दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)

Submitted by .......... on 1 January, 2020 - 09:40

दिगंतराचे प्रवासी... (२०१९)

‘दिगंतराचे प्रवासी’ ही माझी ऑनलाईन असलेली डायरी आहे. रोजनिशी आहे. येथे मी वेळोवेळी पाहीलेल्या पक्ष्यांची, त्यांच्या सवयींची, काही खास प्रसंगांची किंवा मला महत्वाच्या वाटलेल्या घटनांची नोंद करत आहे. वर्षा अखेरीस मला या रोजनिशीमुळे एखाद्या पक्षाचा व्यवस्थित मागोवा घेता येईल. पुढच्या वर्षीच्या पक्षीनिरीक्षणासाठी काही महत्वाचे मागोवे मिळतील. पक्ष्यांच्या नोंदवलेल्या अधिवासामुळे, त्यांच्या विणीच्या हंगामामुळे, विणीच्या हंगामात त्यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे, स्थलांतराच्या नोंदीमुळे मला खुप मार्गदर्शन मिळेल असे वाटते आहे. या वर्षी केलेल्या नोंदींमध्ये आणि पुढच्या वर्षीच्या नोंदींमध्ये असलेल्या फरकामुळे काही गोष्टी नव्याने समजण्याचीही शक्यता आहे. एकूण या नोंदींमुळे माझ्या माहितीत नक्कीच मोलाची भर पडेल.

लॅपटॉपवर अनेक डायरी ऍप आहेत पण मी मायबोलीवर सहज सुरु केलेला २०१९ चा ‘दिगंतराचे प्रवासी’ हा धागा पुर्ण व सलग वाचला तेंव्हा जाणवले की ऍपपेक्षा या धाग्याच्या प्रतिसादस्वरुपात असलेल्या नोंदी जास्त स्पष्टपणे डोळ्यासमोर चित्र उभे करत आहेत. त्यामुळे २०२० या वर्षीचा ‘दिगंतराचे प्रवासी’ या नावानेच पुन्हा दुसरा धागा म्हणजेच माझी ‘रोजनिशी’ सुरु करत आहे. येथे त्या त्या तारखेला पाहीलेल्या पक्ष्यांचे फोटो व इतर माहिती यांची नोंद मी करणार आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार नोंदीची तारीख एक दोन दिवस मागे पुढेही होऊ शकते.

— हरिहर (शाली)

चित्रबलाक
ID: Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 93cm
Loc: Bhigwan (8 Jan 20)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन वर्ष कामाच्या धबडग्यात सुरू झाले त्यामुळे पक्षी पहायला कुठे बाहेर पडता आले नाही. सलीम अली अभयारण्य रस्त्यातच असल्याने तेथे तासभर बसता येते. आज सकाळी या सॅन्क्च्यूरीमधे कोकीळ दिसला. मादी मात्र कुठेच दिसली नाही.

Asian koel (Eudynamys scolopaceus)
Size: 43cm
Pune (Yerwada)
2 Jan (7:30 am)

चित्रबलाकांची संख्या दिवसें दिलस वाढतेच आहे. काही चित्रबलाकांना अजुनही गुलाबी रंग आलेला नाही. हा रंग प्लुमेजमुळे येतो की रोहीतसारखे काही विशिष्ट शेवाळ खाऊन येतो ते माहीत नाही.

Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 90 to 100 cm (3.5 kg adult)
Pune (Yerwada)
2 Jan (7:30 am)

नाचरा कधीही व्यवस्थित फोटो काढू देत नाही. अक्षरश: नाचत असतो. आज तर जोडी होती त्यामुळे जास्तच नाचणे सुरू होते. क्षणभर एका ठिकाणी विसावला पण कॅमेरा फोकस करु शकला नाही. माझ्या आवडत्या दहा पक्षांमधे हा नाचरा आहे.

