रसाच्या पोळ्या

Submitted by मनीमोहोर on 21 March, 2015 - 08:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

नाव बुचकळ्यात पाडणारे आहे खरे. पण कोकणात आमच्याकडे हेच नाव आहे ह्या पोळ्यांचे, म्हणून मी ही हेच दिले आहे. वाचा पुढे म्हणजे उलगडा होईल.

जनरली पाडव्याचं पक्वान्न म्हणजे श्रीखंड. पण आमच्या़कडे पाडव्याला आमरस करायची प्रथा आहे. पहिला आमरस पाडव्याला होतो. आंबे घरचे असल्यामुळेच हे शक्य होतं. एखाद वर्षी आंबा मागास असला, म्हणजे पाडव्याला आमरस करण्याएवढे आंबे नसतील, तर मग आम्रखंड करायचं आणि तेवढे ही नसतील आंबे एखाद्या वर्षी तर ह्या रसाच्या पोळ्या करायच्या पाडव्याला. पण आंब्याचचं काहीतरी करायचं पाडव्याला.

हा रस म्हणजे आंब्याचा आटवलेला रस. मे महिन्यात हा रस केला जातो आणि पुढे वर्षभर खाल्ला जातो. बाजारात हल्ली आंब्याचा मावा म्हणून एक प्रकार मिळतो तो हाच असावा असं वाटतं. कारण मी तो अ़जून बघितलेला नाहीये.

आंब्याचा रस काढुन त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एका भल्या मोठ्या परातीत तो चुलीवर ठेऊन आटवायला घ्यायचा. हा मी नेहमी मोठ्या प्रमाणावरच केलेला पाहिला आहे. रस चुलीवर ठेवला आणि उकळायला लागला की तो फार उडतो सगळीकडे आणि त्यात असलेल्या साखरेमुळे हातावर उडला तर चांगलचं भाजतं म्हणुन चुलीपासून लांब उभं रहायचं आणि लांब दांड्याचा कालथा वापरायचा ढवळण्यासाठी. तसेच हा सारखा ढवळत रहावा लागतो नाहीतर खालुन लागतो. भरपूर कष्टाचं काम आहे हे पण कामवाल्या बायका असतात हाताशी म्हणूनच जमतं. मोठी परातभर रस आटायला चांगले दोन तीन तास लागतात. रस साधारण आटत आला की त्यात थोडी साखर घालायची प्रिझर्वेटिव म्हणून आणि पुन्हा थोडा आटवायचा. साधारण मऊ गूळाएवढी कंसिस्टंसी असते ह्याची. अगदी गार झाला की मोठया मोठ्या चीनी मातीच्या बरणीत भरायचा. वर परत टिकण्यासाठी म्हणून थोडी पिठीसाखर भुरभुरवायची आणि दादरा बांधुन बरणी ठेऊन द्यायची. ह्याचा रंग फार सुंदर येतो आणि चवीलाही छानच लागतो. असा तयार रस मुलाना खाऊ म्हणून कधीही देता येतो. उपासाच्या दिवशी हा रस खाऊन वर दूध प्यायले तर पोट मस्त भरतं. हा रस आणि भाजलेले शेंगदाणे हा आजच्या काळातही आवडता खाऊ आहे आमच्या घरातल्या लहान मुलांचा. तसचं ह्यापासून आंब्याच्या वड्या आणि आता मी सांगणार आहे त्या पोळ्या सुद्धा छान होतात.

नमनाला चांगलं लिटर भर तेल घालुन झालं आहे आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू या .

साहित्य:
सारणासाठी
एक वाटी आटवलेला रस
एक वाटी साखर ( मिक्सर मध्ये दळून )
एक चमचा तूप आणि थोडी वेलची पावडर.

कव्हर साठी

दोन वाट्या कणीक
दोन चमचे डाळीचं पीठ ( पोळ्या खुसखुशीत होतात या मूळे)
दोन चमचे गरम तेलाचं मोहन आणि किंचित मीठ.

पोळ्या लाटण्यासाठी तांदळाची पीठी. ( कणीक शक्यतो घेऊ नये. पीठीच घ्यावी. )

क्रमवार पाककृती: 

प्रथम कणकेमधे बेसन, तेल आणि मीठ घालुन आपण नेहमी पोळ्यांना भिजवतो त्या पेक्षा थोडी घट्ट भिजवून मुरण्यासाठी झाकून ठेवावी.

रस किसणीवर किसून घ्यावा आणि पिठीसाखर त्यात मिसळून नीट एकत्र करावे. नंतर हे मिश्रण मिक्सर मधुन फिरवून घ्यावे म्हणजे रस आणि साखर चांगल मिक्स होईल. आता ह्यात एक चमचा साजुक तूप, वेलची पावडर घालावी आणि दुधाचा हात लावून लावून मळून मळून त्याचा गोळा करावा. एकदम दूध घालु नये. साधारण आपण गूळ पोळीचा गूळ करतो तसा रसाचा गोळा तयार करावा.

