विस्मरणात गेलेले/सहज न मिळणारे खाऊचे पदार्थ.

Submitted by अज्ञातवासी on 10 June, 2019 - 13:19

या लेखाची सुरुवात, प्रस्तावना कशी करावी नाहीये कळत. बघायला गेलं, तर यापैकी बरेच पदार्थ अजूनही दर आठवडी बाजारी मिळतात. पण आता शहरात सहजासहजी मिळणं अशक्य!
ठिकठिकाणी मारवाड, राजस्थान, कृष्णा अशा नावाची चकचकीत स्वीटची दुकाने उघडलीत. त्यातून हे पदार्थ तर हद्दपारच झाले आहेत. जिथे आहेत, तिथे अव्वाच्या सव्वा भावात विकले जातायेत.
चला तर, लहानपणी कसे आजोबा गुडीशेव आणायचे, लग्नाच्या पंगतीत कशी मूठ मूठभर बुंदी खाल्ली, याची आठवण जागवूयात!

१. गोडीशेव/गुडीशेव

लालजर्द दिसणारा आणि बघताच लक्ष वेधून घेणारा पदार्थ म्हणजे गुडीशेव! गोड आणि क्रिस्पी हे कॉम्बिनेशन शक्यतोवर जात नाही, पण गुडीशेवची मजाच न्यारी. एकदा तोंडाला लागली, की सुटता सुटत नाही. पण आता शक्यतोवर आठवडे बाजारात किंवा जत्रेतच मिळते.

२. बुंदी

एरवी लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास आढळणारा गोड आयटम म्हणजे बुंदी. रात्रभर जागून आचारी बुंदी पाडायचा. आता ही बुंदीही हद्दपार झालीये. बुंदी खाताना दाताखाली जो पाक यायचा, त्याची मजा काय वर्णावी महाराजा!

३. हलवायाचा बुंदीचा लाडू

मोतीचूर या गोंडस नावाने बुंदीचा लाडू चकचकीत काचेत विराजमान झाला, आणि तिथेच त्याची मजा संपली. 'शुद्ध घी मे बने हुए मोतीचुर के लड्डू - ६०० रु KG + GST ५ परसेन्ट. गिफ्ट पॅकिंग मे भी उपलब्ध' यात जी मजा नाही, जी एका जुनाट कळकट हलवायच्या दुकानात ओबडधोबड आकारात बनलेल्या ३० रु पावशेर ने कागदात बांधून मिळणाऱ्या लाडवात आहे.

सगळे एकत्र! PC शालिदा

IMG_20190610_222537_875.jpg

४. कडक शेव

भावनगरी, गाठींया, इंदोरी या नानाविध नावानी मिळणाऱ्या शेवेत ही पिवळीधमक दिसणारी झाऱ्यातून सरळ पाटीत आणि तिथून मुठीने कागदात पडणारी शेव हरवली. ही शेव खाताना येणारा कुर्र कुर्र आवाज आता कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या शेवमध्ये नाही होत.

PC शालिदा

IMG_20190610_222903_625.jpg

५. भत्ता

भेळ नाही, फक्त भत्ता, आणि तोही मिळेल तर एखाद्या जुन्या दुकानात किंवा सरळ बाजारात. पॅकिंग फरसाण मध्ये प्रचंड आढळणाऱ्या मक्याच्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा मागमूस नाही. सर्वात आधी तीन चार मुठा भरून मुरमुरे, त्यावर शेव, थोडी जाड शेव, थोडासा भाजक्या पोह्यांचा चिवडा, खारी बुंदी मग दाळ्या आणि सगळ्यात शेवटी पापडी. वर भरपूर मूठभर बारीक कापलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर! लिंबू पिळायचा असेल तर पिळा, जास्तच पट्टीचा असेल तर कच्चं तिखट आणि काळा मसाला वरून. स्वर्गसुख.

images (2)_0.jpeg

६. रेवड्या

रेवड्यांची चव काय सांगू महाराजा, गुडीशेवची लहान बहीण. शुभ्र, जिभेवर पडताच अवीट गोडीचा आनंद देणारी.

gulab-revdi-250x250.jpg

७. गुळाची जिलेबी.

पूर्वी मिळायची. आता नाही मिळत जास्त

IMG_20190610_223519.jpg

८. लाल रसगुल्ले

हो, अशा नावाने एक पदार्थ मिळायचा. एक रुपयाला चार. मध्ये पाक असायचा थोडा, गोड.
thaen-mittai-candy-500x500.jpg

९. दूधमलाई चॉकोलेट

एक रुपयाला चार. हीच्यात आणि किसमीमध्ये टफ फाईट होती. पांढरीशुभ्र चॉकोलेट असायची.

dudh-malai-toffee-500x500.jpg

१०. असवंतरा गोळ्या

पांढऱ्या गोळ्या असायच्या, जिभेवर ठेवताच एक वेगळीच अनुभूती यायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

११. इमली

एक रुपयाला चार अशा अतिशय छोट्या पॅकिंग मध्ये आंबटगोड अशी ही इमली मिळायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

१२. बोरकूट

अतिशय सुंदर चव, पुडी फोडून तोंडात टाकली, की कित्येक वेळ तोंडात चव रेंगाळायची.

