कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.
आमच्या घरात काही कार्य झालं किंवा सणावाराचं ओळीने चार पाच दिवस जड जेवण झालं असेल तर पाचक म्हणून, तोंडाला रुची यावी म्हणून ही केली जाते. “माझं पोट जरा ठीक नाहीये... सुंठीची कढी केली तर उद्या सकाळी घेईन म्हणतो “ अशी वातावरण निर्मिती करत माझ्या नणंद बाईंना ही कढी करण्यासाठी त्यांचा एखादा भाऊ त्याना गळ घालतो. त्या ही ‘ मी का म्हणून करू, मी माहेरवाशीण आहे ह्या घरची, हवी असेल तुला तर सांग तुझ्या बायकोला करायला ’ वैगेरे लटकेच त्याला सुनावतात. पण त्या ही कढी करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्याना करायची हौस ही आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे त्या उद्या नक्की कढी करतील ह्याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चहा कॉफी वगैरे झाली की त्या कढी करायला घेतातच. हीची रेसिपी अशी फार खास नाहीये पण तरी ही हा आमच्या घरचा फार खास पदार्थ आहे. अगदी सणावाराच्या पक्वान्नां पेक्षा ही घरात सर्वाना आवडणारा... करायचं काय तर आंबट ताकात सुंठ उगाळायची, ( कढी साठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.) खरं तर हेच फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे. सुंठ पावडर वापरून ती टेस्ट येत नाही. त्यामुळे सुंठ उगाळावीच लागते. आमच्या घरात माणसं खूप असल्याने आणि ही कढी सर्वांचीच आवडती असल्याने तशी करावी ही लागते भरपूर प्रमाणात. नणंद बाई माजघरात बसून सहाणेवर सुंठ उगाळत असतात. स्वयंपाकाच्या गडबडीतून वेळ काढून जरा जास्त दूध, साखर घातलेल्या आणि जायफळ लावलेल्या गरम गरम कॉफी चा कप श्रमपरिहार म्हणून त्यांची एखादी सून त्याना आणून देते. घरातली मुलं ही छोट्या छोट्या सहाणेवर सुंठ उगाळून आत्याआजीला मदत करत असतात. ओटीवरून ही किती झालीय सुंठ उगाळून , लावू का हातभार उगाळायला अशी मदतीची ऑफर येते. कढीच्या आशेने हळू हळू घरातली सगळी मंडळी नणंदबाईंभोवती गोळा होतात आणि सुंठ उगाळता उगाळता तिथेच गप्पा ही रंगतात. शेवटी पुरेसा तिखट पणा ताकात उतरतो आणि सुंठ उगाळण्याचे किचकट काम एकदाचे सम्पते. मग त्यात थोडे मीठ, थोडा हिंग घालतात. आणि शेवटी आमच्याकडे ह्या कढीसाठीचा म्हणून एक खास ठिक्कर/ दगड आहे, तो गॅस वर चांगला गरम करून त्या ताकात घालतात. ठिकरीमुळे ते ताक हलकेसे गरम होतं. . . बस्स इतकी च रेसिपी . झाली सुंठीची कढी तयार... ती ठिक्कर ताकात घातली की चुर्रर्रर्र असा आवाज येतो त्यामुळे कढी तयार झाल्याचं सगळ्या घराला समजत . प्रत्येकाला अर्धी पाऊण वाटी कढी दिली जाते. ती हिंगाचा स्वाद असलेली, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी चविष्ट कढी गप्पा मारत मारत, घुटके घेत घेत, नणंद बाईंचं कौतुक करत सगळेजण enjoy करतात.
अशी ही आमच्या घरची सुंठीच्या कढीची कहाणी. माझ्या नणंदबाई आज ऐंशीच्या पुढे असून ही अजून ही सुंठ उगाळून कढी करण्याचा त्याना उत्साह आणि हौस आहे. हा आमच्या कुटुंबाचा एक खास पदार्थ आहे . सुंठीची कढी ह्या शब्दालाच आमच्या घरात एक वलय प्राप्त झालं आहे कारण मनाला उल्हसित करणाऱ्या अनेक रम्य आठवणी ह्या कढीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढची अनेक वर्षे हा पदार्थ आमच्या घरचा अगदी खास असेल यात तिळमात्र संदेह नाही.
