सुंठीची कढी

Submitted by मनीमोहोर on 18 September, 2018 - 18:48

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.

आमच्या घरात काही कार्य झालं किंवा सणावाराचं ओळीने चार पाच दिवस जड जेवण झालं असेल तर पाचक म्हणून, तोंडाला रुची यावी म्हणून ही केली जाते. “माझं पोट जरा ठीक नाहीये... सुंठीची कढी केली तर उद्या सकाळी घेईन म्हणतो “ अशी वातावरण निर्मिती करत माझ्या नणंद बाईंना ही कढी करण्यासाठी त्यांचा एखादा भाऊ त्याना गळ घालतो. त्या ही ‘ मी का म्हणून करू, मी माहेरवाशीण आहे ह्या घरची, हवी असेल तुला तर सांग तुझ्या बायकोला करायला ’ वैगेरे लटकेच त्याला सुनावतात. पण त्या ही कढी करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्याना करायची हौस ही आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे त्या उद्या नक्की कढी करतील ह्याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते.

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चहा कॉफी वगैरे झाली की त्या कढी करायला घेतातच. हीची रेसिपी अशी फार खास नाहीये पण तरी ही हा आमच्या घरचा फार खास पदार्थ आहे. अगदी सणावाराच्या पक्वान्नां पेक्षा ही घरात सर्वाना आवडणारा... करायचं काय तर आंबट ताकात सुंठ उगाळायची, ( कढी साठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.) खरं तर हेच फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे. सुंठ पावडर वापरून ती टेस्ट येत नाही. त्यामुळे सुंठ उगाळावीच लागते. आमच्या घरात माणसं खूप असल्याने आणि ही कढी सर्वांचीच आवडती असल्याने तशी करावी ही लागते भरपूर प्रमाणात. नणंद बाई माजघरात बसून सहाणेवर सुंठ उगाळत असतात. स्वयंपाकाच्या गडबडीतून वेळ काढून जरा जास्त दूध, साखर घातलेल्या आणि जायफळ लावलेल्या गरम गरम कॉफी चा कप श्रमपरिहार म्हणून त्यांची एखादी सून त्याना आणून देते. घरातली मुलं ही छोट्या छोट्या सहाणेवर सुंठ उगाळून आत्याआजीला मदत करत असतात. ओटीवरून ही किती झालीय सुंठ उगाळून , लावू का हातभार उगाळायला अशी मदतीची ऑफर येते. कढीच्या आशेने हळू हळू घरातली सगळी मंडळी नणंदबाईंभोवती गोळा होतात आणि सुंठ उगाळता उगाळता तिथेच गप्पा ही रंगतात. शेवटी पुरेसा तिखट पणा ताकात उतरतो आणि सुंठ उगाळण्याचे किचकट काम एकदाचे सम्पते. मग त्यात थोडे मीठ, थोडा हिंग घालतात. आणि शेवटी आमच्याकडे ह्या कढीसाठीचा म्हणून एक खास ठिक्कर/ दगड आहे, तो गॅस वर चांगला गरम करून त्या ताकात घालतात. ठिकरीमुळे ते ताक हलकेसे गरम होतं. . . बस्स इतकी च रेसिपी . झाली सुंठीची कढी तयार... ती ठिक्कर ताकात घातली की चुर्रर्रर्र असा आवाज येतो त्यामुळे कढी तयार झाल्याचं सगळ्या घराला समजत . प्रत्येकाला अर्धी पाऊण वाटी कढी दिली जाते. ती हिंगाचा स्वाद असलेली, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी चविष्ट कढी गप्पा मारत मारत, घुटके घेत घेत, नणंद बाईंचं कौतुक करत सगळेजण enjoy करतात.

अशी ही आमच्या घरची सुंठीच्या कढीची कहाणी. माझ्या नणंदबाई आज ऐंशीच्या पुढे असून ही अजून ही सुंठ उगाळून कढी करण्याचा त्याना उत्साह आणि हौस आहे. हा आमच्या कुटुंबाचा एक खास पदार्थ आहे . सुंठीची कढी ह्या शब्दालाच आमच्या घरात एक वलय प्राप्त झालं आहे कारण मनाला उल्हसित करणाऱ्या अनेक रम्य आठवणी ह्या कढीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढची अनेक वर्षे हा पदार्थ आमच्या घरचा अगदी खास असेल यात तिळमात्र संदेह नाही.

