विस्मरणात गेलेले/सहज न मिळणारे खाऊचे पदार्थ.

Submitted by अज्ञातवासी on 10 June, 2019 - 13:19

या लेखाची सुरुवात, प्रस्तावना कशी करावी नाहीये कळत. बघायला गेलं, तर यापैकी बरेच पदार्थ अजूनही दर आठवडी बाजारी मिळतात. पण आता शहरात सहजासहजी मिळणं अशक्य!
ठिकठिकाणी मारवाड, राजस्थान, कृष्णा अशा नावाची चकचकीत स्वीटची दुकाने उघडलीत. त्यातून हे पदार्थ तर हद्दपारच झाले आहेत. जिथे आहेत, तिथे अव्वाच्या सव्वा भावात विकले जातायेत.
चला तर, लहानपणी कसे आजोबा गुडीशेव आणायचे, लग्नाच्या पंगतीत कशी मूठ मूठभर बुंदी खाल्ली, याची आठवण जागवूयात!

१. गोडीशेव/गुडीशेव

लालजर्द दिसणारा आणि बघताच लक्ष वेधून घेणारा पदार्थ म्हणजे गुडीशेव! गोड आणि क्रिस्पी हे कॉम्बिनेशन शक्यतोवर जात नाही, पण गुडीशेवची मजाच न्यारी. एकदा तोंडाला लागली, की सुटता सुटत नाही. पण आता शक्यतोवर आठवडे बाजारात किंवा जत्रेतच मिळते.

२. बुंदी

एरवी लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास आढळणारा गोड आयटम म्हणजे बुंदी. रात्रभर जागून आचारी बुंदी पाडायचा. आता ही बुंदीही हद्दपार झालीये. बुंदी खाताना दाताखाली जो पाक यायचा, त्याची मजा काय वर्णावी महाराजा!

३. हलवायाचा बुंदीचा लाडू

मोतीचूर या गोंडस नावाने बुंदीचा लाडू चकचकीत काचेत विराजमान झाला, आणि तिथेच त्याची मजा संपली. 'शुद्ध घी मे बने हुए मोतीचुर के लड्डू - ६०० रु KG + GST ५ परसेन्ट. गिफ्ट पॅकिंग मे भी उपलब्ध' यात जी मजा नाही, जी एका जुनाट कळकट हलवायच्या दुकानात ओबडधोबड आकारात बनलेल्या ३० रु पावशेर ने कागदात बांधून मिळणाऱ्या लाडवात आहे.

सगळे एकत्र! PC शालिदा

IMG_20190610_222537_875.jpg

४. कडक शेव

भावनगरी, गाठींया, इंदोरी या नानाविध नावानी मिळणाऱ्या शेवेत ही पिवळीधमक दिसणारी झाऱ्यातून सरळ पाटीत आणि तिथून मुठीने कागदात पडणारी शेव हरवली. ही शेव खाताना येणारा कुर्र कुर्र आवाज आता कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या शेवमध्ये नाही होत.

PC शालिदा

IMG_20190610_222903_625.jpg

५. भत्ता

भेळ नाही, फक्त भत्ता, आणि तोही मिळेल तर एखाद्या जुन्या दुकानात किंवा सरळ बाजारात. पॅकिंग फरसाण मध्ये प्रचंड आढळणाऱ्या मक्याच्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा मागमूस नाही. सर्वात आधी तीन चार मुठा भरून मुरमुरे, त्यावर शेव, थोडी जाड शेव, थोडासा भाजक्या पोह्यांचा चिवडा, खारी बुंदी मग दाळ्या आणि सगळ्यात शेवटी पापडी. वर भरपूर मूठभर बारीक कापलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर! लिंबू पिळायचा असेल तर पिळा, जास्तच पट्टीचा असेल तर कच्चं तिखट आणि काळा मसाला वरून. स्वर्गसुख.

images (2)_0.jpeg

६. रेवड्या

रेवड्यांची चव काय सांगू महाराजा, गुडीशेवची लहान बहीण. शुभ्र, जिभेवर पडताच अवीट गोडीचा आनंद देणारी.

gulab-revdi-250x250.jpg

७. गुळाची जिलेबी.

