देव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2018 - 01:27

देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!

पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.

असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,

मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.

हे देखील तसेच आहे.

एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?

ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!

त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.

या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव, सती हा अमानुष प्रकार आहे तसाच भेदभाव (लिंग, धर्म, जाती, लैंगिकता, वर्ण इ.) हा ही अत्यंत हीन प्रकार आहे. तुमच्या धर्माने सुधारणा नाही केली तर कायदा जरब बसवेलच. रादर बसवावी. जशी कायदा वेळोवेळी करतो.
मी आतून सुधारणा म्हणत होतो त्या म्हणजे, सवाष्ण असेल तरच जेवायला बोलावणे, वेगळ्या जातीत जन्मलेल्या लोकांनी वेगळी कामे करणे, मेन्स्ट्रुअल सायकल चालू असताना घरात देवाची पूजा न करणे धार्मिक विधी न करणे, पोरांना जन्मापासून प्रत्येक ठिकाणी प्राधान्य देणे... इ.इ. ह्यातील अनेक गोष्टी या कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत आणि येऊ ही नये. त्या माणूस /समाज जो पर्यंत मनापासून स्वीकारत नाही तो पर्यन्त काही फरक पडायचा नाही.

सती हा अमानुष प्रकार आहे तसाच भेदभाव (लिंग, धर्म, जाती, लैंगिकता, वर्ण इ.) हा ही अत्यंत हीन प्रकार आहे. तुमच्या धर्माने सुधारणा नाही केली तर कायदा जरब बसवेलच. रादर बसवावी. जशी कायदा वेळोवेळी करतो.>> एकदम बरोबर अमितव.

या प्रथा जुन्या काळापासून आहेत आणि त्याचे कारण लक्षात घ्या. जुन्या काळात सॅनिटरी पाड्स नव्हते आणि सायकल असताना रक्त स्वयंपाकघर किंवा मंदिर किंवा जेवण बनवताना सांडू नये(हायजीन) हे प्रमुख कारण. शिवाय स्त्री ला चार दिवस आराम मिळावा हे आणखी एक कारण असावे.

आता इतकी चांगली पाड्स असताना या बंदी चुकीच्या आहेत हेमाम.

पॅड न्हवते म्हणून बायका रक्त सांडत चालताहेत असं तुम्ही कधी बघितलंय का???? काय वाट्टेल ते कारण लिहून मग शास्त्रीय टेकू देताय!!!

ग्राव्हिटी म्हणजे काय हे माहीत नसले तरी गोष्ट जमिनीवर पडेल हे माहीत होतेच की.
तुम्हाला असे का वाटते की रक्त सांडणार नाही प्याड नसेल तर?

च्रप्स आपला मुद्दा योग्य आहे. पण मुळात देव हिच संकल्पना विविध कारणातून बनवली गेली आहे. उदाहरणार्थ सुर्यचंद्र यांनाही आपंण देव मानतो. ईस्लाममध्येही मानले जाते. पण आज आपल्याला ठाऊक आहे की ते निव्वळ ग्रहतारे आहेत. तरीही मानणारे त्यांना आजही देवच मानतात ना?
तुम्ही श्रद्धेपुढे लॉजिक मांडत आहात तर देव आहे की नाही ईथपासून लॉजिक मांडून ते तपासून घ्यावे लागेल ना. देव असल्यास तो मंदिरातच असतो का किंवा त्याची उपासना करायला मंदिरातच जावे लागते का याचेही लॉजिक तपासावे लागेल.

त्याच्या बदलत्या रूचीनुसर धर्म बदल देखील करू शकतो परंतु आधीच रूढ असलेल्या धर्मातील चालीरीती तो बदलू शकतो का>>>>>>>>>>>

अर्थात करू शकतो, माझ्या हिंदू धर्मात असे बक्कळ बदल झाले आहेत, बायकांना सती जाणे सक्तीचे करणे पासून बायकांचे सती जाणे सक्तीने थांबवणे, बाल विवाह थांबवणे, विशिष्ट धर्मतील माणूस शिवला तर बाटणे, विशिष्ट जातीतील लोकांना मंदिरात प्रवेश नाही, त्यांनी स्पर्श केलेल्या वस्तू शुद्ध करून घेणे इत्यादी रूढ चालीरीती हिंदू धर्मात होत्या, ज्या बदलल्या,

>>>>>जर एखद्या मंदिरात एखाद्या देवाला मांसाहाराचा नैवेद्य चालतो आणि तेच दुसरया देवाला नाही हे मान्य करत असाल तर तेच लॉजिक वापरून एका देवळात स्त्रियांना परवानगी आहे आणि एका देवळात नाही ईतकेच.>>>>>
मग ते लॉजिक केवळ मंदिर प्रवेश आणि स्त्रिया यांनाच का लावायचे?
काही मंदिरात विशिष्ट जातींना प्रवेश नको असे जर कुणी म्हंटले तर ते सुद्धा तुम्ही मान्य करणार का?