ही रेसिपी मी एका contest साठी लिहिली होती. थीम होती तुमची फॅमिली रेसिपी .. आज माबोवर शेअर करतेय.
हेमाताई, हिंग वर्णन बालपणात
हेमाताई, हिंग वर्णन बालपणात घेऊन गेलं. तोच रंग, तीच तुरीची डाळ. आता आईकडे पण हिंग पावडर डबी आणतात.
मधुरीमात हा लेख आल्याबद्द्ल अभिनंदन.
खडा हिंग तसा चिवट/ चिकट असतो
खडा हिंग तसा चिवट/ चिकट असतो ना पण? लहान बाळांचं पोट दुखत असेल तर उगाळून लावतात तोच ना?
योकु धन्यवाद , आणून बघते
योकु धन्यवाद , आणून बघते पतंजली चा हिंग.
मी खडा हिंग म्हणतेय तो वनदेवी छाप 7 नं चा खडा हिंग. 7 नं ही महत्वाचं आहे आणणार असलात तर.
हो खडा हिंग चिवटच असतो कुटला नाही जात वावे , तुरीच्या डाळीमध्ये ठेवला की चिवटपणा कमी होतो आणि कुटता येतो.
लहान बाळांचं पोट दुखत असेल तर उगाळून लावतात तोच ना? >> हो लावतात.
मधुरीमात हा लेख आल्याबद्द्ल अभिनंदन. >>> थँक्यू अंजू
सुंठीवरुन धागा आता खडेहिंगावर
सुंठीवरुन धागा आता खडेहिंगावर आला आहे
सुंठ उगाळण्याचा व्याप जमत
सुंठ उगाळण्याचा व्याप जमत नसेल तर ताकाला दोन तीन चमचे आल्याचा रस लावला तर कसे? प्लस चिमूट चिमूट शेंदेलोण- पादेलोण- जिरे पावडर!
आमच्याकडे हिंगाला अगदी
आमच्याकडे हिंगाला अगदी केशराच्या बरोबरीनं वागवायच्या आ. आणि प. सासूबाई.
खाली मोठ्ठं चौपदरी जाजम घेऊन हिंगाचे दगड खलबत्यात कुटायचे. मग ते काढून फिरकीच्या झाकणाच्या डबीत. मग त्याच खलबत्यात तीळकूट म्हणजे जवसाची चटणी कुटून घेऊन मग खलबत्ता धुवून पुसून जागेवर.
भाजीत हा असा हिंग वापरला की चव येते म्हणायच्या.
आलीच आहे गाडी सुंठेवरून
आलीच आहे गाडी सुंठेवरून खडाहिंगावर तर...
अस्सल हिंग आणला मी आज. दुकानदाराकडे ही लहानच (पावभराची बहुतेक) पेटी होती याची. आत घनस्फटीक-गोळे होते हिंगाचे.
विचारलं त्याला की अस्सल आहे का तर अगदी कणभर दिला त्यानी मला आणि म्हणे दाढेखाली घेऊन चावा (जिभेच्या टोकाला लागला तर जाम
झणकतो) तसा चावला तरीही अक्षरशः सुया टोचल्यासारखं झोंबल आणि बोळकं हिंगमय झालं माझं.
मिक्सर-ग्राईंडर मध्ये बारीक होणारच नाही म्हणाला, जरा अजून बारीक कुटून पाव-चमचा मिठासोबत ग्राईंड करा म्हणालाय.
५०/- ला फक्त १० ग्रॅम. वजनानी जड असल्यानी एकच लहानसा तुकडा बसला. म्हणून अजून घेतला मग. कल पौडर करके रखेंगा...
कुठलं दुकान? कुठला ब्रॅन्ड ?
कुठलं दुकान? कुठला ब्रॅन्ड ?
इकडेच धानोरी मध्ये आहे दुकान.
इकडेच विमाननगरात आहे दुकान. वनदेवी ब्रॅंड.
