दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)

Submitted by .......... on 1 January, 2020 - 09:40

दिगंतराचे प्रवासी... (२०१९)

‘दिगंतराचे प्रवासी’ ही माझी ऑनलाईन असलेली डायरी आहे. रोजनिशी आहे. येथे मी वेळोवेळी पाहीलेल्या पक्ष्यांची, त्यांच्या सवयींची, काही खास प्रसंगांची किंवा मला महत्वाच्या वाटलेल्या घटनांची नोंद करत आहे. वर्षा अखेरीस मला या रोजनिशीमुळे एखाद्या पक्षाचा व्यवस्थित मागोवा घेता येईल. पुढच्या वर्षीच्या पक्षीनिरीक्षणासाठी काही महत्वाचे मागोवे मिळतील. पक्ष्यांच्या नोंदवलेल्या अधिवासामुळे, त्यांच्या विणीच्या हंगामामुळे, विणीच्या हंगामात त्यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे, स्थलांतराच्या नोंदीमुळे मला खुप मार्गदर्शन मिळेल असे वाटते आहे. या वर्षी केलेल्या नोंदींमध्ये आणि पुढच्या वर्षीच्या नोंदींमध्ये असलेल्या फरकामुळे काही गोष्टी नव्याने समजण्याचीही शक्यता आहे. एकूण या नोंदींमुळे माझ्या माहितीत नक्कीच मोलाची भर पडेल.

लॅपटॉपवर अनेक डायरी ऍप आहेत पण मी मायबोलीवर सहज सुरु केलेला २०१९ चा ‘दिगंतराचे प्रवासी’ हा धागा पुर्ण व सलग वाचला तेंव्हा जाणवले की ऍपपेक्षा या धाग्याच्या प्रतिसादस्वरुपात असलेल्या नोंदी जास्त स्पष्टपणे डोळ्यासमोर चित्र उभे करत आहेत. त्यामुळे २०२० या वर्षीचा ‘दिगंतराचे प्रवासी’ या नावानेच पुन्हा दुसरा धागा म्हणजेच माझी ‘रोजनिशी’ सुरु करत आहे. येथे त्या त्या तारखेला पाहीलेल्या पक्ष्यांचे फोटो व इतर माहिती यांची नोंद मी करणार आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार नोंदीची तारीख एक दोन दिवस मागे पुढेही होऊ शकते.

— हरिहर (शाली)

चित्रबलाक
ID: Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 93cm
Loc: Bhigwan (8 Jan 20)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गप्पीदास (नर)
----------
आज कुठे गेलो नाही. देवराईत नेहमीचे बुशचाट, बी इटर, बॅबलर, स्पॅरोज, पॅराकीट, ड्रोंगो, श्राईक, रॉबीन, रोझी, किंगफिशर वगैरे दिसले. वेड्या राघूचे व गप्पीदासचे फोटो मी काढतोच. कारण या दोन पक्षांचे मला रोज नविन काही तरी कळत असतेच. सुरवातीला वाटले होते की एका पक्षाचे दहा पेक्षा जास्त फोटो नको काढायला पण नंतर लक्षात आले की जितके जास्त फोटो काढू तितके जास्त व्यवस्थित निरिक्षण करता येतेय. कारण वेगवेगळ्या पोझमधे पक्षांच्या अनेक लकबी समजतात. फोटोत जास्त बारकाईने निरिक्षण करता येते.
----------
ID - Pied Bush chat (Male)
Scientific name: Saxicola caprata
Size - 13 cm, 15 g
LOC - Devrai
DOP - 29 Jan 20 (7:45 am)

खंड्या, धिवर
----------
याचे संस्कृत नावही खुप सुरेख आहे. चंद्रकांत मीनरंक
हा देवराईत दिसणारा नेहमीचा मीनरंक आहे. याला मी देवराईच्या बाहेर दिसला तरी ओळखू शकतो. माझा समज चुकीचा नसेल तर कदाचीत तोही आता मला ओळखायला लागला असावा. पुर्वी मी जराही जवळ गेलो तर तो उडून भिंतीच्या पलीकडे निघून जायचा. काही दिवसांनी मला पाहून तो फक्त बसायची जागा बदलायचा. गेले काही दिवस मात्र तो माझी चाहूल लागली तर उडून जात नाही. फक्त माझ्याकडे पाठ करुन बसतो. आज मी त्याच्या जवळून तिन साडेतिन फुटांवरुन गेलो पण त्याने लक्ष दिले नाही. मीही कॅमेरा उचलला नाही.
----------
ID - White-throated kingfisher
Scientific name: Halcyon smyrnensis
Size -19 - 28 cm, Mass - 66 - 81 g
LOC - Devrai
DOP - 29 Jan 20 (7:30 am)