White-Spotted Fantail (Rhipidura albogularis)
Size: 17 cm
Pune (Yerwada)
2 Jan (7:00 am)

नाचरा, मस्तच!
अप्पा तुमच्या रोजनिशीच्या निमित्ताने का होईना नवा पक्षी?(माझ्यासाठी नवाच Lol ) दिसला कि निरिक्षण करायला सुरवात होतीये. Happy

त्या कोकीळचे डोळे आहेत की गुंजा!
तो नाचरा त्याचे एकट्याचे फोटो काढले म्हणून रागावला आहे असं वाटतंय.

ID: Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 93cm
Loc: Bhigwan (8 Jan 20)


२ यात झोपलेला तुतवार व शेकाट्याही दिसत आहेत.




मी आजवर पाषाणला, शिक्रापुर, माझ्या घराजवळ मुग्धबलाक पाहीला होता. पण त्याच्या नावाप्रमाणे मला त्याची चोच काही उघडी दिसली नव्हती. भिगवणला पाहीलेल्या अनेक मुग्धबलाकांचीही चोच फट नसलेली होती. वावेंनी सांगीतले होते की लहान मुग्धबलांकाची चोच उघडलेली नसते. मग मला काय फक्त पिल्ले दिसत होती का? पाषाणला दिसलेले मुग्धबलाक अगदी ऍडल्ट होते पण त्यांचीही चोचही अगदी मिटलेलीच होती. मात्र भिगवणवरुन निघताना एका झाडावर बसलेला मुग्धबलाक दिसला. मानेवरची पिसे अगदी कापसासारखी फुलवून त्यात चोच घालून झोपला होता. मला प्रथम ओळखता आलेच नाही हा कोणता पक्षी आहे. एकूण आकार मुग्धबलाक सारखा असला तरी आकार बराच मोठा होता. एकून अवतार गबाळा होता. जरा वेळ तेथेच वाट पाहील्यावर त्याने मान किंचीत वर केली आणि त्याची चोच दिसली. तो मुग्धबलाकच होता. त्याची चोच खरोखर पुढील बाजूला उघडी होती. एखादे लाकडी हत्यार वापरुन झिजावे तसे त्याच्या चोचीत फट पडलेली दिसत होती. चोचही अगदी जुनी झाल्यासारखी वाटत होती. माझा अंदाज आहे की ऍडल्टल्सची चोच उघडत नसावी तरी पुर्ण वाढ झाल्यानंतर बरेच दिवसांनी त्याच्या चोचीत फट पडत असावी. या पक्ष्यांचे आयूष्य नक्की किती असते, म्हातारे झाल्यावर ते कसे दिसतात यावर जरा लक्ष द्यायला हवे.
या फोटोत मुग्धबलाकच्या चोचीत असलेली फट स्पष्ट दिसते आहे. माझ्या इतर फोटोत ती दिसत नाही.

मुग्धबलाक
ID: Asian openbill (Anastomus oscitans)
Size: 81 cm, Mass: 1.3 – 8.9 kg
Loc: Bhigwan (8 Jan 2020)

( वरील दोन्ही नोंदी सौच्या आयडीने झाल्यात लॉगआऊट न केल्याने. त्या नोंदी माझ्या आहेत. )

या गलचे मराठी नाव काही मला समजले नाही. मी या अगोदर मुंबईला कुरव (Black-headed Gull) पाहीलेत पण हा गल कधीही पाहीला नव्हता. भिगवणला बॅकवॉटरमध्ये होडीतून फिरत असताना शेकडो गल्स दिसले पण हा मात्र एकच होता. प्रथम दुरुन मला ते बदक वाटले कारण त्याचा आकार खुपच मोठा होता. नावाड्याने होडी जवळ नेवून थांबवले तेंव्हा लक्षात आले की हा कुठला तरी गल आहे. नावाड्याने नाव सांगीतले. दिसायला खरच देखणा पक्षी आहे हा. जरा वेळाने तो उडाला तेंव्हा अगदी डौलदार दिसला. नेटवर सर्च केले असता याचे डोके काळे असलेले दिसले. मी पाहीलेला कदाचीत लहान असावा किंवा मादी. याविषयी जास्त माहिती मिळाली तर येथे नोंद करेनच.
पल्लासचा कुरव
ID: Pallas's Gull (chthyaetus ichthyaetus)
Size: 66-72 cm, Mass: 1.4 kg
Loc: Bhigwan (8 Jan 2020)

