दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)

Submitted by .......... on 1 January, 2020 - 09:40

दिगंतराचे प्रवासी... (२०१९)

‘दिगंतराचे प्रवासी’ ही माझी ऑनलाईन असलेली डायरी आहे. रोजनिशी आहे. येथे मी वेळोवेळी पाहीलेल्या पक्ष्यांची, त्यांच्या सवयींची, काही खास प्रसंगांची किंवा मला महत्वाच्या वाटलेल्या घटनांची नोंद करत आहे. वर्षा अखेरीस मला या रोजनिशीमुळे एखाद्या पक्षाचा व्यवस्थित मागोवा घेता येईल. पुढच्या वर्षीच्या पक्षीनिरीक्षणासाठी काही महत्वाचे मागोवे मिळतील. पक्ष्यांच्या नोंदवलेल्या अधिवासामुळे, त्यांच्या विणीच्या हंगामामुळे, विणीच्या हंगामात त्यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे, स्थलांतराच्या नोंदीमुळे मला खुप मार्गदर्शन मिळेल असे वाटते आहे. या वर्षी केलेल्या नोंदींमध्ये आणि पुढच्या वर्षीच्या नोंदींमध्ये असलेल्या फरकामुळे काही गोष्टी नव्याने समजण्याचीही शक्यता आहे. एकूण या नोंदींमुळे माझ्या माहितीत नक्कीच मोलाची भर पडेल.

लॅपटॉपवर अनेक डायरी ऍप आहेत पण मी मायबोलीवर सहज सुरु केलेला २०१९ चा ‘दिगंतराचे प्रवासी’ हा धागा पुर्ण व सलग वाचला तेंव्हा जाणवले की ऍपपेक्षा या धाग्याच्या प्रतिसादस्वरुपात असलेल्या नोंदी जास्त स्पष्टपणे डोळ्यासमोर चित्र उभे करत आहेत. त्यामुळे २०२० या वर्षीचा ‘दिगंतराचे प्रवासी’ या नावानेच पुन्हा दुसरा धागा म्हणजेच माझी ‘रोजनिशी’ सुरु करत आहे. येथे त्या त्या तारखेला पाहीलेल्या पक्ष्यांचे फोटो व इतर माहिती यांची नोंद मी करणार आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार नोंदीची तारीख एक दोन दिवस मागे पुढेही होऊ शकते.

— हरिहर (शाली)

चित्रबलाक
ID: Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 93cm
Loc: Bhigwan (8 Jan 20)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती बारीक निरीक्षण व भारी वर्णन......वाचून थक्क झालो
फक्त ते घरटं आणू नका कदाचित दुसरा शिंजीर वापरेल ते

वाॅव शालीदा. आजची दैनंदिनी वाचताना अॅनिमल प्लॅनेट पाहिल्याचा फील आला. शिक्राचे आगमन झाल्यापासून पुढचं सगळं वाचताना मी श्वास रोखून धरला होता हे मला नंतर कळलं. पिलं सुखरूप आहेत हे कळल्यावर जीव भांड्यात पडला!
मीपण आज एक नवीनच पक्षी पाहिला ( म्हणजे बाबांनी दाखवला तेव्हा मला दिसला.) हिरव्या रंगाचा चिमणी एवढा पक्षी होता त्याच्या चोचीच्या वरच्या बाजूला लाल रंग होता आणि गळ्यावर पण रंग होते. निटसा दिसण्याआधीच उडून गेला.

ऋतुराज,
मीही तोच विचार केला होता पण असे वाटते की घरट्याच्या आतली रचना कशी कळणार मला? एखादे घरटे नसले तर शिंजिर पुन्हा विणतील. पण हरकत नाही. राहूदे तसेच. ती जागा अगदी आदर्श आहे. पाणी, फळबाग, माणसांचा शुन्य वावर, उन सावलीच्या वेळा वगैरे बाबतीत.

वा
काय छान रनिंग कॉमेंट्री सारखे वाटते.

थॅन्क्यू सुबोध खरे!