वेडा राघू, बहिरा पोपट, रानपोपट, पाणपोपट
----------
थंडी वाढल्यापासुन हे सकाळी उन्हात बसतात तारेवर. संध्याकाळीही ते अगदी खेटून बसतात एकदम. दुरुन पाहीले तर हिरव्या लोकरीचा गुंडा असल्यासारखे वाटतात व त्यांच्या चोची त्या गुंड्यामधे खोचलेल्या सुयांसारख्या दिसतात. चतुर पकडताना क्रुर वाटणारा हा राघू असा खेटून बसला की फार गोड दिसतो.
----------
ID - Green bee-eater
Scientific name: Merops orientalis
Size - 21 cm, Mass - 15 g
LOC - Devrai
DOP - 29 Jan 20 (7:45 am)

सामो ती कथा मी वाचलेली आहे पुर्वी. छान आहे. ते नपिता नाव वावेंनी देखील सांगितले होते.
थँक्यू ऋतुराज.

कुकुडकुंभा नेहमी हुप हुप हुप ओरडतो वरच्या फांदीवरून तेव्हा डोके खाली करतो. पण एकदा खर्रर्रर्र असा मोठा आवाज काढताना पाहिलं तेव्हा तो खालच्या फांदीवर होता आणि पंख थोडे पसरवून हलवून खाली पाहात होता. (चौल)

काही मुले (दापोलीपासून तीन किमी) बेचक्या घेऊन फिरत होती. "काय मारता रे?"
"कुकुडकुंभा."
"?"
"हो, छान लागतो कोंबड्यासारखा."

कवडा गप्पीदास (संस्कृत: कृष्णपीत स्थूलचंचू)
------------
आज (२९ जाने) एका मित्राने माझ्याकडे बुशचाटचे फोटो मागीतले. मी त्याला काही पाठवले पण त्याला ते आवडले नाहीत. त्याला आजच हवे होते. बाहेर सुर्यास्त व्हायला आला होता. अशा वेळी मी देवराईत जाणे टाळतो. मग सोसायटीच्या बागेत गेलो व बाकड्यावर मस्त बसुन राहीलो. आता मित्राच्या नशिबात असेल तर गप्पीदास दिसणार होते. ही गार्डन व देवराई यात एक सहा फुटी भिंत आहे. देवराईतील बाभळी खुप फोपावल्यामुळे त्यांच्या फांद्या भिंतीवरुन अलिकडे आल्या होत्या. दोन दिवस त्या तोडायचे काम सुरु होते. त्या मनगटाएवढ्या जाड फांद्या तेथेच खाली पडल्या होत्या. त्यावर गप्पीदास यायची शक्यता होती. कारण त्यांना कुठल्याही काडीच्या, फांदीच्या टोकावर बसायला आवडते. जरा वेळ वाट पाहील्यावर एक गप्पीदासची जोडी अगदी मजेत खेळत तेथे आली. मला एक अपेक्षीत होता, येथे जोडी आली होती. मी आजवर या गप्पीदासांच्या जोडीला कधीच जवळ जवळ पाहीलेले नाही. म्हणजे एकत्र फिरत असतात पण मादी मात्र एखाद्या लाजाळू नववधूसारखी नरापासून एक फुटापेक्षा जास्त अंतर राखून असते. एक फुटापर्यंत देखील ते नाईलाजाने येतात. म्हणजे बसण्याची जागा जर कमी असेल तरच. आजही हे असेच अंतर ठेवून बसले. पाच मिनिटात दोघांनीही किमान आठ-नऊ वेळा जागा बदलल्या. नंतर नराने एक छान बाहेरच्या बाजूला आलेली तोडलेली फांदी शोधली व त्यावर जाऊन बसला. नंतर त्या दोघांचाही खेळ सुरु झाला. मग माझ्या लक्षात आले की ते सारखी जागा बदलत होते कारण ते त्यांना आवडेल अशी जागा बसायला शोधत होते. या दोघांचा खेळ म्हणजे अगदी लहान मुले खेळतात तसे होता. म्हणजे लहान मुले जशी आळीपाळीने व त्यांच्या भाषेत करार करुन घेवून मग एखाद्या खेळण्यावर बसतात तसे नर अगोदर त्या फांदीच्या टोकावर बसला. काही सेकंदाने तो खाली उतरुन एका गवतावर बसला व मग मादी तेथे बसली. जरा वेळाने नराने तिला उठवले व तो तेथे बसला. मग नंतर त्यानेच काही वेळाने जागा सोडली व मादी तेथे बसली. त्यांचा हा खेळ सुर्यास्त होईपर्यंत चालला होता. मी त्या दोघांना त्या जागेवर १४ वेळा बसताना पाहीले. गम्मत म्हणजे नराची पाळी झाली की तो स्वतःहून खाली उतरत होता पण मादी मात्र उठवल्याशिवाय खाली उतरत नव्हती. हा खेळ ते का खेळत होते समजले नाही. अजुन किती वेळ खेळले असते ते माहीत नाही कारण एका कोतवालाने नराला डिवचले व त्याच्या मागे लागला. मादी एका झुडपात शिरली व नर दुरच्या खुरट्या झुडपावर बसला. कोतवालही त्याच झुडपावर बसला पण नर उडाला नाही व कोतवालानेही बसल्यावर त्रास दिला नाही. पण नर पुन्हा उडाला तेंव्हा कोतवाल परत त्याच्या मागे लागला. नर भिंतीच्या पलीकडे देवराईत नाहीसा झाला व कोतवालही त्याच्या मागे गेला. दोघेही गेल्यावर मादी पुन्हा मघाच्या फांदीवर येवून बसली. आता तिला उठवायला नर तेथे नव्हता. अंधार पडायला लागल्याने मी घरी परतलो.
------------
ID : Pied Bush chat
Scientific name: Saxicola caprata
Size : 13 cm, Mass : 15 G
LOC : Devrai
DOP : 29 Jan 20 (6:00 pm)
------------
नर गप्पीदास. हा प्रथम त्या फांदीवर बसला.

मग मादी गप्पीदास त्या फांदीवर बसली. ते साधारन एक मिनिट बसत असावेत. गम्मत म्हणजे कित्येकदा ते अगदी सेम पद्धतिने बसत. मी सारखे दिसणारे फोटो निवडले आहेत. अगदी फोटोशॉप केल्यासारखे वाटताहेत दोघे. Wink

नराने उठवल्यानंतर बाजूच्या काडीवर बसलेली मादी. खाली उतरल्यावर देखील ती फक्त तिन ठिकानांवरच आळीपाळीने बसत होती.

पण एकदा खर्रर्रर्र असा मोठा आवाज काढताना पाहिलं>>>>>>>>> मी देखील त्याला वेगवेगळ्या आवाजात ओरडताना पाहीले आहे. हा सकाळी सकाळी अगदी पोटातुन काढल्यासारखा घुमावदार आवाज काढतो. दुपारी त्याचा आवाज अगदी वेगळा असतो. सुरवातीला मला ते दोन वेगवेगळ्या पक्षाचे आवाज वाटले होते. पण नंतर त्याला दोन्ही आवाजात ओरडताना प्रत्यक्ष पाहीले तेंव्हा समजले. कधी कधी तो भांडल्यासारखेपण आवाज काढतो.

"हो, छान लागतो कोंबड्यासारखा.">>>>>>>>>>> बापरे! हे नव्हते माहीत मला. याला देखील खातात म्हणजे कमाल आहे. आमच्या भागात (जुन्नर) तर याची पुजा करतात वर्षातून ठरावीक दिवशी. गेल्या वर्षी मी कोकणात जाताना ताम्हीणीच्या आसपास तिन भारद्वाज वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर मरुन पडलेले पाहीले. आणि चौथा भारद्वाज माझ्या समोरच एका दुचाकीला धडकून खाली पडला. तो रस्त्यावरुन फक्त दिड दोन फुट उंचीवरुन उडत रस्ता ओलांडत होता. मी त्याला पाणी पाजले. जरा वेळाने तो चालत बाजूच्या झाडीत निघून गेला. बाकीचे तिनही तसेच मेले असणार.

