देव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2018 - 01:27

देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!

पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.

असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,

मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.

हे देखील तसेच आहे.

एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?

ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!

त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.

या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages