दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)

Submitted by .......... on 1 January, 2020 - 09:40

दिगंतराचे प्रवासी... (२०१९)

‘दिगंतराचे प्रवासी’ ही माझी ऑनलाईन असलेली डायरी आहे. रोजनिशी आहे. येथे मी वेळोवेळी पाहीलेल्या पक्ष्यांची, त्यांच्या सवयींची, काही खास प्रसंगांची किंवा मला महत्वाच्या वाटलेल्या घटनांची नोंद करत आहे. वर्षा अखेरीस मला या रोजनिशीमुळे एखाद्या पक्षाचा व्यवस्थित मागोवा घेता येईल. पुढच्या वर्षीच्या पक्षीनिरीक्षणासाठी काही महत्वाचे मागोवे मिळतील. पक्ष्यांच्या नोंदवलेल्या अधिवासामुळे, त्यांच्या विणीच्या हंगामामुळे, विणीच्या हंगामात त्यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे, स्थलांतराच्या नोंदीमुळे मला खुप मार्गदर्शन मिळेल असे वाटते आहे. या वर्षी केलेल्या नोंदींमध्ये आणि पुढच्या वर्षीच्या नोंदींमध्ये असलेल्या फरकामुळे काही गोष्टी नव्याने समजण्याचीही शक्यता आहे. एकूण या नोंदींमुळे माझ्या माहितीत नक्कीच मोलाची भर पडेल.

लॅपटॉपवर अनेक डायरी ऍप आहेत पण मी मायबोलीवर सहज सुरु केलेला २०१९ चा ‘दिगंतराचे प्रवासी’ हा धागा पुर्ण व सलग वाचला तेंव्हा जाणवले की ऍपपेक्षा या धाग्याच्या प्रतिसादस्वरुपात असलेल्या नोंदी जास्त स्पष्टपणे डोळ्यासमोर चित्र उभे करत आहेत. त्यामुळे २०२० या वर्षीचा ‘दिगंतराचे प्रवासी’ या नावानेच पुन्हा दुसरा धागा म्हणजेच माझी ‘रोजनिशी’ सुरु करत आहे. येथे त्या त्या तारखेला पाहीलेल्या पक्ष्यांचे फोटो व इतर माहिती यांची नोंद मी करणार आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार नोंदीची तारीख एक दोन दिवस मागे पुढेही होऊ शकते.

— हरिहर (शाली)

चित्रबलाक
ID: Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 93cm
Loc: Bhigwan (8 Jan 20)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! किती गोड आहेत फोटो.
_____________
वेलकम बॅक हरीहर!!! कोणत्याही आलतू-फालतू आय डींच्या त्रासाने, माबो सोडू नये ही विनंती.

कोणत्याही आलतू-फालतू आय डींच्या त्रासाने, माबो सोडू नये ही विनंती.
Submitted by सामो on 13 January, 2020 - 09:46
>>> सही कहा. स्वानंदा साठी लिहिलं पाहिजे की.

कापशी घार

ID - Black-winged kite (Elanus caeruleus)
Size - 33 cm, Mass - 260 g
Loc - Bhigwan
DOP - 8 Jan 2020

चांदवा, वारकरी
भिगवणच्या बॅकवॉटरमध्ये असंख्य चांदवे पहायला मिळाले. या अगोदर खुपदा या चांदव्याला पाहीले असल्याने मी याकडे खास लक्ष दिले नाही. याची पिल्ले कशी दिसतात हे अजुन पहाण्यात नाहीत. बॅकवॉटरच्या कडेने जी शेते आहेत तेथेही खुप चांदवे एक पाय वर करुन विश्रांती घेताना दिसले. या पक्ष्याविषयी मला अजुन फारसे माहीत नाही.

ID - Eurasian coot (Fulica atra)
Size - 42 cm, Mass - 720 g
Loc - Bhigwan
DOP - 8 Jan 2020