मी या अगोदर मुंबईला गल्स पाहीले होते पण त्यांचे जवळून निट निरिक्षण करता आले नव्हते. भिगवणला मात्र या पक्ष्याला अतिशय जवळून पहाता आले. अतिशय सुंदर व गोड दिसतो हा पक्षी. याची उडान तर अगदी अप्रतिम असते. आम्ही होडी घेवून बॅकवॉटरच्या दुसऱ्या टोकाला गेलो तेंव्हा तेथे शेकडो कुरव बसले होते. पण आमचा जायची वेळ चकली असावी. कारण ते सगळे झोपलेले होते. एकाच वेळी शेकडो कुरवला पंखात मान घालून झोपलेले पहाने सुध्दा खुप छान होते. काही कुरव मात्र असजुनही अन्न शोधत होते. नावाड्याने गल्सच्या जवळ गेल्यावर बोट बंद केली व मग सावकाश वल्हवत त्यांच्या अगदी थव्याजवळ नेऊन उभी केली. मग जवळच्या पिशवीतून लाह्या काढून उधळल्या. क्षणात अनेक गल्सने होडीभोवती अगदी गोंधळ केला. फोटो काढावे वाटले नाही जास्त कारण अतिशय सुंदर पक्षी समोर असताना त्यांना कॅमेऱ्यातून काय पहायचे! अगदी गोंडस दिसतो हा पक्षी. जरा वेळाने आम्ही तेथून निघालो तर खुप मोठा थवा बदकांसारखे पोहत खुप दुरवर आमच्या होडीमागे आला. नावाड्याने त्यांचे मराठी नाव सांगीतले ते पटले अगदी -“हावरा”
आवाज मात्र फार कर्कश्श आहे त्यांचा.
नावाप्रमाणे यांचे डोके काळे असते पण ते उन्हाळ्यात. हिवाळ्यात मात्र प्लुमेजमुळे त्यांचे डोके करडे-पांढरे होते. Summer plumage मध्ये यांचे डोके पुन्हा काळे होते.

कुरव
ID: Black-headed Gull (Chroicocephalus ridibundus)
Size: 43cm Mass: 280 g
Loc: Bhigwan (8 Jan 2020)

१. सुदैवाने मला याचा उभा असलेला फोटो मिळाला. यात त्याचे पाय, चोच, डोळे, साधारण उंची व एकून शरीराची ठेवण स्पष्ट दिसते आहे. Happy

२. शांत पोहणारे कुरव

३. लाह्या खायला धावणारे कुरव.

४. पक्ष्यांना कारण नसताना खायला घालणे मला आवडत नाही. नावाड्याने पिशवीतून लाह्या काढल्या त्यावेळीही मला सारखे वाटत होते की कशाला त्या पक्ष्यांच्या सवयी बिघडवायच्या. पण जेंव्हा त्याने त्या लाह्या पाण्यात टाकल्या तेंव्हा सगळ्या कुरवांची उडालेली धांदल एवढी गोड होती की मी माझ्याच नियमाला मनातल्या मनात पळवाट काढली. "एखाद वेळ लाह्या टाकल्याने त्या पक्ष्यांचे काय एवढे मोठे नुकसान होणार आहे? टाकूदे अजुन" हे असेच असते मन. Lol

५. आम्हाला जायला उशीर झाला होता त्यामुळे सर्व कुरव सकाळचा नाष्टा करुन निवांत झोपले होते. मला जरा वाईट वाटले पण नंतर असेही वाटले की उडणारे गल्स सगळेच पहातात. सामुदायीक विश्रांती घेणारे गल्स कधी पहायला मिळाले असते? खरच ते सगळे एकत्र झोपल्याने फार मस्त दिसत होते. जरा विनोदीही दिसत होते.

