सुंठीची कढी

Submitted by मनीमोहोर on 18 September, 2018 - 18:48

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.

आमच्या घरात काही कार्य झालं किंवा सणावाराचं ओळीने चार पाच दिवस जड जेवण झालं असेल तर पाचक म्हणून, तोंडाला रुची यावी म्हणून ही केली जाते. “माझं पोट जरा ठीक नाहीये... सुंठीची कढी केली तर उद्या सकाळी घेईन म्हणतो “ अशी वातावरण निर्मिती करत माझ्या नणंद बाईंना ही कढी करण्यासाठी त्यांचा एखादा भाऊ त्याना गळ घालतो. त्या ही ‘ मी का म्हणून करू, मी माहेरवाशीण आहे ह्या घरची, हवी असेल तुला तर सांग तुझ्या बायकोला करायला ’ वैगेरे लटकेच त्याला सुनावतात. पण त्या ही कढी करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्याना करायची हौस ही आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे त्या उद्या नक्की कढी करतील ह्याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते.

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चहा कॉफी वगैरे झाली की त्या कढी करायला घेतातच. हीची रेसिपी अशी फार खास नाहीये पण तरी ही हा आमच्या घरचा फार खास पदार्थ आहे. अगदी सणावाराच्या पक्वान्नां पेक्षा ही घरात सर्वाना आवडणारा... करायचं काय तर आंबट ताकात सुंठ उगाळायची, ( कढी साठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.) खरं तर हेच फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे. सुंठ पावडर वापरून ती टेस्ट येत नाही. त्यामुळे सुंठ उगाळावीच लागते. आमच्या घरात माणसं खूप असल्याने आणि ही कढी सर्वांचीच आवडती असल्याने तशी करावी ही लागते भरपूर प्रमाणात. नणंद बाई माजघरात बसून सहाणेवर सुंठ उगाळत असतात. स्वयंपाकाच्या गडबडीतून वेळ काढून जरा जास्त दूध, साखर घातलेल्या आणि जायफळ लावलेल्या गरम गरम कॉफी चा कप श्रमपरिहार म्हणून त्यांची एखादी सून त्याना आणून देते. घरातली मुलं ही छोट्या छोट्या सहाणेवर सुंठ उगाळून आत्याआजीला मदत करत असतात. ओटीवरून ही किती झालीय सुंठ उगाळून , लावू का हातभार उगाळायला अशी मदतीची ऑफर येते. कढीच्या आशेने हळू हळू घरातली सगळी मंडळी नणंदबाईंभोवती गोळा होतात आणि सुंठ उगाळता उगाळता तिथेच गप्पा ही रंगतात. शेवटी पुरेसा तिखट पणा ताकात उतरतो आणि सुंठ उगाळण्याचे किचकट काम एकदाचे सम्पते. मग त्यात थोडे मीठ, थोडा हिंग घालतात. आणि शेवटी आमच्याकडे ह्या कढीसाठीचा म्हणून एक खास ठिक्कर/ दगड आहे, तो गॅस वर चांगला गरम करून त्या ताकात घालतात. ठिकरीमुळे ते ताक हलकेसे गरम होतं. . . बस्स इतकी च रेसिपी . झाली सुंठीची कढी तयार... ती ठिक्कर ताकात घातली की चुर्रर्रर्र असा आवाज येतो त्यामुळे कढी तयार झाल्याचं सगळ्या घराला समजत . प्रत्येकाला अर्धी पाऊण वाटी कढी दिली जाते. ती हिंगाचा स्वाद असलेली, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी चविष्ट कढी गप्पा मारत मारत, घुटके घेत घेत, नणंद बाईंचं कौतुक करत सगळेजण enjoy करतात.

अशी ही आमच्या घरची सुंठीच्या कढीची कहाणी. माझ्या नणंदबाई आज ऐंशीच्या पुढे असून ही अजून ही सुंठ उगाळून कढी करण्याचा त्याना उत्साह आणि हौस आहे. हा आमच्या कुटुंबाचा एक खास पदार्थ आहे . सुंठीची कढी ह्या शब्दालाच आमच्या घरात एक वलय प्राप्त झालं आहे कारण मनाला उल्हसित करणाऱ्या अनेक रम्य आठवणी ह्या कढीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढची अनेक वर्षे हा पदार्थ आमच्या घरचा अगदी खास असेल यात तिळमात्र संदेह नाही.