जांभळा शिंजिर आणि त्याचे घरटे

ID - Purple Sunbird (Cinnyris asiaticus)
Size - 10 cm
LOC - Near Devrai
DOP - 10 Jan 2020
फायनली आज शिंजिरचे घरटे सापडले. खुप दिवस शोधत होतो. पण गेले दोन दिवस मागावरच राहीलो त्याच्या. एका ठिकाणी बसुन त्याला पंधरा विसवेळा उडताना पाहीले. मग त्यावरुन एक दिशा ठरवली. मग नेटवर त्याचे घरटे कसे असते व साधारण कुठे असते त्याचे फोटो पाहीले. त्या अंदाजाने गेलो. तेथे दोन तास बसलो. मग साधारण झाड शोधले. त्यासाठीही तो तिन झाडे बदलत होता. प्रथम अन्न घेवून आला की एका झाडावर, मग दुसऱ्या झाडावर मग तिसऱ्या झाडावर जायचा. क्रम तोच होता साधारण. मग शेवटच्या झाडावर लक्ष ठेवले. लहान बाभूळ आहे सहा फुटांची. तेथ तो प्रथम एका फांदीवर क्षणभर बसायचा व मग दुसऱ्या बाजूला जायचा. मादी दोन झाडे बदलत यायची व तीही क्षणभर एका फांदीवर बसून मग दुसऱ्या बाजूला जायची. दोघांची बसायची फांदी ठरलेली होती पण वेगवेगळी. मग मी शेवटी झाडाजवळ गेलो. खाली भली थोरली सापाची कात पाहून बिचकलो. पण मग शेवटी त्यांचे घरटे दिसले. तिन फुट उंचावर होते फक्त. पण जागा खुप अडचणीची. घरटे वितभर पण नसेल. आत पिल्ले असणार पण अगदी जवळ जावून पाहीली तरी दिसली नाही. जरा मागे सरकून विचार करत होतो तोच मादी आली व पिल्लांना भरवून गेली. मी तिन फुटांवर असेल. ती मला घाबरली नाही म्हणून मग तेथेच पहात थांबलो. इतक्या जवळून पाहूनही पिल्ले काही दिसली नाहीत. ती भरवताना दिसत होती. पिल्लाची फक्त चोच दिसल्यासारखी वाटली. मी तेथून हलत नाही म्हणून सावधगीरी, की तीला विश्रांती हवी होती म्हणून ते माहीत नाही पण मग ती घरट्यात बसून माझ्याकडे पहात बसली. त्यांना उगाच त्रास नको म्हणून मी मनाविरुद्ध तेथून आलो. पण त्यांचे पिल्ले असलेले घरटे सापडले याचा काय आनंद झालाय म्हणून सांगू? बरं शिंजीरचा आकार फार तर 9-10 cm असेल. त्यात त्याचे घरटे केवढेसे. जास्त जवळ जाता येत असुनही जाण्यात अर्थ नाही त्यामुळे पिल्ले दिसली नाही. एक मात्र पाहीले की त्याने जेवढ्या वेळा खाद्य आणले तेंव्हा प्रत्येक वेळी एकाच जातीचा किडा आणला. म्हणजे त्या किड्यांची वस्ती त्याने शोधली असणार. मागेही एकदा मी वटवट्याला दहा ते पंधरावेळा अन्न आणताना पाहीले होते तेंव्हा त्याच्या चोचीतही प्रत्येक वेळी वाळवी होती. म्हणजे हे छोटे पक्षी आपले अन्न शोधण्यात फार कष्ट घेत नाहीत. एखादी किड्यांची वसाहत शोधायची आणि तेथून कोठारातून आणावे तसे ताजे अन्न उचलून आणायचे असा प्रकार दिसला.

हे आहे शिंजिरचे घरटे.

अन्न (किडा) घेवून आलेला नर. ही फांदी त्याचा पहिला मुक्काम आहे. मग दुसऱ्या फांदीवर व नंतर घरट्याकडे जातो तो.

पिल्लांना भरवनारा नर शिंजिर

पिल्लांना भरवणारी मादी.

तासभर पिल्लांना भरवल्यावर नर कुठे दिसेनासा झाला व मादी घरट्यात बसली.

मी नराला फक्त पिल्लांना भरवतानाच पाहीले पण मादी मात्र पिल्लांसाठी किडा आणत होती व भरवून झाल्यावर जाताना ती घरट्यातील पिल्लांची शी-शू घेवून जात होती. याचा अर्थ ती घरटे स्वच्छ ठेवायचे कामही वेळच्या वेळी करत होती. घरट्यात दोन पिल्ले आहेत.

ही तेथे असलेली सापाची कात. काल मी तेथे एकून पाच पाण्यातले बिनविषारी साप पाहीले. माझ्या उभे राहण्याच्या जागेपासुन ते फक्त २-३ फुटांवरुन वावरतात त्यामुळे शिंजिरकडे जास्त लक्ष देता येत नाही. बिनविषारी असले तरी चावले तर इन्फेक्शन व्हायची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात ते काही करणार नाहीत.

ठिपकेवाली मनोली
ही मनोली शिंजिरचे घरटे ज्या झाडावर आहे त्याच्या शेजारी खुप वेळ बसली होती. आजुबाजूला दुसरी मनोली दिसली नाही.