IMG_20190610_224720_0.jpg

१३. दहिवडे

ह्या पदार्थाचा अजूनही मला नेटवर फोटो मिळाला नाही. थोडासा ब्राऊनिश लाल कलर असलेला पदार्थ जिलेबीच्या पाकात टाकला जायचा. स्वर्गीय चव.

अजून काही पदार्थ सुचवा, सांगा. लहानपणीच्या आठवणी जाग्या करूयात.

१४. राजमलाई चॉकोलेट (धन्यवाद किल्ली)

अशा चवेची चॉकोलेट अजून बनलेली नाहीये. मस्त चव..images (3)_1.jpeg

१५. काळ्या आंबट गोड गोळ्या (किल्ली)

१६. बटर (आशुचाम्प)

images (4)_0.jpeg

१७. संत्रा गोळी (आशुचाम्प)

ही मिळण्याच अजूनही हक्काचं ठिकाण, एस टी स्टँड Lol
images (5).jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आठवणी जाग्या केल्यात. आमच्या लहानपणी किराणा दुकानात दूधगोळी मिळायची. ती चव अजूनही आठवते.

आता ही बुंदीही हद्दपार झालीये. >>>> नाही ओ, अजुनही बर्‍याच कार्यक्रमात बुंदी असते. अगदी आमच्या हाफीस कँटीनमध्ये शुक्रवारी स्वीट डीश म्हणून महिन्यातून एखाद वेळ असतेच असते.

त्या पांढर्‍या रेवड्यांची आठवण- मामाच्या गावी मुख्य कुस्ती फड सुरू होण्याआधी लहान मुलांच्या कुस्त्या लावायचे टाईमपास म्हणून. जिंकू किंवा हरू दोघानाही रेवड्या मिळायच्या

खरं तर वरील सर्व पदार्थ आजही आम्हाला खायला मिळतात. आठवडाभर उपलब्ध आहेत. आमचं गाव खुप असं मोठं नाहिये त्या मूळे असेल कदाचित.

बऱ्याच गोष्टी अजूनही बऱ्याच ठिकाणी रेग्युलर उपलब्ध असतात आणि आहेत. फक्त आपण आपल्या चाकोरी बाहेरही बघायला शिकले पाहिजे.

लेखकाने लहानपणी प्रत्यक्षात बोरकुट खाल्लीय इतक्या वयाचे वाटत नाही ... खरेच खाल्लीय तर स्वागत आहे आमच्या पंक्तित Happy

शाली ह्यांच्या एका नुकत्याच वाचनात आलेल्या लेखाचा संदर्भ फोटो आणि लेख पाहुन आठवला. आणि शाली ह्यांनी त्यातील अनेक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्याचे त्यांच्या लिखाणशैलीतून प्रकर्षाने जाणवते ... तशी जाणीव इकडे नाही होत हेमावैम.

बाकी ×××× हां प्रयत्न छान होता !

@आसा - मस्त प्रतिसाद, आणि रेवडींची आठवण तर भारीच.
बुंदी मिळते काही दुकानात, पण एकदम वेगळीच. पूर्वीची चव नाहीच.

@pravintherider - भाग्यवान आहात! Happy

बोर्कुट पाहून तोपासू झाले, इतर खाऊ पण मस्त Happy
राजमलाई चॉकोलेट विसरलात का?
शेव पाहून पुन्हा एकदा दमडी आठवली , इयत्ता 6 वी, पाठ 1ला, बालभारती

बोर्कूट पाहून तोंपासु>> अगदी अगदी !
बोरकूट बघितलंच नाहीये कित्येक वर्षांत !
किल्लीताई, मला दमडी आठवेना. एखादा संदर्भ ? Happy

चुरमुऱ्याचा लाडू
आजी बनवायची मस्त आणि तो असा कुडुंकुडुम आवाज करत खायला मजा यायची

10 पैशाला मिळणारी संत्र्याची गोळी
वडाच्या पानावर मिळणारे आईस्क्रीम
पत्र्याच्या डब्यातून विकत मिळणारे बटर खरी टोस्ट
तयाची चव वेगळीच होती

धन्यवाद अज्ञा ! वाचायला सुरवात केल्यानंतर आठवली !! Happy

वर उल्लेखलेले बाजारातले बरेचसे पदार्थ नेहेमी बघतो. कधीतरी खाल्लेही जातात.
बोरकूट, दुधमलई चॉकलेट मात्र दुर्मिळ !
गुळाची जिलेबी मात्र माझ्यासाठी नविन आहे. लहानपणी कधी खाल्ली असेल तर आठवत नाही.

