माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्याती, हवाबंद डब्यात भरुन फ्रीजमधे ठेव. ज्वारी बाजरी पीठ, बेसन, भाजणी फ्रीजर मधे ठेव म्हणजे खूप दिवस टिकेल.

फ्रीझर मधे ठेवायचे सगळॅ मग कीड लागत नाही.
ज्या गोष्टी संपणार नाहीत अशा गोष्टी कमी प्रमाणात आणायच्या किंवा २ मैत्रिणीनी वगैरे मिळुन आणायच्या.

थॅन्क्स दीपान्त, मिनोती!
मावणार कसे फ्रीज मध्ये?? एकतर इथे जवळ मोठे देसि दुकान नाही, जर्सीवरुन किराणा भरावा लागतो Sad

एकाच महिन्यात सगळे नाही आणायचे. आणलेले आधी संपवायचे (तोपर्यंत दुसर्‍याची आठवण आलेली असते ) मग दुसरे आणायचे.

न्याती, रवा थोडा कोरडाच भाजुन घेऊन गार होऊ द्यायचा. त्यात ३-४ अख्ख्या लवंगा घालायच्या आणि हवाबंद डब्यात ठेवायचा. अजिब्बात कीड लागणार नाही.
ज्वारी-बाजरी पीठ फ्रिज मधे. दलिया मधे पण लवंगा घाल आणि हवाबंद डब्यात ठेव.
मुग डाळीला थोडे तेल आणि हळद चोळ. हवाबंद ड्ब्यात कोरड्या जागी ठेव.

थॅन्क्स लाजो! करतेच सगळे या वीकेन्डला.
दिनेशदा सारखे जाणे होत नाही ना जर्सीला म्हणुन एकदम आणावे लागते, इथला स्टोअरवाला दुप्पट भावाने विकतो सगळे, तरिपण करुन पाहीन Happy

बेसन लाडू भाजताना तूप जास्त झालय आणि पीठ जरा पातळ झालय वळायला.
आता जरा घट्ट बनवण्याकरता काही युक्ती आहे का?

मो...थोडावेळ फ्रिज मध्ये ठेव्...मग वळले जातील्...पण फ्रिज मध्ये जास्त वेळ ठेवलेस तर खूप घटट होइल (स्वानुभव : मग परत १० सेकंद मावे मधे ठेवले आणि वळले) साधारण १५ मि. ते अर्धा तासाने काढून बघ...आत्ता हे सगळे उद्योग करून मगच पोस्ट करते आहे...:)...

हे तूप जास्त झालेले लाडू वळले तरी फ्रीजमधेच ठेवावे लागतात. बाहेर काढले कि परत पसरतात.
हे बेसन एका नायलॉनच्या कापडात सैलसर बांधुन तूप काढता येते. ( पण हे फार गरम नसताना आणि पुरते थंड व्हायच्या आधीच करावे लागेल. ) किंवा त्यावर एखादी जाळी ठेवून (दुधाच्या भांड्यावर झाकण ठेवायला मिळते ती ) त्यावर भाजके पोहे टाकायचे. ते जास्तीचे तूप शोषतात. मग त्या पोह्याचा चिवडा करता येतो. जाळी झाकण म्हणून नाही तर थेट बेसनावरच ठेवायची.

मी रवा + नारळ लाडु करायला घेतले आहेत. दिनेशदा तुम्ही दिलेलेच सर्व प्रमाण घेतले आहे. मिश्रण आताच पाकात घातले आहे पण खुपच कोरडे वाटत आहे. २-३ तासांत लाडु कसे वळुन होणार? दिनेशदा सांगाल का आता काय करु?

मिश्रण कोरडे वाटले तर थोडा वेळ थाबून परत बघायचे. तरीही कोरडे वाटले तर बाजुला पाक काढला असेल तर तो घालायचा, किंवा गरम दूध शिंपडून लाडू वळायचे. (खुपच उशीर झाला उत्तर द्यायला )
पण अजूनही मिश्रण कोरडेच असेल तरीही हे उपाय करता येतील. पण परत भांडे आचेवर ठेवायचे नाही, तसे केले तर आणखी कोरडे होईल. एका मोठ्या पातेल्यात गरम पाणी करुन त्यात हे भांडे ठेवले, तरी मिश्रंण मऊ होईल. अगदी शेवटचा उपाय म्हणून, घट्ट झाकण ठेवून, कूकरमधे वाफ देता येईल.