ही रेसिपी मी एका contest साठी लिहिली होती. थीम होती तुमची फॅमिली रेसिपी .. आज माबोवर शेअर करतेय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच प्रतिसाद छान. हिंगाबद्दल बरीच माहिती मिळाली.
मी हिंग आजिबात वापरत नव्हते. आता एकाद वर्षापासुन वापरायला सुरुवात केली आहे.
मी वर जसं 'असं कसं सुंठ माहित नाही' असा प्रश्न विचारला होता, तसं मला इथेच कुठल्या तरी धाग्यावर कुणीतरी 'हिंग वापरतच नाही' असा आश्चर्यमिश्रित प्रश्न विचारला होता. Happy
मग मी हिंग वापरु लागले

शेकडा म्हणजे प्रत्यक्षात १२८ कैर्या, असं तुम्ही लिहिलंय. यातले जे वरचे २८ आहेत त्यालाच ( अशा प्रकारे जादा दिलेल्या वस्तूंना) पासंग म्हणतात का? की माझा काही घोटाळा होतोय?>>
माझ्या या प्रश्नाचे उत्तर का हो कुणी देईना? की शब्दार्थाच्या धाग्यावरच विचारायला हवं?

असू शकेल वावे. तराजूच्या दोन्ही पारड्यांच्या वजनात फरक असेल तर बारिकसा दगड वगैरे ठेवून तो फरक मिटवतात त्या वस्तूला पासंग म्हणतात.
पासंगालाही पुरणार नाही असा वाक्प्रचार आहे.

शेकडा = १२८
१६ चा एक फाडा असं अचानक काहीतरी आठवलं ....
बाकी धागा मनोरंजक व मा हितीपूर्ण झालाय... वर म्हटल्याप्रमाणे हिंगाचा वेगळा धागा हवा....

ओके मॅगी. धन्यवाद Happy
वाक्प्रचारातच तो शब्द नेहमी ऐकलाय. नेमका अर्थ माहीत नव्हता.

सत्तूचे पीठ, तमालपत्र, दगडफूल, मेतकूट हेहि शब्द बरेचदा ऐकले पण ते काय असते नि कसे करतात, वापरतात हे माहित नाही. तर जाणकारांनी त्यावरहि धागे काढावे अशी नम्र विनंति.

वावे यांच्या पासंगाचे मॅगी यांनी करेक्ट उत्तर दिले आहे. त्यांना १० पैकी १० मार्क.

मोल्सवर्थ डिक्शनरीनुसार :

पासंग (p. 292) pāsaṅga m n ( P) 1 Inclination of the balance: also the weight or thing put into the light scale to remove it and effect equilibrium. 2 The bearing or pointing of flame

***
नंद्या,
उत्तरेतलं सत्तू अन आपल्याकडचं सातूचं पीठ यात थोडा फरक आहे.

तमालपत्र हे मसाल्यात वापरायचे झाडाचे पान आहे, अन दगडफूल हा मसाल्याचा पदार्थ म्हणजे एकप्रकारची बुरशी व कवक यांचा परस्परावलंबी जीव प्रकार. (शेवाळ व बुरशीचे सिंबायोसिस. रच्याकने सर्व मश्रूम्स या फंगस असतात Wink तेव्हा ईऽक बुरशी कशी खायची वगैर विचारू नका.) दगडफूल टीना यांच्या वर्‍हाडी चिकनमधे सापडेल, अन त्यावर बरेच चर्चा-चर्वण झालेले आहे.

मनोरंजक आणि माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे खर तर धाग्याची शोभा कैक पटीने वाढली आहे.

त्या साठी सर्वाना खूप खूप धन्यवाद.

या धाग्यात सुंठीच्या वापराविषयीचे उल्लेख आहेत. याच्याशी संबंधित अशी एक लिंक मिळाली. यात पंधराव्या शतकात सामोसा कसा बनवलां जाई त्याची माहिती आहे. सुरुवातीचा परिच्छेदच फक्त सुन्ठीशी संबंधित असला तरी पूर्ण लेखही मनोरंजक आहे. धागा खूप मागे पडला असला तरी ही माहिती रोचक वाटली म्हणून इथे चिकटवत आहे. महत्त्वाचे म्हणजे या सामिष सामोश्यात मिरची वापरलेली नाही पण भरपूर सुंठ मात्र आहे!
https://madrascourier.com/insight/the-multinational-samosa-the-mughal-em...

Pages