६. कॅमेऱ्यात एवढेच आलेत. यांचा खुप मोठा थवा सगळ्या गोंधळापासुन जरा अंतर ठेवून शांत झोपला होता.

मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज
मी या अगोदर मळगुजा पाहिला होता पण त्याला सुरवातीला बरेच दिवस मी तुतवारच (Sandpiper) समजत होतो. पण तुतवारमध्येही दोन प्रकार सातत्याने पाहील्याने या मळगुजाचे वेगळे वैशीष्ट जाणवले. खरेतर हाही तुतवारच्याच फॅमिलीतील पक्षी आहे. यातही अनेक प्रकार आहेत. सगळेच प्रकार पहाण्यात नसल्याने फक्त इंटरनेटचा आधार घेवून मला हा नक्की कोणता मळगुजा आहे हे काही समजले नाही. त्यातही मळगुजा हेच मराठी नाव आहे. पाणटिवळाही असाच दिसतो बराचसा. इंग्रजीत मात्र याची वेगवेगळी नावे आढळली. नेहमीच्या पहाण्यातला नसल्याने याची मला फारशी माहीत नाही पण याचे वागणे, सवयी या बऱ्याचशा तुतवारसारख्याच आहेत. चोच मुळाशी गुलाबी असुन टोकाकडे काळी होत गेली आहे. मी या भिगवणला अनेक ठिकाणी पाहीले. प्रत्येक वेळी याच्या सोबत शेकाट्या होताच. याच्या फॅमिलीत आढळणारे इतर पक्षी म्हणजे Snipes, Sandpipers, Curlewa, Woodcock वगैरे.

ID: Black-tailed godwit (Limosa limosa)
Size: 41-50cm, Mass: 290 g
Loc: Bhigwan (8 Jan 2020)
१.

२.

३.

पट्टकादंब
हे बदक माझे आवडते असुनही मला याचे क्लिअर फोटो मिळाले नाहीत. भिगवणला जाण्यामागे रोहीत व पट्टकादंब हे दोन मुख्य आकर्षण होते. दुर्दैवाने मला रोहीत (Flemingo) पट्टकादंब हे दोन्ही पक्षी दिसले नाहीत. रोहीत त्यादिवशी आलेच नव्हते व पट्टकादंब मात्र चार होते. पण चारही पट्टकादंब झोपलेले होते. ते जागे झाल्यावर मला त्यांचे व्यवस्थित निरिक्षण करता आले असते पण तेथे शेकडो पक्षी एकत्रच असल्याने मी प्रत्येकाला शोधून काढून, ओळख पटवून मग निरिक्षण करावे लागत असल्याने नंतर माझे पट्टकादंबांकडे दुर्लक्ष झाले व नंतर ते दिसलेच नाहीत.

Bar-headed Goos (Anser indicus)
Size: 75 cm, Mass: 2-3 kg
Loc: Bhigwan (8 Jan 2020)

मोर शराटी
या शराटीचे अनेकदा दर्शन होवूनही हीला ज्यामुळे मोर शराटी हे नाव मिळाले ते तिचे चमकदार रंग काही मला कधी पहायला मिळाले नव्हते. दिसले तरी फक्त हे किती सुरेख असतील याचा अंदाज येण्यापुरते दिसले होते. या दोन महिन्यात मला खुपदा या शराटीचे दर्शन झाले होते. अगदी देवराईतही या शराट्यांनी हजेरी लावली होती. पण या शराट्या पाण्यात कसे अन्न शोधतात ते मला भिगवणला अगदी बारकाईने पहाता आले. ही शराटी आकाराने इतर शराट्यांच्या मानाने खुपच लहान आहे. होडीमध्ये फक्त मी व बायकोच असल्याने व बायकोलाही पक्ष्यांमध्ये रस असल्याने मी प्रत्येक पक्ष्याशेजारी बराच वेळ होडी उभी करुन पक्षी पाहीले.