खरवस, आईसकँडी, मटका कुल्फी, ताडगोळे (बोरं, जांभळं, करवंद), बर्फाचा गोळा, बैलाने फिरवलेल्या चरकातला ऊसाचा रस, ऊन्हाळ्यातल्या लग्नातला मठ्ठा, दूध कोल्ड्रींक, बिना आईस्क्रीमची लस्सी, कढईतले मलईदार मसाला दूध, शुक्रवारचा बालाजीचा प्रसाद (फुटाणे+खारे शेंगदाणे+साखर फुटाणे), हवाबंद पिशवीतले गुलाबी बुढ्ढी के बाल, नवरात्रातल्या देवीच्या जत्रेदरम्यान मिळणारी मसाला काकडी/पेरू/कणीस, ज्वारी/बाजरीच्या खारोड्या, दूध पाणी साखर घालून बनवलेलं सातूचं पीठ, रसना
आणि अजून अनेक...
बर्‍याचआता गोष्टी मिळत असतीलही, जसे ऊसाचा रस वगैरे पण यंत्रावर बनवलेल्या गोष्टीत ती जुनी चव लागत नाही.

सही कलेक्शन आहे हे. यातले बरेच मिळतात अजूनही सहज पण लिस्ट ची आयडिया मस्त आहे. यातले अनेक इथे अमेरिकेतही मिळतात देशी दुकानात. बटर संत्रा गोळी वगैरे.

आशूचॅम्प - पण वडाच्या पानावरच्या आइसक्रीम च्या उल्लेखाने एकदम शाळा आठवली Happy

दहीवडा फोटो नसेल तर सध्या ही माहितीपूर्ण क्लिप चालवून घ्या Wink

आमच्या लहानपणी किराणा दुकानात दूधगोळी मिळायची. ती चव अजूनही आठवते.+१११११११ शाळेबाहेरच्या दुकानात असायच्या. आणी बॉब्या. संभाजीबागेत पिस्ता आइस्क्रीम मिळायचं चांगले त्या चवीचे नाही मिळाले खायला!
अज्ञातवासी- ह्या धाग्यासाठी धन्यवाद Happy

पूर्वी घरातल्या घरात सहज असणारे व वरचेवर खाल्ले जाणारे काही पदार्थही आजकाल विस्मरणात जातील अशी भिती वाटते म्हणून नोंदवून ठेवते. हे पदार्थ दुर्मीळ नाहीत पण बिस्कीटं, ब्रेड, मॅगी ह्या गोष्टींच्या सहज उपलब्धतेमुळे (आणि त्यास असलेल्या जाहीरातीय वलयामुळे ) हे सहज सोपे पदार्थ खाणं म्हणजे कमीपणाचं वाटतं मुलांना.
सतत भूक लागलेली असण्याच्या काळात आईला त्रास द्यायला नको म्हणून ते खाल्ले जायचे---किंवा दुपारच्या झोपेच्या वेळेस "आई भूक" म्हटलं की वैतागलेल्या आयांकडून खालील पर्याय सुचवले जायचे. ओतप्रोत डबे भरलेले असतानाही हल्लीची मुलं उठसूठ म्हणतात तसं, "श्या बाबा आपल्याकडे कधी काही खायलाच नसतं" असले डायलाॅग्ज मारायची सोय नव्हती. त्या पिढीनं उपासमार पाहीलेली असल्यानं जरा जास्त संवेदनशील होती माणसं. वाढीच्या वयाची मुलं असायची त्या घरी पोळ्यांचा डबा जरा जास्तीचा भरलेला असायचा. घर म्हणून दूध असायचं कायम आणि मग गॅस चालू न करता मुलांना आपले आपले घेऊन खाता येतील असे पदार्थ म्हणजे-
दूध साखर पोळी
दूध गूळ भाकरी
दूध गूळ/ साखर पोहे
दही तिखट मीठ पोहे
तेल मसाला मीठ तिखट आणि पोळी
वरण आणि गूळ एकत्र करून पोळीशी
साखरंबा / गुळांबा पोळी
वरण कच्चा मसाला तिखट मीठ कांदा पोळी
तेल ति. मी. पोहे
केळं पोळी
गूळ/साखर तूप पोळी
दही दूध भात
आमटी भाकरी कुस्करून
इ.इ.