आमची आजीसुद्धा खापराचा तुकडा
आमची आजीसुद्धा खापराचा तुकडा रसरशीत तापवून कढीत सोडत असे. ती त्याला ठिकरीची फोडणी म्हणे. फक्त कढीलाच नव्हे तर आणखीही काही आमट्यांना ती अशी फोडणी देई. सुंठीविषयी सांगायचं तर गेल्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत किंचित मिरमिरीत अथवा तिखट चवीसाठी स्वयंपाकात सुंठ वापरली जात असे. असे एक मत आहे की मिरचीचा प्रवेश भारतीय स्वयंपाकात चारपाचशे वर्षांपूर्वी तुरळक प्रमाणात झाला. सर्वसामान्य घरांत मिरची वापरली जाण्यासाठी आणखी दोन शतके जावी लागली. त्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्या आज्यापणज्या झालेल्या बाया हयात होत्या, त्यांच्या आठवणींतल्या बालपणीच्या स्वयंपाकात त्यांच्या आज्यापणज्यांनी सुंठ वापरलेली असे. मिरी, सुंठ, पिंपळी, त्रिफळे, आले हे पदार्थ मिरमिरीत चवीसाठी वापरले जात. त्यामुळे ह्या आज्यापणज्यांच्या लेकीनातींच्या आठवणीत ह्या पदार्थांचा वापर केलेला कदाचित अजूनही असेल. मी स्वतः माझ्या लहानपणी सुंठ घातलेले पोहे, साबूदाण्याची खिचडी, आले घालून बटाट्याची भाजी खाल्ली आहे. आले मिरी आणि त्रिफळे तर अनेक पदार्थात वापरतात अजूनही.
हिंगाविषयीची आठवण सांगायची तर आमच्याकडे पूर्वी इराणी हिंग किंवा काडीवाला हिंग वापरत. झाडाचे खोड तासून त्यावर जमलेल्या कॉफी किंवा चॉकलेटी काळपट रंगाच्या खडबडीत चकत्या कम गोळ्यांसारखा तो दिसे. त्याला झाडाच्या खोडाच्या सालींच्या काड्याही चिकटलेल्या असत. त्या लाकडी काड्यांसकटच तो कुटला जात असे. लोणच्याला तर हाच हिंग लागे. आता तो पंचवीस हजार रुपये किलो झाला आहे. दहा ग्रॅमला अडीजशे रुपये हा काही महिन्यांपूर्वीचा भाव. मशीदबंदरला वनदेवी हिंगवाल्यांचे घाउक विक्रीचे दुकान होते. आता त्यांची विभागणी होऊन दोन दुकाने झाली आहेत. तिथून हिंग आणला जात असे.
काय मस्त चाललय हे सुंठ हिंग
काय मस्त चाललय हे सुंठ हिंग प्रकरण..
धाग्याच्या शंभरीसाठी आनंद झाला.. सद्ध्याच्या जमान्यातल्या ऐर्या गयर्या नत्थु खैर्या धाग्यालाही १०० कोटी पडतात अन चांगले चुंगले धागे बिचारे हरवून जातात त्यावेळी एकदम सिलेक्टेड पब्लिक अन संयत चर्चा चालत ह्या धाग्याने शतक गाठलं त्याचं खुप अप्रुप वाटतय मला..
आमच्याकबे आजही पोह्यात,
आमच्याकडे आजही पोह्यात, बटाट्याच्या भाजीत किसलेलं आलं घालतात.
५०/- ला फक्त १० ग्रॅम. वजनानी
५०/- ला फक्त १० ग्रॅम. वजनानी जड असल्यानी एकच लहानसा तुकडा बसला. म्हणून अजून घेतला मग. कल पौडर करके रखेंगा...
<<
दहा ग्रॅमला अडीजशे रुपये हा काही महिन्यांपूर्वीचा भाव.
<<
हीरा यांनी सांगितलेली किंमत जास्त ऑथेंटिक अन म्हणून तो हिंग जास्त प्युअर असावा. योकु इतका स्वस्त मिळत असेल तर स्टॉक करून ठेवा. अर्थात हा संप्लवनशील असल्याने घट्ट झाकणाच्या डबीत थंड जागी ठेवा.
हिंग = असा-फेटिडा. Asafoetida /æsəˈfiːtɪdə/
असा = झाडाचा डिंक निघतो तो. उदा बाभूळ, निंब इ. झाडांच्या खोडाला जखम केली तर आतला सॅप बाहेर येऊन वाळतो, अन हा खायचा लाडूचा डिंक बनतो. खैराच्या झाडाच्या अशाच डिंकाचा काथ बनतो.