Glossy Ibis (Plegadis falcinellus)
Size: 52 cm, Mass: 430g
Loc: Bhigwan (8 jan 2020)
१.

२. या फोटोत शराटीचे रंग बऱ्यापैकी उठून दिसत आहेत. शेजारी दर्वीमुख ( Eurasian Spoonbill) दिसत आहे.

खूप सुंदर फोटो आलेत सगळे. माहितीही सुरेख.

मुग्धबलाक चोच उघडू शकत नाहीत काय? मग जेवतात कसे?

मूळ लेखात बाकीचे सगळे फोटो टाका. म्हणजे पाने जास्त झाली तरी फोटो पाहता येतील.

झोपलेले पक्षी पाहणे खूप मजेशीर आहे. माझ्या गच्चीतल्या तीन चार फुटी छोट्याश्या झाडावर एक छोटा अशि प्रिनिया झोपायला यायचा. झोपल्यावर लिंबूला सर्व बाजूने पिसे असतील तर ते जसे दिसेल तसा व तेवढ्या आकाराचा तो दिसायचा. इतका गाढ झोपायचा की मी जवळ गेले तरी त्याला चाहूल लागायची नाही. मी कधीच जास्त जवळ गेले नाही, उगीच का त्रास द्या.

थँक्यू साधनाताई!
मुग्धबलाक चोच उघडू शकत नाहीत काय? मग जेवतात कसे?................ तसं नाहीए साधनाताई, ते इतर पक्ष्यांसारखीच चोच उघडतात मात्र त्यांच्या वरच्या व खालच्या चोचीत टोकाकडील भागात फट असते. म्हणजे दोन्ही चोची पुर्ण बंद होत नाहीत. चोचीतल्या या कंसाच्या आकाराच्या फटीमुळे त्यांना शिंपले किंवा गोगलगाईचे शंख व्यवस्थित पकडता किंवा फोडता येतात. पिल्ले आणि तरुन मुग्धबलाकांमध्ये ही फट आढळत नाही.

मूळ लेखात बाकीचे सगळे फोटो टाका. म्हणजे पाने जास्त झाली तरी फोटो पाहता येतील.............. मला समजले नाही. हा धागा मी डायरीसारखा वापरतो आहे. जेंव्हा जेंव्हा पक्षी दिसेल तेंव्हा त्या तारखेला त्याची सविस्तर नोंद मी येथे करणार आहे. (दहा दिवसातल्या नोंदी आज वेळ मिळाल्याने एकदम करतो आहे.) नंतर मला हेच धागे संदर्भ म्हणून वापरता येतील. किंवा नुसते हे धागे वाचले तरी बरेचसे चित्र स्पष्ट होईल. म्हणजे कोणता पक्षी कोणत्या महिन्यात, कोणत्या वातावरणात, कोणत्या भागात काय करताना आढळला. घरटे कधी बांधले, पिल्ले केंव्हा झाली याचे खुप स्पष्ट चित्र मिळेल. कदाचीत इतरांनाही या नोंदींचा उपयोग होवू शकेल.

पल्लासचा कुरव
ID: Pallas's Gull (chthyaetus ichthyaetus)
Size: 66-72 cm, Mass: 1.4 kg
Loc: Bhigwan (8 Jan 2020)
१.

२.

थापट्या, खातहंस
या अगोदर हे बदक मी फक्त चित्रातच पाहीले होते. (खरे सांगायचे तर बरेचसे पक्षी मी चित्रातच पाहीले होते. हे पक्षीवेड या तिन-चार महिन्यातच सुरु झाले असल्याने माझ्यासाठी बहुतेक पक्षी हे नविनच आहेत.) भिगवणच्या बॅकवॉटरमध्ये थापट्यांच्या अनेक जोड्या दिसल्या. पिल्लेही होती. म्हणजे यांचा नेस्टींग पिरियड संपला असावा. यातला नर सुंदर आहे व मादी मात्र फारशी आकर्षक नाही. हे बहुतेक पक्षांमध्ये हेच पहायला मिळते. याला अन्न शोधताना मी पाहीले नाही. मी गेलो तेंव्हा ते नुकतेच जागे झाले होेते व पंख साफ करत होते. यांची संख्या गल्सइतकी नसली तरी अगदी लक्षणीय होती. पिल्ले अनेक होती. पण ती मोठी होवूनही आकर्षक दिसण्याएवढी तरुण झाली नव्हती. हे बदक दिसायला अर्थातच खुप सुंदर आहे. नावाप्रमाणेच याची चोच खुप चपटी व मोठी आहे.