धन्यवाद किट्टू!
त्याच्या चोचीच्या वरच्या बाजूला लाल रंग होता आणि गळ्यावर पण रंग होते. ...... तुम्ही जे वर्णन केलय त्यावरुन तो नक्कीच तांबट पक्षी असणार. Coppersmith barbet.

खूप मस्त उपक्रम आहे हा. फोटो बघायला आणि माहिती वाचायला मजा येतेय.

माझ्या लेकीनं शाळेतल्या तिच्या आर्टप्रोजेक्ट करता काही पक्ष्यांची चित्रं काढली होती. त्यात चित्रबलाक, स्टॉर्क आणि बगळे होते. याकरता आम्ही राणीच्या बागेत जाऊन या पक्ष्यांचे फोटो काढले होते आणि त्यावरून तिनं चित्रं रंगवली होती. वरचा चित्रबलाक बघून त्याची आठवण झाली. या धाग्यातले एकसे एक सुंदर फोटो दाखवून तिला अजून चित्रं काढायला प्रोत्साहन द्यायला हवं.

भरतपूरचे अभयारण्यदेखिल पक्षीप्रेमींसाठी एक उत्तम जागा आहे.

थँक्यू मामी!
या फोटोंचा उपयोग चित्रे काढण्यासाठी झाला तर छानच आहे अगदी. Happy

शिंजिर कथा आवडली .. Happy
हे फोटो बघूनच कळा ल की आमच्या खिडकीत पण हे शिंजिर मादी येते .. एक शो झाड आहे ज्याला वर्षात एकदा लाल पानं येतात.. लांबून फुला सारखी दिसतायत
तर आज मादी तिथे अगदी जवळ आली, चोच पुढे केल्यावर तिला कळल की हे फुल नाही, मध नसावा.. मग भुर्र उडली.. तिथे तांदूळ पाणी अस्त पण तिथे ही कधी जात नाही

आई ग!!! किती ओघवतं वर्णन. किती सुरेख फोटो. वा!!!
________
पिल्लं पंख साफ करतात खरी उडण्याच्या अगोदर. व व्यायामही चालू असतो. कबूतरांचा पाहीला आहे. आमच्या बाल्कनीमध्ये कबूतरांनी एकंदर २ वळा अंडी उबवली व पिल्लांना मोठे केले. नंतर तीसर्‍या वेळी अंडी abandone केली. आता तर मादी नाहीशी झाली आहे. नर एकटा व व्यथित दिसतो. सैरभैर दिसतो. आता टाकलेले खाण्दे खील पहातही नाहीये. दुसरी मादी त्याच्याशी प्रणयाराधना करण्याचा प्रयत्न करते पण ... हा विशेष प्रतिसाद देत नाही.
कूठे गेली आमची सुबक ठेंगणी कोणास ठाउक. होय हेच नाव ठेवलं होतं आम्ही तिचं. Sad

काय मस्त चित्रकथा, अगदी उत्कंठेने शेवटपर्यंत वाचले.
म्हणजे या पिल्लांचा अ‍ॅडल्टहूडकडे जायचा प्रवास किती वेगवान असतो नाही!
@चनस, मध असणारी फुलझाडे लावा उदा. जमैकन स्पाईक
फुलं आल्यावर सनबर्डना सुगावा लागतोच. फुलपाखरं पण येतील.

