देव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2018 - 01:27

देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!

पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.

असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,

मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.

हे देखील तसेच आहे.

एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?

ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!

त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.

या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि आज शुद्धीकरणासाठी मंदिर बंद ठेवले

मंदिर प्रवेशाचा हक्क मिळावा म्हणून , केरळमध्ये बायकांनी काही शे किलो मीटर ची मानवी साखळी केली .

दरम्यात प्रधान सेवक म्हणाले हा रुढींचा प्रश्न आहे.

दरम्यात प्रधान सेवक म्हणाले हा रुढींचा प्रश्न आहे.
>>>
लॉजिकली हे कर्रेक्ट आहे.
जर तुम्ही देव मानता तर त्या त्या देवाच्या अनुषंगाने आलेल्या प्रथा परंपरा रुढी मानाव्याच लागणार.
किंवा मग त्याच देवाचे एक सेपरेट मंदीर फक्त महिलांसाठी हवे अशी मागणी करा.

जर तुम्ही देव मानता तर त्या त्या देवाच्या अनुषंगाने आलेल्या प्रथा परंपरा रुढी मानाव्याच लागणार.>> असे कुठल्या देवाने सांगितले.
उगाच उच लली बोटे, लाव ली फलकाला

<< जर तुम्ही देव मानता तर त्या त्या देवाच्या अनुषंगाने आलेल्या प्रथा परंपरा रुढी मानाव्याच लागणार.>> असे कुठल्या देवाने सांगितले.
उगाच उच लली बोटे, लाव ली फलकाला >>

--------- रुढी, परंपरा हे आपणच ठरवले आहे ना ? कालानुरुप त्यात बदल व्हायला हवेत. महिलांना केवळ त्या महिला आहेत म्हणुन मंदिरात प्रवेश नाही या परंपरा, रुढी मोडीत काढायला हव्यात.

आपल्यात सतीची प्रथा पण प्रचलित होती. राजा राममोहन राय यांनी या प्रथे विरुद्ध जनमत तयार केले... आणि घोर अन्यायकारक, मानवतेला काळिमा लावणारी प्रथा बंद झाली. अजुनही अशा घटना पुर्णपणे बंद झालेल्या नाहीत (१९८७ मधे राजस्थान मधे रुपकुंवर ह्या सती गेल्याचे उदा ताजे आहे).

प्रथा, रुढी या कालानुरुप बदलायला हव्यात. मंदिरात तरी सर्वांना समान वागणुक मिळणे अपेक्षित आहे. जनसंख्येच्या ५० % महिला आहेत, आणि त्यांना एखाद्या स्थळी त्या केवळ महिला आहेत म्हणुन प्रवेश नाही हे पटतच नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. सर्व अडथळे दुर करत तो निर्णय अमलात आणावा.

रुढी, परंपरा हे आपणच ठरवले आहे ना ? कालानुरुप त्यात बदल व्हायला हवेत.
>>>>

सामाजिक सुधारणा आणि धार्मिक रुढीपरंपरा यात गल्लत होतेय का?

धर्मांध आणि नास्तिकांध यात फार फरक नसतो.
धर्मांध म्हणतो तू आमचा देव मानतो ना आता या अमुक तमुक सगळ्या रूढी परंपरा मानच. नास्तिकांध म्हणतो हो त्याचे बरोबर आहे, सगळ्या रूढी परंपरा मानच.
धर्मांधाला वाटते देव मानणारे सगळे माझ्या सारखे धर्मांधच असायला हवेत. नास्तिकांध म्हणतो एकदा देव मानला तोच अंधपणे मग आता धर्मांध होण्यात काय प्रॉब्लेम आहे धर्मांधच हो. देव मानणाऱ्यांनी कसे वागावे हे धर्मांध आणि नास्तिकांध ठरवू पहातात.
वेगळ्या विचारांचे लोक असतात, आणि त्यांना कुठल्या रूढी मानव्यात कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य हवे हे दोघांच्याही पचनी पडणे महाकठीण.