गप्पीदासाचे वर्णन / निरीक्षण मस्तच
त्याचे कृष्णपीत स्थूलचंचू हे नाव माहीतच नव्हते
भारद्वाज हे गोत्र आहे, देवक पण आहे का ?
विषयांतराबद्दल क्षमस्व

हे गोत्र देवक वगैरे काय असते माहीत नाही.
भारद्वाज पक्ष्याची पुजा नाही करत खरे तर. त्याच्या पिसाची पुजा करतात आमच्याकडे. खास करुन घरातल्या मोठ्या मुलाच्या लग्नात.

गप्पीदास
------------------------
कालचा प्रसंग पाहून आज बरोबर त्याच वेळी गार्डनमध्ये गेलो होतो. पुन्हा तसेच काही पहायला मिळेल असं वाटले नव्हते पण आशा होती. काल ते सहज वागणे होते गप्पीदासांचे की हा त्यांचा नेहमीचा खेळ आहे हे पहायचे होते. काल जेथे ती जोडी तेथेच आजही होती. मी गेल्यावर मात्र नर उडून देवराईत गेला. मागोमाग मादीही गेली. पर्यायाने मीही गेलो. Wink तेथील शेतात नुकतेच नांगरुन ठेवले आहे. तेथे दोघेही अंतर ठेवून बसले. मला उत्सुकता होती. काही मिनिटे गेल्यावर नराने एक उंच गवताची वाळलेली काडी पाहीली व बसला. जरा वेळाने तो उडाला व तेथे मादी बसली. कालचाच खेळ त्यांनी आजही सुरु केला. नर तेथून उडाला की डाव्या बाजूच्या एका काडीवर बसत होता. कधी कधी रुईच्या फांदीवर बसत होता. मादी उडाली की उजव्या बाजूला असलेल्या काडीवर बसत होती. आता हा प्रकार अजुन काही दिवस पुन्हा दिसला तर कदाचीत त्यामागचे कारणही कळेल. आज काहीही समजले नाही. (दोन दिवस गप्पीदासच्याच मागे आहे. Happy )
------------------------
ID : Pied Bush chat
Scientific name: Saxicola caprata
Size : 13 cm, Mass : 15 G
LOC : Devrai
DOP : 30 Jan 20 (5:45 pm)

त्याच काडीवर बसलेली मादी.

तेथून बाजूला बसला की नर दुसऱ्या काडीवर किंवा तारेवर बसत होता.

विजेच्या तारेवर बसलेला नर मावळत्या किरणांमधे चमकत होता. ती चमक कॅमेऱ्यात पकडता आली नाही.

मादीही दुसऱ्या बाजूला असलेल्या काडीवर अगदी टोकाला बसत होती.

वाह!!! मस्तच फोटोज.
>>>>>>>देवराईमधील सुर्यास्ताचा फोटो द्यायचा मोह आवरत नाही.>>>>>> बरय आवरत नाही तेच Happy

या गप्पिदासच्या शेवटच्या फोटोवरून सुचलं। - तुमच्याकडे बरेच फोटो आहेत त्यातून प्रत्येक पक्ष्याचे वेगळ्या कोनातले एकत्र केलेत तर फार उपयोगी पुस्तक बनेल.
बाजूने., पुढून, मागून, उडताना, नर आणि मादी.
पाडिएफ केली तर उत्तम.
( इतर छापील पुस्तकांत इतके फोटो देणे परवडत नाही ते दोनच बाजूचे देतात नरमादीचे.)

@Srd माझ्याकडील डायरी ऍपमधे आठ पक्ष्यांची वेगवेगळी डायरी आहे. त्यात प्रत्येकाचे खुप फोटो आहेत. ते फोटो एकत्र पाहीले की त्या पक्ष्याच्या लकबींचा बराच अंदाज येतो.

सोसायटीजवळ रामगंगारा (cinereous tit) दहा बारा वेळा दिसला आहे. फोटो काढण्याइतका शांत नसतो. सोसायटीच्या मागे असलेल्या टेकडीवर मात्र दिसत असावा तो. या चार महिन्यात मात्र अजिबात दिसला नाहीए.

विशिष्ठ वेळी विशिष्ट ठिकाणी बसणं इंटरेस्टींग आहे>>>>>>>> हो नक्कीच. मला सुरवातीपासुन एका जागेवर बसायला आवडते. पक्ष्यांच्या मागे फिरलो तर जास्त पक्षी दिसतात हे खरे असले तरी त्यांच्या सवयी, घरटी वगैरे फारसे समजत नाहीत. आणि मी देवराईत पाहीलेल्या पक्ष्यांपैकी अनेक पक्षी हे त्यांच्या हद्दीतच जास्त फिरताना दिसतात. त्यांची roosting साठीची झाडेही ठरलेली आहेत. त्यामुळे एका जागेवर बसण्याचे फायदे आहेतच.