ही रेसिपी मी एका contest साठी लिहिली होती. थीम होती तुमची फॅमिली रेसिपी .. आज माबोवर शेअर करतेय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आलं सुकवुन सुंठ बनत नाही.. ते आलं सुकुन काडी होतं आणि फेकुन द्यावं लागतं>>> कसं बनतं ते सांगा की मग << तुमच्या प्रतिसादांपासुन वरच्या दिशेचा ४ था प्रतिसाद वाचा.. Proud Proud Proud

सुंठ ऐकून माहित आहे पण कधी बघितल्याची आठवत नाही. >>>

अगदी ऐतेन क्षण. तो सायोकडून आल्यामुळे म्हणजे खरे तर सुंठीमुळे; अजूनच न Happy

सुंठ आमच्याकडे असायची, आई पुड करुन ठेवायची. कधी कधी बाबाही खलबत्यात कुटून द्यायचे. उगाळून कढी केलेली मात्र बघितली नव्हती. ती जास्त छान लागत असणार.

सुंठ दुधात उकळून वाळवतात किंवा चुन्याच्या निवळीत हे पण मी वाचलंय कुठेतरी. बाहेर मिळणारी चुन्याच्या निवळीतली असावी असं वाटतं.

देवीका मस्त माहिती.

सुंठ घालून केलेला सुंठवडा चांगला तिखट लागतो. हल्ली बाजारात तयार सुंठ पावडर मिळते ती खूपच माईल्ड करतात . चहा मध्ये वैगेरे कित्ती घातली तरी चव येत नाही.

मैत्रेयी, चांगलं धुवून वाळवलं तर बुरशी नाही येत. धुवायच नीट आणि ताटलीत घालून भाजीच्या गरम झाकणावर , कुकरवर ठेवायचं मस्त खडखडीत वाळत. पण मला स्वतःला लहान बाळांना गुटी देणं नाही पटत.

हो, माधव त्याकाळी दोन सहाणी असत घरोघरी. रक्तचंदन, आंबेहळद, तुरटी, सुंठ, वेखंड उगाळून लेप घालणे खूप कॉमन होत. पेनकिलर घरोघरी पोचली नव्हती तेव्हा.

पूनम, थँक्यू. छान लिहिलं आहेस.

झंपी , खरंच इतक्या जणांना ही कढी माहीत असेल असं खरंच वाटलं नव्हतं. पण ह्या कढी मुळे माबोकर जुन्या आठवणीत रमले. ह्याहून अधिक काय पाहिजे ?

सुंठ घालून केलेला सुंठवडा चांगलाच तिखट लागतो. हल्ली बाजारात तयार सुंठ पावडर मिळते ती खूपच माईल्ड करतात . चहा मध्ये वैगेरे कित्ती घातली तरी चव येत नाही.

अमा, होम वर्क मस्त.

मैत्रेयी, चांगलं धुवून वाळवलं तर बुरशी नाही येत. धुवायच नीट आणि ताटलीत घालून भाजीच्या गरम झाकणावर , गरम कुकरवर ठेवायचं. मस्त खडखडीत वाळत. पण मी स्वतःला लहान बाळांना गुटी वैगेरे देणं नाही पटत.

DJ नी लिहिलेली कृती मला पण करेक्ट वाटतेय. अमच्याकडे हळद अशीच करतात हे मला माहितेय . आलं आणि हळद एकाच जातकुळीतले आहेत. आणि मी लिहीलय तस कोकणात तरी दूध वापरत नसतील. आधीच मुळात "समस्त म्हैशी गाभण काय रे झम्प्या" अशी परिस्थिती असताना एवढं दूध कोण वाया घालवेल ?

कोणी उत्साहाने केली ही कढी तर इथे फोटो टाका. आणि दुसरं म्हणजे आपल्या नॉर्मल कढी सारखी वाट्या वाट्या पिण्यासारखी ही कढी नाही. max पाऊण वाटी . त्या मानाने करा कोणी केली तर.