कणीक आणि रस असे दिसेल

From mayboli

मग कणकेच्या दोन छोट्या लाट्यांमध्ये एक रसाची लाटी ठेऊन कडा बंद कराव्यात आणि आपण गूळाची पोळी लाटतो तशी ही पोळी लाटावी आणि मंद गॅसवर दोन्ही बाजुनी खरपूस भाजावी. ही अगदी ट्म्म फुगते आणि हलकी होते.

ही घ्या तयार पोळी

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे पण ह्या पुपो प्रमाणे जड होत नाहीत.
अधिक टिपा: 

मंद गॅस वरच भाजावी.
लाटताना रस कडेपर्यंत जाईल हे पहावे.
अगदी हलक्या आणि खुसखुशीत होतात. मुलांना हातात धरून खाता येतात.
खाताना साधारण पातळ केलेले तूप यावर घातले तर ह्यांची चव अजून खुलते.
पाडव्यासाठी म्हणून दारची पांढर्‍या चाफ्याची फुलं आणि कडुनिंबाची पानं यांनी सजावट केली आहे.

माहितीचा स्रोत: 
कोकणातील पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, माझ्या एक सासुबाई ही रस आणि भात असं अगदी आवडीने खात असतं. मी अजुन ट्राय नाही केलयं मात्र . रसाचा साग्रसंगीत बेत असेल तर आम्ही ही पापड, कुरड्या तळतोच पण रसात बुडवुन हे नाही आत्तापर्यंत खाल्लयं कधी. ट्राय केलं पाहिजे.

नंदिनी, करेक्ट आहे. रस आटवायला घेतला की त्याच्या सुटणार्‍या वासामुळे पोरं घुटमळत असतात अवती भोवती. आणि तयार झाल्यावर गार करत ठेवला की डल्ला मारतातच त्यावर. त्यांचे गोरे गोरे चिमुकले हात केशरी दिसले की आम्हाला कळतं पण आम्ही ही दुर्लक्षच करतो तिकडे.

ऋन्मेष, तुला अगदी तश्शाच हव्या असतील तर माझ्याकडे ये खायला अगदी फोटोत दिसतायत तश्शा मिळतील. तुझ्या जीएफ ला पण घेऊन ये. ( स्मित) कारण ह्या तुला कुठेही विकत नाही मिळणर.

अंजू , तु पुपो सारख भरतेस का? मी आता करुन बघेन तसं

अत्रुप्त, खरं आहे तुपाशिवाय मजा नाहीच ह्या पोळ्यांना पण हल्ली तुपाला नाह़क बदनाम केलं गेलयं ना !! मी पण घेतेच यावर तूप.
वर्षु, दाद धन्यवाद. दाद, हा फक्त आमच्याच भागातला खास पदार्थ आहे.

आंब्याच्या माव्याला मलिदा की मलिंदा म्हणतात.गावावरून आलेला मलिंदा,लहानपणी खाल्ल्ला होता.पण त्याच्या पोळयांची आयडिया झकासच.

ऋन्मेष, तुला अगदी तश्शाच हव्या असतील तर माझ्याकडे ये खायला अगदी फोटोत दिसतायत तश्शा मिळतील. तुझ्या जीएफ ला पण घेऊन ये. >>>> नक्की Proud

कारण ह्या तुला कुठेही विकत नाही मिळणर. >> पैश्याने सारे काही विकत घेता येत नाही असा विचार आला मनात हे वाचून Wink
हे खायचे असेल तर तुमच्यासारखी माणसेच जोडावी लागणार आयुष्यात Happy

हेमाताई, नुकताच काढलेला आंब्याचा रस आणि भात हे कॉम्बो माझी कोकणातली आजी पण खायची पण माझं नाही कधी डेरिंग झालं.

रस भात नाही पण रस कूर्डया व तांदळाचे पापड आवडतात. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया करतात रसाबरोबर खायला नाव आठवत नाही विचारुन सांगते..

masta aahet yaa polyaa. karun pahane kadhi shakya hoil mahit naahi Happy

rasaasathi kuthla amba vaparataat? hapus ki rayval?

देशावर आमरस आणि पुरणपोळी हे कॉम्बो पण खातात. कोकणात नाही.

हेमाताई मस्तपैकी आता आंब्याच्या वड्यांची रेसिपी टाका. मलापण छान करता येतात पण माझं अंदाजपंचे दाहोदरसे असते. नो माप etc.