ID: Northern Shoveler (Spatula clypeata)
Size: 51 cm, Mass: 610 g
Loc: Bhigwan (8 Jan 2020)
१. नर आणि मादी

२. नर, मादी व पिल्लू

३. पुर्ण वाढ झालेला नर

४. मादी व बऱ्यापैकी मोठे झालेले पिल्लू

दर्वीमुख, चमच्या
हा दर्वीमुख अगदी कितीही दुरुन सहज ओळखायला येतो. आकाशातून उडतानाही याची चोच प्रथम नजरेत भरते. हा जेंव्हा अन्न शोधत नसतो किंवा शांत उभा असतो तेंव्हा खुप सुंदर दिसतो. या सौंदर्यात चोच तर भर घालते पण राखी बलाक सारखा डोक्यावरुन मानेवर रुळलेला तुरा फारच छान दिसतो. हा तुरा नराला विणीच्या काळातच येतो. नोव्हेंबरच्या आसपास यांचा विणीचा हंगाम असल्याने तुम्ही या दिवसात त्याला पाहीले तर त्याची आकर्षक शेंडी नक्की पहायला मिळेल. मी पाहीले तेंव्हा दोन्ही चमचे अन्न शोधण्यात मग्न होते. इतक्या मोठ्या बॅकवॉटरमध्ये मला फक्त एकच जोडी दिसली. या अगोदरही मी जेंव्हा चमचे पाहीले तेंव्हा ते जोडीने किंवा थव्यानेच होते. उथळ पाण्यात अन्न शोधण्यासाठी त्यांना चोचीचा खुप उपयोग होता. पाय काळे असतात. चोचही काळी असुन टोकाला काही ठिकाणी पिवळी दिसते. नावाप्रमाणे खरेच त्यांची चोच टोकाकडे फार पसरट असते. म्हणजे यांच्या चोचीचा एक भाग जर मिळाला तर खरोखर चमच्यासारखा वापरता येईल.

ID: Eurasian spoonbill (Platalea leucorodia)
Size: 60 cm, Mass: 1.9 kg
Loc: Bhigwan (8 Jan 2020)
१. अन्न शोधण्यासाठी पाणी ढवळणारी जोडी. शेजारी थापट्या (Northern shoveler) पंख साफ करतो आहे.

२. या फोटोत चमच्याची चोच कशी असते याचा थोडा अंदाज येईल.

२. एक दर्वीमुख उडाल्यानंतर दुसरा फार वेळ थांबला नाही.

Ok अप्पा, माझ्या दैनंदिनीचे लक्षात आले नाही. कल्पना खूप चांगली आहे. पूर्ण वर्षभर फोटो टाकले तर विणीच्या हंगामातील पक्षी नंतर कसा मुळपदावर येतो हेही लक्षात येईल.

हिवाळी सुरय, कुरव चोचीचा सुरय
नेहमीच्या सुरय (River Tern) आणि हा सुरय यात बरेचसे साम्य आहे. सुरयची चोच पिवळी असते व याची काळी. आकारातही जरा फरक आहे. नदी सुरयचा आकार बराचसा पाकोळीसारखा असतो तर हिवाळी सुरयचा आकार काहीसा गल्ससारखा असतो. मी पाहीले तेंव्हा हा गल्सच्या थव्यातच वावरत होता. मला सुरवातीला गल आणि हा सुरय यात फरकच कळला नाही. मग जाणवले की हा काहीसा सुरयसारखा दिसतोय. नावाड्याला विचारल्यावर त्याने नाव सांगितले. हे नक्की किती दिसले हे सांगता येणार नाही कारण हे गल्समध्ये अगदी बेमालून मिसळून गेले होते.

