दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)

Submitted by .......... on 1 January, 2020 - 09:40

दिगंतराचे प्रवासी... (२०१९)

‘दिगंतराचे प्रवासी’ ही माझी ऑनलाईन असलेली डायरी आहे. रोजनिशी आहे. येथे मी वेळोवेळी पाहीलेल्या पक्ष्यांची, त्यांच्या सवयींची, काही खास प्रसंगांची किंवा मला महत्वाच्या वाटलेल्या घटनांची नोंद करत आहे. वर्षा अखेरीस मला या रोजनिशीमुळे एखाद्या पक्षाचा व्यवस्थित मागोवा घेता येईल. पुढच्या वर्षीच्या पक्षीनिरीक्षणासाठी काही महत्वाचे मागोवे मिळतील. पक्ष्यांच्या नोंदवलेल्या अधिवासामुळे, त्यांच्या विणीच्या हंगामामुळे, विणीच्या हंगामात त्यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे, स्थलांतराच्या नोंदीमुळे मला खुप मार्गदर्शन मिळेल असे वाटते आहे. या वर्षी केलेल्या नोंदींमध्ये आणि पुढच्या वर्षीच्या नोंदींमध्ये असलेल्या फरकामुळे काही गोष्टी नव्याने समजण्याचीही शक्यता आहे. एकूण या नोंदींमुळे माझ्या माहितीत नक्कीच मोलाची भर पडेल.

लॅपटॉपवर अनेक डायरी ऍप आहेत पण मी मायबोलीवर सहज सुरु केलेला २०१९ चा ‘दिगंतराचे प्रवासी’ हा धागा पुर्ण व सलग वाचला तेंव्हा जाणवले की ऍपपेक्षा या धाग्याच्या प्रतिसादस्वरुपात असलेल्या नोंदी जास्त स्पष्टपणे डोळ्यासमोर चित्र उभे करत आहेत. त्यामुळे २०२० या वर्षीचा ‘दिगंतराचे प्रवासी’ या नावानेच पुन्हा दुसरा धागा म्हणजेच माझी ‘रोजनिशी’ सुरु करत आहे. येथे त्या त्या तारखेला पाहीलेल्या पक्ष्यांचे फोटो व इतर माहिती यांची नोंद मी करणार आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार नोंदीची तारीख एक दोन दिवस मागे पुढेही होऊ शकते.

— हरिहर (शाली)

चित्रबलाक
ID: Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 93cm
Loc: Bhigwan (8 Jan 20)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दोन्ही प्रिनिया सारखेच दिसताहेत, दोघांच्याही डोक्यावर तोच रंग दिसतोय. एका प्रिनियाची अजून अंघोळ झाली नाहीय व एक नीट केसबीस विंचरून बसलाय इतकाच फरक.

Happy Happy

शिंजीरचे घरटे
चार पाच दिवस मी शिंजीरच्या घरट्याची माहीत घेतली. दोन पक्षीतज्ञ मित्रांनाही विचारले. नेटवर सर्च केले. हाती आलेली माहीत अशी होती की शिंजीर फार क्वचित एकदा वापरलेले घरटे पुन्हा वापरतो. दरवेळी तो नविन घरटे बनवतो. (पिल्लांना भरवायची जबाबदारी नर व मादी दोघेही घेत असले तरी घरटे मात्र फक्त मादीच विणते.) कधी कधी तो जुन्या घरट्याचे मटेरीअल वापरतो. तरीही मी नेटवर घरट्याच्या आतील भागाचे फोटो मिळतात का हे शोधले पण मिळाले नाहीत. त्यामुळे मी शेवटी हे घरटे काढायचे ठरवले. (जर माझ्या फोटोंचा उपयोग जर कुणा पक्षीमित्राला संदर्भ म्हणून झाला तर ते घरटे काढायचे टाळतील असाही हेतू आहेच.)