पूर्वी मिळायची. आता नाही मिळत जास्त

IMG_20190610_223519.jpg

८. लाल रसगुल्ले

हो, अशा नावाने एक पदार्थ मिळायचा. एक रुपयाला चार. मध्ये पाक असायचा थोडा, गोड.
thaen-mittai-candy-500x500.jpg

९. दूधमलाई चॉकोलेट

एक रुपयाला चार. हीच्यात आणि किसमीमध्ये टफ फाईट होती. पांढरीशुभ्र चॉकोलेट असायची.

dudh-malai-toffee-500x500.jpg

१०. असवंतरा गोळ्या

पांढऱ्या गोळ्या असायच्या, जिभेवर ठेवताच एक वेगळीच अनुभूती यायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

११. इमली

एक रुपयाला चार अशा अतिशय छोट्या पॅकिंग मध्ये आंबटगोड अशी ही इमली मिळायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

१२. बोरकूट

अतिशय सुंदर चव, पुडी फोडून तोंडात टाकली, की कित्येक वेळ तोंडात चव रेंगाळायची.

IMG_20190610_224720_0.jpg

१३. दहिवडे

ह्या पदार्थाचा अजूनही मला नेटवर फोटो मिळाला नाही. थोडासा ब्राऊनिश लाल कलर असलेला पदार्थ जिलेबीच्या पाकात टाकला जायचा. स्वर्गीय चव.

अजून काही पदार्थ सुचवा, सांगा. लहानपणीच्या आठवणी जाग्या करूयात.

१४. राजमलाई चॉकोलेट (धन्यवाद किल्ली)

अशा चवेची चॉकोलेट अजून बनलेली नाहीये. मस्त चव..images (3)_1.jpeg

१५. काळ्या आंबट गोड गोळ्या (किल्ली)

१६. बटर (आशुचाम्प)

images (4)_0.jpeg

१७. संत्रा गोळी (आशुचाम्प)

ही मिळण्याच अजूनही हक्काचं ठिकाण, एस टी स्टँड Lol
images (5).jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय.
मला पण नाही दिसत आहेत ईमेजस.

दहिवड्यात आत रस? कसा काय ? हे उ.डाळीचेच द.व. आहेत ना? का वेग्ळे काहीतरी आहे?
मला फोटो दिसून राहिलाय. Happy

हो, इथला प्रसिद्ध बालुशाही धागा आहे त्यावर एक व्हर्जन असं आहे.
मी मध्ये एकदा पाहिली होती ती बटाटेवडे आकाराची आणि त्यावर पांढरा जाड तुपाचा थर वाली होती.

मी लहान अताना असताना
चटक चांदणी ह्या नावाच्या वेलीला जास्वंद सारखे पण त्याच्या पेक्षा मोठे सफेद रंगाचे फुल यायचे त्याची सुकी भाजी बनवली जायची खूप मस्त चव असायची पण ती वेल आता बघायला मिळत नाही .
दुसरे भुईफोड नामक बटाट्याच्या आकाराचे mushroom पहिला पावूस पडला की मोकळ्या जमिनी वर उगवायचा ते सुद्धा खूप छान चवीला लागायचे

