सुंठीची कढी

Submitted by मनीमोहोर on 18 September, 2018 - 18:48

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.

आमच्या घरात काही कार्य झालं किंवा सणावाराचं ओळीने चार पाच दिवस जड जेवण झालं असेल तर पाचक म्हणून, तोंडाला रुची यावी म्हणून ही केली जाते. “माझं पोट जरा ठीक नाहीये... सुंठीची कढी केली तर उद्या सकाळी घेईन म्हणतो “ अशी वातावरण निर्मिती करत माझ्या नणंद बाईंना ही कढी करण्यासाठी त्यांचा एखादा भाऊ त्याना गळ घालतो. त्या ही ‘ मी का म्हणून करू, मी माहेरवाशीण आहे ह्या घरची, हवी असेल तुला तर सांग तुझ्या बायकोला करायला ’ वैगेरे लटकेच त्याला सुनावतात. पण त्या ही कढी करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्याना करायची हौस ही आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे त्या उद्या नक्की कढी करतील ह्याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते.

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चहा कॉफी वगैरे झाली की त्या कढी करायला घेतातच. हीची रेसिपी अशी फार खास नाहीये पण तरी ही हा आमच्या घरचा फार खास पदार्थ आहे. अगदी सणावाराच्या पक्वान्नां पेक्षा ही घरात सर्वाना आवडणारा... करायचं काय तर आंबट ताकात सुंठ उगाळायची, ( कढी साठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.) खरं तर हेच फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे. सुंठ पावडर वापरून ती टेस्ट येत नाही. त्यामुळे सुंठ उगाळावीच लागते. आमच्या घरात माणसं खूप असल्याने आणि ही कढी सर्वांचीच आवडती असल्याने तशी करावी ही लागते भरपूर प्रमाणात. नणंद बाई माजघरात बसून सहाणेवर सुंठ उगाळत असतात. स्वयंपाकाच्या गडबडीतून वेळ काढून जरा जास्त दूध, साखर घातलेल्या आणि जायफळ लावलेल्या गरम गरम कॉफी चा कप श्रमपरिहार म्हणून त्यांची एखादी सून त्याना आणून देते. घरातली मुलं ही छोट्या छोट्या सहाणेवर सुंठ उगाळून आत्याआजीला मदत करत असतात. ओटीवरून ही किती झालीय सुंठ उगाळून , लावू का हातभार उगाळायला अशी मदतीची ऑफर येते. कढीच्या आशेने हळू हळू घरातली सगळी मंडळी नणंदबाईंभोवती गोळा होतात आणि सुंठ उगाळता उगाळता तिथेच गप्पा ही रंगतात. शेवटी पुरेसा तिखट पणा ताकात उतरतो आणि सुंठ उगाळण्याचे किचकट काम एकदाचे सम्पते. मग त्यात थोडे मीठ, थोडा हिंग घालतात. आणि शेवटी आमच्याकडे ह्या कढीसाठीचा म्हणून एक खास ठिक्कर/ दगड आहे, तो गॅस वर चांगला गरम करून त्या ताकात घालतात. ठिकरीमुळे ते ताक हलकेसे गरम होतं. . . बस्स इतकी च रेसिपी . झाली सुंठीची कढी तयार... ती ठिक्कर ताकात घातली की चुर्रर्रर्र असा आवाज येतो त्यामुळे कढी तयार झाल्याचं सगळ्या घराला समजत . प्रत्येकाला अर्धी पाऊण वाटी कढी दिली जाते. ती हिंगाचा स्वाद असलेली, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी चविष्ट कढी गप्पा मारत मारत, घुटके घेत घेत, नणंद बाईंचं कौतुक करत सगळेजण enjoy करतात.