राखी तित्तीर, चितूर, तित्तूर, चित्तर
गेले दोन महिने अगदी गजर लावावा इतक्या वेळेवर हा फ्रँकोलीन मला उठवतो. अगदी तार स्वरात ते आरोळी मारतात. आज ७:३० वाजता याचा पुन्हा जोरात आवाज ऐकायला आला म्हणून खिडकीतून पाहीले तर दोघेही देवराईच्या भिंतीवर उन्हात उभे होते. मी कॅमेरा काढेपर्यंत एक उडाला. रोज यांचा फक्त आवाज येतो पण दिसत नाहीत स्पष्ट. आज दिसले म्हणून मी खाली उतरलो व देवराईची भिंत उडी मारुन ओलांडली. आता त्यांचा आवाज दुसऱ्या बाजूने यायला लागला. तिकडे पाहीले तर दोघे गवतात घुसत होते. मी दिशा बदलून तिकडे निघालो तर बायकोचा फोन आला की "फ्रँकी इकडे आहेत, तू तिकडे का निघाला आहेस?" ती अजुनही खिडकीतून पहात होती. मी हातवारे करुन सांगीतले की ते दोघे इकडे आहेत. बायको फोनवर सांगत होती की "नाही, ते तुझ्या बरोबर मागे आहेत" एवढ्यात मागूनही आवाज आला. तेंव्हा मला समजले की या फ्रँकोलीनच्या जोड्यांनी माझा कात्रजचा घाट केला होता. मी समजत होतो की देवराईत एक जोडी आहे पण आता समजले की प्रत्यक्षात दोन जोड्या म्हणजे चार फ्रँकोलीन आहेत येथे. अर्थात आज मला दोन्हीपैकी एकही जोडी दिसली नाही. सगळे पक्षी इतके सहकार्य करत असताना माझ्या खिडकीतून दिसणारे हे फ्रँकी मात्र मला अजुन स्पष्ट दिसले नाहीत. कॉलेजला असताना खुप चित्तूर शिकार करुन खाल्लेत मी, त्याचाच राग असावा त्यांना. Lol
हे देवराईच्या अतिशय अडचणीच्या भागात, आमच्या भाषेत 'गचपानात' रहात असल्याने मागोवा घेता येत नाही. आता त्यांच्या मनात असेल तेंव्हा दर्शन देतील स्पष्ट. तोवर वाट पहायची माझी तयारी आहे. (हे फोटो घरातून काढलेले असल्याने क्लिअर नाहीत.)

ID - Grey francolin (Francolinus pondicerianus)
Size - 33 cm, Mass - 330 g
LOC - Devrai
DOP - 18 Jan 2020 (7:15 am)

.

मराठा सुतार, पगडीवाला सुतार
पक्षी पहायला सुरवात केल्यापासुन मी देवराईतील एकून एक पक्षी शोधला आहे. कोण, कुठे, कधी दिसेल हे मला अगदी इत्यंभुत माहीत आहे. (म्हणजे माझा तसा समज आहे.) आज मात्र प्रथमच मराठा सुतार दिसला. जमीनीवर भांगपाड्यांचा मोठा थवा उतरला होता. त्यांच्यावर काळा गोविंद लक्ष ठेवून होता. मी त्यांच्यात गुंतलो होतो. तेथेच असलेले फायकस सारखे दिसणारे आठ दहा फुटी झाड आहे. त्याच्या लहान खोडाआडून मला लाल ठिपका चमकल्यासारखा वाटला. म्हणून पाहीले तर मराठा सुतार होता. तो त्या लहान खोडावर स्प्रिंगच्या आकारात फिरत वर वर चढत होता. दिसणाऱ्या लहान मोठ्या छिद्रात चोच घालून अंदाज घेत होता. खोडावर जमीनीपासुन स्पायरल फिरत तो वर पर्यंत गेला. सगळे खोड तपासल्यावर त्याला त्याच्या मनासारखे छिद्र मिळाले नसावे. वेळ न घालवता तो घाईत असल्यासारखा उडाला. त्याला देवराईत पाहून फार छान वाटले. तो नक्की घरटे करायला झाड शोधत होता. जर त्याला आजूबाजूलाच मनासारखे झाड मिळाले तर मला त्याचे नियमित दर्शन व्हायची शक्यता आहे. देव करो त्याला देवराईतच मनासारखे झाड मिळो व ते झाड मलाही वेळेत सापडो. Happy

ID - Yellow-fronted Pied Woodpecker, Mahratta Woodpecker
Scientific Name - Leiopicus mahrattensis
Size - 18 cm
LOC - Devrai
DOP - 18 Jan 2020 (7:30 am)

झाडातील होल्स तपासताना मराठा.