ID - Scaly-breasted Muniya (Lonchura punctulata)
Size - 10 cm, Mass - 14 g
LOC - Near Devrai
DOP - 10 Jan 2020

माळमुनिया, पांढऱ्या कंठाची मनोली
या चार ते पाच मुनिया शिंजिरचे घरटे असलेल्या फांदीवर खुप गोंधळ करत होत्या. मी नुकतेच यांना सुगरणींचे रिकामे झालेले घरटे ताब्यात घेताना व ते दुरुस्त करुन वापरताना पाहीले होते. त्यामुळे मला भिती वाटली की या मुनिया आता शिंजिरच्या घरट्याच्या काड्या ओढून काढतात की काय. पण ते फक्त तेथे एकमेकांचा पाठलाग करत खेळत राहीले. यावेळी शिंजिर मादी घरट्यात बसुन विश्रांती घेत होती व नर बराच वेळ कुठे दिसला नव्हता. दहा मिनिटे खेळून झाल्याव सर्व मुनिया घरट्याला धक्का न लावता बाजूच्या झाडावर पिसे साफ करत बसल्या. बाजूलाच ठिपकेवाली मुनियाही बसलेली होती. ही त्यातलीच एक माळमुनीया.

ID - Indian Silverbill (Euodice malabarica)
Size - 12 cm
LOC - Near Devrai
DOP - 10 Jan 2020

शिक्रा
हा शिक्रा आमच्या सोसायटीत येणारा नव्हे. तो पुर्वेकडून कुठून तरी येतो आणि पुन्हा पुर्वेकडेच जाताना दिसतो. देवराई हा त्याचा शेवटचा मुक्काम असावा. हा शिक्रा वेगळा आहे व मला गेले तिन दिसवस त्याच झाडावर दिसतो. दिसला नाही तरी त्याचे ओरडणे स्पष्ट कानावर येते. मी सोसायटीत जो शिक्रा पहातो तो कधीही ओरडत नाही. हा मात्र दर दहा मिनिटाने १५ सेकंद ओरडतो. तो ज्या झाडावर बसतो तेथे खाली लहानसे तळे आहे व त्याच्या अलिकडे शिंजिरचे घरटे असलेली बाभूळ आहे. त्या बाभळीवर सगळेच लहान पक्षी असतात. त्यामुळेच शिक्रा तेथे बसलेला असतो. बाजूलाच एक मोकळे असलेले पण भले थोरले घरटे आहे. ते कोणत्या पक्ष्याचे आहे ते माहीत नाही.

ID - Shikra (Accipiter badius)
Size - 31 cm, Mass - 130 g
LOC - Near Devrai
DOP - 11 Jan 2020

पांढरा धोबी
शिंजिरचे निरीक्षण करत असताना हा सतत माझ्या आजुबाजूला किडे शोधत, शेपटी उडवत फिरत असतो. कधी कधी जोडीही असते. तेथे गेल्यावर प्रथम हा धोबी दिसतो. आज मात्र मी त्याला जमिनीवर सारखे मुरुन बसताना पाहीले. कोंबडी जशी अंड्यावर बसते तसे शरीर अगदी चपटे करुन तो जमिनीत मुरायचा. काही सेकंद झाले की ती जागा सोडून दुसरी जागेवर तसेच दबा धरुन बसल्यासारखा बसायचा. आज बऱ्यापैकी थंडी होती. मी बुट काढून पाय जमिनीवर टेकवला तर माती चांगलीच थंड होती. मग तो थंड मातीत कशासाठी अंग मुरवून बसत असावा? हा प्रकार जवळ जवळ पंधरा मिनिटे सुरु होता. त्याचे घरटे असावे का तेथे? त्याचा नेस्टींग पिरियड शोधून मग पहायला हवे. अर्थात घरटे असले तरी एका वेळी शिंजिरचे व त्याचे घरटे नजरेखाली ठेवणे शक्य होणार नाही. आज त्याच्या विचित्र वागण्यामुळे माझे शिंजिरकडेमात्र दुर्लक्ष झाले. अर्थात त्याने काही फरक पडत नाही.

ID - White wagtail (Motacilla alba)
Size - 18 cm, Mass - 24 g
LOC - Near Devrai
DOP - 14 Jan 2020
जमिनीत मुरलेला पांढरा धोबी.