( हा आहे घरट्याचा उभा छेद. )

( छलावरण असलेली घरट्याची बाहेरील बाजू. )

घरटे घरी आणले व फोटो काढले त्यामुळे ते चटकन नजरेत भरेल असे दिसत आहे. प्रत्यक्ष ते झाडावर असताना लवकर नजरेस पडत नाही. घरटे दिसले तरी झाडावर अडकलेला कचरा आहे असे वाटावे असे त्याचे रंगरुप असते. घरट्याचा पुर्ण आकार २५.५ सेंमी असला तरी त्यातला खालील ९ सेंटीमिटरचा भाग हा फक्त छद्मावरण म्हणून केलेला असतो. सुगरणीचे घरटे जितके सुबक असते तितकेच हे घरटे गचाळ दिसेल असे बनवलेले असते. बाहेरील बाजूला काड्या, कागद, इतर किड्यांच्या अंड्यांची माळ वगैरे फक्त कचऱ्यात आढळणाऱ्या वस्तू विचारपुर्वक सजवलेल्या असतात. मी या वस्तू वेगवेगळ्या करुन व्यवस्थित समोर मांडल्या तेंव्हा लक्षात आले की यातली प्रत्येक वस्तू आकारमानाच्या दृष्टीने खुपच हलकी होती. म्हणजे घरटे दिसताना जरी बोजड दिसले तरी त्याचे प्रत्यक्ष वजन अतीशय हलके असते. यात वाळलेल्या व पोकळ असलेल्या असलेल्या गवताच्या काड्या, वजनाला अत्यंत हलका असलेला लाकडाचा चुरा, कोळ्यांची जाळी, हँडमेड पेपरसारखे किंवा टिश्यू पेपरसारखे पुठ्याचे हलके तुकडे, वाळलेली गवताची लांब पाने यांचा प्रामुख्याने उपयोग केलेला असतो. जरा विचार केला तर लक्षात येईल की वरील गोष्टी वजनाला हलक्या असल्या तरी मजबूत आहेत. यात रंगसंगतीचाही विचार केलेला आढळतो. साधारण सैन्याचे camouflage जसे असते तशी रंगसंगती असते. पिवळे, गडद तपकीरी, करडे या सारखे रंग सगळ्या घरट्यावर कुशलतेने पसरलेले असतात. घरट्याला ४ सेंमी आकाराचे दार असते व त्यावर बरेच पुढे आलेले छप्पर असते. आय लेव्हलला उभे राहून पाहीले तर घरट्यातील पिल्लाला भरवणाऱ्या शिंजीरची फक्त शेपटीच दिसते. म्हणजे जमीनीवर खाली बसून पाहीले तरच घरट्यातल्या पिल्लाची चोच दिसू शकेल असे हे छप्पर असते. कदाचीत या मुळे हवेत उडणाऱ्या कचऱ्याचा किंवा अवेळी आलेल्या पावसाचा आतील पिल्लाला त्रास व्हायची शक्यता अगदीच शुन्य असते. मी पाहीलेल्या घरट्याचे दार हे नैऋत्य दिशेला होते. सकाळच्या सुर्यकिरणांमध्ये मी पिल्लांना भरवणाऱ्या शिंजीरचे फोटो काढताना मला सारखे जाणवायचे की दार जर पुर्वेला असते तर मला व्यवस्थित फोटो मिळाले असते. त्यावरुनच मला अचानक जाणवले की नैऋत्येकडे असलेले दार हे योगायोगाने नसुन ते मुद्दाम तसे केले असावे. रोज किरणांचा कोण बदलत उगवणाऱ्या सुर्याच्या किरणांचा थोडाही त्रास या घरट्यातील पिल्लांना होवू नये म्हणूनच ही दिशा ठरवली असावी. मी नेटवर सर्च केले असता याला पुष्टी मिळाली.
( घरट्याची मोजमापे. उभा छेद घेताना काही आकार जरा ताणल्यामुळे मोठे वाटत आहेत. )

