सुंठीची कढी

Submitted by मनीमोहोर on 18 September, 2018 - 18:48

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.

आमच्या घरात काही कार्य झालं किंवा सणावाराचं ओळीने चार पाच दिवस जड जेवण झालं असेल तर पाचक म्हणून, तोंडाला रुची यावी म्हणून ही केली जाते. “माझं पोट जरा ठीक नाहीये... सुंठीची कढी केली तर उद्या सकाळी घेईन म्हणतो “ अशी वातावरण निर्मिती करत माझ्या नणंद बाईंना ही कढी करण्यासाठी त्यांचा एखादा भाऊ त्याना गळ घालतो. त्या ही ‘ मी का म्हणून करू, मी माहेरवाशीण आहे ह्या घरची, हवी असेल तुला तर सांग तुझ्या बायकोला करायला ’ वैगेरे लटकेच त्याला सुनावतात. पण त्या ही कढी करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्याना करायची हौस ही आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे त्या उद्या नक्की कढी करतील ह्याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते.

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चहा कॉफी वगैरे झाली की त्या कढी करायला घेतातच. हीची रेसिपी अशी फार खास नाहीये पण तरी ही हा आमच्या घरचा फार खास पदार्थ आहे. अगदी सणावाराच्या पक्वान्नां पेक्षा ही घरात सर्वाना आवडणारा... करायचं काय तर आंबट ताकात सुंठ उगाळायची, ( कढी साठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.) खरं तर हेच फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे. सुंठ पावडर वापरून ती टेस्ट येत नाही. त्यामुळे सुंठ उगाळावीच लागते. आमच्या घरात माणसं खूप असल्याने आणि ही कढी सर्वांचीच आवडती असल्याने तशी करावी ही लागते भरपूर प्रमाणात. नणंद बाई माजघरात बसून सहाणेवर सुंठ उगाळत असतात. स्वयंपाकाच्या गडबडीतून वेळ काढून जरा जास्त दूध, साखर घातलेल्या आणि जायफळ लावलेल्या गरम गरम कॉफी चा कप श्रमपरिहार म्हणून त्यांची एखादी सून त्याना आणून देते. घरातली मुलं ही छोट्या छोट्या सहाणेवर सुंठ उगाळून आत्याआजीला मदत करत असतात. ओटीवरून ही किती झालीय सुंठ उगाळून , लावू का हातभार उगाळायला अशी मदतीची ऑफर येते. कढीच्या आशेने हळू हळू घरातली सगळी मंडळी नणंदबाईंभोवती गोळा होतात आणि सुंठ उगाळता उगाळता तिथेच गप्पा ही रंगतात. शेवटी पुरेसा तिखट पणा ताकात उतरतो आणि सुंठ उगाळण्याचे किचकट काम एकदाचे सम्पते. मग त्यात थोडे मीठ, थोडा हिंग घालतात. आणि शेवटी आमच्याकडे ह्या कढीसाठीचा म्हणून एक खास ठिक्कर/ दगड आहे, तो गॅस वर चांगला गरम करून त्या ताकात घालतात. ठिकरीमुळे ते ताक हलकेसे गरम होतं. . . बस्स इतकी च रेसिपी . झाली सुंठीची कढी तयार... ती ठिक्कर ताकात घातली की चुर्रर्रर्र असा आवाज येतो त्यामुळे कढी तयार झाल्याचं सगळ्या घराला समजत . प्रत्येकाला अर्धी पाऊण वाटी कढी दिली जाते. ती हिंगाचा स्वाद असलेली, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी चविष्ट कढी गप्पा मारत मारत, घुटके घेत घेत, नणंद बाईंचं कौतुक करत सगळेजण enjoy करतात.

अशी ही आमच्या घरची सुंठीच्या कढीची कहाणी. माझ्या नणंदबाई आज ऐंशीच्या पुढे असून ही अजून ही सुंठ उगाळून कढी करण्याचा त्याना उत्साह आणि हौस आहे. हा आमच्या कुटुंबाचा एक खास पदार्थ आहे . सुंठीची कढी ह्या शब्दालाच आमच्या घरात एक वलय प्राप्त झालं आहे कारण मनाला उल्हसित करणाऱ्या अनेक रम्य आठवणी ह्या कढीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढची अनेक वर्षे हा पदार्थ आमच्या घरचा अगदी खास असेल यात तिळमात्र संदेह नाही.

ही रेसिपी मी एका contest साठी लिहिली होती. थीम होती तुमची फॅमिली रेसिपी .. आज माबोवर शेअर करतेय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही पूनम हीरा हिंग म्हणजेच वर प्रतिसांदात असलेला सात नंबर हिंग (बहुतेक).
मी तरी हिरा हिंग असा ब्रँड पाहीलेला नाही. पण दुकानदारांना हिरा हिंग मागितला की महागडा पण चांगला हिंग देतात नेहेमी.