सुंठ तयार करणे (ड्राय क्युअर्ड जिंजर):
आले जमिनीतून काढल्यानंतर त्यावरील माती पाण्याने धुवून काढतात व आले स्वच्छ धुवून करतात. उन्हात सुकविल्यावर हे आले पुन्हा पाण्यात भिजू देतात. साल नरम झाल्यावर आले पाण्यातून काढून त्यावरील साल कोरड्या फडक्याने घासून काढतात. त्यानंतर चुन्याच्या निवळीत तीन टप्प्याने भिजत ठेवावे. त्यानंतर हवाबंद खोलीत गंधकाची धुरी देतात. परत उन्हात सुकवून ६ तास गंधकाची धुरी देतात. नंतर उन्हात चांगले सुकतात. अशा तऱ्हेने तयार झालेली सुंठ ओल्या आल्याच्या मानाने १५ ते २० टक्के या प्रमाणात मिळते दर हेक्टरी ७५०० किलो आले १८५० किलो सुंठ मिळते.
(सौजन्य: ही लिंक )

आमची माती आमची माणसं प्रतिसाद झाल्यावर इथला प्रतिसाद लिहिते.
ममो ,नेहमीप्रमाणे मस्त लेख. तुम्ही खरंच पुस्तकाचं मनावर घ्याच आता. सगळ्या फोटोंसह छान कॉफी टेबल बुक करता येईल .

>> नवीन Submitted by मॅगी on 20 September, 2018 - 10:11 << अरे बापरे.. अशी करतात होय..? मला वाटालं हळकुंडा सारखीच बनवत असतील.. असो.. पण याचा अर्थ घरी बनवायला अवघड प्रकार दिसतेय सुन्ठ..!!

> इथे लोकांना सुंठ माहित नाही हे वाचुन आश्चर्य वाटलं मला. असं कसं सुंठ माहित नाही? > कदचीत सुंठीला काही लोक्स वेगळ्या नावाने ओळखत असतील..

आता पुन्हा एकदा- सुंठ ऐकून माहितेय पण पाहिल्याचं आठवत नाही कधी. त्यामुळे सुंठ माहित नाही असं समजून आश्चर्यचकित होऊ नका.

हो, माधव त्याकाळी दोन सहाणी असत घरोघरी. रक्तचंदन, आंबेहळद, तुरटी, सुंठ, वेखंड उगाळून लेप घालणे खूप कॉमन होत. पेनकिलर घरोघरी पोचली नव्हती तेव्हा.>> अगदी अगदी!
बाहुल्याच्या खेळात कमी पडली तर रक्तच्नन्दाची बाहुली गुपचुप देवघरातुन आणलीही जायची, नतर कधितरी कुणि नेली आणी आणून द्द्यायचे
विसरले .मी दोन्ही मुलाना बाळगुटी दीली होती तेव्हा माबोवर वैद्य अश्विनी होती तिने अगदी वेढा,मात्रा सगळ निट समजावल होत त्याप्रमाणे सगळ सामान भारतातुन आइला आणायला लावल होत. सर्दीवर पण सुरवातिला दोघाना वेखण्डाचा लेप वैगरेच लावला होता... सुठ मात्र जपुन लावावी त्याने पुरळ वैगरे येवु शकते खुप गरम असते सुन्ठ.

>>बाप्रे! सायो तुम्हाला सुंठ ठाऊक नाही?
आश्चर्यच आहे. चकित झालो मी Lol
Submitted by आ.रा.रा. on 20 Sep>> Lol
सगळ्यांचं आश्चर्य दाखवून चकित होऊन झालं असेल तर बीबीने ‘सुंठ माहित नाही?‘ हे स्टेशन सोडायला हरकत नसावी. Proud

भारीच वाटतेय की रेसिपी. कधी नव्हती ऐकली.
इथल्या बर्‍याच गोष्टी वाचून नॉस्टॅल्जिक झाले मात्र.. लोखंडी कढ्ल्यात सुंठ गरम करून कपाळावर लावणारी आजी, त्याने कपाळावर लागलेली ओढ, तो वास, बाहेर पाऊस हमखास, रक्तचंदनाची बाहुली, सहाण... फारच मस्त आठवणी...

मनीमोहर, जरा गंमत करत होते. राग नसावा. ह्या पारंपारीक रेसीपी आहेत आजारावर, बर्‍याच आजींना तरी माहीती असतील.

माझ्या आजी( आईची आई) कडे, तर दोन पितळी डबे होते. त्यात ती अशी औष्धी वस्तु ठेवी.
तिचे एकून मला माहित झाले,
रक्तचंदन बाहुली- मुका मार , हाडाचे दुखणे वगैरे. मी लहान्पणी खेळायची ह्या बाहुलीसोबत.
सांबार शिंग - हाडाची साधी दुखणी( आपटणेने सूज वगैरे). हे आजोबांना त्यांच्या जंगल मित्राने दिलेले. १०० वर्षे वर जुनं असेल आता असते ते. हरवलं का चोरलं गेलं घर हलवलं तेव्हा.