घरट्याची आतील बाजू अगदी गोलाकार होती. म्हणजे त्याची लांबी, रुंदी व उंची ही ६ सेंटीमिटर होती. हे घरटे बाहेरुन जेवढे ओबड-धोबड होते तेवढेच ते आतून सुबक होते. सर्व बाजूच्या भिंतींच्या विणीच्या काड्या या आतुन बाहेर विणत नेल्या होत्या. म्हणजे अगदी चुकूनही एखादी काडी किंवा तिचे टोक आतील बाजूला नव्हते. घरट्याचा सेक्शन घ्यायच्या अगोदर मी उजव्या हाताचा अंगठा आत ठेवून पाहीला. अंगठ्याला जाणवलेल्या स्पर्शावरुन सांगतो, बाजारात मिळणाऱ्या, शास्त्रीय पध्दतिने विचार करुन बनवलेल्या मॅट्रेस देखील इतक्या आरामदायक नसतील एवढी आतली गादी आरामादायक होती. घरट्याचा उभा छेद घेतल्यावर दिसले की ही गादी आपल्या मॅट्रेससारखीच थरा-थरांची बनवलेली होती.
( येथे गादीचे थर दिसताहेत. )

सगळ्यात खाली अगदी कठीन अशा पुठ्यांचे तिन पातळ थर होते. त्यावरचे चार थर हे ज्याला आपण ‘म्हाताऱ्या’ म्हणतो तशा कापसांच्या होत्या. त्यात सावर, कावळी यासारख्या बियांचा कापूस प्रामूख्याने होता. एक थर कापसाचा, त्यावर शेवग्याची शेंग वाळल्यावर तिच्या आतला भाग जसा थर्माकोलसारखा होतो तशा मटेरीअलचा थर, पुन्हा सावरीचा कापूस असे हे थर होते. मी जसजसे हे थर काढतो गेलो तसतसे मी चकीत झालो. अत्यंत क्लिष्ट पध्दतिने ते थर एकमेकांमध्ये गुंतवलेले होते. सगळ्यात वरचा थर हा अतिशय मऊ अशा पांढऱ्या धाग्यांचा होता. कदाचीत त्यात कोळ्यांच्या जाळ्याचे धागेही असावेत.
( मी हाताने जरा विलग केलेले गादीचे थर. )

( हा गादीत वापरलेला कापुस व कुठल्याशा झाडाच्या गाभ्यातला थर्माकोलसारख्या भागाचा चुरा. )

नेटवर मिळालेल्या माहीतीप्रमाणे यात नायलॉनचे धागे, प्लॅस्टीक वगैरेंचा वापर होतो असे उल्लेख होते, पण मी पाहीलेल्या घरट्यात कागद सोडले तर एकही मानवनिर्मित वस्तू नव्हती. कदाचीत आमच्या भागात नैसर्गीक साधनांची उपलब्धता हे कारण असेल. (या पध्दतिने जर गादी बनवली तर निद्रानाशाचा त्रास असलेला मानूसही पाच मिनिटात गाढ झोपेल हे नक्की. Happy ) उन, पाऊस, आरामदायकपणा या सगळ्यांचा बारकाईने विचार करन बनवलेले हे घरटे फक्त ९ ते १० इंच असते. विशेष म्हणजे पिल्ले उडून गेल्यावर नर, मादी व स्वतः पिल्लेही या सुंदर घराचा त्याग करतात. Happy हे घरटे बनवायला मादीला फक्त १५ ते २० दिवस लागतात व सोडताना क्षणभरही लागत नाही.

घरटे जमिनीपासुन ४ फुट उंचीवर बाभळीच्या झाडावर होते. तो सर्व भाग बराचसा खोलगट असुन चारीही बाजूने उंच भाग आहे. तेथे उभा असलेला मानूस दुरुन दिसणार नाही. जवळच माती काढून नेल्यामुळे झालेले मोठे तळ्यासारखे पाणी साठलेले आहे. आजूबाजूला माणसांचा वावर अजिबातच नाही. हाकेच्या अंतरावर काही फळबागा आहेत. आजुबाजूला बाभूळ, निंब यासारखी झाडे आहेत. पाण्यामुळे जमिन नेहमी थंड असते.