१४ जाने
आज शिंजिरच्या घरट्याजवळ गेल्यावर प्रथम पांढऱ्या धोब्याने (White Wagtail) लक्ष वेधून घेतले. नेहमी तुरुतुरु चालणारा, घाईत असलेला धोबी आज जरा विचित्रपणा करत वावरत होता. त्यामुळे शिंजिरकडे दुर्लक्ष झाले. या पंधरा मिनिटात मला फक्त नर शिंजिर ये-जा करताना दिसला. शेजारील पाण्यात आज फक्त एकच साप पाण्याबाहेर किंचित डोके काढून उभा होता. वेडे राघूंची नेहमीची धावपळ, नेहमिच्या फांदीवर सुरु होती. शिक्राला शोधले पण तो दिसला नाही. पण दिड तासात त्याचे पाच वेळा ओरडणे ऐकू आले. त्या पाण्याभोवती आज ८ जंगली मैना दिसल्या. गेल्या पाच दिवसात येथे पाणी असुनही एकही बगळा मात्र दिसला नाही.
शिंजिरच्या घरट्याच्या तोंडाची दिशा किंचित बदलली होती. वाऱ्यामुळे होणे शक्य नाही कारण ती फांदी अतिशय लहान आहे. कशामुळे घरटे हालले ते माहित नाही. आत पिल्ले होती पण आत्ता हे लिहिताना चटकन लक्षात आले की मी आज एकच पिल्लू पाहीले. रोज तर दोन दिसत होती. घरटे हलण्यामागे व पिल्लू नसण्यामागे काही संबंध असेल का? मला एकच पिल्लू दिसले पण दुसरे कदाचीत आतच असेल असं काही असेल का? जर आत असेल तर मग नर किडे भरवत होता तेंव्हा मला एकच का दिसले? अर्र. उद्या गेल्यावर जरा व्यवस्थित पहायला हवे. असो.
आज नर व मादी दोघेही ये जा करत होते पण किडे मात्र फक्त नरच भरवत होता. मादी घरट्यातील पिल्लांची शी-शू बाहेर नेवून टाकत होती. महत्वाचे म्हणजे ती घरट्यातील कचरा चोचीत घेवून उडाल्यानंतर आजूबाजूला झाडावर बसून तो कचरा टाकायला हवा तिने, पण चोचीतला कचरा घेवून ती पलिकडच्या झाडीमागे उडून जात होती. कचरा घरट्यापासुन जास्तीत जास्त दुर टाकायचा प्रयत्न असेल का तो? ती बाजूच्या फांदीवर बसुन पिसे साफ करते. तेथे बसून ती कचरा टाकू शकते. आता तज्ञ मित्राची मदत घ्यायला हवी. मादी कचरा दुर नेवून टाकत होती व एकटा नर किडे आणून पिल्लाला भरवत होता. आज मला तरी एकच दिसले. नराने किडा भरवला व तो उडाला की पिल्लू खुप जोरजोरात मान हालवत होते. मला एकदम वडीलांच्या मागे लागणारे लहान मुल आठवले. खालच्या फोटोतही एकच पिल्लू दिसते आहे. Sad

नराची अन्न आणायची वारंवारीता आज जास्त वाटली मला. येथेही खालच्या फोटोत एकच पिल्लू दिसते आहे. Sad

नराने बऱ्याच चकरा मारल्यावर तो थकलेला बाबा जसा घराच्या अंगणात बसतो तसा घरट्यासमोरच्या फांदीवर निवांत बसला. इतका शांत बसलेला शिंजिर मी प्रथमच पाहीला.
आराम करणारा शिंजिर आणि मागे त्याचे घरटे. Happy

मादीचे मात्र आज घरटे साफ करायचे काम सुरु होते. मला आज जास्त वेळ मिळाला नाही तेथे बसायला. उद्या जर वेळ मिळाला तर जास्त निरीक्षण करता येईल. नर व मादी पिल्लांना भरवत असल्याचा व्हिडिओही छान मिळाला आहे. त्याची लिंक येथे देईनच.

हरिहर, एक सांगावसं वाटतंय. बर्डिंग कम्युनिटीमध्ये शक्यतोवर पक्षांच्या घरट्यांचे फोटो टाकू नयेत असं ऐकलं आहे. ह्यात लोकेशन कळलं तर लोकं तिथे जाऊन डिस्टर्ब करू नयेत हा उद्देश असावा.

मस्त सुरुय!! भिगवणला जाऊन आलात वाटत! फ्लेमिंगो आलेत का? पाणी भरपूर असल्याने यंदा कमी आहेत ऐकलं?

बर्डिंग कम्युनिटीमध्ये शक्यतोवर पक्षांच्या घरट्यांचे फोटो टाकू नयेत असं ऐकलं आहे.
>> +१. नीट फोटोच्या नादात पब्लिक फीडिंग डिस्टर्ब करत बऱ्याचदा.

शिंजिर विडिओ आवडला.
हे सनबर्ड जमिनीपासून दोन फुटांवरही घरटे करतात. कोकण रेल्वेला क्रॉसिंग सिग्नल लागला की लगेच प्रवासी पाय मोकळे करायला उतरतात. तसे एकदा उतरलो. एक सनबर्ड बाजूलाच घोटाळत होता. जरा दूर उभे राहिलो तर दोन फुटी बोरीच्या झुडपाच्या टोकाला असेच घरटे होते. त्यात तो शिरला. पिलांना पंधरा मिनिटे ममममला उशीर कसा चालेल?