फेटिड = घाण वास येणारा.
तर असा उग्र अगदी शुद्ध घेतला तर आपल्यालाही नकोसा होणारा हा हिंग. बहुतेक युरोपियन्सना हा अजिबात सहन होत नाही.
याचे खडे नुसते वापरून अतीशय उग्र चव येते, म्हणून बेसनात मिक्स करून पावडर बनवलेली असते. जी आपण नॉर्मली हिंग म्हणून वापरतो. तोळ्या माश्याच्या हिशोबाने पूर्वी शेकड्यांनी मोजलेल्या कैर्यांच्या लोणच्यात वापरत. ३ फूट उंचीच्या भल्या मोठ्या चिनी मातीच्या, फिरकीच्या झाकणाच्या २ बरण्या भरून लोणचं आमच्या घरी होई. अन ते वर्षभरात फस्तही होई.
(या शेकड्याची पण गम्मत. आमच्याकडे ३२ फाड्यांचा शेकडा. ४ कैर्या = १ फाडा. म्हणजे ज्याला शेकडा उर्फ १०० म्हणायचे त्या कैर्या अॅक्चुअली १२८ नग)
हे इंटरेस्टिंग विकी पेज
बादवे.
बादवे.
सुंठीला अल्टरनेटिव्ह म्हणून आलं चालत नाही. सुंठ ही सुंठच. त्यात चुन्याचाही जहालपणा अॅडेड असतो.
फार चांगली माहीती.
फार चांगली माहीती.
हायला मी आणलेला स्वस्तच म्हणायचा मग. मला सकाळी खाल्लेल्या त्या हिंगकणाचे आताही आठवून झणका! तर हा अजून शुद्ध हिंग कसा असेल?
आ.रा.रा. , प्रतिसाद आवडला.
आ.रा.रा. , प्रतिसाद आवडला. तुम्ही शेकड्याची गंमत लिहिलीय्त तशीच मणाचीही गंमत असायची. बंगाली मण, मोगलाई मण मला वाटते वेगवेगळे असायचे. शिवाय आजही शेतकर्याकडून विकत घेताना शेतमाल क्विन्टलवर घेतला तरी व्यापारी एक क्विन्टलच्याऐवजी ११० किलो मागतात आणि शेतकरी खळखळ न करता देतात. पालेभाज्यांच्या गड्ड्या, लिंबे यातही तेच. ही अर्थात व्यापार्यांची शेतकर्यांवर राजीखुशीची जबरदस्ती.
हिंगामध्ये बेसन मिसळतात यात थोडी दुरुस्ती किंवा भर. माझ्या माहितीप्रमाणे शुद्ध हिंगाचे खडे/चकत्या मिलमध्ये बारीक करताना आणि ती पूड वर्गवारी करून लहान मोठ्या डब्यांत भरताना त्याचे बारीक कण उडतात. ते श्वासावाटे फुप्पुसात जाऊन श्वसन रोग होत असत. साधारण ८०-९० वर्षांपूर्वी भारतात या कामासाठी बालकामगार वापरले जात. कोवळ्या वयातच ते अशा रोगांना बळी पडत. ही गोष्ट लक्ष्यात आल्यावर तत्कालीन नेत्यांनी या पद्धतीविरुद्ध एक चळवळ उभारली. मग एक कायदा झाला. त्याअन्वये शुद्ध हिंगात गव्हाचे बारीक पीठ अथवा बारीक रवा प्रमाणित स्वरूपात मिसळून मगच त्याची पावडर करून डब्यांमधून भरायची सक्ती झाली. याला हिंग बांधणे असे नाव पडले. बांधानी हिंग अथवा मराठीत बांधणीचा हिंग म्हणजे मुद्दाम मिसळ करून सौम्य अथवा डाय्ल्यूट केलेला हिंग. अलीकडे कदाचित बेसन वापरतही असतील. कारण बरीचशी हिंगमिश्रणे पिवळसर दिसतात. असा बांधलेला हिंग लोणच्यांना चालत नाही. त्यातल्या पिठांमुळे लोणची नासतात. अनेकदा आपण हिंगाच्या पारदर्शक गोट्या पाहातो. पण खडेस्वरूपातून गोळास्वरूपात आणतानासुद्धा हिंगात थोडे पीठ घालावे लागते. हिंगडबीवरचे कन्टेन्ट्स जर आपण वाचले तर त्यात हे मिश्रण आहे असे लिहिलेले असते.
