सुंठीची कढी

Submitted by मनीमोहोर on 18 September, 2018 - 18:48

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.

आमच्या घरात काही कार्य झालं किंवा सणावाराचं ओळीने चार पाच दिवस जड जेवण झालं असेल तर पाचक म्हणून, तोंडाला रुची यावी म्हणून ही केली जाते. “माझं पोट जरा ठीक नाहीये... सुंठीची कढी केली तर उद्या सकाळी घेईन म्हणतो “ अशी वातावरण निर्मिती करत माझ्या नणंद बाईंना ही कढी करण्यासाठी त्यांचा एखादा भाऊ त्याना गळ घालतो. त्या ही ‘ मी का म्हणून करू, मी माहेरवाशीण आहे ह्या घरची, हवी असेल तुला तर सांग तुझ्या बायकोला करायला ’ वैगेरे लटकेच त्याला सुनावतात. पण त्या ही कढी करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्याना करायची हौस ही आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे त्या उद्या नक्की कढी करतील ह्याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते.

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चहा कॉफी वगैरे झाली की त्या कढी करायला घेतातच. हीची रेसिपी अशी फार खास नाहीये पण तरी ही हा आमच्या घरचा फार खास पदार्थ आहे. अगदी सणावाराच्या पक्वान्नां पेक्षा ही घरात सर्वाना आवडणारा... करायचं काय तर आंबट ताकात सुंठ उगाळायची, ( कढी साठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.) खरं तर हेच फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे. सुंठ पावडर वापरून ती टेस्ट येत नाही. त्यामुळे सुंठ उगाळावीच लागते. आमच्या घरात माणसं खूप असल्याने आणि ही कढी सर्वांचीच आवडती असल्याने तशी करावी ही लागते भरपूर प्रमाणात. नणंद बाई माजघरात बसून सहाणेवर सुंठ उगाळत असतात. स्वयंपाकाच्या गडबडीतून वेळ काढून जरा जास्त दूध, साखर घातलेल्या आणि जायफळ लावलेल्या गरम गरम कॉफी चा कप श्रमपरिहार म्हणून त्यांची एखादी सून त्याना आणून देते. घरातली मुलं ही छोट्या छोट्या सहाणेवर सुंठ उगाळून आत्याआजीला मदत करत असतात. ओटीवरून ही किती झालीय सुंठ उगाळून , लावू का हातभार उगाळायला अशी मदतीची ऑफर येते. कढीच्या आशेने हळू हळू घरातली सगळी मंडळी नणंदबाईंभोवती गोळा होतात आणि सुंठ उगाळता उगाळता तिथेच गप्पा ही रंगतात. शेवटी पुरेसा तिखट पणा ताकात उतरतो आणि सुंठ उगाळण्याचे किचकट काम एकदाचे सम्पते. मग त्यात थोडे मीठ, थोडा हिंग घालतात. आणि शेवटी आमच्याकडे ह्या कढीसाठीचा म्हणून एक खास ठिक्कर/ दगड आहे, तो गॅस वर चांगला गरम करून त्या ताकात घालतात. ठिकरीमुळे ते ताक हलकेसे गरम होतं. . . बस्स इतकी च रेसिपी . झाली सुंठीची कढी तयार... ती ठिक्कर ताकात घातली की चुर्रर्रर्र असा आवाज येतो त्यामुळे कढी तयार झाल्याचं सगळ्या घराला समजत . प्रत्येकाला अर्धी पाऊण वाटी कढी दिली जाते. ती हिंगाचा स्वाद असलेली, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी चविष्ट कढी गप्पा मारत मारत, घुटके घेत घेत, नणंद बाईंचं कौतुक करत सगळेजण enjoy करतात.

अशी ही आमच्या घरची सुंठीच्या कढीची कहाणी. माझ्या नणंदबाई आज ऐंशीच्या पुढे असून ही अजून ही सुंठ उगाळून कढी करण्याचा त्याना उत्साह आणि हौस आहे. हा आमच्या कुटुंबाचा एक खास पदार्थ आहे . सुंठीची कढी ह्या शब्दालाच आमच्या घरात एक वलय प्राप्त झालं आहे कारण मनाला उल्हसित करणाऱ्या अनेक रम्य आठवणी ह्या कढीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढची अनेक वर्षे हा पदार्थ आमच्या घरचा अगदी खास असेल यात तिळमात्र संदेह नाही.