अशी ही आमच्या घरची सुंठीच्या कढीची कहाणी. माझ्या नणंदबाई आज ऐंशीच्या पुढे असून ही अजून ही सुंठ उगाळून कढी करण्याचा त्याना उत्साह आणि हौस आहे. हा आमच्या कुटुंबाचा एक खास पदार्थ आहे . सुंठीची कढी ह्या शब्दालाच आमच्या घरात एक वलय प्राप्त झालं आहे कारण मनाला उल्हसित करणाऱ्या अनेक रम्य आठवणी ह्या कढीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढची अनेक वर्षे हा पदार्थ आमच्या घरचा अगदी खास असेल यात तिळमात्र संदेह नाही.

ही रेसिपी मी एका contest साठी लिहिली होती. थीम होती तुमची फॅमिली रेसिपी .. आज माबोवर शेअर करतेय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुटीसाठी दुधात उगाळतात.
या रेसिपीत आंबट ताकात उगाळलेली दिसते आहे. आलं वाटून रस घातला तरी चालायला हवा पर्याय म्हणून.

सुंठ आल्यासारखीच दिसते दिसायला पण वरून पांढरा लेअर असतो. (चुन्याच्या निवळीत भिजवून मग तयार करतात ही माझी ऐकीव माहीती).
आल्यापेक्षा बरीच घट्ट आणि कठीण असते, सहजासहजी मिक्सरमध्येही पूड अशी होत नाही.
या रेस्पीकरता बहुतेक पाण्यात/ताकात उगाळून घ्यायची असेल.

आलं वाटून रस घातला तरी चालायला हवा पर्याय म्हणून >> तो पर्यायच व्हायचा वॉटर्डाऊन व्हर्जन वाला. सुंठ बरीच स्ट्राँग असते चवीला आणि आल्यापेक्षा जरा उग्रही असते.

माझ्यामते सुंठपावडर पाण्यात (मिक्सरमध्ये) घुसळून मग गाळून ते पाणी वापरून ही कढी केली तर जवळ जवळ ती चव साधता येईल.

वाटण्या-कुटण्या-उगाळण्याला मिक्सरचा पर्याय असला, तरी या तिघांत प्रत्येकवेळी चव वेगवेगळी तयार होते, हे निर्विवाद!

माहित नसलेल्यांसाठी सुंठ अशी असते..
.

.
.
आल्यापेक्षा बरीच घट्ट आणि कठीण असते, सहजासहजी मिक्सरमध्येही पूड अशी होत नाही.>> बरोबर योकु.
मी पावसाळ्या हिवाळ्याच्या सुरुवातीला चहा मसाला तयार करत असते हमेशा (इथे रेस्पी दिली नाही वाटत). त्यात सुंठ असतेच असते.
डिरेक्ट मिक्सर मधे त्याला बारीक करायला जावं म्हणजे मिक्सरच्या पात्यांवर अत्याचार अन जोडीला कानावरही. म्हणुन तिला मिक्सर मधुन काढण्यापूर्वी बत्त्याने जरासं चेंदून घ्यावं/दणके द्यावे. ती ठिसुळ असते पण भरपूर फायबर्स असल्यामूळे लगेच भूरका/पीठ होत नाही तिच अन मग त्यानंतर तिला मिक्सरमधे फिरवून पावडर करावी हवी तशी.

आम्ही करतो हि कढी. पद्ध्त थोडीशी वेगळी आहे.
ताकातच सुंठ उगाळतो आणी वरून फोडणी देतो.
सुंठ लागतेच घरात. कफावर उत्तम आहे.
गोकुळाष्टमीला प्रसादात लागतेच. प्रसादात किसलेली सुंठ, सुकं खोबर्‍याचा कीस, खडीसाखरेची पूड, वेलची पूड. मस्तच लागते. गोकुळाष्टमीला आईकडे असेन तर, मी तर वाटीभर खाते अजूनही. आई ओरडतेच चमचाभरच खा.
आमच्याकडे गावी बाळंतीण असेल तर हेच अधून मधून देतात. पोटाच्या विकारावर उत्तम. गॅसेस वर उत्तम.