काळा गोविंद, कोतवाल
याच्याविषयी काय लिहायचे. रोज दिसणाऱ्या पक्षांमध्ये हा सर्वात वर आहे. भांगपाडी मैनांचा थवा आज जमिनीवर उतरुन चरत होता. हा गोविंद त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता. कदाचीत त्या मैनांमुळे याला एखादी शिकार मिळायची शक्यता असावी. मैनांचा थवा जसा फिरत होता तसा हा झुडूप बदलून बसत होता. नंतर तो फिरत फिरत मी बसलो होतो त्या ठिकानी तारेवर येऊन बसला. सहज वावर असेल तर पक्षी आपला स्विकार करतात हे लक्षात आल्याने माझ्या हालचाली हळू हळू तशाच व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे या गोविंदाला माझी फारशी भिती वाटली नाही. अगदी तिन फुटांवर हा बसला होता. नंतर मैना उडाल्यावर हाही त्यांच्या मागे निघून गेला.

ID - Black drongo
Scientific name - Dicrurus macrocercus
Size - 30 cm
LOC - Devrai
DOP - 18 Jan 2020 (7:30 am)

ब्राह्मणी मैना, भांगपाडी
या मैनांचा मोठा थवा आज जमिनीवर अन्न शोधत फिरत होता. काही जोड्यांचे अधून मधून प्रणयाराधन सुरु असावे किंवा समुहाचे संबंध सुधारण्यासाठीही त्या एकमेकांशी काही कुजबूजत असाव्या. थव्यात किंवा कळपात राहणाऱ्यांमध्ये हा प्रकार दिसतो.

ID - Brahminy starling
Scientific name: Sturnia pagodarum
Size - 22 cm
LOC - Devrai
DOP - 18 Jan 2020 (7:30 am)

सातभाई, बैरागी, गोसावी, कोयाळी (जुन्नर भाग), बामनीन (पुरंदर भाग)
या गोसाव्यांचा मला फार वैताग येतो. कधी दुपारी जरा पुस्तक वाचत बसावे म्हटले व त्याचवेळी जर यांचा थवा खाली पार्कींगला आला तर असा काही कर्कश्श गोंधळ घालतात की विचारु नका. आज मात्र या गोसाव्यांनी एका वारुळावर हल्ला केला. मला फोटो काढायचे सुचले नाही प्रथम. बराच वेळ मनसोक्त गोंधळ घातल्यावर ते बाजूच्या झाडावर बसले. दोन गोसावी अजुनही वारुळावरच बसले होते. दोघेच असल्याने ते काय करत आहेत ते मला स्पष्ट पहायला मिळाले. दोघेही वारुळाच्या भोकांमध्ये जवळ जवळ अर्धे शरीर आत घालून काहीतरी शोधत होते. वाळवी असणार. हे लिहिताना आता मला सुचले की ते गेल्यानंतर वारुळात नक्की कोणती वाळवी होती ते पहायला हवे होते. ते दोघे गोसावी अगदी क्रमा क्रमाणे खालपासुन वरच्या दिशेने प्रत्येक भोकात घुसून पहात होते. त्यांचा चेहराच चिडखोर दिसत असल्याने व आवाज भांडल्यासारखा असल्याने मला उगाच त्यांनी वारुळावर हल्ला केल्यासारखे वाटले. मी या अगोदर त्यांना वारुळावर एकत्र गोळा झालेले पाहीले नव्हते. वारुळात वाळवी असते याचे त्यांना चांगलेच ज्ञान असावे असेच ते वावरत होते.

ID - Large Grey Babbler
Scientific name: Turdoides malcolmi
Size - 28 cm
LOC - Devrai
DOP - 18 Jan 20 (7:45 am)

.

.

सुगरण
यांचा थवा सारखाच देवराईवर वावरत असतो. यांची काही खास माहीती मिळाल्याशिवाय यांची येथे नोंद करण्यात काही अर्थ नाही. एक मात्र आहे. विणीचा हंगाम संपल्यानंतर मला आजवर पिवळे नर दिसले नाहीत. नर व मादी सारखेच दिसतात व नर मात्र विणीच्या हंगामात पिवळा होतो असे काही आहे का ते शोधले पाहीजे. नेटवरतर तसे काही उल्लेख मिळाले नाहीत. पण इतके दिवस नर न दिसणे हेही शक्य वाटत नाही. सुरवातीला मला वाटायचे की पर्पल सनबर्ड जांभळाच दिसतो पण फार उशीरा कळाले की नॉन ब्रिडींग मेल व फिमेल सनबर्ड सारखेच दिसतात. तसेच यांचे काही असावे असे वाटते. यांचा मोठा थवा शेतावरुन गेलेल्या तारेवर बसलेला असतो. सकाळी ८:३० नंतर मात्र या सुगरणी सहसा दिसत नाहीत. संध्याकाळी ४:३० नंतर यांची पुन्हा वर्दळ सुरु होते.