ही रेसिपी मी एका contest साठी लिहिली होती. थीम होती तुमची फॅमिली रेसिपी .. आज माबोवर शेअर करतेय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्तच, किती सुरेख ओघवतं लिहिलंय.

आई करते सुंठेची कढी. अर्थात आम्ही सुंठपावडर असते त्याची करतो. थोडी वेगळी करतो म्हणजे थोडा ओवा, जिरं, मिरपूड पण घालतो हिंग आणि सुंठपावडर, मीठ याबरोबर, सुंठपूड अर्थात जास्त. परवाचं केलेली मी. कधी याला तुपाची फोडणी पण करतो मग फोडणीचे ताक म्हणतो. तेव्हा जिरं, हिंग फोडणीत घालतो. बाकी ताक जास्त आंबट असेल तर किंचित साखर, एरवी नाही.

आई घरी सुंठपूड करून ठेवायची, मी विकत आणते.

उगाळलेल्या सुंठेची करून बघायला हवी. इंटरेस्टिंग वाटतेय.

अंजू , पहिली वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

किती छान लिहिलं आहेस.

लिहायचे राहिले ठीक्करीचा चुर्रर्र आवाज पोचला अगदी, कित्ती छान डोळ्यासमोर उभं करता.

माझी आठवण या आवाजाशी वेगळी आहे म्हणजे कधी कधी लोखंडी पळी फक्त तापवून सुंठेच्या कढीत आई घालायची तेव्हा असाच चुर्रर्र आवाज यायचा. कधी फोडणी पण त्याच लोखंडी पळीत करून मग ताकात टाकायची. कधी फोडणी न करता.

पहिल्यांदाच हा प्रकार ऐकला. वाचून तर वाटतय खुप आवडेल. तसंही फोडणीचे ताक माझे आवडते त्यामुळे हे करुन पहाणार. अडचण एक आहे, “आज जरा मेथीची भाजी कर गं” म्हटलं की ही समोर मेथीची गड्डी आणुन टाकते तसं जरा ही रेसेपी करून बघ गं. म्हटलं तर ही सहाण आणुन ठेवायची समोर. Happy
लिहिलय सुध्दा खुप सुरेख.

वा, मस्त. वेगळाच प्रकार आहे. पण तुम्ही फोटो वगैरे टाकण्यात जरा हात आखडता घेता. मी सुंठ पाहिलेली नाही कधी त्यामुळे ती बघायची उत्सुकता आहेच पण तुमचा दगडही बघायला हवा.

अरे, छान प्रकार दिसतोय.
माझ्या आजीला जाता-येता सुंठ खायची सवय होती. गॅसच्या बाजूला ठेवून थोडी गरम झालेली ती सुंठ छान लागायची तिखट असली तरी. पुढे आजीला अल्सरचा त्रास झाला आणि तिचं तिखट खाणं अजिबात बंद झालं. मग घरात सुंठ फारशी आणलीच गेली नाही. मी तर खाल्लीच नाहीये कित्येक वर्षांपासून.
ही कढी करून बघायला पाहिजे.

किती छान लिहीलंय, कढी बनवतानाचं दृष्य डोळ्यापुढं उभं राहिलं. माहीत नव्हता हा प्रकार, एकदा करून बघणार.

मस्तच लिहिलयस ममो..
पण मला किती ताकाला किती सुंठ याच प्रमाण लागत नाहीए त्यामूळे कसं कळणार चव चांगली झालीए कि वांगली?
करुन बघावी म्हणते..

ह्याची फ्लेवर प्रोफाइल फार युनिक मराठी अशी आहे. सुंठ, ताकाचा आंबट पणा, हिंग. मीठ , तूप जिरे फोडणी घातल्यास ती. व कोथिंबीर. मला कोथिंबीर लागते कढीत. मस्त साधा पदार्थ. तुम्ही हे सर्व लेख एकत्र करून एक मालिका बनवा व माबो विशेष मध्ये ठेवा. निर्मला मोने ह्यांचे कोकणावर पुस्तक आहे छोटेसेच पण मस्त तसे कलेक्षन होईल.