(या घरट्याचा क्वचितच एखाद्या शिंजीर जोडीला उपयोग झाला असता हे माहीत असुनही ते काढताना मला वाईट वाटलेच. पण हे फोटो मी बहुतेक पक्षीप्रेमींना पाठवणार आहे. त्याचा उपयोग जर त्यांना संदर्भ म्हणून झाला तर त्यांना माहीती मिळवण्यासाठी दुसरे घरटे काढावे लागणार नाही ही आशा. वेगवेगळे झालेले हे मटेरीअल मी आज सकाळीच पुन्हा त्या परिसरात नेवून टाकले आहे. कदाचीत त्याचा उपयोग कुणा शिंजीरला होईलही. माफ कर ऋतुराज, मला काही उत्सुकता शांत बसु देईना.)

घरटे झाडाच्या काडीपासून कसे सोडवले? तिथली पकड मजबूत असणारे.

घरटे पाहताना एक विचार मन विषण्ण करून गेला. शिंजिर किंवा इतर पक्षी घरटे बांधताना शाल्मली, सावर, कपोक इत्यादी कापूस देणारी झाडे कापसाने फुललेली असतात जिथून कच्चा माल मिळू शकतो. पण आता ही झाडे शहरात नष्ट होताहेत. मग या पक्ष्यांनी करायचे काय..

किती सुंदर फोटो आणि छान माहिती. एका नवीनच जगात प्रवेश केल्या सारखे वाटते.. हे पक्ष्यांचे फोटो धाग्याला ४ चांद लावत आहेत.
मी हा धागा अगदी राखून ठेवला आहे. कधीही कंटाळा / थकवा आला की कुठुनही सुरु करायचा वाचायला.. मस्त फ्रेश वाटते..
तुमच्या अनेक विक्रमी नोंदी येथे होवोत आणि आम्हाला त्याचे साक्षीदार होता यावे हीच सदिच्छा !

Srd नक्की शिंजीर व्हा. फक्त शिक्रा, घार वगैरे नसलेल्या भागात जन्म घ्या. Lol

साधनाताई घरटे काढण्यासाठीच गेलो होतो त्यामुळे secateur सोबतच घेवून गेलो होतो. ती फांदी तशी लहानच होती.
घरटे १० इंचाचे असले तरी ते फांदीवर फार मजबुतीने विणले होते. फांदीवर अगोदर (सावरीच्या) कापसाचे आवरण होते व त्याचे काही धागे खालपर्यंत आले होते व त्या धाग्यांवर गवताने घरट्याचा आधार विणला होता. जसे आपण चिखलात भाताचे तुस, कापूस, गवत वगैरे टाकतो तसा प्रकार होता. फोटो काढलेत पण त्यात ते स्पष्ट दिसत नाहीए.

धन्यवाद निलाक्षी!

चिमणी
देवराईत दिसणाऱ्या चिमण्या या भुरकट रंगाच्या व डोके, छाती व पोट साधारण एकाच रंगाच्या असलेल्या असतात. त्या क्वचित शेतातल्या ज्वारीवर दिसतात. मात्र शेतातल्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या मात्र गडद विटकरी डोके, छातीवर काळ्या खवल्यांची नक्षी व पोट पांढरे असणाऱ्या असतात. याच चिमण्या मी घराच्या आजूबाजूला पहात आलोय. चिमणी म्हणजे हीच माहीत आहे मला. कदाचीत यांच्यात काही उपजाती असण्याची शक्यता आहे.

ID - House sparrow
Scientific name: Passer domesticus
Size - 14-18 cm, Mass - 24-40 g
LOC - Devrai
DOP - 24 Jan 20 (7:15 am)

खाटीक
आज काही पक्षी पहायला फारसा मुड नसल्याने एकदोन पुस्तके घेवून सकाळीच देवराईतील शेतातल्या झाडाखाली जावून बसलो होतो. अर्थात सवयीमुळे कॅमेरा सोबत होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात मला एकाच जागेवर बसुन चक्क ७ खाटीक (Long-tailed Shrike) दिसले. एकाच जागेवरुन सातही खाटीक दिसत होते याचा अर्थ त्यांचे शिकारीचे क्षेत्र अत्यंत कमी असणार हे ओघानेच आले. तरीही ते तेथे एकाच वेळी (वेगवेगळ्या झांडावर) होते म्हणजे नक्की काही तरी कारण असणार. नाकतोड्यांची झुंड किंवा ग्रास हॉपर सारख्या किड्यांचा थवा असे काही कारण असावे. मला मात्र काही दिसले नाही.