तपकिरी होला, व्हलगड, छोटी कवडी, भोरी
------------------------
काल गप्पीदासचे फोटो काढत असताना शेजारी होला व वेडा राघू बसले होते. एका वेळी एकाच पक्षावर लक्ष केंद्रीत करायची सवय असल्याने या दोघांचे फोटो काढून घेतले. गम्मत म्हणजे घाईत काढलेल्या या फोटोत मला खुप दिवस उत्सुकता असलेल्या गोष्टी कैद झाल्या. शिक्रा, भारद्वाज, टर्की वगैरे पक्षांचे फोटो काढताना अनेकदा त्यांच्या डोळ्यांवर अर्धपारदर्शी पडदा असल्याचे दिसले होते. तो असतो हेही पुर्वीच माहीत होते. पण मला उत्सुकता होती की आपल्यासारखे ते पापण्या मिटतात की फक्त तेवढाच पडदा असतो पक्षांच्या डोळ्यांवर? काल या होलाचे फोटो काढताना चुकून त्याने डोळे मिटले व ते कॅमेऱ्यात सापडले. हे नुसत्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही. कारण ते अतिशय जलद पापणी मिटवून उघडतात. फोटो असल्याने ते व्यवस्थित पहाता आले. आता प्रश्न हा आहे की सर्वच पक्षांना अशी पापणी असते का? ती ती माणसांसारखीच डोळ्यांच्या मधोमध मिटता येते की काहींना फक्त एकच पापणी असुन ती डोळा झाकते? काल भारद्वाजला काड्या तोडताना पाहीले तेंव्हा एक लक्षात आले होते की हे पक्षी अशा काड्या तोडताना, पंख साफ करताना डोळ्यांवर हा पारदर्शी पडदा ओढून घेतात. डोळ्यांची सुरक्षा हा हेतू असणार हे नक्की. शिक्रा तर जांभई देतानाही असा पडदा ओढून घेतो. तो फोटो सापडला तर येथे डकवेन.
------------------------
ID : Laughing Dove
Scientific name : Spilopelia senegalensis
Size : 27 cm, Mass : 82 g
LOC : Devrai
DOP : 30 Jan 20 (5:45 am)
------------------------
(येथे वरची पापणी पुर्ण डोळा झाकताना दिसतेय.)

येथे मात्र खालची व वरची पापणी डोळ्याच्या मध्यभागात मिटताना दिसतेय. पापण्यांच्या कडाही स्पष्ट दिसत आहेत.

येथे त्याच्या पाठीवरच्या, पंखांवरच्या, पार्शभागावरच्या पिसांची रचना अगदी स्पष्ट दिसते आहे. प्रत्येक ठिकाणी असलेल्या पिसांचा आकार, दिशा व एकमेकांशीजारी असण्याचा पॅटर्न वेगवेगळा आहे. याचा उपयोग त्यांना हवेचा विरोध कमी करण्यासाठी होत असणार. याचे अजुन विविध फोटो मिळायला हवेत. तसेच काही पंखही जमवायला हवेत.


.

हा वरील फोटोच क्रॉप केला आहे. मला वाटत होते की यांच्या मानेवर जे काळे चौकोन दिसायचे ते पिसे फुलवून निर्माण केले जातात. म्हणजे प्रत्यक्षात ते काळे चौकोन नसुन त्यांचा भास असतो. हे अर्धवट खरे आहे. पिसे फुलवली जातात मात्र त्याठीकाणी असलेली पिसे ही आतमध्ये खरेच काळ्या रंगांची असतात. तसेच या पिसांची टोके चौकोनी असतात. त्यामुळे दुरुनही हे काळे चौकोन अगदी रेखीव दिसतात. हळू हळू एकेक गोष्ट उलगडते आहे या पक्ष्यांची. Happy
(येथे पिसांचा काळा भाग अगदी स्पष्ट दिसतोय तसेच पिसांच्या टोकाचा आकारही दिसतोय.)