सुंठ नेहमी असतेच घरी. आलं आणि सुंठ ह्यांचे गुणधर्म वेगळे आहेत.
सुंठ बनवायची पद्धतः आमची आजी आलं साफ पाण्यात धुवायची. उकळत्या पाण्यात काहितरी १०-२० मिनिटे उकळवून मग ताकात भिजवून ठेवायची. ताकात किती वेळ ते माहित नाही. मग कडकडीत उन्हात वाळवायची. परत दुरर्‍या दिवशी हि अर्धी सुकलेली सुंठ ताकात भिजवून वाळवायची. ह्या प्रक्रियेमुळे सुंठीचे गुणधर्म बदलतात.

मिक्सवर वाटू नका, किसणीवर कीसून मग खलबत्यात कुटा. खुप कडक असते.
सहाणीवर उगाळण्याआधी ताकात भिजवायची नाहितर पाण्यात जसे चंदन उगाळतो तसेच.

धन्यवाद सगळयांना.

ह्या रेसिपीत सुंठ आंबटसर ताकातच उगाळायची आहे सायो. म्हणजे डोकं दुखत असेल तर पाण्यात उगळतात, गुटी साठी दुधात वैगेरे.

ह्या रेसिपीची मजा सगळेजण घरी जमलेले असताना करण्यातच आहे. घरातला जमलेला गोतावळा, सुंठ उगाळण्यावरून झालेले लटके वाद, मुलांची लुडबुड आणि शेवटी मिळणारी ती अर्धी पाऊण वाटी लिमिटेड कढी ह्यातच मजा आहे. रेसिपी वाचून दाखवल्यावर माझी मुलगी पण म्हणत होती की," आई आपण इथे करू या का म्हणून . पण म्हटलं " आपण चौघांनीच करून पिण्यात काय ग मजा येणार ? "

@ममो
नेहमीप्रमाणे उत्तमऽऽऽऽ लेख

आणि इतरांसारखी नेहमीची तक्रार फोऽऽऽटोऽऽऽऽऽ.

आणि पुस्तकाचे नक्की मनावर घ्या.
पुलेप्र

ती सुंठ उगाळल्यावर ओली राहिल्यामुळे बुरशी वगैरे येत नाही का? बळगुटी च्या मुळ्यांबद्दल तसे होऊ शकते असे डॉक्टर्स कडून ऐकले आहे पूर्वी.

वेगळिच रेसिपी आहे एक्दम!
रामजन्माला सुन्ठवडा वाटला जातो , सुठ खलबत्त्यत घालुन कुटुन मग चाळुन घ्यावी लागते त्यात पिठीसाखर मिसळली जाते , अगदी चिमटीने खायचा प्र्कार असतो , सुन्ठ पुड तिखट असते आल्यापेक्षा खुपच!

खूप भारी लागते ही कढी. आई पोट दुखत असले की करून द्यायची लहानपणी. खापरी नसल्याने लोखंडाच्या पळीचा चटका द्यायची. तेंव्हा घरी सुंठ, रक्तचंदन, सुत्शेकर मात्रा अशी औषधे उगाळायला वेगळी सहाण होती आणि चंदन उगाळायला वेगळी सहाण.

एकदा हुक्की आल्याने मी रेडिमेड सुंठ पावडर वापरून करून बघितली होती - ब्ये का र लागली.

रामनवमीच्या सुंठवड्याची रेसिपी पण द्या कुणीतरी.

>>>गोकुळाष्टमीला प्रसादात लागतेच. प्रसादात किसलेली सुंठ, सुकं खोबर्‍याचा कीस, खडीसाखरेची पूड, वेलची पूड. मस्तच लागते. गोकुळाष्टमीला आईकडे असेन तर, मी तर वाटीभर खाते अजूनही. आई ओरडतेच चमचाभरच खा.<<<<

+१११
देवीका, सुंठवडा म्हणतात त्याला.