हेमा ताई ,तुमच्या पा. कृ आणि लेखन शैली नेहमीच मला भाराऊन सोडतात.. काय च वि ष्ट लागत अ स णा र या पोळ्या....
ख र पु स दिसतायत.... तसेच म ला कोकणा ब द्द्ल विलक्षण प्रेम.. मा.बो. ंमुळे एक जिवाभावाची मैत्रीणच मिळाली . जी ने ह मीच च वि ष्ट पदार्थ शिकवत अ स ते...
अआं बा वDee ची पा कृ पण टा का. .
मंजु ताई तुला स र गुंडे म्हणायचे आहे का?

वॉव! ममो...मस्तच!
मला आधी वाट्लं रसाच्या पोळ्या म्हण्जे उसाचा रस घालून केलेल्य पोळ्या.
जेव्हा पूर्वीच्या काळी ठराविक सीझनलाच ठराविक गोष्टी करणयाची, खाण्याची पद्दहत होती:स्मितः
तेव्हा रामनवमीला घरात स्टीलच्या बरणीतून रस आण्ला जायचा.
तेव्हा उरलेल्या रसाच्या त्यात कणीक घालून गोडसर चविष्ट पोळ्या जायच्या.

मस्तच! आमरसाच्या पोळ्या खाल्ल्या आहेत पण हा प्रकार पहिलुनच एकला, बघितला
फोटो टेम्प्टिन्ग आहेत प्र्च.न्ड!!

हो हो तेच स रगुंडे....
र च्याकने देव नगरला स्वामी स म र्थ किराणा मdhe आंब्याचे सांदण / मावा मिळतो... त्या मुळे नक्की कर ण्यात येईल...
हेमा ताई चाफ्याची फुलं आणि कDu लिंब खुप खुलुन दिसतोय.
या व ळेला गुढी उभारतांना पां ढ र्‍या चाफ्याची माळ वाहतांना तुमची आठव ण झाली...

धन्यवाद सगळयांना आमचा हा पारंपारिक पदार्थ चवीने वाचलात म्हणून .

साधना, रस आटवण्यासाठी हापूसचाच घेतो. तो घट्ट असतो म्हणून . रायवळचा रस पात्तळ असल्याने नाही घेत. आटवल्यावर तो खूपच कमी उतरतो. मेहनतच जास्त होते. तसचं हापुसचा रंग आणि स्वाद दोन्ही जास्त सुंदर असतं

कोकणात ही रस शेवया पॉप्युलर आहे पण त्या असतात्त तांदळाच्या ओल्या शेवया आणि रस असतो नारळाचा. म्हणजे नारळाच्या दूधात गूळ आणि वेलची , जायफळ घालायचं

मला आधी वाट्लं रसाच्या पोळ्या म्हण्जे उसाचा रस घालून केलेल्य पोळ्या >>> मानुषी, माहितेयेत ह्या पोळ्या. नाव बुचकळ्यात पाडणारे आहे खरे.

आंब्याच्या वड्यांची रेसिपी पण टाकते सवडीने. त्यापण छानच होतात. गणपतीत प्रसादाला विकतचे पेढे न आणता आम्ही आंब्याच्या वड्याच करतो.

या व ळेला गुढी उभारतांना पां ढ र्‍या चाफ्याची माळ वाहतांना तुमची आठव ण झाली... >>> सायली, थँक्यु ग

मस्त ! तोंपासू ! प्रेझेंटेशनचे फुल मार्क्स ! .

(मला खायला बोलवा कधीतरी Wink )

मनीमोहोर, मस्त रेसिपी आहे .

रत्नागिरीत देसाईच्या दुकानातून आम्ब्याचा मावा घेतला होता. त्यात पिठीसाखर व दुधाचा हात लावून मळल्यावर असेच होईलसे वाटते.

मनीमोहोर, सलाम तुमच्या पाककौशल्याला !!! अगदी रसाळ शैलीत लिहील्यामुळे वाचतानाही घमघमाट येत होता.
बी तुम्ही भात अन रस एकत्र खाण्याबद्दल लिहीलय तस वर्णन मी ह.मो.मराठे यान्च्या 'बालकाण्ड,' मध्ये वाचले आहे.फोटो पण कातिलच डाएटिंगचे संकल्प ढासळवून टाकणारे आहेत .

मस्तं पाककृती आहे. फोटोपण सुंदर!

चितळ्यांच्या भयाण गोड आंबाबर्फ्यांचा सारणासारखा उपयोग करून पोळ्या केल्या. मूळ आंबाबर्फ्या नाहीत, पण त्या वापरून केलेल्या पोळ्या चवीला आवडल्या. मुख्य म्हणजे बेताच्या गोड झाल्या. भाजतानाच साजुक तूप पोळीवर सोडलं. यांना रसपोळ्या म्हणता येईल का?

भुईकमळ . टीना, अल्पना धन्यवाद मनापासून.