मस्त माहिती हिरा. तुमचे
मस्त माहिती हिरा. तुमचे प्रतिसाद नेहमीच आवडतात.
आता सगळ्यांनी हिंगाबद्दल एक धागा काढून त्यात डकवा ना हे. इथे खूपच अवांतर होतंय.
वाह हिरा, कित्ती सुंदर
वाह हिरा, कित्ती सुंदर लिहीलंय तुम्ही. ग्रेट.
आ रा रा इंटरेस्टींग प्रतिसाद.
भारिच माहिती मिळाली, हिन्ग
भारिच माहिती मिळाली, हिन्ग -मिरे दोन्ही आवडते, दोन्हीचा वास आणी दाताखाली आल्यावर येणारा झणका आवडतो मला, योकु सारख प्युअर हिन्ग आणुन स्वाद चाखायला हवा, माझ्या मावशिकडे खडा हिन्ग असे, एका घट्ट झाकणाच्या डबित ठेवुन ती डबी अजुन एका डब्यात ठेवलेली असे .. वास उडु नये म्हणून.
योकु, मानलं हो तुमच्या
योकु, मानलं हो तुमच्या उत्साहाला ! कसा आहे हा खडा हिंग ते पण लिहा इथे. सुंठीच्या कढी चा तर फोटो नाहीये निदान सणसणीत तापलेली पळी ताकात बुडवतानाचा आणि हिंगाचा तरी फोटो येऊ दे इथे.
आ. रा. रा. आणि हिरा मस्त प्रतिसाद आणि माहिती.
टीना , छान लिहिलं आहेस ग.
आमच्याकडे पण हिंगाला अगदी स्पेशल ट्रीटमेंट असायची. लोणच्याचा हिंग तर जाऊबाई नेहमी स्वतः च कुटत असत. कामवाली बाई तर सोडाच पण आम्हाला ही कुणाला देत नसत कुटायला.
आ. रा. रा. आणि हिरा,
आ. रा. रा. आणि हिरा, तुमच्यामुळे किती छान माहिती मिळत आहे इथे.
योकू, किती उत्साही आहेस.
आमच्याकडे माहेरी पूर्वी तुरीच्या डाळीत हिंगाचे खडे असत ते आठवले. पण तो हिंग लोणचे आणि गोडा मसाला यासारख्या वर्षभराच्या साठवणूकीसाठीच वापरला जायचा. रोजच्या फोडणीत पावडरच असे.
या हिंगावरुन इथे एकदा गंमत झाली. मी मुलाला आणायला शाळेत गेले होते. नेहमीच्या जागी गाडी पार्क करुन शाळा सुटायची वाट बघत होते, तर एक आजी तिच्या गाडीतून उतरुन माझ्या गाडीजवळ आली आणि खुणेनेच काच खाली करायला सांगितले. मी काच खाली करताच तिने विचारले की कोलिक असलेल्या बाळासाठी तुला काही उपाय माहित आहे का ? अजिबात ओळख नसलेली स्त्री मला असे का विचारतेय हे मला कळेना आणि मी गोंधळून इथे इतरांनी मला पढवलेलेच तिला ऐकवले - ' डिशवॉशर किंवा वॉशिंग मशीन वर कारसीटमधे ठेव बाळाला.' मग तिने खुलासा केला की तिच्या नात्यात कुणाला तरी लहान बाळ झाले होते आणि त्या बाळाला कोलीकचा त्रास होता. तिने खूप वर्षांपूर्वी एका भारतीय व्यक्तीकडे काम केले होते त्यामुळे बाळाच्या पोटाला पोटदुखीसाठी काहीतरी ब्राउन लावतात इतपत तिला माहित होते पण ते काय असते ते निटसे आठवत नव्हते. मी भारतीय तेव्हा मला माहित असणार म्हणून ती मला विचारत होती. तेव्हा इथे पावडर केलेला हिंग देखील शिकागोहून आणणे, तो पुरवून वापरणे आणि संपला की त्याशिवायच स्वैपाक अशी अवस्था. त्यामुळे माझ्याही लगेच डोक्यात आले नाही की ब्राउन प्रकरण हिंग असावे ते. शेवटी कुणाला तरी विचारुन उद्या सांगते असे सांगितले. तिच्या चेहर्यावरचे भाव - ' अशी कशी ही बाई, एक मूल आहे पण काहीच कसे माहित नाही!'
