बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

घरी बालुशाही वैगेरे कोण करतं (किल्ली, मी करते असं सांगु नको. Happy ) आणावी की हलवायाकडुन.
आमच्या इथे एका लहानश्या जनता नामक हलवायाकडे अप्रतिम बालुशाही मिळते.
बादवे, आम्ही ह्या पदार्थाला खाजाही म्हणतो.

खाजा म्हणजे ते करंजीच्या आकारासारखं आणि चिरोट्याच्या बेस क्लास सारखं दारं दारं असलेले पदर सुटलेलं असतं ते ना?

करंजीच्या आकारासारखं आणि चिरोट्याच्या बेस क्लास सारखं दारं दारं असलेले पदर सुटलेलं असतं ते ना?>>>>> गुजियाबद्दल बोलताय ना?/ का?
खाजा म्हणजे जत्रेत वैगेरे मिळतात ते साधारण अर्थाने.
पण आम्ही बालुशाहीला पण खाजा म्हणतो Happy
मह त्या लगेच खाल्या जातात आणि टिकत नाहीत. :पीजे:

शंका निरसनासाठी पुढील वेळी बालुशाही करताना पुर्ण रेसीपी चा व्हीडीओ स्लो मो मोड मध्ये रेकोर्ड करुन तुनळी वर अप्लोड करेन आणि इथे लिन्क टाकेन ....

तोपर्यन्त जे लिहीले आहे त्यात शन्कासमाधान करुन घ्यावे, अधिक माहीती तरीही हवी असेल तर सरळ घरी यावे,किंवा मला घरी बोलवावे आणि माझ्या मार्गदर्शनाखाली बालुशाही करुन बघाव्यात Proud

हुशश....

घरी बालुशाही वैगेरे कोण करतं>> एवढं लेकराने )म्हणजे किल्ली बरं का) दिवाळीच्या सुट्टीत केलंय त्याच काही कवतिक नाही बै Light 1

धन्यवाद कृष्णा Happy

आताच माझ्या मनात बालुशाही म्हणजे चिरोट्याची बहीण का भाउ म्हणावा असं आलं होतं. Happy
चिरोटे पणसेम पाकृ असतेच की. फक्त ते लाटतात. चौकोनी.हे गोळे.

एवढं लेकराने )म्हणजे किल्ली बरं का) दिवाळीच्या सुट्टीत केलंय त्याच काही कवतिक नाही बै >>> कौतुक करुन झाल्यानंतरचा (वर कौतुक केलेली पोस्ट वाचणे ) प्रॅक्टीकल विचार आहे हा Lol

मालवणी खाजा असतो त्यात गोड आणि तिखट चवी एकत्र असतात. सुंठ असते की काय माहीत नाही. मस्त लागतो पण. आकार करंजीसारखा नसतो पण. लांब लांब सळ्यांचे तुकडे असावेत तसा दिसतो.

@ सस्मितः
घरी बालुशाही वैगेरे कोण करतं>>
:आज्जी मोड चालु:
नेहमी घरी केलेले पदार्थ खावेत, बाहेर काय माहित कसे बनवतात, तेच तेल सारख वापर्तात etc etc (बाकीचा उपदेश इमैजिन करावा)
:आज्जी मोड बन्दः
Proud Lol

एवढं लेकराने )म्हणजे किल्ली बरं का) दिवाळीच्या सुट्टीत केलंय त्याच काही कवतिक नाही बै<<<<<<< अस्स क्स्स बै बोलून राहिली तू ? कवतिक असल्याखेरीज क इतलाले पोस्टी पडून राहिल्या.

मला वाटले बालुशाही तेलातुन बाहेर उडी मारुन परत तेलात जाणार. Lol

तळून झाले की पाकात उडी मारणार. छान मुरले की ताटात उडी मारणार. Lol Lol

आणि खाणाऱ्याने तोंड उघडले की ताटातुन डायरेक्ट तोंडात उडी मारणार. Lol Lol Lol

तेलाला हात लावून पाहण्याइतक तेल गरम/कोमट असेल तर पदार्थ उडी मारून वर येणारच नाही आणि छोटे बुडबुडे सुद्धा येणार नाहीत ( या मुद्द्यावर बेट लावण्याइतकी मी किचन एक्स्पर्ट नाही, पण माझं gk मला असं सुचवत आहे).
स्टेप 7 आणि स्टेप 8 मध्ये एक स्टेप 7a असायला हवी अस मला वाटतं. म्हणजे 7 ला कोमट तेलात त्या बाशा सोडायच्या. 7aला गॅस चालू करायचा आणि उडी बुडबुडे यांची वाट पहायची मग 8 वर जे काही होणार ते पुढे चालु.