म्हणूनच कुठल्याही रुढी असोत, जो पर्यंत बेसिक चार्टर ऑफ राईट्स व्हायोलेट होत नाहीत, कोर्ट काही बोलत नाही (बोलू शकत नाही) ते झाले की कोर्ट कारवाई/ निर्णय देते.
सुधारणा ह्या आतुनच व्हायला हव्यात. या केस मध्ये चार्टर ऑफ राईट्सचे उल्लंघन झाले आहे. निर्णय आला, विषय संपायला हवा. नसेल संपत तर... मरा! खरंतर त्या देवाला सोडून दुसरीकडे जा. तुमच्या नातेवाईकांना पण तिकडे जाऊ देऊ नका. देवाचे दुकान बंद पाडा.
ह्या बॅटल मध्ये दुसर्‍या बाजूला मूर्ख आणि माथेफिरू लोक असतील तर तुमचा जीव अशात हकनाक घालू नका. घालायचा असेलच तर मग घाला. पण परत विचार करा. चूज युअर बॅटल्स.
मरु द्या... विचारसरणीच्या लोकांना नास्तिकांध म्हणतात का मानव? मला धर्मांधच हो असं अजिबातच वाटत नाही. पण मूव्ह ऑन मात्र व्हावसं वाटतं.

नास्तिकांध म्हणतो हो त्याचे बरोबर आहे, सगळ्या रूढी परंपरा मानच.
>>>>

नास्तिकांध म्हणजे जो आपले नास्तिकत्व दुसरयावर लादतो असा अर्थ हवा ना..
मग तो तर म्हणेल देव मानूच नका, काहीही रुढी परंपरा मानूच नका..
मानच असे का म्हणेन?

वेगळ्या विचारांचे लोक असतात, आणि त्यांना कुठल्या रूढी मानव्यात कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य हवे ...
>>>>

आपण एक वेगळे उदाहरण घेऊया.
म्हणजे एक असाच वेगळ्या विचारांचा माणूस म्हणाला की मला अमुकतमुक देव मानायचाय. पण मंदीरात नॉनवेज खाऊ नका वा मद्य पिऊ नका हे मला मानायचे नाहीये. मी तर देवासमोर लाडू नाही तर चिकन लॉलीपॉपचा नैवेद्य ठेवणार.

तर अश्या वेगळ्या विचाराच्या माणसाला तसे करू द्यायचे का.?

ईथे तो म्हणतोय की आमच्या गावी अमुकतमुक देवासमोर बकरयाचा बळी दिला जातो. मग या देवासमोर तेच केले तर काय प्रॉब्लेम आहे?

१. घटनेने दिलेले मूलभूत मानवी हक्क हे कोणत्याही धार्मिक्/सामाजिक परंपरेपेक्षा श्रेष्ठ आहेत.
२. मुद्दा (फक्त) मंदिरप्रवेशाचा नाही. पाळी येणारी स्त्री अपवित्र असते या समजुतीचा आहे. पाळीमुळे स्त्रियांना ज्या अनेक भेदभावांना, अन्यायांना तोंड द्यावं लागतं, त्यातला हा एक. हा एक प्रतीकात्मक लढाही आहे.

सुधारणा ह्या आतुनच व्हायला हव्यात.

म्हणजे नेमकं काय व्हायला हवं? कोणी करायला हवं?

उदा- सतीची प्रथा बंद व्हावी यासाठी राजा राममोहन रॉयनी लढा दिला. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड बेन्टिक यांनी सरळ कायदाच आणला ज्याद्वारे सती हा मर्डर झाला. दॅट डिड इट. यासाठी त्याकाळी हिंदू स्त्रियांनी संघटित होऊन लढा दिला , लाटणं मोर्चे काढले वगैरे असं काही वाचनात आलेलं नाही.
मग रॉय व बेन्टिक यांनी केलेली सुधारणा 'आतून' झाली म्हणायचं की 'बाहेरून'?