वेखंड- तापावर डोक्यावर थापायला
जेष्ठमध काड्या- खोकला वगैरे
सुंठ- सर्दी, कफ, पोटदुखी
लेंडी पिपळी- काढा सर्दीवर, पोटदुखी
कडूजिराईत- ताप, कणकण
कोळसा(खास लाकडाचा)- पोटदुखी, दात्दुखी वगैरे

खरेच, बर्‍याच जुन्या आठवणी आल्या डोळ्यासमोर. आजी काहीना काही उगाळत असायची बसल्या बसल्या अमक्याला हे चाटण दे, तमक्याला ते दे. धन्यवाद ममो.
————-
देवीका, ते ताक नसेल, दूध व ताक असे पाणी असेल.
——-
आमच्याकडे घरगुती सुंठ बनवताना गंधक नाहि वापरत. गंधक कमर्शियल पद्ध्तीत वापरतात बुरशी येवु नये म्हणून. माझी आजी आलं धूवून, उकळवून मग एक फेरी दूध-ताकात भिजवून वाळवून , तोच प्रकार तीनदा करायची( भिजवणे-वाळवणे). मग शेवटी, खायचा चुन्याच्या निवळीत परत ओले करून नुसते( भिजवायचे वा भिजत नाही ठेवायचे आलं) खडखडीत चार दिवस वाळवायची. गावी दर उन्हाळ्यातला प्रकार असे. हळकुंड आणि सुंठ बनवण्याचा.

>>घरी सुंठ, रक्तचंदन, सुत्शेकर मात्रा अशी औषधे उगाळायला वेगळी सहाण होती आणि चंदन उगाळायला वेगळी सहाण.>>
माझ्याकडे इथेही तसेच आहे.

माझे वडील त्याम्चे वडील वारल्यावर कुटुंबा सहित पुण्याला आले. आजोबा औदुंबरला नदीच्या पाण्यात पडून वारले. वडील सर्वात मोठे दोघे धाकटे भाउ, एक बहीण व आजी, आणि आम्धळी पणजी असा परिवार होता. काही वर्शे वडूज मध्ये आजीने शेती केली. मग पुण्याला आले. तर इथे नातेवाइकांच्या आधाराने काही दिव्वस राहायला लागले आपले सेट होईपरेन्त. वडील गाण्याचे शिक्षण घेत, शिकवण्या घेत. किडनीचा त्रास होता.
व इतर वेळी आमचे एक वैद्य नातेवाइक होते नाना म्हणून तिथे अप्रेम्टिस गिरी करत. काढे बनवणे, मात्रा खलून देणे. लार्ज बॅचेस बनवून ठेवणे वगैरे हे वैद्य तेव्हा आमच्या पेक्षा आर्थिक बाबीत सेट व वरचढ होते त्यामुळे आई, बाबांना निमूट पणे काम करावे लागे ऐकून घ्यावे लागे. पुढे परिस्थिती बदलली. १९४०-१९४५ ची कथा.

मी फार नंतर ह्या सगळ्यात आले पण आईबाबा आजी जेव्हा जुन्या आठव णी काढत त्यात हे सर्व काढे, आयुर्वेदिक औषधे मात्रा ह्यांचे डीप रेफरन्सेस असत. रक्तचंदन बाहुली होती. मी त्याने खेळलेली आहे. तिचा वास घेतला आहे. घरी सुम्ठ मात्रा काढे अनेक पडून असत. आईबाबा पण साठी च्या पुढचे असल्याने रोज काहीना काही तब्येतीची तक्रार असे व पहिले हीच औषधे वापरली जात. नसलीच तर अ‍ॅलोपॅथीची .वापरायची सहाणी होत्या. पूजेचे चंदन उगाळ ले आहे मी व इतर बारक्या सहाणीवर. चांगली मोठी सहाण होती चंदना साठी.
तपकिरीच्या डब्यात सर्व नीट ठेवलेले असे. तपकिरीच्या डब्यावर भुताचे चित्र होते. काय अहो ब्रँडिंग!! Wink