ID - Long-tailed shrike
Scientific name: Lanius schach
Mass - 52 g
LOC - Devrai
DOP - 24 Jan 20 (7:15 am)

माळमुनिया, पांढऱ्या कंठाची मनोली, फिकी मुनिया
मी जेथे नेहमी बसतो ते लिंबाचे मोठे झाड आहे व त्याच्या बुंध्यापर्यंत पिक पेरलेले असते. सध्या येथे ज्वारी आहे. मी पुस्तक काढून वाचत असताना मागील बाजूने माझ्या दोन्ही कानांच्या अगदी जवळून उडत या मुनियांचा थवा समोरच्या ज्वारीवर उतरला. मी आजवर यांचा इतका मोठा थवा कधीच पाहीला नव्हता. किमान ५० पेक्षा जास्त मुनिया असाव्यात. (मोजता येणे शक्यच नव्हते.) मी ज्या झाडाखाली बसतो तेथे पिकाची उंची अगदी दिड दोन फुटांपासून सुरु होते व झाडाच्या बुंध्याच्या दुरवर जात ही उंची अगदी सहा फुटांपर्यंत होते. उतरलेला थवा निम्मा शेताच्या मुख्य भागात होता तर निम्मा थवा माझ्या समोरच उतरला होता. माझ्या सगळ्यात जवळ असणारी मुनिया फक्त एक फुटांवर असेल. या सर्व मुनिया अतिशय निटनेटक्या व सडपातळ होत्या. मला वाटले पिल्ले असावीत. पण पिल्ले इतक्या मोठ्या संख्येने कशाला उडतील? सर्व ऍडल्ट असाव्यात. हात लांबवला तर हाताशी येतील इतक्या जवळ असल्याने आज मला त्यांच्या चोचीची रचना, डोळ्यांवर असलेली भुवईसारखी पिसे, कणसातून दाणे काढताना होणारा चोचीच्या विशिष्ट आकाराचा उपयोग हे सर्व पहाता आले. त्यातही बऱ्याच मुनिया दाणे खाण्यापेक्षा कणसांवर आलेली फुले खाण्यात जास्त रस घेत होत्या हे विषेश. जवळ जवळ पंधरा मिनिटे हा थवा माझ्या तिनही बाजूला निर्भय होवून वावरत होता. मला या मुनियांच्या अनेक गोष्टी अगदी जवळून पहाता आल्या. मुनिया इतक्या जवळ वावरत असल्याने मी कॅमेऱ्याला हात घातला नाही. जर थवा भुर्र झाला असता तर एवढ्या देखण्या पक्षाला पहायची संधी गेली असती. तरीही जरा वेळाने थवा शेताच्या मधल्या भागात सरकल्यावर मी काही फोटो घेतले. आज अगदी १२-१५ इंचांवरुन या मुनियांना गवताच्या काड्या ओढताना, कणसावरची फुले खाताना, चोच साफ करताना, प्रिनिंग करताना पाहीले. आज खरे तर मला सुगरणीचा खोपा काढून आणायचा होता पण या मुनियांना पहायच्या आनंदात सर्वच विसरलो. खोप्यांची खुप मोठी रिकामी कॉलनी येथे आहे. उद्या एखादा खोपा घेवून येईन.

ID - Indian silverbill
Scientific name: Euodice malabarica
Size - 11 - 11.5 cm
LOC - Devrai
DOP - 24 Jan 2020 (8:30 am)
1

2

3

वेडा राघू, बहिरा पोपट, रानपोपट, पाणपोपट
या वेड्याचे व कोतवालचे फोटो काढणे आता मी बंद करणार आहे. आमच्याकडे यांची संख्या आता खुप वाढली आहे. या वेडा राघूला किडे, चतूर पकडताना पहाने मात्र भारी असते. काय चपळ हालचाली असतात याच्या. आज देवराईत गेल्या गेल्या याचेच दर्शन प्रथम झाले म्हणून फोटो काढला.

नाचरा
या वेळीही याने फोटो काढू दिले नाही.