स्वातंत्र्य हवे याचा अर्थ कायदे धाब्यावर बसवणे असा होतो का?

जर त्या रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज खातात मद्य पितात तर मला कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये नॉनव्हेज घेऊन जाऊन खाण्यास (नेऊन ठेवण्यास) मद्य पिण्यास कायदा परवानगी देतो का?

जर अमुक एका जागी पशुवध करण्यास परवानगी आहे म्हणुन कायदा मला कुठेही पशुवध करण्यास परवानगी देतो का?

याचे उत्तर होय असेल तर तू म्हणतोयस त्याला न्यायालय परवानगी देईल, आणि ते स्वातंत्र्य पाळता येईल.

निवळ्ळ महिलेने नमस्कार केला तर ब्र्ह्मचर्य संकटात सापडत असेल तर बाबा इतका कसा रे तु अशक्त असाच प्रश्न पडतो.
खैर, हे सगळ बघुन, देव आहे, पण धर्माच काही खरं नाही, हे आमचं मत अधिकच स्ट्राँग होत जात.

किती बायकांनी असा अनुभव घेतलाय की पुरुषांनी (नुसतं?!) बघितले म्हणून offensive वाटते? किती बायकांना अनोळखी पुरुषांच्या आजुबाजुला स्वतः असल्याने uncomfortable वाटते? चुकून गर्दीच्या वेळी general / gents लोकल डब्यात चढलो तर .... आठवून पहा. मी अजून स्पर्श इ. बद्दल बोलतच नाहीये. काही personal प्रेफेरेन्स म्हणून नसतं का! बाकीच्या 33 कोटी देवांना (वजा एक) बायका भक्त चालतात म्हणून ह्या देवाला पण चालव्यात असा अट्टहास का? ह्या पुरुष देवाच्या बाबतीत 'नो' means 'yes' का! (असंच माझं pointless rambling)

देव! देव आहे तो. मर्त्य मानव नाही. त्याचं मंदिर स्त्रीच्या येण्यानं अपवित्र होत असेल तर कोणाची शक्ती जास्त?
स्त्रीच्या जवळ येण्याने त्याचं ब्रह्मचर्य भंग होत असेल, तर तो देव कसा?
तेव्हा हे सगळं नक्की देवाने ठरवलं की त्याच्या वतीने आणखी कोणी?
एक ऑर्ग्युमेंट ऐकलं की देव त्या स्त्रियांना आशीर्वाद देणार नाही, शिवाय देवळात गेल्याने त्यांना त्रासही होईल. हा त्या स्त्रियांचा प्रश्न आहे. त्यांचा निर्णय त्याच घेतील.

(३३ कोटी म्हणजे ३३ करोड नव्हेत. ३३ प्रकारचे.

अय्यप्पा हा शिव आणि मोहिनीरूपातील विष्णू यांचा पुत्र. हरिहरपुत्र म्हणून ओळखला जातो.

देवाने कुठे सांगितलेय आणि देवाने कुठे ठरवलेय, हे सगळे आपण माणसेच ठरवतो या मुद्द्याला अर्थच नाही.

कारण अमुकतमुक देव आहे हे सुद्धा आपण माणसांनीच ठरवलेय. त्याचे मंदिर बांधायचे असते आणि पूजा करायची असते हे सुद्धा आपण माणसांनीच ठरवले आहे.
जर देवाने सांगितलेलेच पाळायचे असा निकष लावला तर सारेच अवघड होऊन जाईल. एखाद्या देवाला आधी तो देव आहे हे सिद्ध करून मग माझे मंदिर बांधा हे सांगण्यापासून सुरुवात करावी लागेल. अन्यथा सारीच मंदिरे बेकायदेशीर ठरतील Happy

जर त्या रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज खातात मद्य पितात तर मला कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये नॉनव्हेज घेऊन जाऊन खाण्यास (नेऊन ठेवण्यास) मद्य पिण्यास कायदा परवानगी देतो का?
>>>>>

देऊळ हे एक दुकान आहे आणि तिथे येणारे भक्त हे ग्राहक! हे जर श्रद्धाळू लोकांना सर्वानुमते मान्य असेल तर मग आपला मुद्दा बरोबर आहे Happy

म्हणजे दुकनाला देशाचे कायदा लागू होउ देत, पण मंदिरांना कायद्यांच्या हद्दीबाहेर ठेवा! हीच ती नास्तिकांधता / धर्मांधता.