ही वेड्या राघूच्या (Green Bee-eater) पंखावरील पिसांची रचना. वेडेवाकडे व अतिशय गतीने उडण्यासाठी तसेच उडताना अगदी तिव्र कोनात वळण्यासाठी ही रचना उपयोगी असणार.

.

मला या क्लोजप फोटोंचा उपयोग पक्ष्यांची पिसे, स्कल व स्कलला चोच ज्या पध्दतिने जोडलेली असते ते समजण्यासाठी होतो. म्हणजे सिल्व्हरबिलची चोच ही स्कल कुठे संपते व चोच कुठे सुरु होते हे फक्त पिसांवरुन समजते. आकारावरुन नाही. तसेच या वेड्या राघूची चोच मला वाटत होती तशी स्कलच्या बाहेर उघडत नाही तर ती खुप खोलवर उघडते हे या फोटोमुळे लक्षात आले. दिसायला हे दृष्य जरा विचित्रच दिसले.

चेसबोर्ड चौकट आवडली.
पापणी कबुतर वर्गात फार दिसते. कावळ्याचीही पाहिली. पण फोटोमुळे ती पकडता आली.
-----
नर मादी वेगळे दिसणार्यांचे ६/८फोटो हवेत. अर्थात हे नेटवर पिडीएफसाठी चालतील. प्रिंटला परवडणार नाही.

मैना, साळुंकी, शाळू (संस्कृत नाव : कलहप्रिया, सारिका)
---------------------
ही साळूंकी मला कर्वेरोडला दिसली. नेहमीच्या साळूंकीसारखी वाटत नाहीए. ही जंगल मैनासारखी दिसत आहे पण तिच्या चोचीवर तुरा नाही व रंगही साळूंकीसारखाच आहे. तिच्या डोळ्याभोवतीही पिवळा भाग आहे. ही साळूंकीच आहे पण आकाराने किंचीत मोठी व लकब किंचीत जंगल मैनेसारखी आहे. कदाचीत प्रौढ साळूंकी असावी. नेहमीच्या साळूंकीपेक्षा किंचित वेगळी होती हे नक्की.
---------------------
ID : Common Myna
Scientific name: Acridotheres tristis
Size : 23 cm, Mass : Female: 120 – 140 g (Adult), Male: 110 g (Adult)
LOC : Karve Road
DOP : 31 Jan 20 (3:30 pm)

ब्राह्मणी मैना, भांगपाडी मैना, पोपई मैना (संस्कृत : शंकरा (शङ्करा)
--------------------
ID : Brahminy Starling
Scientific name: Sturnia pagodarum
Size :
LOC : Devrai
DOP : 31 Jan 20 (7:30 am)
1

2

3

4

कोतवाल, काळा गोविंद, गोचिडघुम्मा, काळबाण्या, बाणवा (संस्कृत नाव : अङ्गारक)
---------------------
याची माहीती खुपदा दिली आहे. आज विषेश काही पहायलाही मिळाले नाही. फरक येवढाच आहे की हा नेहमी देवराई व त्या पुढील भागातच दिसतो. आजवर कधीच हा माझ्या खिडकीसमोर दिसला नाही. हा जेथे बसला आहे तेथे फक्त सातभाई, बुलबुल, शिंजीर बसतात. आज हा येऊन बसला. जोडी होती. जरा आश्चर्यच वाटले. हा सुर्योदय होता होता आला होता. त्यामुळे त्याचा सुरेख Silhouette मिळाला. संध्याकाळी दिसला असता तर छान ऑरेंज बॅकग्राऊंड मिळाले असते. आज फक्त फोटो आवडला म्हणून देत आहे.
--------------------
LOC : Devrai
DOP : 31 Jan 2020
Time : 7:00 am

लालबुडी भिंगरी, मंदिर देवकन्हई
---------------------
ID : Red-rumped Swallow
Scientific name: Cecropis daurica
Size : 19 cm, Mass : 22 g
LOC : Devrai
DOP : 1 Feb 2020 (7:15 am)

चीरक, काळोखी (मादी)
(संस्कृत नाव : कृष्णपक्षी, देवी श्यामा)
-------------------------------
ID : Indian Robin
Scientific name : Saxicoloides fulicatus
Size : 16 cm
LOC:: Devrai
DOP : 1 Feb 2020 (7:15 am)

अङ्गारक
-------------
Name : Black Drongo
LOC : Devrai
DOP : 1 Jan 20 (7:15 am)

Pages