आम्ही ह्याच रेसीपीने सुंठवडा बनवतो. आजकाल लोकं काजू काय ,बदान काय, खारीक पूड आणि बेदाणे असे काहीही टाकून पंचखाद्य बनवावे तसे बनवून सुंठवडा विडिओ टाकतात. पारंपारीक रेसीपीत, मोजून तीनच आयटम असतात खोबरं, सुंठ पूड आणि खडीसाखर कुटून.

मनीमोहोर,
बरेच लोकं करतात की हि कढी. Wink

सुंठीची कढी नाही प्यायली कधी, पण बाकीचे पदार्थ वाचून तोंपासु! सुंठ, पिठीसाखर आणि तूप घालून सुंठीची गोळीही करतात, थंडीच्या दिवसात, आलेपाक खातो तसंच खायची ही गोळी, थंडी बाधू नये म्हणून.
दूध-गूळ पोह्यातही सुंठीची चिमट घातली तर ऑसम चव लागते. सध्याच्या काळात दूध-गूळ पोहे ही फारच जुनाट रेसिपी झाली Happy पण आम्ही खातो हुक्की आली की. मी लहान असताना कधी कंटाळ्याची भूक लागून भुणभुण करायला लागले की आजी तेल-तिखट-मीठ पोहे नाहीतर दूध-गूळ पोहे द्यायची. चैनच चैन! Proud
मी रेग्युलर कढीत नेहेमीच आलं घालते, आता एकदा सुंठही घालून बघेन. सुंठीचं खोड आणायला हवं, आयुर्वेदिक औषधींच्या दुकानात मिळेल बहुतेक.
ममो, तुमच्या रेसिपीज नेहेमीच नॉस्टॅलजिक करतात Happy

सहाणीवर उगाळण्याआधी ताकात भिजवायची नाहितर पाण्यात जसे चंदन उगाळतो तसेच.>> मी हेच ममोला विचारायला आली होती. इथे दिल्याबद्दल धन्यवाद देवीका..

रामजन्माला सुन्ठवडा वाटला जातो , सुठ खलबत्त्यत घालुन कुटुन मग चाळुन घ्यावी लागते त्यात पिठीसाखर मिसळली जाते , अगदी चिमटीने खायचा प्र्कार असतो >> हो आमच्या घराकडे जे रामजन्म करतात तिथेपन असतो हा प्रकार प्राजक्ता. फक्त रामजन्मालाच करतात हा सुंठ्वडा.

आलं पाण्यात उकळवुन ते उन्हात सुकवलं की त्याचि सुंठ बनत असावी. कारण आमच्याकडे ओल्या हळदीचे गड्डे खणुन काढल्यावर मोठ्ठ्या कायलीत उकळलेल्या पाण्यात त्यांना शिजवतात आणि नंतर सुकवतात तेव्हा त्यांचे हळकुंड बनते. आलं आणि हळद एकाच कुळातील असल्याने हळकुंड बनविण्याचीच पद्धत सुंठ बनवायला लागु होत असावी असा माझा कयास..! Light 1

अरे दत्ताचा प्रसाद गुरुवारी पण सुंठवडा असतो ना? तो खोबरे सुंठ खडीसाख र वाला मी खाल्ला आहे लहान पणी. टिपिकल टेस्ट. आल्यापेक्षा अगदी वेगळी. सर्वांनी आज होमवर्क म्हणून एकेक इंच आले घेउन या. व सुकवायला ठेवा आणि फोटो टाका.

सुंठ कढी हिट आहे.

इथे लोकांना सुंठ माहित नाही हे वाचुन आश्चर्य वाटलं मला. असं कसं सुंठ माहित नाही?

आलं सुकवुन सुंठ बनत नाही.. ते आलं सुकुन काडी होतं आणि फेकुन द्यावं लागतं>>> कसं बनतं ते सांगा की मग

Pages