बर्डिंग कम्युनिटीमध्ये शक्यतोवर पक्षांच्या घरट्यांचे फोटो टाकू नयेत असं ऐकलं आहे>>>

मलाही घरट्याबद्दल वाचत असताना आधी हेच डोक्यात आहे. पण हे घरटे नेहमीच्या बर्डिंगच्या जागीचे नसून खासगी मालकीच्या जागेत आहे जिथे सगळ्यांना प्रवेश मिळेल असे नाही. त्यामुळे चालून जाईलसे..

एक सांगावसं वाटतंय. बर्डिंग कम्युनिटीमध्ये शक्यतोवर पक्षांच्या घरट्यांचे फोटो टाकू नयेत असं ऐकलं आहे. ह्यात लोकेशन कळलं तर लोकं तिथे जाऊन डिस्टर्ब करू नयेत हा उद्देश असावा.>>>>>>> हे मी प्रथमच ऐकले. पण हे योग्य वाटते आहे. पण मी शक्यतो एकटाच पक्षी निरिक्षणसाठी जात असल्याने व लोकेशनचा उल्लेख नसल्याने तसा काही त्रास व्हायची शक्यता नाही. मला फोटो काढण्यापेक्षा पक्षी समजुन घेण्यात जास्त रस असल्याने निदान माझ्याकडून तरी पक्षी डिस्टर्ब होणार नाही याची मी पुरेपुर काळजी घेतो. फोटो हे संदर्भासाठी काढतो, फोटोग्राफीची हौस म्हणून नाही त्यामुळे मला कोणताही अँगल वगैरे चालतो. अनेकदा तर असे होते की पक्षी पहाण्याच्या नादात मी फोटो काढायलाही विसरतो.
चांगले फोटो मिळावेत म्हणून फोटोग्राफर नको त्या गोष्टी करतात हे मी ऐकून आहे. मला त्या प्रकारांची चिड आहे.

रॉनी भिगवनला जाऊन आलो. गल्स, डक या सारखे पक्षी दरवर्षीपेक्षा जास्त संखेने आले आहेत. फ्लेमिंगो मात्र आजवर सहा सातच दिसल्याची नोंद आहे. मला एकही दिसला नाही. बाकीचे पक्षी इतक्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचे फारसे वाईटही वाटले नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मी पुन्हा एकदा भिगवणला जाऊन येणार आहे.

आरुणी
हा नेहमी एकटाच दिसतो. हा वारंवार दिसत नसला तरी अगदी नियमीत म्हणावे असा दिसतो. आज पाहीलेला आरुणी तरुण असावा. कारण नेहमी जे पुर्ण वाढलेले आरुणी दिसतात ते इतके स्वच्छ व सतेज नसतात. हा देवराईमधील कंपाऊंडच्या खांबावर बराच वेळ शांत बसला होता. मी गेलो तरी तो तेथेच बसलेला होता.

ID - Indian Bush Lark (Mirafra erythroptera)
Size - 14 cm
LOC - Devrai
DOP - 15 Jane 2020 (8:30 am)

अप्पा बर्डिंग ग्रुपवर हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. अडमीन सदस्याला समज देऊन फोटो डिलीट करतात. पक्ष्यांना विणीच्या हंगामात (तरी) त्रास होऊ नये हा उद्देश असतो.

निळा कस्तुर (मादी)
या निळ्या कस्तुरविषयी इतकेदिवस होऊनही मला काहीच माहीत होऊ शकले नाही. ही माझ्या बाल्कनीच्या भिंतीवर येऊन बसते बराच वेळ व निघून जाते. ती कुठे जाते, काय खाते, इतर सवयी काय आहेत हे काहीच समजायला मार्ग नाही. साधारण एक दिड महिन्यापुर्वी मी या कस्तुर मादीला व नराला पाहीले होते. त्यानंतर नर पुन्हा कधीच दिसला नाही. महत्वाचे म्हणजे एखादा पक्षी दिड महिन्यापेक्षा जास्त एकाच ठिकाणी वावरतो का हे मला माहीत नाही. ही कस्तुर मादी नियमीतपणे माझ्या बाल्कनीत येते. प्रचंड भित्री व सावध आहे. आज ती पार्कींगच्या भिंतीवर बसलेली असताना मी मोबाईलवर युट्युबमध्ये ब्लू थ्रश कॉल लावला. तो आवाज ऐकून ती प्रचंड गोंधळली. ३६० अंशात फिरत तिने सर्व परिसर बारकाईने न्याहाळला. मलाच तीची फसवनूक बरी न वाटल्याने मी ट्रॅक बंद केला. मग मात्र ती उडून गेली.