इथे स्त्रीला बंधनात घालणारे अन् तिला बंधनमुक्त करणारे जमलेत वाटत,चर्चेवरुन तर तसेच जाणवते आहे.
पण मी स्त्री असले तरी ना कधी मी कुणाचे बंधन मानले आणि नाही कुणाचे बंधनमुक्त विचार मानले.कारण जे केले ते मला वाटले, आवडले,व आले म्हणूनच केले.

आता कुठली अंधश्रद्धा आड येतेय ते बघा.
>>>>>
कळीचा मुद्दा हाच आहे. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय? हे ठरवणार कोण?
माझ्यामते देव हीच एक अंधश्रद्धा आहे. तर देव मानणारे लोक्स सारी मंदिरे बंद करायला तयार होतील का?

..

काही मंदिरात विशिष्ट जातींना प्रवेश नको असे जर कुणी म्हंटले तर ते सुद्धा तुम्ही मान्य करणार का?
>>>
याच प्रश्नाचीच वाटच बघतच होतोच Happy

जातींना जेव्हा मज्जाव केला जातो ते उच्चनीचतेतून होते. एखाद्या समूहाला हलके लेखण्यातून होते. ईथे तसे नाहीये तसे भासवून कोणी दिशाभूलही करू नये. किँबहुना तेच भासवून हा वाद कसा पेटत राहील हे बघितले जातेय असे वाटतेय. आपण अश्यांना साथ देऊ नये असे मला वाटते.

क्षुद्राने शिवल्यावर आंघोळ करून शुद्ध होणे, आणि स्त्रियांनी दर्शन घेतल्यावर मंदिर शुद्ध करणे हे वेगवेगळे आहे का?

हो
कारण जातीवरचे भेद मंदिरापुरते नसतात. मंदिराबाहेरही त्यांना अस्प्रुश्यच वागणूक मिळते..
ईथे स्त्रियांबाबतचा भेद फक्त मंदिरापुरता केला जात आहे. मंदिराबाहेर नाही.
पहिला भेद अहंकारातून आला आहे.
दुसरा भेद श्रद्धेतून आला आहे.

दारूच्या धाग्यावर दारूच्या समर्थनार्थ नेहमी म्हटले जाते की दारू वाईट नाही तर दारूचा अतिरेक वाईट आहे.
आत जर उद्या कोणी एखाद्या मंदिरात दारू पिऊन जात असेल आणि त्याची अडवणूक केली तर त्याने ती अडवणूक निमूटपणे मान्य करावी की आम्ही दारू पितो म्हणून काय अस्पृश्य वा हलके झालो का असे म्हणत भांडावे. तसेच आम्ही अट्टल बेवडे नसून प्रमाणात पितो असे वर युक्तीवादही करावेत.
केल्यास हे खपवून घेतले जाईल का?
जर दारू पिणे न पिणे हे एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यात येत असेल तर त्यावरून त्याने काही गोंधळ घालायच्या आधीच अमुततमुक जागा पवित्र आहे म्हणत त्याला मज्जाव करणे योग्य आहे का?

अशी वेगवेगळी उदाहरणे घेत लॉजिक तपासून पाहायला हवे.

स्त्री ला या ना त्या कारणाने अस्पृश्य-स्पृश्य मानणे यात कोणती श्रद्धा आहे? अन् कसलं तत्व आहे ही फक्त आणि फक्त अहंकार अन् पुरूषदेहप्रधानमानसिकता आहे.

>>>>>..
ईथे स्त्रियांबाबतचा भेद फक्त मंदिरापुरता केला जात आहे. मंदिराबाहेर नाही.>>>

>>>>>दुसरा भेद श्रद्धेतून आला आहे.>>>>

नवरा नसलेल्या स्त्रीला धार्मिक कार्य करायचा अधिकार नाही,
मुलगी अंत्यसंस्कार करू शकत नाही,
विधवा स्त्रियांवरील सामाजिक बंधने
जबाबदारीच्या पदांवर महिलांच्या नियुक्तीस विरोध असणे
समान काम करून सुद्धा वेतनात तफावत असणे

हे सगळे भेद नक्की कोणत्या श्रद्धेतून आले आहेत?

लाखो लोकांच्या भावनांचा अनादर करून 'श्रद्धेपोटी' मंदिरात प्रवेशकरणं हा शुद्ध दांभिकपणा आहे. कोणाचं नुकसान होत नसेल तर एक गंमत, रुढी म्हणून अगदी युरोप-अमेरीकेते सुद्धा (पुरोगामी म्हणवणार्‍या लोकांना समजण्यात सोपं) अशा पद्धती असतात. या मंदीराच्या ऐवजी अगदी एखादं वाचनालय जरी असतं तरी मी समजू शकतो.

