थालीपिठ - मराठवाडी पद्धत, बिना भाजणीचे

Submitted by किल्ली on 29 July, 2018 - 06:51
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारीचं पीठ - ३ वाट्या
बेसन /चणाडाळीचं पीठ - १ वाटी
लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
जिरे - चिमूटभर
ओवा - चिमूटभर
तीळ - चिमूटभर
हळद - चिमूटभर
धणेपूड - थोडीशी
कोथिंबीर - बारीक चिरून
कांदे बारीक चिरून - २
आवडत असतील तर टोमॅटो - १ बारीक चिरून
तेल

क्रमवार पाककृती: 

"भूक लागलीये,खमंग काहीतरी खायची इच्छा होतेय. पोटभरीचं चटकन होईल असं काय करावं बरं ?"
"थालीपीठ कर."
"भाजणी नाहीये पण "
"बिग डील. मी सांगते तसं कर ."
"सांग मग"
"ही घे कृती:"
१.. एका परातीत किंवा टोपात वरील सर्व साहित्य एकत्र करावे (तेल सोडून)
२. पाणी टाकून पीठ मळून घ्यावे
३. साधारण थालीपीठाला भिवतो तसे छान मऊ थापले जाईल असे मळावे
गोळा झाल्यांनतर तेलाचा हात लावून परत एकदा मळावे
४. नॉन स्टिक पसरत भांड्यात कडेने सर्व बाजुंनी थोडेसे तेल सोडावे.
गोलाकार थालीपिठे थापून घ्यावीत.
बरेच जण प्लास्टिक कागदावर थापून मग तव्यावर/ पसरत भांड्यात शेकतात/भाजतात
मी डायरेक्ट तव्यावरच थापले.
थापताना ज्वारीची पीठ हाताला चिकटते, म्हणून हाताला तेल लावून घ्यावे
५. थापून झाल्यानंतर त्याला ४-५ छिद्रे पडून त्यात थोडेसे तेल सोडावे
(तेलामुळे चव चांगली येते, कमी तेल टाकले तरी चालू शकते )
६. दोन्ही भिजुनी खरपूस ,खमंग आणि थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे
कडक झाल्यानंतर खायला आणखी मजा येते
७. भाजल्यानंतर ताटात काढून ताज्या दह्याबरोबर खावे

फोटोग्राफ्सः

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ थालीपिठ होतील
अधिक टिपा: 

थालीपीठ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून थोडा वेळ झाकून तसेच राहू द्यावे. मस्त कडक होतात

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बहुधा पीठ भिजवताना पाणी कमी पडतंय. थालीपिठाची पहिली बाजू भाजली जात असताना तव्यावर झाकणी ठेवता की नाही? ठेवावी.
तसंच पीठ भिजवताना त्यात कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर छान खुसखुशीत होतात कुठलीही थालीपिठं.

कांद्याऐवजी कच्च्या पपईचा किस घालून आज या पद्धतीने केले थालीपीठ. मस्त झाले.

पीठ भिजवताना त्यात कडकडीत तेलाचं मोहन >> धन्यवाद स्वाती. पुढल्यावेळी असे करेन

बहुधा पीठ भिजवताना पाणी कमी पडतंय. >>
ओके.

थालीपिठाची पहिली बाजू भाजली जात असताना तव्यावर झाकणी ठेवता की नाही? ठेवावी.
>>
ठेवतो

तसंच पीठ भिजवताना त्यात कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर छान खुसखुशीत होतात कुठलीही थालीपिठं.>>
अच्छा, मी मोहन घालत नव्हतो, आता घालेन.

धन्यवाद.

@प्राजक्ता, मी कोथिंबीर घालतो भरपूर. त्यानेही मेथी/पालक सारखा इफेक्ट येईल का?

भरपूर कोथिंबीर, थोडी उरलेली आमटी, किंवा वांग्याची भाजी स्मॅश करून पिठात घातली की मऊ होतात थालिपीठं . झाकण मात्र उलटवेपर्यंत घालावे. मी मोहन कधी घातलं नाही तरी मऊ झालीत.

पीठ चांगलच थुलथुलीत भिजवायचे, म्हणजे मौ होतात थालीपीठे..
ही थालीपीठे आमच्या घरीही लोकप्रिय आहेत. भाजणीची क्वचितच खाल्लीत.

पीठ चांगलच थुलथुलीत भिजवायचे, म्हणजे मौ होतात थालीपीठे.. +111111

वरती उल्लेख झाल्याप्रमाणे पिठात एखादी पालेभाजी किंवा रसदार फळभाजी बारीक करून टाकावी, मऊ होण्यासाठी

भाजताना व्यवस्थित तेल सोडून झाकण ठेवावे

थालीपीठ च पीठ मळताना मोहन मी कधी घातले नाही बाई.. त्यामुळे कल्पना नाही

IMG_20200313_113152~2.jpg

आज केलेले धपाटे थोड्या variation ने पालक आणि नाचणीचेपीठ add करून.

Pages