ID - Blue Rock Thrush (Monticola solitarius)
Size - 23 cm, Mass - 54 g
LOC - Devrai
15 Jan 20 (8:00 am)

.

अप्पा बर्डिंग ग्रुपवर हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. अडमीन सदस्याला समज देऊन फोटो डिलीट करतात. पक्ष्यांना विणीच्या हंगामात (तरी) त्रास होऊ नये हा उद्देश असतो.>>>>>>>साधनाताई उद्देश लक्षात आला. पण मी येथे दिलेल्या फोटोमुळे तसाही कुणाला लोकेशन समजनार नाही व ती जागा खाजगी असल्याने बाहेरील कुणाला येता येत नाही. माझे शिंजिरच्या घरट्याचे फोटो पाहीले तर तुझ्या एक लक्षात येईल की तिन चार दिवसात काढलेल्या सर्व फोटोंचा ऍन्गल एकच आहे. कारण मी एका विशिष्ट जागी बसुन पहात असतो. चांगल्या फोटोसाठी जवळ जा, जागा बदल, सतत हालचाल कर हे प्रकार मी करत नाही. जसे येतील तसे फोटो संदर्भासाठी काढत असतो.
मला वाटते बर्ड वॉचरला फोटोंची काळजी नसते व बर्ड फोटोग्राफरला पक्षांची चिंता नसते. मी बर्ड वॉचर या प्रकारात मोडतो. Happy

फोटोचा exit data off करण्याचा पर्याय कुठेतरी असतो क्यामेरा app settings मध्ये. प्रत्येक फोटोत तो जातो. जिपीएस बंद आहे हे पाहावे लागते. ते पण दिसते.

खंड्या
दोन दिवस शिंजिरच्या घरट्याकडे जाणे झाले नाही. आजही कुठे जायला जमले नाही. सकाळी चालताना नेहमीचा खंड्या दिसला. हा आजकाल देवराईत असलेल्या विहिरीत बसतो. विहिरीचे पाणी खाली गेले आहे व काठापासुन पाच सहा फुटांवर मोटारची एक वायर आडवी गेली आहे. त्यावर हा आजकाल बसलेला असतो. वरुन पाहीले तर याची फक्त पाठ दिसते. आजूबाजूचे काहीही दिसत नसलेल्या ठिकाणी तो कसाकाय बसतो माहीत नाही. बहुतेक तिकडे फारशी वर्दळ नाही म्हणून बसत असावा. शक्यतो पक्षी असं धाडस करत नाहीत.

ID - White-throated Kingfisher (Halcyon smyrnensis)
Size - 28 cm, Mass - 66-81 gm
LOC - Devrai
DOP - 16 jan 20 (7:30 am)

गप्पीदास (मादी)
आज दुपारी घरी येताना देवराईमध्ये ही गप्पीदासची मादी किडे पकडताना दिसली. ही शक्यतो एखाद्या वाळलेल्या काडीच्या टोकावरच बसने पसंद करते. क्वचित झाडाच्या फांदीवर बसते. आजकाल गप्पीदास दिसने कमी झाले आहे.

ID - Siberian stonechat (Saxicola maurus)
Size - 13 cm
LOC - Devrai
DOP - 16 Jan 20 (4:30 pm)

फोटोचा exit data नाही exif data. Auto correct झाले होते.
गप्पीदास मादी चिमणीच वाटते. चिमणीच्या शेपटीचे टोक दुभंगलेले असते - दोन वेगळी पिसे. आणि ती अशी फांदीच्या टोकाशी क्वचितच बसते.

तिन दिवस शिंजिरच्या घरट्याकडे फिरकलो नव्हतो. रात्री जरा जास्तच थंडी पडल्याने जरा काळजी वाटली त्यामुळे सकाळी ७:३० वाजताच घरट्याजवळ पोहचलो. (मी जेथे बसतो तेथून शिंजिरला मी दिसत नसावा) काही वेळाने नर व मादी दोघेही अन्न घेवून आले. नराने अळई व मादीने कोळी आणला होता. दोघांनीही घरट्यातील पिल्लांना भरवले व उडाले.

.

मी कॅमेऱ्याचा वापर दुर्बिनीसारखा करतो. माझे लक्ष घरट्याच्या दारावरच होते. इतक्यात मादीने घरट्यातुन तोंड बाहेर काढले. मादी तर आताच उडाली होती मग पुन्हा कधी आली ते मला समजेना. इतक्यात मादीने सुळकन बाहेर उडी मारली व समोरच्याच फांदीवर बसली. मी व्यवस्थित पाहीले तेंव्हा लक्षात आले की ते तर पिल्लू होते. हायला, म्हणजे आज पिल्लाने प्रथमच घरट्याबाहेर पाय टाकला होता. मी त्याच्यावरच लक्ष केंद्रीत केले. ते फांदीवर बसण्यासाठी धडपडत होते. जरा वेळाने ते स्थिर झाले. मग त्याने मान वर करुन छातीवरील पिसांमधे चोच खुपसायचा प्रयत्न केला. पण ते त्याला जमले नाही व ते तोल जावून धडपडले व खालील फांदीवर गेले. पायांची पकड मजबूत केल्यावर पुन्हा त्याने छातीत चोच खुपसायचा प्रयत्न केला. पाच वेळा प्रयत्न केल्यावर ते त्याला जमले. तोल जातच होता.