माझी आजी घरात लहान मुलांन गॅस
माझी आजी घरात लहान मुलांन गॅस झाले की,
खडा हिंग कुटुन ( काळसर तपकिरी रंगाचा गवत चिकटलेला) त्यात नारळाचे तेल एकत्रित करून, जरासे लोखंडी पळीत शेकून, बाळाच्या बेंबी पासून अर्धा इंच सोडून गोलाकर लेप थापायची.
मग बाळाचे पाय वर करून छातीला लावायची. भसकन गॅस बाहेर यायच आणि मुल रडायच थांबायचं.
दुसरा एक कोकम प्रयोग सुद्धा करायची लहान बाळांवर ज्याने गॅस बाहेर यायचा, ज्या बाळांना कोलिकचा त्रास असायचा.
काहि व्यापारी तर , बेसन महाग
काहि व्यापारी तर , बेसन महाग म्हणून असे करतात. कमर्शियल हिंगात मैदा, पिवळा रंग आणि जरासाच हिंग असतो.
नाहितर गावच्या घाण्यात, रवा पीठी खडा हिंग कुटताना घालतात म्हणून थोडा फिक्कट रंग होतो आणि डबीत चरचरीत रहातो.
त्याच्याहि पुढे, कॉर्न स्टार्च सुद्धा घालतात. भेसळीचा माल असतो हा.
रवा घातलेला कधीच नाही एकलं.
रवा घातलेला कधीच नाही एकलं.
मला मैदा चालत नसल्याने बाजारी हिंग बंद केले. आता खडा हिंगच वापरत्र.
फारच मस्त प्रतिसाद हीरा आणि आ
फारच मस्त प्रतिसाद हीरा आणि आ. रा. रा. यांचे! माझ्या माहितीत खूप भर पडली.
आ. रा. रा., हिंग नेमक्या कोणत्या झाडाचा आसा? तुम्ही लिहिले असेल तर मला लक्षात आले नाही.
आ.रा.रा. आणि हीरा, मस्त
आ.रा.रा. आणि हीरा, मस्त माहिती!
अति अवांतर:
१ शेकडा म्हणजे प्रत्यक्षात १२८ कैर्या, असं तुम्ही लिहिलंय. यातले जे वरचे २८ आहेत त्यालाच ( अशा प्रकारे जादा दिलेल्या वस्तूंना) पासंग म्हणतात का? की माझा काही घोटाळा होतोय?
हीरा, मिरचीऐवजी आलं, सुंठ इत्यादी वापरण्याची माहितीही मस्तच. उकडलेल्या बटाट्याच्या भाजीत आलं घालतात अजूनही.
माझ्या २६/०९ (१३. ३१) च्या
माझ्या २६/०९ (१३. ३१) च्या प्रतिसादात थोडी गडबड झाली आहे. इराणी हिंगाचा दहा ग्रॅमचा दर मी अडीजशे लिहिला आहे तो दीडशे पाहिजे. म्हणजे किलोला २५०००च्या ऐवजी १५००० रु . पाहिजे.
छान माहिती मिळते आहे, एवढ
छान माहिती मिळते आहे, एवढ हिन्गाबद्दल माहिती नव्हत

लेख आणि प्रतिसाद दोन्हीही निवडक १०त
इंटरेस्टिंग माहिती. हे
इंटरेस्टिंग माहिती. हे हिंगाबद्दलचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यावर हलवता येतील का? नंतर सापडायला सोपे जाईल.
नेमक्या कोणत्या झाडाचा आसा? >
नेमक्या कोणत्या झाडाचा आसा? >> असाफोटिडा या शब्दाची फोड आहे ती. असा म्हणजे झाडाचा डिंक. हिंगासाठी कोणत्या झाडाचा डिंक काढतात? त्यासाठी हे पहा- https://en.wikipedia.org/wiki/Ferula
बांधानी हिंग का म्हणतात याची माहिती मस्त. 'हीरा' असाही एक हिंगाचा ब्रॅन्ड आहे ना?
Pages