ID - White-spotted fantail
Scientific Name - Rhipidura albogularis
Size - 17 cm
LOC - Devrai
DOP - 26 Jan 20 (7:30 am)

.

देवकी, यावेळी मुनीया अगदी फुटभर अंतरावर उतरल्या होत्या त्यामुळे जास्त फोटो नाही काढले. फोटो झुम केला किंवा मोठ्या स्क्रिनवर पाहीला तर मुनियाच्या डोक्यावरील अगदी लहान पिसे, डोळ्यांवरची पिसे, चोचीची रचना वगैरे स्पष्ट दिसतेय.

आऊटडोअर्स, आमच्या सोसायटीच्या परिसरात खुप पक्षी आहेत. बाहेर जावे वाटत नाही जास्त. पण हे कोरड्या भागात आढळणारे पक्षी आहेत. फ्लायकॅचर्ससारखे पक्षी आढळत नाही या भागात.

कुंचीवाला बुलबुल
हा बहुतेक नुकताच तरुण झालेला बुलबुल असावा. कारण तो या कणसावर बसुन खुप आक्रस्ताळेपणा करत होता. त्याच्या आजूबाजूला बसलेले बुलबुल कसलीशी चाहूल लागून झटकण उडाले पण हा मात्र तेथेच बसुन ओरडत राहीला. अनुनभवी असल्यासारखे वागणे होते त्याचे. त्याच्यामुळे मला एक नविनच गोष्ट समजी. हे बुलबुल डोक्यावरची कुंची मिटवू शकतात. अगदी त्रास वाटेल इतके बुलबुल आमच्या सोसायटी आहेत पण मी आजवर असे कधी पाहीले नाही. याने मात्र दोन तिन वेळा डोक्यावरची कुंची मिटवून पुन्हा उघडली. याचा अर्थ डोक्यावरच्या पिसांवर यांचा कंट्रोल असतो.

ID - Red-vented bulbul
Scientific name: Pycnonotus cafer
Size - 20 cm, Mass - 43 g
LOC - Devrai
DOP - 26 Jan 2020 (7:45 am)

कुंची मिटवलेला तोच बुलबुल आहे हा.

छान आहे कुंचीवाला बुलबुल.
चतुर कसा काय सहज पकडतात हे राघू. मग चेपून त्याचे डोके उडवतात. मधला छातीचा भाग खातात, शेपटी आणि पंख खाली पडतात. मधमाशीला मध्यभागी धरून फांदीवर चोच तीनदा आपटतात तेव्हा नांगी बाहेर येऊन खाली पडली की मट्ट.
प्यारडाईज फ्लाईक्याचर फार शिताफीने केमरं ( उंबराभोवती फिरतात ती चिलटं) पकडतो हवेतच.

सहज म्हणून बुलबुल गुगल केले. भारतीय उपखंडातच आढळणाऱ्या ह्या पक्ष्याला पेट म्हणून उपखंडाबाहेर नेले गेले व तिथे त्याने दाणादाण उडवून उपद्रवी जात म्हणून नाव कमावलेय... Happy Happy

गुड गोइंग!!

फॅनटेलचे फोटो काढणं कठीणच!

इथे सध्या ब्राऊन इयर्ड बुलबुल ने उच्छाद मांडलाय नुसता. प्रचंड कर्कश्य आवाजात ओरडत असतो.

परवा मजाच झाली. फोटो काढायला गेले होते एका ठिकाणी. बॅगमधून कॅमेरा काढावा म्हणून एका बेंचवर सॅक ठेवली आणि कॅमेरा काढणार तेवढ्यात बेंचच्या पाठीवर हा वर लिहीलेला बुलबुल येऊन बसला. मी हलले असते तर लगेच उडाला असता म्हणून मग तशीच निस्तब्ध त्याच्याकडे बघत उभी राहिले. काही क्षण बसला तो, ओरडून दाखवलं आणि उडून गेला. इतकं मस्त वाटलं पण.