मग त्याने डाव्या पंखात चोच घातली. हे मात्र त्याला चटकन जमले. एकून ते पंख व पिसे साफ करण्याचा प्रयत्न करत होते. पंधरा मिनिटात ते त्याला बऱ्यापैकी जमले. इतक्या वेळात नर किंवा मादी दोघेही आले नव्हते. पंख साफ झाल्यावर त्याने आळीपाळीने डावा व मग उजवा पंख ताणून पुन्हा व्यवस्थित केला.

.

मग ते खाली पायांवर उंच उभे राहीले व एकदम खाली बसले. पक्षी उडण्याअगोदर जी पोझ घेतो ती त्याने घेतली. पण उडाले नाही. पुन्हा पायांवर उभे राहीले. पुन्हा तिच पोझ घेतली व पुन्हा उभे राहीले. माझीच उत्सुकता प्रचंड वाढली होती. पण पिल्लू कोणताही धोका घ्यायला तयार नसावे. मी मोजले. त्याने ७ वेळा उडण्याची पोझ घेतली पण उडाले नाही. नंतर ते मान वर करुन च्विईवऽ च्विईवऽ असा आवाज काढत बराच वेळ बसले. अजुनही नर व मादी आले नव्हते.

.

मग पुन्हा त्याने ८ व्यांदा तिच पोझ घेतली. त्याच्या ऐवजी मिच श्वास रोखला होता. यावेळी मात्र ते उडाले व दिड फुट अंतरावर असलेल्या फांदीवर धडपडत जाऊन बसले. त्याचा पार्श्वभाग सोडला तर सर्व शरीरावर पिवळट पांढरी पिसे होती. चोच बरीच आखूड होती. तेथे पाच मिनिट बसल्यावर त्याने पुन्हा लहान भरारी मारली व झाडाची सगळ्यात बाहेर आलेल्या फांदीच्या टोकावर येवून बसले. या वेळी उडण्यात खुपच सफाई होती. त्याने घरट्यातून बाहेर पाय टाकून फक्त अर्धाच तास झाला होता हे विशेष. मग मात्र ते एका जागेवर बसले व जोरजोरात ओरडायला सुरवात केली.

इतक्यात नर व मादी दोघेही परत आले. मादी झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर बसली तर नर शेजारच्या गवतात उंच काडीवर बसला.

दुसरे पिल्लू मला अजुन दिसले नव्हते. मी मादी व पिल्लू यांच्याकडे पहात असताना कुठून तरी शिक्राने अतीशय वेगात नराच्या दिशेने सुर मारलेला मी पाहीले. आजुबाजूचे वेड राघू एकदम हवेत उधळले. मादी उडून जायच्या ऐवजी झाडाच्या टोकावरुन आतल्या फांदीवर पिल्लाजवळ उतरली. शिक्राने सुर मारला तेंव्हा मी एक निळी रेषा चमकलेली पाहीली. म्हणजे नर वाचला होता व उडाला होता. मला एकदम पिल्लाची काळजी वाटली. शिक्रा मोकळ्या चोचीने पुन्हा हवेत काटकोनात वर उसळताना दिसला. बाजूला असलेल्या वेड्या राघूंच्या लिंबाच्या फांदीवर जावून बसला.

.

मी सुटकेचा सुस्कारा टाकला व कॅमेरा शिक्राकडे वळवला. पिल्लू कुठे जाणार नव्हते. शिक्रावर लक्ष ठेवायला हवे होते. खरे तर घरटे दिसले त्याच दिवशी मी ठरवले होते की तटस्थपणे निरीक्षण करीन. पिल्लांमध्ये गुंतणार नाही. पण आता ते शक्य वाटेना. मी शिक्रावर लक्ष ठेवत होतो इतक्यात मी विचित्र प्रकार पाहिला. मी घरी आल्यावर नेटवरही सर्च केले पण कुठेही असा उल्लेख दिसला नाही. त्या शिकारी शिक्राच्या मागे नर शिंजिरसुध्दा उडाला होता व त्याच फांदीवर जावून बसला होता. हे आश्चर्य होते. शिंजिर केवढा, शिक्रा केवढा. जरा वेळाने शिंजिरने फांदी बदलली. शिक्रा अस्वस्थ वाटला. त्यानेही बसण्याची दिशा बदलली. दोन मिनिट शिंजिर त्याच्या भोवती उडत होता व आजुबाजूला बसत होता. शेवटी शिक्रा अस्वस्थ होऊन उडाला.