ID - Baya weaver
Scientific name: Ploceus philippinus
Size - 15 cm, Mass - 28 g
LOC - Devrai
DOP - 18 Jan 2020 (7:45 am)

.

खंड्या
हा आज देवराईतच दिसलेला पण नेहमीचा नसलेला खंड्या आहे. मी आलो तेंव्हा नेहमीचा खंड्या विहिरीच्या काठावर बसला होता. हा देवराईच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या शेताच्या कुंपणाच्या खांबावर बसला होता. येथे आजुबाजूला कुठेही पाणी नाहीए. पण कुंपणाच्या शेजारीच दहा फुटांचा एक उघडा असलेला पाण्याचा हौद आहे. त्या हौदात याला काय शिकार मिळणार आहे माहीत नाही पण हा आशेने खांबावर बसलेला दिसला. गम्मत म्हणजे हौदाच्या काठावर एक ढोकरीही बसली होती. याचा अर्थ हौदात नक्की काहीतरी असणार. पहायची हिम्मत नाही झाली कारण कुंपणाच्या पलीकडे हौदाशेजारी एक मोठ्ठा जर्मन शेफर्ड बांधलेला असतो. नेहमी जावून ओळख झाली आहे म्हणून आता भुंकत नाही तो. (तिन गुड्डेचे पुडे किंमत मोजलीय मी. Lol ) पण आमच्यात कुंपण असलेलेच बरे. Lol

Yess शालीदा! Coppersmith barbet होता तो. आता गुगलून बघितला. हो आणि काल दोन कोतवाल पण दिसले.
डोंबिवलीत कबुतर आणि कावळे सोडून ईतर पक्षी पण आहेत हे बघून 'आनंदी आनंद गडे' असं वाटतंय मला.

किट्टू डोंबिवलीच्या आसपास बरेच पक्षी आहेत. बर्ड स्पॉट गुगल केले तर बरेच बर्डींग स्पॉट मिळतील.

होय Srd, आमच्या सोसायटीच्या दोन बाजूला विस्तिर्ण शेते आहेत व एका बाजूला देवराई आहे.

थॅंक्यू सुबोध खरे.

अप्पा, मस्त लिहिले तुम्ही. मला तर भीतीच वाटली, आता गेले पिल्लू.... पण नशीब बलवत्तर...

दुसरे पिल्लू तुम्ही जायच्या आधीच खाली उतरले असणार....

शिंजिरच्या घरट्यासारखेच एक घरटे माझ्या टेकडीवर विलायती चिंचेच्या झाडावर कित्येकदा पाहिले आहे. मला तो कायम चिंध्याचा बोळा वाटलाय.. आता नीट निरीक्षण करेन.

साधनाताई नशिब बलवत्तर म्हणून पिल्लू वाचले नाही तर बोटभर आकाराच्या नर शिंजिरने शिक्राला चांगलाच विरोध केला. शिक्राने चार ते पाच झाडे बदलली पण शिंजिरने त्याचा पाठलाग सोडला नाही. त्याला चक्क तेथून हाकलून लावले. माझ्यासाठी ही फार नवलाची गोष्ट आहे.
दोन्ही पिल्ले मी आल्यावरच उतरली असणार. कारण एक पिल्लू बाहेर आले तेंव्हा मादी त्याला भरवत होती व नर घरट्यात भरवत होता. मी दुर असल्याने कॅमेऱ्यातून पहात होतो. त्यामुळे फ्रेममध्ये जे आहे तेवढेच दिसते. दुसरे पिल्लू उतरलेले म्हणूनच मला पहायला मिळाले नाही. व मला वाटले होते की एकच पिल्लू राहीले आहे म्हणून मी दुसऱ्याकडे लक्षच दिले नव्हते.

मामी, सामो खुप धन्यवाद! Happy

Pages