ता.क.: खालीले पैकी एकजरी काउंटर आर्ग्युमेंट असेल तर स्वतःच्या थोबाडीत मारून घेणे.
१. प्रश्न श्रद्धा म्हणून मंदीरात प्रवेश करण्याचा नाही तर असल्या भंपक अंधश्रद्धा असलेल्या रूढी मोडीत काढण्याचा आहे.
२. नुकसान ही सापेक्ष गोष्ट आहे.

लाखो लोकांच्या भावनांचा अनादर करून 'श्रद्धेपोटी' मंदिरात प्रवेशकरणं हा शुद्ध दांभिकपणा आहे.>>>>>

आजच्या घडीला लाखो स्त्रिया रस्त्यावर मंदिर प्रवेशाला पाठिंबा द्यायला उभ्या आहेत,
कोणत्या लाख लोकांचा अनादर करायचा हा तुमचा चॉईस

<ईथे स्त्रियांबाबतचा भेद फक्त मंदिरापुरता केला जात आहे. मंदिराबाहेर नाही.>

नक्की का? चार दिवसांत बायकांनी वेगळं बसावं, स्वयंपाकघरात जाऊ नये, देवाचं अजिबात काही करू नये हे नियम घरोघरी पाळले जायचे.
आता शहरांत जागेच्या आणि मनुष्यबळाच्या अडचणीमुळे कमी झालंय, तरीही या दिवसांत स्त्रियांनी देवाचं करणं टाळणं अपेक्षित असतं.
मंदिरप्रवेश नाकारण्याचं ते एक मोठं कारण आहे.

लाखो लोकांची भावना काय आहे? या स्त्रियांच्या तिथे येण्याने मंदिर अपवित्र होणार आहे, देवाचं ब्रह्मचर्य धोक्यात आहे? मग या भावनांवर उपाय करायची गरज आहे.

https://www.independent.co.uk/news/world/asia/nepal-womens-rights-menstr...
Nepal passes law to end practice of exiling women for menstruating

Bill aims to grant greater protections to women, who are often forced to leave their homes and take shelter in cow sheds while having their periods as part of Chhaupadi custom

दरम्यान अशा दूर बसवलेल्या दोन बायकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत.

नेपाळ सारखे (पूर्वाश्रमीचे) पूर्ण हिंदू राष्ट्र असे काही कायदे करायचे धाडस दाखवते, या पार्श्वभूमीवर भारतातल्या " नव- हिंदुत्व" कवटाळून बसणाऱ्या लोकांची प्रतिगामी विचारसरणी उठून दिसते

https://www.business-standard.com/article/news-ani/travancore-board-chie...
एखादी बाई मंदिरप्रवेशासाठी योग्य काळात आहे की नाही, हे तपासणार्‍या यंत्राचा शोध लागेपर्यंत बायकांना मंदिरप्रवेश नाही.
- त्रावणकोर देअस्व बोर्डाचे प्रमुख

माझ्यामते देव हीच एक अंधश्रद्धा आहे. तर देव मानणारे लोक्स सारी मंदिरे बंद करायला तयार होतील का?>>>
ज्याला हे वाटते त्याने मंदिरात जाणे बंद करावे. मंदिरेच बंद करा म्हणणे हे धर्मांधाने "सगळ्यांनीच धर्म पाळा आणि तो अमुक प्रकारेच" म्हटल्या सारखे आहे. धर्मांध आणि नास्तिकांध यांच्यात फारसा फरक नसतो.

त्रावणकोर???
म्हणजे जिकडे मागासवर्गीय स्त्रियांना छाती झाकायला बंदी होती ते??
जिकडे स्त्रियांना "ब्रेस्ट टॅक्स" द्यायला लागायचा ते??

पण तो तर सामाजिक रुढींचा भाग होता... त्यात स्त्रियांना तुच्छ वगैरे लेखले जात नव्हतेच कधी.

सिम्बा, भरत चांगल्या पोस्ट्स.

एखादी बाई मंदिरप्रवेशासाठी योग्य काळात आहे की नाही, हे तपासणार्‍या यंत्राचा शोध लागेपर्यंत बायकांना मंदिरप्रवेश नाही.
>>
कहर आहे!

भरत, सिम्बा चांगल्या पोस्ट्स.
यात तीन शक्यता आहेत.
१. त्या महिला भगवान आयप्पांच्या खूप मोठ्या भक्त आहेत. देवाशिवाय त्या राहूच शकत नाही, म्हणून त्या जीवावर उदार होऊन मंदिरात जात आहेत.
२. त्यांना देवाशी काहीही घेणं देणं नाही, पण इतके वर्ष त्यांच्यामते स्त्रीला दुय्यम लेखणारी प्रथा तोडायचीय.
३. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे सगळं चाललंय...