शंकरपाळे तळले तेव्हा कुर्कुरीत होते .... पण थंड झाल्यावर मऊ पडले... असे का झाले असावे?

पण थंड झाल्यावर मऊ पडले...
>>
अमि शंकरपाळे गरम गरम भरलेस का डब्यात?? गरम भरले असशील तर नरम पडतात थंड झाल्यावर.

चकल्या शंकरपाळ्या वगैरे प्रकार तळताना, येणारे बुडबुडे जवळजवळ थांबेपर्यंत ते तळावे लागतात. बुडबुडे म्हणजे आतल्या पाण्याची बाहेर पडणारी वाफ. जर घाईघाईने तेलातून बाहेर काढले तर गरम असताना कुरकुरीत लागतात, पण थंड होताना आतल्या वाफेचे पाणी होते व ते आतच राहते आणि त्याने पदार्थ मऊ पडतो.

चकल्या शंकरपाळ्या वगैरे प्रकार तळताना, येणारे बुडबुडे जवळजवळ थांबेपर्यंत ते तळावे लागतात. बुडबुडे म्हणजे आतल्या पाण्याची बाहेर पडणारी वाफ. जर घाईघाईने तेलातून बाहेर काढले तर गरम असताना कुरकुरीत लागतात, पण थंड होताना आतल्या वाफेचे पाणी होते व ते आतच राहते आणि त्याने पदार्थ मऊ पडतो.

इडलीचे भिजवलेले पीठ चुकून जास्तच पातळ झालंय. पीठ छान फुगलंय मात्र. तेव्हा ह्या पीठाचा आणखी कसा उपयोग करावा? ह्या पीठाचे उतप्पे, डोसे कसे करावे? परतून उलथताना तुकडे पडताहेत. काय नेमके चुकले असेल? जाणकार जरा मदत कराल का?

अमी

इडलीचे भिजवलेले पीठ मिक्सर मधुन काढुन बारिक करुन मग उतप्पे, डोसे करा. इडलीचे पीठ जाड असल्याने बर्‍याचदा त्याचे डोसे करताना तुकडे पडतात. बारिक करुन घेतले कि तुकडे पडत नाहि.

नेहमी पेक्षा छोटे डोसे करा.( कॉक्टेल डोसा म्हना. !) त्यात कान्दा टोमॅटॉ घातल्यास तुट्नार नाही कदाचित.

priyab, ashwinimami, प्रतिसादा बद्दल धन्यवाद. दोन्ही सूचना प्रमाणे करुन पाहाते. छोटे डोसे ही कल्पना खरंच छान आहे. मुलांना खूप आवडेल.

अमी

त्यात भर घालणे आवश्यक आहे. मूग, चणा वा तूर डाळ भरड वाटून (कोरडी ) त्यात मिसळून, तसेच दूधीचा किस, मका वा मटार, आले मिरचीचे वाटण, थोडे तेल मिसळून हांडवो करता येईल, एका कढईत जिरे, हिंग व तिळाची फोडणी करुन हे मिश्रण ओतायचे. मंद गॅसवर ठेवून भाजायचे. ( फार आंबट झाले असेल तर पिठात थोडी साखर घालायची ) इडली डोश्यापेक्षा या पदार्थाची कटकट कमी असते. एकदाच पिठ कढईत टाकले कि आपण मोकळे. नीट भाजले गेले कि खमंग वास सुटतोच.

dineshvs, हांडवोचे तयार पीठ अनायासे घरात आहे. तेच जर इडलीच्या पीठात भर म्हणून टाकले तर चालेल का? तुम्ही सुचवलेला उपाय वाचून हे नक्की करायचेच असे ठरवले आहे! हांडवो माझी अति प्रिय वानगी त्यामुळे! पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद!

अमी

dineshvs, मी यात गुजराती प्रकाराचा मेथ्याचा लोणच्याचा मसाला टाकते - त्यामुळे मस्त खमंग चव येते. तुम्ही ही करुन पाहा - नक्की आवडेल तुम्हाला.

अमी

Pages