शाली की इतर कोणी म्हटल्याप्रमाणे,हे पक्षी आजबाजूला असतात,फक्त आपले लक्ष जात नाही.
एवढे मुबलक आणि निवांत पहायला मिळत नाहीत,तरीही ते असतीलच.गेल्या महिन्यात पाणकावला पाहता होते.त्यानंतर अजून एक न पाहिलेला पक्षी पहिला ग्रे कलरचा. आठेक दिवसांपूर्वी छोटुसे पक्षी दाम्पत्य (?) पाहिले.अगदी बोटभर असतील.अगदीच फिक्या रंगाचे,पण पंखावर फिके पोपटी फराटे होते.5 मिनिटे कुंड्यांची बाहेरून पाहणी करून उडाले.
आता kabutaraansathi जाळी बसवल्यामुळे आता आम्ही पिंजऱ्यात आहोत.

सुमारे 18-१९ वर्षांपूर्वी संध्याकाळी,सोसायटीच्या बागेतल्या झाडांवर छोटे बगळे बसायचे त्यावेळी झाड पांढरे झालेले दिसायचे.त्यांचे झाडावर उतरणे,स्थिरावले बघण्यासारखे असायचे.
खंड्या बरेचदा दिसायचे.एकदा जांभळा शिंजिर स्थिरवून गेला.
भिंतीपलीकडून गलोलीने वात्रट पोरे बागळ्यांना त्रास द्यायची. हळुहळू बगळे दिसेनासे झाले.कबुतरे एवढी माजली की आज प्रत्येकाच्या घराला पिजन होल नेट किंवा बारीक जाळी आहेच.

भारद्वाज
--------------------
याला मराठीत खुप नावे आहेत. भारद्वाज, सोनकावळा, कुक्कुटकुंभा, कुंभारकावळा, सुलक्षणी, नपिता, चमारकुकडी, कुंभार्‍या वगैरे. कोकणात, विदर्भात किंवा अजुन काही भागात वेगवेगळीही नावे असतील. आजोबा सांगायचे की माझ्या वडीलांच्या लग्नाच्या वेळी पुजेसाठी याचे पिसच मिळत नव्हते. याचा अर्थ पुर्वी आमच्याकडे भारद्वाजची पुजा व्हायची. आता तसे काही होत नाही.
आज बागेत बसलो असताना हा सारखा भिंतीवर येवून बसत होता व पलीकडील बाजूला उतरत होता. त्याने चार पाच वेळा असे वर खाली केल्यावर लक्ष दिले तर तो मॉर्नींग ग्लोरीच्या सुकलेल्या वेलींच्या काड्या निवडत होता व चोचीत घेवून जात होता. बसल्या बसल्या त्याचा नेस्टींग पिरीयड सर्च केला. तो नोव्हेंबरच्या आसपास असल्याचे समजले. तरीही सिझन सोडून पक्षांना घरटी बांधताना या वर्षी पाहीलय त्यामुळे कदाचीत तो घरटे बांधत असावा. अजुन दोन तिन दिवस त्याच्यावर खास लक्ष ठेवले तर कदाचीत नक्की काय आहे ते समजेल. घरटे बांधत असेल तर मला सुरवातीपासुनच पहायला मिळेल.
--------------------
ID - Greater Coucal (Crow Pheasant)
Scientific name - Centropus sinensis
Size - 48 cm
LOC - Devrai
DOP - 28 Jan 20 (5:45 pm)
1

2

3

सामो, ही नेटवर उपलब्ध असलेली नावे आहेत. पण स्थानिक भाषेतील अजुन अनेक नावे असणार आहेत याला. आम्ही याला कुकूडकुंभा म्हणायचो. भारद्वाज हे फार नंतर कळले. कुकूडकुंभा म्हणायच्या अगोदर मी याला दहावीपर्यंत कोकीळ समजत होतो. Lol

अरे वा! देवकी तुम्हालाही पक्षी दिसायला लागले आता. वर्णनावरुन नावे शोधली तर सापडतील. किंवा एखादा फोटो मिळाला असेल तर गुगल लेन्स चटकन नाव सांगते. डॉ. कसंबे यांनी पक्षांच्या मराठी नावांच्या PDF ची लिंक दिली आहे. त्यात मराठी नावे सहज मिळतील.

Pages