भारीच!
वडाच्या पानावरच्या आइसक्रीम च्या उल्लेखाने एकदम शाळा आठवली>>>अगदी अगदी
रावळगाव चॉकलेट.

विस्मरणात नाही गेले पण शक्यतो हे पदार्थ नाही होत आता.
चीम (चिंचेचे सार)
तेलच्या-गुळवनी (मोठ्या आकाराच्या पुऱ्या)
शाक (कार्यात केली जायची ही भाजी)

एक गोल ( चेंडूसारख्या गोल) गोळ्या मिळायच्या. चित्रातल्या चेंडूवर असतात तसे किंवा कलिंगडावर असतात तसे पट्टे असायचे त्या गोळ्यांवर. खूप वर्षांत बघितल्या नाहीत.
पोलो आल्यापासून साध्या पेपरमिंटच्या गोळ्याही खाल्ल्या नाहीत.

रेवड्या, गुळाची जिलेबी इथे एकदम ताजी मिळते. बटर , टोस्ट ही एकदम मस्त मिळतात. बुंदीचा लाडु घरी दिवाळी, इकडे येताना आई/सासुबाई करून आणतात. मैत्रिण गणपतीत घरी करते.
बोरकुट, राजमलाई माहित नाही कस लागत. गुडी शेव म्हणजे जाड शेव गुळाच्या पाकात घातलेली का?

पानपरागची गोळी आठवतेय का कोणाला? आमच्या ऑफिसमध्ये कोणी तश्या गुलाबी-पोपटी रंगाचा कॉम्बो घालुन आलं की आम्ही हमखास त्यांना पानपराग म्हणतो.

pp.jpgpp.jpg

आणि हो ती स्वादची गोळी पण
sw_0.jpgsw_0.jpg

आणि त्या भिंगर्‍या मिळायच्या त्या आठवट आहेत का कोणाला... मध्ये धागा ओवलेला असायचा आणि त्या धाग्यात चक्रासारखी गोळी असायची.
चित्र नाहिये माझ्याकडे त्याचं... Sad

एक सायकलवाला यायचा, सायकलला मध्ये मोठा दांडा उभा लावलेला असे. तो काचेच्या बाटल्या आणि पत्र्याच्या गोष्टी घेऊन त्या बदली त्या दांड्यावर एक गुलाबी पांढरी किंवा पिवळी पांढरी चमकदार अशी चिक्की असे (एकदम चिकट असा गोळा) त्याची पट्टी काढून त्याची छोटी सायकल, फुल, गाडी बनवून ती एका काडीवर लावून देत असे. त्याची टेस्ट गोड गोड रेवडीसारखी असे. लहानपणीचे ते पहिले लॉलीपॉप. भंगाराऐवजी तो पैसे घेऊनही हे देत असे.

बटर मिळतं की.जिरा बटर येतं... डीमार्टात येत होते.
संत्रा गोळी पण मिळते. जवळपास नसेल मिळत तर नटराज ऑरेंज कँडी या नावाने अ‍ॅमेझॉन वर आहे उपलब्ध. घरी पण बनवता येते.

चुणचुण्या नाहीत का यादीत ?

अनेक घरगुती खाउ विस्मरणात गेलेत आणि त्याजागी हलदीराम वगैरे लोकांच्या स्नॅक्सनी घरातले डबे भरले जाउ लागलेत!
स्विगी, झोमॅटो वगैरे मंडळींमुळे आता घरपोच गोष्टी मिळू लागल्यायत (अर्थात काही लोकांना सोयीचेही आहे ते) आणि आपण घरी पदार्थ बनवण्याचा अजुनच कंटाळा करायला लागलोय
कालाय तस्मै नम:

पण लहानपणी ताक दूध पोहे, दही दूध पोहे, दूध गुळ पोहे, तेल तिखट पोहे, दडपे पोहे वगैरे अगदी चुटकीसरशी तयार होणारा हमखास नाश्ता असायचा
माझी आई मुगाचे पीठ भाजुन आणून ठेवायची... त्यात दूध किंवा तूप घातले की एकदम पौष्टिक नाश्ता!
भाजलेली कणीक असायची घरात बऱ्याचदा .... तीही तूप वगैरे घालून मस्त लागायची
आदल्या दिवशीची थालीपीठे (किंवा क्वचित भाकरी) दुसऱ्या दिवशी तेल तिखट आणि शेंगदाण्याचे कूट याबरोबर कुस्करुन खाण्यात जाम मजा होती
चिरमुरे शेंगदाणे आणि जोडीला वाटीत घरचे तिखट किंवा कांदा लसूण मसाला हा माझा सगळ्यात आवडता नाश्ता होता

अजुन बरेच पदार्थ आहेत.... लिहतो आठवतील तसे!

Pages