कर्नाटकचा हिंग प्रसिद्ध आहे. आमच्या गावातल्या कर्नाटकात माहेर असलेल्या बायका चालल्या की त्यांच्यकडे अस्सल हिंगड्याच्या ऑर्डरी जातात. वर्षभराच्या हिंगड्याची तजवीज केली जाते.

ह्या सगळ्या प्रतिसादांतून हिंग किती महत्वाचा आहे आपल्या रोजच्या जेवणात हे कळतंय. Wink
पूर्वी जेव्हा डब्यांतून हिंग मिळायचा नाही तेव्हा हा असाच हिंग घरोघरी वापरत असावेत.

हो ना,
आत्तापर्यंत कोणी 'हिंग' लावून येत नव्हते माबोवर. आता हिंगाचा उल्लेख आला अन झाडून सगळे इथे हजेरी लावत आहेत.
(एक सुमार शाब्दिक कोटी- गोड (हिंग) मानुन घ्या)

मस्त च माहिती...या धाग्यावर 2 प्रतिसाद जरी नवीन दिसले तरी मी तुटून पडते..मज्जा येतेय नवीन माहिती वाचायला...

आमच्याकडे गहु भरडसर दळून त्याचा जाडसर रवा बनवून त्या रव्याचा गुळाचा शिरा बनवतात त्यात चांगली अर्धा चमचा सुंठपूड व अर्धा चमचा जायफळ पूड घालतात.

वरती कोणीतरी (बहुधा झम्पी यांनी) हिंगातल्या भेसळीचा उल्लेख केलाय. पण भारतात शुद्ध हिंगात बारीक रवा, मैदा, तांदूळपीठ यांचे प्रमाणात मिश्रण करणे याला भेसळ मानीत नाहीत. आपल्याकडे हिंगपूड ही बहुतेक वेळा काम्पाउन्डेड असते. आपण मराठीत त्याला बांधणी हिंग म्हणतो. हे अधिकृत असते. बहुतेक सर्व हिंगपुडींमध्ये ३०% शुद्ध हिंग आणि बाकी रवा/मैदा/तांदूळपीठ आणि बाभूळडिंक, हळद वगैरेंचे मिश्रण असते. अलीकडे शुद्ध हिंगपूडसुद्धा मिळते. कारण आता आधुनिक यंत्रे वापरून भुकटी करताना हिंगकण फारसे बाहेर उडत नाहीत.

स्वाती 2 मस्त आठवण.

हिंगा वरचे सगळेच प्रतिसाद interesting.

पूनम मला पण अस वाटतंय की हीरा एक ब्रँड होता हिंगाचा. Sure नाही मात्र.

Submitted by सायो on 27 September, 2018 - 08:23
हो ना,
आत्तापर्यंत कोणी 'हिंग' लावून येत नव्हते माबोवर. आता हिंगाचा उल्लेख आला अन झाडून सगळे इथे हजेरी लावत आहेत. >> पाफा, सही कोटी.

मी लिहिलेल्या प्रतिसादानंतर अचानक ३० नवीन पाहून घाबरलो ना मी!
म्हटलं काय असं चुकीचं लिहिलं की धागा पेटला!!

तर, प्रतिसाद लिहिणार्‍या सर्वांना धन्यवाद.

Submitted by पूनम on 27 September, 2018 - 17:13 चा हा प्रतिसाद कोणत्या झाडाचा डिंक ही माहिती देतो, तशीच माहिती मी दिलेल्या विकी लिंकवरही आहे. फक्त थोडी वेगळी आहे. ती अशी:

>>
Asafoetida is thought to be in the same genus as silphium, a plant now believed to be extinct, and was used as a cheaper substitute for that historically important herb. The species is native to the deserts of Iran and mountains of Afghanistan, but is mainly cultivated in nearby India
<<

***
हीरा हिंग हा हिंगाचा फेमस ब्रँड आहे. भरपूर स्ट्रॉंग असतो. खडा अन बांधणी, दोन्ही प्रकारात मिळतो. डबी दिसली की फोटो टाकतो.

>>मी लिहिलेल्या प्रतिसादानंतर अचानक ३० नवीन पाहून घाबरलो ना मी!
म्हटलं काय असं चुकीचं लिहिलं की धागा पेटला!!>> म्हणजे तुमचे प्रतिसाद धागा पेटवतात हे मान्य आहे तर तुम्हांला? Wink

पेटवायचाच तर मिरची भारतात कधी आली अन शिवाजी महाराजांनी मिरची कधी खाल्ली असेल का? याबद्दलचे त्या आपल्याह्यांचे जे काय होते त्याबद्दल लिहिले असते म्हणतो Wink :दिवे"

हिरा, ते मी कॉर्न स्टार्च मिसळण्याला “ भेसळ “ म्हटलेय. अतिशय स्वस्त पडतो कॉर्नस्टार्च .