इन फर्स्ट केस, त्या महिलांना प्रवेश मिळायलाच हवा. कारण मनापासून भक्ती करणाऱ्या कोणत्याही भक्ताला कुणीही माणूस देवाजवळ जाण्यापासून रोकू शकत नाही.
दोन, मंदिरात प्रवेश ही अशी रूढी आहे, जी कुठल्याही स्त्रीला वैयक्तिक नुकसान पोहोचवत नाही, आणि काही फायदाही नाही. तिथे काही स्त्रियांसाठी इतक्या लोकांचे जीव पणाला लावणं, आणि जिथे त्या त्या प्रदेशातील स्त्रियाच ही रूढी तोडण्याविरुद्ध जीव पणाला लावत आहेत, तिथे त्या त्या प्रदेशातील भावनांचा व विविधतेचा आदर करावा. अजून खूप विभाग आहेत जिथे स्त्रियांसाठी या महिला काम करू शकतात. पण हा खरंच जीवनमरणाचा प्रश्न नाही.
तिसरी केस, आताच्या आता त्यांना अटकाव व्हायला हवा.
आणि जर महिनाभर भारतातील कोणतीही स्त्री मंदिरात गेली नाही ना, तर सर्व मंदिरे आधी स्त्रियांसाठी खुली करावी लागतील... धंदा बसेल सगळ्यांचा... कारण मोस्टली पुरुष मंडळी घरातील स्त्रीच्या आग्रहावरूनच सोबत मंदिरात जातात, अन्यथा त्यांना काही देणं घेणं नाही (अर्थात अपवाद असू शकतात, किंवा हे स्टेटमेंट चुकीचंही असू शकतं. माझं मत) मग भक्तच आले नाहीत, तर उत्पन्न कुठून मिळेल? कुठे लाखोंच्या अभिषेकाच्या पावत्या खपवायच्या? कुठे देवीवरच्या साड्या हजारोनी विकायच्या?
पण, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न, हेच खरं!
आणि देव मानायचा असेल, तर दगडातही आहे, आणि मानायचा नसेल तर देवळतही नाही. शेवटी श्रद्धेचा प्रश्न!
नास्तिकांनी अस्तिकाना किंवा आस्तिकांनी नास्तिकाना मते पटवून देण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण मत पटलं नाही, तर हिणवण्याचा खेळ खेळू नये. काही लोक तर मनोरुग्ण म्हणेपर्यंत मजल गाठतात...
...आणि आजकाल नास्तिकतेची ठिकठिकाणी जाहिरात करणारे, टिमकी वाजवणारे व आस्तिक कसे अडाणी व मागासलेले हे कुठेही मंच मिळाला तर ओरडून सांगणारे जॅम डोक्यात जातात. आणि तसेच आम्ही किती परंपरा पाळतो, किती देवाचं करतो, आणि तुम्ही साधं मंदिरात जात नाहीत, हेही!

नवरा नसलेल्या स्त्रीला धार्मिक कार्य करायचा अधिकार नाही,
मुलगी अंत्यसंस्कार करू शकत नाही,
विधवा स्त्रियांवरील सामाजिक बंधने
जबाबदारीच्या पदांवर महिलांच्या नियुक्तीस विरोध असणे
समान काम करून सुद्धा वेतनात तफावत असणे
हे सगळे भेद नक्की कोणत्या श्रद्धेतून आले आहेत?

>>>>>

हे भेद श्रद्धेतून नाही तर पुरुषी अहंकारातून आले आहेत आणि लढायचे तर अश्या भेदांविरुद्ध लढा हेच तर तुम्हाला ईतकेवेळ समजावतो आहे.

ज्याला हे वाटते त्याने मंदिरात जाणे बंद करावे. मंदिरेच बंद करा म्हणणे हे धर्मांधाने "सगळ्यांनीच धर्म पाळा आणि तो अमुक प्रकारेच" म्हटल्या सारखे आहे.
>>>

+७८६
हेच तर समजावत आहे.
जो तो आपल्या मनाने मागणी करू लागला तर कसे चालेन.
त्यापेक्षा जे पूर्वापार श्रद्धेने चालत आले आहे पण त्याचवेळी ज्यात कोणाला काही त्रास नुकसान नाही ते चालू द्यावे.
तुमच्याच भाषेत समजावायचे झाल्यास धर्मांधही बनू नका आणि नास्तिकांधही बनू नका. उगाच एकाच टोकाचा हट्ट धरण्यात काय अर्थ आहे.

Pages