चिकलेट्स च्युईंग गम ४० वर्षापूर्वी खूप फेमस होते. क्रिकेट खेळाडू सतत चघळत असत ,महाग होते पण छान चव होती. गावठी च्युईंग गम - बिंडूकलीची गोड मधाळ फळं बी सकट चाऊन खाल्लं की च्युईंग गम सारखाच चिकट पदार्थ तयार व्हायचा.
पाण्यात टाकली की फसफसून विरघळणारी ( histac antacid सारखी) सरबताची वेगवेगळ्या रंगांची व चवीची गोळी मिळायची , आता मिळते का?
अस्वंद, निवडुंगाची गोड रसाळ बोंड आता बघायलाही मिळत नाहीत.
गोड दहीवडे नाशिक मध्ये मिळतात. खूप सुंदर चव असते.
हत्ती घोड्याची बिस्किटे अद्याप काही खेडेगावात मिळतात, १६०-२००/किलो.
झोपडपट्टीत रस्त्यावर, गटारी वर वाळत घातलेले बघितलेले असल्यामुळे पोंगा पंडित खायची कधीच इच्छा झाली नाही.
बर्फाचे आईस क्रीम गटारीच्या पाण्यापासून बनवितात असे घरचे वडीलधारे म्हणायचे, आम्ही ते खाऊ नये म्हणून खास विकत घेऊन त्यावर मीठ टाकायचे, खरंच आईस क्रीम मध्ये काहीतरी वळवळताना दिसायचे.
बालपणी बोराच्या बिया फोडून आतील डाळ्या गुळाबरोवर खायचो.
पूर्वी पावसाळा संपला की घरात अनेक प्रकारचे गवतावरील कीटक यायचे, एक काळया रंगाचा पाठीवर पिवळे ठीबके असलेला बिटल त्याला स्पर्श केल्यावर पिवळ्या रंगाचा उग्र वासाचा गरम वायूचा फवारा सोडायचा, जोरात चटका बसायचा. अजून एक ब्लिस्टर नावाचा कीटक झोपेत अंगाखाली चिरडला गेल्यास सकाळी त्वचेवर पाणीदार फोड यायचा, फोड फुटला की खूप वेदना व्हायच्या. आता हे दोन्हीही कीटक दिसत नाहीत.
कीटकांवरून आठवण झाली, कोणी लाल मोठ्या मुंग्यांची (डोंगळे) अंडी खाल्ली आहे का? खारट- आंबट चव असते, त्याची चटणी छान लागते, ही अंडी पौष्टिक असतात.

पाण्यात टाकली की फसफसून विरघळणारी ( histac antacid सारखी) सरबताची वेगवेगळ्या रंगांची व चवीची गोळी मिळायची , >>>>> ऑरेंज गोळी टेस्ट केलीय लहानपणी.

वरच्या एकदोन प्रतिसादांमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. "मोठ्या मुंग्यांची (डोंगळे) अंडी... त्याची चटणी" हि मात्र माझ्यासाठी नवीन पण रोचक माहिती आहे.

एक जुनी रानभाजी आठवली. वाघाटी म्हणत. घराशेजारी झुडुपात याचे एक रोप होते. पावसाळ्यातच फळे यायची. आज सहज गुगल केले असता आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपास सोडताना वाघाटीची भाजी करतात अशी माहिती मिळाली. आजकाल हि भाजी दुर्मिळ झाली आहे. मी तर लहानपणी नंतर खाल्ल्याचे आठवत नाही. मागच्या वर्षी मंडईत हि भाजी आली होती तिचा दर तब्बल आठशे रुपये किलो होता अशी बातमी आहे.

पावसाळी भाज्यांमुळे आठवलं -- आता पावसाळा सुरु झाला आता बाजारात "शेवळं" येतील .
सीकेपी आणि एसकेपी लोक जीव टाकतात या भाजीसाठी असं ऐकीवात्/पहाण्यात आहे Happy

आम्ही रानावनात भटकताना बांडगुळ(दुसऱ्या झाडावर पूर्ण अवलंबून असलेली वनस्पती )
ची फळ जी छोटी आणि लाल रंगाची असतात पण मस्त गोड लागतात.
आणि त्याच बरोबर मासरडची (masrad)ब्लॅक रंगाची छोटी गोल फळे सुधा मस्त लागायची त्या वेळी

प्राचीन , Happy
माझं माहेर कोकणाकडचं आणि सासर मुंबईतले एसकेपी .
डिन्गरी मला माहीत नाही. शेवळांमध्ये जीव ओवाळून टाकण्यासारखं मला काही वाटलं नाही Happy
साबांकडे चौकशी करेन आणखी काही भाज्यांची .
एक पालेभाजी असते 'कारळी" की असं काही नाव असते - ती छान लागते चणा डाळ घालून .
पण आम्हाला लहानपणापासून शेगल्याच्या पालेभाजीच जास्त अप्रूप Happy

जागूतै किन्वा दिनेश्दा वगैरे कोणाचा पावसाळी रानभाज्या चा बाफ होता का ? तिकडे आणखी काही माहिती असेल. >>>> सापडला
https://www.maayboli.com/node/26435

Pages