.

शिक्रा तळ्याजवळच्या लिंबावर बसला. शिंजिर त्याच्याच मागे होता. जरा वेळाने शिक्रा तेथूनही उडाला व मी बसलो होतो त्या झाडावर येवून बसला. शिंजिर अजुनही त्याच्या मागेच होता. आता मात्र वैतागलेला शिक्रा उडाला व अगदी दुर असण्याऱ्या सोसायटीच्या दिशेने नाहीसा झाला. तो ज्या दुरवर उडाला होता त्यावरुन तो निदान आजतरी पुन्हा शिंजिरच्या घरट्याजवळ येणार नव्हता हे नक्की.

नर शिक्राच्या मागावर होता तोवर मादीने पिल्लाला दोन वेळा घरट्याच्या बाहेरच भरवले होते. मला दोन्हीकडेही लक्ष ठेवावे लागत होते. पिल्लू मात्र सारखे फांदी बदलत होते व मादी त्याच्या मागे मागे फिरत होती.

मादी उडाली व पिल्लू बसले होते त्याच फांदीवर नर येऊन बसला. पण त्याने अन्न आणले नव्हते. पिल्लू खुप ओरडत असतानाही नराने त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

जरा वेळ तेथे बसल्यावर पिल्लू ज्या फांदीवर बसले होते त्या फांदीला नर उलटा लटकला व त्याने पिल्लाच्या पिसे नसलेल्या मांसल पार्श्वभागावर खुप जोरात तिन चार वेळा चोच मारली. पिल्लू अक्षरशः किंचाळले व धडपडले. मला याचे कारण काही कळले नाही.

नर उडाला दुर गवतात उतरला. मी तिकडे पाहीले तर तेथे दुसरे पिल्लू गवताच्या काडीवर बसले होते व मादी त्याला भरवत होती. ही सगळी गडबड पहाताना मला अनेक प्रसंग क्लिक करायचे भान राहीले नाही त्यामुळे नोंदीसाठीही फोटो मिळाले नाही. जरा वेळाने ते गवतातले पिल्लू उडाले व बाजूच्या झाडावर जावून बसले. आता ते मला स्पष्ट दिसत होते. त्याने पंख अगोदरच साफ केले असावे. ते आता बरेचसे मोठे दिसायला लागले होते.

हे पिल्लू तासाभरापुर्वीच घरट्यातुन प्रथमच बाहेर पडले होते यावर माझा विश्वासच बसेना.

.

जरा वेळाने हे पिल्लू उडाले व अजिबात न गोंधळता मस्त भरारी मारत माझ्या नजरेच्या टप्याच्या अगदी दुर उडून गेले. Sad
मी पहिल्या पिल्लाकडे पाहीले. ते अजुनही घरटे असलेल्या झाडावरच बसले होते.

जरा वेळाने तेही तेथून उडाले व बाजूला असलेल्या पुर्ण सुकलेल्या प्रचंड बाभळीवर जावून बसले. याच बाभळीवर माळमुनीया, ठिपकेवाली मुनिया, धोबी, सातभाई बसतात. हे पिल्लू त्या बाभळीवर बसले व त्याने अगदी मनासारखी पिसे साफ केली.

पिसे साफ झाल्यावर त्याने जरा अंदाज घेतला. उडण्याची पोझ घेतली व क्षणात त्याने आकाशात भरारी घेतली.

त्याने एक चक्कर त्या बाभळीवर मारली, दुसरी चक्कर घरटे असलेल्या झाडावर मारली व आता झाडावर उतरते की काय असे वाटत असताना हेही पिल्लू क्षणात माझ्या नजरेआड होईल इतके दुर उडाले व नाहीसे झाले. काही वेळ नर व मादी तेथेच फिरताना दिसले मग तेही नाहीसे झाले. गेले आठ दिवस या कुटूंबाशी असलेला माझा ऋणानूबंध संपला. कितीही तटस्थ रहायचे ठरवूनही मला हुरहूर लागलीच. शेवटी घरी आलो. उद्या व परवा मी तेथे जावून त्यांची वाट पाहीन. नाहीच आले ते तर आठ दिवस थांबून मी ते घरटे घेवून येईन. मला त्याचा व्हर्टीकल सेक्शन घेवून आतली रचना पहायची आहे. त्यावेळी येथे फोटो देईनच. १० जानेवारी ते १७ जानेवारी या काळात हे चौघेही माझ्या संपर्कात होते. Happy Sad

Pages