कुठल्याही प्रौढ भारतीय नागरिकला त्याच्या आवडत्या धर्म स्वीकारण्याची व त्याचे पालन करण्याची परवानगी आहे.
तो त्याच्या बदलत्या रूचीनुसर धर्म बदल देखील करू शकतो परंतु आधीच रूढ असलेल्या धर्मातील चालीरीती तो बदलू शकतो का?
तसेच त्यास कुठलाही आधीचा प्रस्थापित धर्म पसंत नसेल तर तो स्वतःचा एक सदस्यीय नूतन धर्म स्थापन करू शकतो का?

म्हणजे दुकनाला देशाचे कायदा लागू होउ देत, पण मंदिरांना कायद्यांच्या हद्दीबाहेर ठेवा!
>>>>

मी देव मानत नाही. माझ्यासाठी ती मंदिरे दुकानच आहेत. जी माझ्या कामाची नाही. मला माझ्या घराशेजारी एखादे मंदिराऐवजी किराण्याचे द्कान झालेले जास्त आवडेल. ते माझ्या कामाचे असेल. तसेच ओवरऑल सार्वजनिक जागेत मंदिराऐवजी गार्डन, मैदान, मॉल वगैरे झालेले आवडतील जे माझ्या कामी येतील.

सांगायचा मुद्दा हा की मला काही फरक पडत नाही तुम्ही मंदीराला कोणते कायदे लावता.
जे लोकं देवाला मानतात त्यांना ते आवडणार नाही की तुम्ही मंदिराची तुलना एखद्या दुकानाशी केलेली.

बाकी जर एखद्या मंदिरात एखाद्या देवाला मांसाहाराचा नैवेद्य चालतो आणि तेच दुसरया देवाला नाही हे मान्य करत असाल तर तेच लॉजिक वापरून एका देवळात स्त्रियांना परवानगी आहे आणि एका देवळात नाही ईतकेच.

दोन्ही केसमध्ये देवाने येऊन काहीच सांगितले नाहीये. एकदा तुम्ही श्रद्धेने देव मानला की मी मानेन तीच श्रद्धा आणि ईतर मानतील ते अंधश्रद्धा असे करण्यात अर्थ नाही. अमुकतमुक मंदिरात स्त्रिया नको ही बहुसंख्य लोकांची श्रद्धा असेल तर किमान श्रद्धाळू आस्तिकांनी तरी आदर केला पाहिजे. मुद्दाम हट्ट धरण्यात काय अर्थ आहे?

तसेच त्यास कुठलाही आधीचा प्रस्थापित धर्म पसंत नसेल तर तो स्वतःचा एक सदस्यीय नूतन धर्म स्थापन करू शकतो का?
>>>>>

येस्स ! करू शकतो. केले गेले आहे.
माझा स्वत:चा धर्म आहे. एकसदस्यीय. आणि मला माझ्या धर्माची संख्या वाढवण्यात रस नसल्याने मी त्याचा प्रचारही करत नाही.
ईतर हिंदू मुस्लिम खिश्चन धर्माचे सण मात्र त्यांच्यासोबत तितकेच उत्साहाने साजरे करतो. देव मात्र कुठलाच मानत नाही. तसेच माझ्या धर्माचे नियम मला माझ्या आवडीनुसार बदलता येतात.

अरे हो,
आणि माझ्या धर्मात मी एकटाच असल्याने स्त्री पुरुष समानतेचा प्रश्नच उद्भवत नाही Happy

Pages