मस्त ! तोंपासू ! प्रेझेंटेशनचे फुल मार्क्स ! . >>> जाई, थँक्यु ग. अग, मला सजावटीत खूप रस आहे. पोळ्या केल्या की बोलावीन नक्की. खायला घरी ये.

आशिका, मी प्रत्यक्ष कधी पाहिला नाहीये तो मावा पण साधारण मऊ गूळासारखा असेल तर नक्की होतील त्याच्या पोळया.

मृण्मयी, तुमच्या कल्पना शक्तीला सलाम . ह्यांना नक्कीच रसाच्या पोळ्या म्हणता येईल ना ! चव मी लिहीलेल्या कृतीच्या खूप जवळ जाणारी असेल असं वाट्तयं. आमच्या सारणात मावा नसतो जो बर्फीत असतो एवढाच काय तो फरक. त्या बर्फीत आणखी काही घातलं का ? लाटताना सारण पोळीच्याकडेपर्यंत नीट गेलं का ? कारण बर्फी थो़डी चिकट असेत ना म्हणून शंका आली.

सुंदर पदार्थ आणि त्याहून सुंदर लेखन, मस्तच जमल्यात !
गोव्यात हा रस आटवताना हात दंडापर्यंत कापडात गुंडाळतात, त्यासाठी वेगळे आंबे वापरतात. पिकून काळे डाग पडलेले आंबे असतात ते. पण त्याच्या पोळ्या वगैरे करत नसावेत. निदान मी आत्याकडून ऐकले तरी नाही.

मृण्मयी मस्तच. बिनधास्त म्हण रसाच्या पोळ्या त्याला कारण मीपण कधी कधी गावाहून आलेल्या रसात थोडा खवा मिक्स करून पोळ्या करते किंवा आंबावडीपण करते खवा मिक्स करून.

पण जास्त नुसत्या रसाच्याच करते.

मानुषीताई, मला पण त्याच त्या आपल्या उसाच्या रसाच्या पोळ्या आठवल्या. अशी सांगली दिसली बघा. स्मित>>>>$
हं....नी + १००. सांगली बहु चांगली.
मृण्मयीची आयड्या मीही एक दोन वेळा केलीये. जसं पेढे आले की साटोर्‍या/हलवा.... इव्हन पोळ्या सुद्धा.
तसंच आंबा बर्फी(चितळे यांची)

रिझल्टसच्या काळात घरात आलेल्या सगळ्या 'इम्पोर्टेड' पेढ्यांना साटोर्‍यांमधे मुक्ती मिळत असे माझ्या घरी... Proud

सुंदर फोटो मनीमोहोर!! अगदी तोंडाला पाणी सुटलं... पण तुम्ही यंदा पाडव्याला या पोळ्या केल्यात म्हणजे यद्मा आंबा कमी आहे काय? Sad

या आटवलेल्या रसाला 'आंबा मावा' म्हणायची पद्धत कशी रूढ झाली कोणास ठाऊक! आम्ही 'आंब्याचा गोळा' म्हणतो. याचं मिल्कशेक आणि आईसक्रिम खूपच सुंदर होतं. वेगळी साखर घालावी लागत नाही. एकदम खमंग खमंग होतं. आणि रंग तर अगदी ए-वन येतो. पडीचे आंबे आटवण्यासाठीच वापरतात.

अप्रतिम !!
मनीमोहोर > कोकणातलं घर, हापूस आंबे, त्याचे खास पदार्थ ! भाग्यवान आहात खरचं !

एकदम झकास. दर मे महिना कोकणात जायचा पण रसाच्या पोळ्या कधी ऐकल्या/खाल्ल्या नव्हत्या.

आम्ही 'आंब्याचा गोळा' म्हणतो.>>>> आम्ही पण. मागिल दारी पाणचुलीवर मोठी परात ठेवून, त्यात लाकडी कालथ्याने रस आटवत आज्जी बसायची. खूप रस उडायचा. रसाचे गोळे, आंब्याची साठं, उकडांबे, आंबोशी असं काय काय आमच्याबरोबर मुंबईलाही पाठवायची ती.

सुरेख फोटो! प्रसन्न वाटलं पाहून. (मीही 'उसाच्या रसाच्या पोळ्या'च समजले :))

रसाच्या वड्या केल्या आहेत मी. काय अस्सल रंग येतो ना त्याला!

ही पोळी करण्यासाठी आंब्याच्या तयार आटवलेल्या गोळ्यावरही बरीच खटपट करावी लागेल असा माझा अंदाज आहे, कारण तो चांगलाच घट्ट असतो. तो किसून, दूध घालून बराच मऊ करून घ्यावा लागेल नाहीतर तो पसरणार नाही पोळी लाटताना.

Pages