह्यात ही घालते. रंग आणि स्वाद दोन्ही छान येतो.
आहाहा!

असा कसा राहू शकतो? केव्हाच गट्ट झाला असता.>>>>> ब्लेम ऑन डायबेटीस Wink

रसाची आणि कणकेची कंसीटन्सी सारखी ठेवणे हा एक उपाय आहे त्याला.>>> ओके.

छान कृती, आंब्याचा मावा करतानाचे वर्णन वाचायला छान वाटले. अगदी अशाच खव्याच्या पोळ्या केलेल्या आहेत पण माव्याच्या नाही केल्या कधी.

मस्त फोटो आहे पोळीचा.. उचलावाशी वाटते ताटामधून..
तुम्ही पाककौशल्यात फारच पारंगत आहेत ममोताई .. मेरे तो बस की बात नही..!

Pages