गावी, मोठ्या प्रमाणावर हिंग कुटताना, तांदूळ पीठी मिक्स करतात. हा पिवळा दिसत नाहिच.
पण लोणच्यात किंवा घरगुती जेवणात, थोड्या प्रमाणात ताजाच कुटुन घालायचा असेल तर नुसतो कुटला जायचा. आमच्या गावी घरी, हे स्पटिकासारखे दिसणारे तपकीरी खडे असत. जमिनीत, एक खड्डा असतो ( उखळ नाही), त्यात उभे राहिइन कुटायचा. कण इतक्या वर उडत नाहित. खलबत्यात कुटायचा असेल तर थोडाफार तर, नाकाला फडका आणि खड्यांना जरासा तेल लावून कुटले की नाहि उडत.
हे ३० वर्षापुर्वीच्यस आठवण आहेत.

अहो स्पार्क आहेच, त्याबद्दल शंका नाही Happy
>>पेटवायचाच तर मिरची भारतात कधी आली अन शिवाजी महाराजांनी मिरची कधी खाल्ली असेल का? याबद्दलचे त्या आपल्याह्यांचे जे काय होते त्याबद्दल लिहिले असते म्हणतो >> जेनो काम तेनो थाय.. तुम्ही पुरावे देत बसाल तर त्यात मजा नाही Wink

सायो Lol

आमच्या इथे शंकरछाप नावाचा हिंग येतो खडा . एकदम मस्त त्यावर लेबल वगैरे नसतं. हे नाव सांगितले तर बरोबर देतात दुकानवाले.

जमिनीत, एक खड्डा असतो ( उखळ नाही), त्यात उभे राहिइन कुटायचा. कण इतक्या वर उडत नाहित>> बरोबर. हा खड्डा म्हणजे जमिनीच्या लगत पुरलेला गोल दगडी खल असतो. त्याला वाहन/व्हाइन असे म्हणतात कोकणात. त्यात मुसळाने भात कांडून पोहे तयार केले जायचे.

मॅगी , बरोबर . मी आईला विचारले , वायनात कुटणे म्हणतात.
तो माजघरात असतो. मी बर्‍याच वेळेला अडखळलेय त्यात.

बरीच कुटणी होतात त्यात.

<<पेटवायचाच तर >>

दगडफूल, मेतकूट, सत्तूचे पीठ हे काय प्रकार आहेत, त्यांच्याबद्दलहि लिहा.

अनामिका, तो शंकरछाप हिंग मी पाहिला आहे. पाच ग्रॅमच्या मापात छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांतून मिळायचा बेळगाव कारवारकडे. तोच इराणी खडा हिंग असावा असं वाटतंय. bdw, मुंबईत दसरादिवाळीच्या सुमारास भरणाऱ्या ग्राहकपेठांत कर्णाटकातल्या चंद्रगिरी ॲग्रो किंवा अशाच काहीशा नावाने मसाल्यांचे स्टॉल्स असायचे. त्यातले सगळेच मसाले, विशेषत: हिंग उत्तम असायचा. काजूगर देखील उत्तम असायचे त्या स्टॉलवर.

मनीमोहोर, धाग्याचे नाव बदला. : सुंठीची कढी हिंग मारके Bw

कढीची रेसीपी एकदम छान! त्याबरोबरच सुंठीबद्दल आणि आता लगे हात हिंगाबद्दलही बरीच माहिती मिळाली.

ह्या हिंग रेझिनचा अर्क तेल स्वरूपात अत्तर शास्त्रात वापरतात. अग्दी अगदी कमी प्रमा णात. कोणतेही पदार्थ डायल्यूट करून वापरणे म्हणजे भेसळ ना ही कारण प्युअर स्वरूपात ते ह्युमन कंझ म्शन ला अव घडच पडेल. तुमचे साधे परफ्यूम म्हणजे फाइन फ्रॅग्रन्स फवारा उडवताना त्यात हिंग आहे अशी कल्पना करू नका. इतर अनेक उत्पादनांत अत्तरे कंपाउंड जातात त्यात वापरले जातात. हेच नव्हे नैसर्गिक रेझिन्स अतिशय दुर्मिळ व फार रेव्हरन्स ने वापरली जातात. जबरदस्त नावा जलेली अत्तर कंपाउंड्स आहेत त्यात असे नैसर्गिक घटक पदार्थ असतातच.

बरोब्बर हिरा. मलापण एका दुकानदाराने हेच सांगितलं होतं, की तो हिंग इराणी असून इथे शंकरछाप म्हणून विकतात.

Pages