मनीमोहोर, नेहेमीप्रमाणेच खूप मस्त लेख ! फार मजा आली वाचून. सुंठीची कढी म्हणजे खरंतर सुंठ लावलेलं ताकच आहे की ते.
बाळगुटीत सुंठ येते पण ती क्वचितच उगाळली असेल ( फार दिली नाहीत गुटीतील औषधं लेकाला ) घरात विकतची सुंठपावडर मात्र असतेच. ग्राहक संघातून एक सुंठ पावडर येते ती छान स्वाद असलेली आणि तिखट असते. सासूबाईंकडे ग्राहकचे सामान येत असल्याने हल्ली सुंठ पुरवठा तिथूनच असतो. माझा रोजचा चहा सुंठ घातल्याशिवाय होत नाही. तसेच हल्ली ताकालाही मी सैंधव, हिंग, जिरपूड आणि सुंठ घालते. मस्त लागते ! आता एकदा लोखंडी पळी तापवून घातली पाहिजे ह्या ताकात. तुमच्या फॅमिली रेसिपीइतकी ऑथेंटिक नाही तरी सुंठीची कढी म्हणून पिता येईल Happy

आता एकदा लोखंडी पळी तापवून घातली पाहिजे ह्या ताकात. >>> अगो कर, आई करायची अशी. मस्त चुर्रर्र आवाज येतो. पळी छान लालसर होईपर्यंत तापवायची. जरा लांबून कर हा. ताक उसळतं.

मेग ने लिहीलय तशी व्यावसायिक प्रमाणात करत असतील सुंठ. आम्ही कशी करतो ते घरी विचारून लिहिते.

सगळयांचे प्रतिसाद छानच आहेत.

सुंठ, आलं, सहाण, घरगुती औषधं, गुटी ... मस्त रंगल्या गप्पा ह्या सुंठीच्या कढी च्या निमित्ताने.

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.

एक राहिलं .. मधुरिमाच्या 28 ऑगस्ट च्या अंकांत हे प्रसिद्ध झालं आहे. इथे कायम राहील म्हणून फोटो अपलोड करतेय.

40240031_10217172574732544_6871447056506945536_o.jpg

ताक बाधू नये म्हणून लोखंडी पळी सणसणीत तापवून त्यात थोडं हिंग घालून ताकाला चटका द्यायचा असं आजेसासूबाई सांगायच्या ते आठवलं.

ओय हो... तापलेल्या पळीत अस्सल हिंग टाकल्यावर कसला घमघमाट सुटत असेल नै? नेक्स्ट टैम कमीत कमी हे तरी करून पाहाता येईल.

>>तुम्हाला सणसणीत तापवलेल्या पळीनं जास्त खुणावलेलं दिसतंय>> योकु आणि लोखंडाचं या जन्मीचं काही नातं आहे. आठवा त्याच्या रेसिप्यांतली लोखंडी कढई Wink

हो , योकु आणि सणसणीत च नक्कीच काही तरी नातं आहे.

हिंगावरून सांगते .. आमच्याकडे हल्ली हल्ली पर्यंत रोजच्या वापरात खडा हिंग असे. नुसता खडा हिंग नाही तर 7 नं चा खडा हिंग .. हा महाग असतो खूप. त्याचे खडे तुरीच्या डाळीच्या डब्यात चार आठ दिवस ठेवले की नीट कुटले जात असत. खलबत्त्यात कुटत असू आम्ही. नंतर नंतर थोडे कुटून घेऊन मिक्सर मध्ये करू लागलो. त्याची पूड बाजारच्या रेडिमेड पुडी सारखी बारीक नाही करायची , थोडी दाणेदार ठेवायची म्हणजे फोडणीत जळत नाही हिंग. तसेच हा हिंग रंगाला पिवळट नसून थोडा चॉकलेटी असतो. ह्याचा स्वाद खूप म्हणजे खूपच चांगला लागतो.

हल्ली काळ बदलला तेव्हा हिंग पूड रेडिमेड आणतो. कोणाला उत्साह असेल तर ट्राय करा. मला पण थोडी पूड कुरिअर करा. ,☺

मला ते लोखंडी भांड जे काय तापतं ना त्याचं कवतीक. तसलं हिंडालिअम वगैरे नाय गरम होत आणि मुख्य म्हणजे लोखंडी भांड्यात केलेल्या पदार्थांच्या चवीत जाणवण्याइतपत फरक पडतो.

ममो, हीरा हिंग म्हणजेच ७ नंबर का?
पुढल्यावेळी पतंजली चा हिंग वापरून पाहा. बर्‍यापैकी चांगल्या प्रतीचा आणि दाणेदार असतो आणि पूड करा वगैरेची कटकट नसते.

हो, आईसुद्धा पूर्वी खडा हिंग आणायची हे आठवतंय.
आता आम्ही दोघीही एल्जीची तयार पूड वापरतो.

योकु, लोखंडाच्या भांड्यांबद्दल सहमत. Happy

Pages