( कढी साठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.)

<<
घरी सुंठ कशी बनवतात?

विकीपेडियावर दुधात भिजवून आलं सुकवलं की सुंठ बनते असं दिसलं. माझ्या माहितीत चुन्याच्या निवळीत भिजवून वाळवतात असं होतं. नक्की कृती काय?

धन्यवाद सगळ्याना प्रतिसादासाठी.

सायो सुंठीचा, ठिक्करिचा किंवा कढीचा कसलाच फोटो नाहीये ग मझ्याकडे. नेट वर आहे सुंठीचा फोटो . आल्यापेक्षा पांढरट दिसते आणि सुकवल्या मुळे कडक ही होते .

वावे पूर्वी सुंठ म्हणजे घरगुती औषधातला हुकमाचा एक्का होता. सर्दी , ताप, अपचन सगळ्यावर सुंठ घेत असत. म्हणून एखाद वेळेस लागली असेल सवय सुंठ खाण्याची.

टीना , आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे आम्ही करतो ती माईल्ड तिखटच असते. तू तिखट खाणारी मुलगी आहेस सो तिखटाची चव लागेल एवढी उगाळ सुंठ.

अमा, मस्त आयडीया. करायला हवं खरंच असं काही तरी.

आ. रा. रा. मी कायम तिकडे नाही रहात आणि सुंठ करण्याच्या सीझनला कधी तिकडे गेले नाहीये त्यामुळे मला माहित नाही कशी करतो आम्ही आल्याची सुंठ ते. घरी विचारून इथे लिहिते. पण आम्ही कोब्रा असल्याने दूध वापरत असू अस वाटत नाहीये . दुधाच्या ऐवजी नक्कीच त्यापेक्षा स्वस्तातल काही तरी वापरलं जातं असेल कोकणात हा माझा अंदाज ( हलके घ्या ).

इथे शहरात जर कोण करणार असेल तर ठिक्करी पर्याय म्हणून लोखंडी पळी गरम करून ताकात बुडवता येईल

आले दुधात उकळतात व नंतर सुकवतात की झाली सुंठ ही रेसिपी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकली होती.

ममो, मस्त रेसीपी. करून पाहण्यात येईल नक्कीच.

भारी आहे की कढी. लिहिलंयही मस्त. Happy

ठिकरीमुळे स्मोकी फ्लेवर येत असेल का? करून बघायला हवं. Happy

सायो, सुंठ म्हणजे वाळवलेलं आलं - आल्याचा गड्डा सुकल्यानंतर दिसेल तशी दिसते. बाळांच्या गुटीत घालतात उगाळून. इथे पावडर मिळते, अख्खी पाहिलेली नाही.

ओके.
सुंठ कशावर उगाळतात?(सहाणेवर हे उत्तर नकोय. म्हणजे पाणी वगैरे का?)
तुमच्याकडे जशी सुंठीची कढी सगळ्यांना हवी असते तशी आमच्याकडे आरारुटची खीर. तोंड येवो न येवो. एकाकरता करायची तर सगळ्यांनाच थोडी थोडी हवीशी असते.

मस्त वाटतेय रेसिपी! फोटो नसला तरी अंदाज आला. मी आख्खी सुंठ नाही पाहिलेली. सुंठ पावडर मात्र असते घरात. ती ठिकरीची आयडिया पण कसली भारी आहे! असल्या घरगुती पारंपारीक नुस्क्यांची मजा वेगळीच असते!

अरे वा मस्त रेसिपी
आई लहानपणी (बहुतेक पोट बिघडलयावर) द्यायची ते आठवले, एकदम विस्मृतीत गेली होती. अर्थात कशी करायची ते माहीत नव्हते.

सुंठ पण पाहिली आहे, पांढरट दिसते बाहेरून. (इकडे google images मधे dry आल्याच्या कलर ची दिसतेय तशी नसे दिसत तेव्हा). सर्दी झाल्यावर सुंठ उगाळून कपाळावर लावायची.

Pages