थालीपिठ - मराठवाडी पद्धत, बिना भाजणीचे

Submitted by किल्ली on 29 July, 2018 - 06:51
Thalipeeth
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारीचं पीठ - ३ वाट्या
बेसन /चणाडाळीचं पीठ - १ वाटी
लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
जिरे - चिमूटभर
ओवा - चिमूटभर
तीळ - चिमूटभर
हळद - चिमूटभर
धणेपूड - थोडीशी
कोथिंबीर - बारीक चिरून
कांदे बारीक चिरून - २
आवडत असतील तर टोमॅटो - १ बारीक चिरून
तेल

क्रमवार पाककृती: 

"भूक लागलीये,खमंग काहीतरी खायची इच्छा होतेय. पोटभरीचं चटकन होईल असं काय करावं बरं ?"
"थालीपीठ कर."
"भाजणी नाहीये पण "
"बिग डील. मी सांगते तसं कर ."
"सांग मग"
"ही घे कृती:"
१.. एका परातीत किंवा टोपात वरील सर्व साहित्य एकत्र करावे (तेल सोडून)
२. पाणी टाकून पीठ मळून घ्यावे
३. साधारण थालीपीठाला भिवतो तसे छान मऊ थापले जाईल असे मळावे
गोळा झाल्यांनतर तेलाचा हात लावून परत एकदा मळावे
४. नॉन स्टिक पसरत भांड्यात कडेने सर्व बाजुंनी थोडेसे तेल सोडावे.
गोलाकार थालीपिठे थापून घ्यावीत.
बरेच जण प्लास्टिक कागदावर थापून मग तव्यावर/ पसरत भांड्यात शेकतात/भाजतात
मी डायरेक्ट तव्यावरच थापले.
थापताना ज्वारीची पीठ हाताला चिकटते, म्हणून हाताला तेल लावून घ्यावे
५. थापून झाल्यानंतर त्याला ४-५ छिद्रे पडून त्यात थोडेसे तेल सोडावे
(तेलामुळे चव चांगली येते, कमी तेल टाकले तरी चालू शकते )
६. दोन्ही भिजुनी खरपूस ,खमंग आणि थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे
कडक झाल्यानंतर खायला आणखी मजा येते
७. भाजल्यानंतर ताटात काढून ताज्या दह्याबरोबर खावे

फोटोग्राफ्सः

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ थालीपिठ होतील
अधिक टिपा: 

थालीपीठ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून थोडा वेळ झाकून तसेच राहू द्यावे. मस्त कडक होतात

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.
गरम तव्यावर लावली की जरा वेगळी दिसते खालची बाजू Happy चवीत फरक पडत नाही अर्थात. मी हल्ली ओल्या फडक्यावर थापून घेते आणि मग गरम तव्यावर टाकते.

आज केली ही थालिपीठे. पहिलं चिकटलं, करपलं जरा पण खायला छान वाटलं. बाकीचे तीन व्यवस्थित झाले, आवडले.

अरे वा, छान मानवजी, धन्स हा Happy
काल मी डिनरला हेच केले होते. Happy

चिकटु नये म्हणून थोड तेल लावा,
डोसा तवा असेल तर तो वापरा, मग चिकटत नाहीत.

@ च्रप्स :
चिला म्हणजे? थालीपीठासारख कहीतरी असत ना?

मला लहानपणी भाजणीपेक्षा हीच थालिपीठं जास्त आवडायची.

क्रमवार पाककृतीतले पहिले ४ संवाद एकदा साबा आणि माझ्यात झाले होते... फक्त ‘बिग डील...’वाले संवाद माझ्याकडे होते Proud

गरम तव्यावर थेट थालिपीठं लावू शकणार्‍यांना __/\__

गरम तव्यावर थेट >> हातावरच आधी पसरट करुन मग लावावे, हाताला पाणी किवा तेल लावुन,
चटके बस्तात सुरुवातीला , पण सवयीने जमत Happy

मी रविवारी केली होती थालिपीठे या कृतीने. पातीचा कांदा घातला भरपूर आणि टॉमेटो वगळले. टॉमेटो घातले तर बेसन + टॉमेटो असं व्हेज ऑमलेट मिळत असे पूर्वी तसं लागेल की काय वाटलं.
मस्त खमंग झाली होती. घरच्या सर्वांनी आवडीने खाल्ली. भाकरी जमतील अशा ओव्हर कॉन्फिडंसने आणलेलं ज्वारीचं पीठ संपवायचा चांगला उपाय सापडला.

मेधा, भाकरी जमत नसेल तर ज्वारीच्या पिठात २५% कणिक मिसळून कालवा मग छान लाटून भाकऱ्या करता येतात, आणि चांगल्याही लागतात. माझी बायको अशाच भाकऱ्या करते.

थालीपीठ उलटल्यावर आच बंद करायची. तव्याच्या गरम पणात दुसरी बाजू शिजते आणि तव्याचं तापमान जरा कमी होत. नंतर थापाताना गोळा थोडा सपाट झाला की पाणी लावावं की पसरता येतं. मग भोक पाडून तेल सोडून गॅस चालू करावा.

आज कांद्या च्या ऐवजी परतलेला दुधीचा कीस घालून थालीपीठ केलंय, खाणार्यांना अजिबात समजला नाही की मी दुधी घातलाय ते Proud

किल्ली, दुधीच काय, आमच्या ऑफिसच्या बाजूचा भजीवाला कोबीची भजी बरेचदा कांदा भजी म्हणून विकतो. काहींना कळते तर काही खातात आपले त्याला कांदाभजी समजून ☺️

बाकी तुम्हाला थालीपीठ खूपच आवडते वाटते☺️

खान्देशात म्हणजे धुळे व जळगावाकडे यालाच " कोंडाळे " असेही आम्ही म्हणत असतो. प्रत्येकवेळी भाजी ( हिरव्या भाज्या) घरात शिल्ल़क अस्तेच असे नाही, अशा वेळी खान्देशात एकतर खिचडी किंवा कोंडाळे करणे सोपे असते. शिअवाय याच्या सोबत भाजीची गरज नाही, नुसत्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर अथवा कैरीच्या लोणच्याबरोबर खाता येते. दोन तीन खाल्ले की पोट मस्त भरते.

थालिपिठात नेहमी कांद्याव्यतिरिक्त एखादी भाजी घालूनच करते.दुधी, कोबी, याशिवाय हे ढकल ते ढकल.यावेळी वांगं उरलं होते, ते उकडून पिठात मिसळले.भाजी घातली की हलकासा मऊपणा येतो असं मला वाटतं.

किल्ली, मी करत असतो हे थालीपीठ अधुन मधून.
पण गेले काही वेळा पासून जास्तच कडक होतंय किंवा कच्चं तरी रहातय. थोडेफार मऊ यायला काय करता येईल?

Pages