सावधान - स्टेप 7ला उडी बुडबुडे अपेक्षित असतील तर मात्र तेलात नक्की घालायचा नाही, बोटं भाजणार याची खात्री वाटते मला

किल्ली!!!
इंडिया वॉन्टस टू नो!! (हे अर्णब च्या किंचाळणाऱ्या आवाजात.)

@ मीरा.. आणि mi_anu :
इंडिया वॉन्टस टू नो!! >> काय राव, एव्हढ्या प्रश्नांमुळे मी गोंधळात पडले आता, आधीच लेकराने कधी नै ते काहीतरि किचकट पदार्थ करण्यच जमवलय, ते जम्लय म्हनुन पोस्ट्लं तर तुम्ही मला एक्ष्पर्ट समजुन राहिले Proud Light 1 Light 1 Light 1

on a serious note, घरी जाऊन साबांना विचारुन देते उत्तर, ओके ?

मस्त रेसिपी आणि फोटो! मला बालुशाही फारशी आवडत नाही, पण आता खावीशी वाटते आहे.

@भरत, @किल्ली - किल्ली, तुम्ही ३९६९४ चा दुवा देताना त्यात शेवटी ज्यादा " : " पडला आहे, त्यामुळे ते पान दुव्यावर टिचकी मारल्यावर उघडत नाही. पत्त्याच्या रकान्यातला तो : काढला की व्यवस्थित उघडतं.

https://www.maayboli.com/node/39694

धन्यवाद भाचा Happy
पत्त्याच्या रकान्यातला तो : काढला की व्यवस्थित उघडतं.>> स्पेस द्यायची राहुन गेली होती : च्या आधी, बदल केला आहे, खुप धन्स Happy

डायरेक्ट तोंडात उडी मारणा>> @ शाली :
Rofl
असं मला ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनच्या जाहिरात/डेमो चा विडिओ पाहून वाटलं होतं.
"त्यात एक शर्ट स्वतःहून मशीनमध्ये जातो, मशीन कपडे धुण्याच्या सगळ्या प्रक्रिया त्या शर्टवर करते , वाळवते आणि तो शर्ट स्वतः घडी होऊन पडतो "
एका शर्टसाठी मशीन कोण वापरेल ,
असो विषयांतर होतंय Proud

भास्कराचार्यांनी शोधून काढलीच. पण तिथे अगदी ऑऑ झालं.
कोणी तरी खाजा म्हटलेलं पाहून बरं वाटलं, कारण मीपण या प्रकाराला बंगाली खाजा म्हणून ओळखतो.
पण गुगल केलं तर चिरोटयाचे फोटो आले.
मालवणी खाजा टोटली वेगळा.

बालुशाही घरी करण्याचा घाट घालून प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक ..
बालुशाही घरी करता येते असं वाटलंच नव्हतं .. मी काय घरी करणार नाही मी तुझ्याच घरी येणार खायला Wink

Submitted by वावे on 16 November, 2018 - 10:09>> बरोबर वावे .. त्यात किसलेला गूळ आणि वाटलेलं आलं (जिंजर ) असतं बाकी त्या सळ्या बेसनाच्या असतात .. जत्रेत मिळतात त्यात रंग असतो ..आणि मोस्टली आलं नसतं /नसावं

"त्यात एक शर्ट स्वतःहून मशीनमध्ये जातो, मशीन कपडे धुण्याच्या सगळ्या प्रक्रिया त्या शर्टवर करते , वाळवते आणि तो शर्ट स्वतः घडी होऊन पडतो ">> म्हणजे सग्गळं ऑटोम्याटिक Lol ( संदर्भ: मी आणि माझा शत्रुपक्ष)

@anjali_kool@: खुप धन्यवाद Happy
मी तुझ्याच घरी येणार खायला >> नक्की या
@ वावे:
Rofl

Pages