ID: Gull-billed Tern (Gelochelidon nilotica)
Size: 220 g
Loc: Bhigwan
DOP: 8 Jan 2020
1.

2.

भोरडी
या भोरड्या आजकाल देवराईत खुप दिसायला लागल्या आहेत. गेटवरच बोरीचे झाड आहे त्यावर यांचा किचकिचाट सुरु असतो. येथे भिगवणलाही खुप भोरड्या दिसल्या. येथे आकाशात सुर्यास्ताबरोबर या भोरड्यांची सामुदायीक कवायत (Murmuration) सुरु होते. ती अतिशय नयनरम्य कवायत पहाण्यासारखी असते. दुर्दैवाने सुर्यास्तापर्यंत थांबता न आल्याने मला तो सोहळा पहाता आला नाही. यांचे या अगोदरच भरपुर वर्णन केल्याने येथे फक्त फोटो आणि कवायतीची युट्युबवरील लिंक देत आहे. लिंकवरचा व्हिडिओ अर्थात माझा नाही. पुढच्या आठवड्यात जाईन तेंव्हा या डायरीसाठी नक्की शुट करायचा प्रयत्न करेन. येथे व्हिडिओ पहाता येईल. परवानगीची आवश्यकता आहे का ते माहीत नाही.

ID - Rosy Starling (Pastor roseus)
Size - 23 cm, Mass - 73 g
Loc - Bhigwan
DOP - 8 Jan 2020
1.

2.

कंठेरी चिखल्या
अनेक तळ्यांच्या काठी, दलदलीच्या परिसरात हा चिखल्या दिसतो. पंखाचा रंग तुतवारसारखाच असतो. डोळ्याभोवती ठसठशीत कडे असते. मला नेहमी जोडीच दिसली आहे याची. एकमेकांच्या आजूबाजूला वावरत हे चिखलात अन्न शोधत असतात. याची मला फारशी माहित नाही.

ID - Little ringed plover (Charadrius dubius)
Mass - 40 g
Loc - Bhigwan
DOP - 8 Jan 2020

काळ्या डोक्याची शराटी
मी दोन तिन वेळा काळ्या शराटी पाहील्या होत्या. मला मेल व फिमेल यामध्ये मला फरक जाणवला नाही. काही लहान मोठा फरक असेल तर तो माझ्या अजुन लक्षात नाही आला. या शराटीची पिल्ले कशी दिसत असतील याची मला फार उत्सुकता होती, शराटींच्या थव्यामध्ये मला कधी पिल्ले दिसले नाहीत. पिल्ले ऍडल्टपेक्षा नक्कीच वेगळी असणार पण मला ती दिसली नव्हती. भिगवणला मात्र प्रथमच काळ्या शराटीचे पिल्लू दिसले. इतर पक्ष्यांप्रमाणेच पिल्लू आईच्याच आकाराचे होते फक्त त्याचे डोके अजुन पुर्ण काळे झाले नव्हते. डोक्यावर, चोचीवर एक रापलेपणा येतो तो अजुन त्याच्या डोक्यावर आला नव्हता. इतर पिल्लांप्रमाणेच हे धडपडे व आईच्या मागे मागे करणारे होते.

ID - Black-headed ibis (Threskiornis melanocephalus)
Size - 75 cm
Loc - Bhigwan
DOP - 8 Jan 2020
१. पुढे पुर्ण वाढलेली शराटी व मागे पिल्लू.

२. पिल्लू

३. हा पिल्लाचा क्लोजप. मला तर याच्या डोळ्यातही खट्याळपणा व उत्सुकता दिसतेय. पिल्लाचे डोके नुकतेच काळे होऊ लागल्याचेही दिसते आहे.

Pages