युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक

Submitted by कुमार१ on 28 December, 2017 - 21:17

युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.

क्रिअ‍ॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.

या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती

शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.

अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.

शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.

मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अ‍ॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!

आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.

३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.

इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने ! हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !

जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *

क्रिअ‍ॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअ‍ॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअ‍ॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअ‍ॅटिनीन.

प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअ‍ॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअ‍ॅटिनचे क्रिअ‍ॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअ‍ॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.

उत्सर्जन

युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअ‍ॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.

आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअ‍ॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.

आता युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअ‍ॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअ‍ॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअ‍ॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.

प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअ‍ॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !

युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअ‍ॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.

तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.

समारोप

शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअ‍ॅटिनपासून रोज ठराविक क्रिअ‍ॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
****************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहिती. निदान आता तरी लोक किडनीकडे व त्यातील आजाराकडे दुर्लक्ष करणार नाहीत याची आशा आहे. व या लोकांमध्ये मी पण असल्याने या लेखाचा खरच फायदा आहेच. धन्यवाद डॉक.

चांगली माहिती. घरात पेशंट तयार झाला की हे शब्द कानी पडायला लागतात पण त्यांचा अर्थ नेमका माहीत नसतो. युरिया मूत्रात नाही म्हणजे तो रक्तात आहे व रक्तात आहे म्हणजे अमोनिया निर्माण होऊन मेंदूला धोका हे समीकरण लक्षात यायला लेखाची मदत झाली.

रश्मी व साधना, आभार.
साधना,
युरिया मूत्रात नाही म्हणजे तो रक्तात आहे व रक्तात आहे म्हणजे अमोनिया निर्माण होऊन मेंदूला धोका >>>> तुमचा गैरसमज झालाय. युरिआ पासून रक्तात अमोनिया नाही होणार . जर अमोनियाचे रुपांतर युरिआत झाले नाही तरच मेंदूला धोका होतो.

चांगली माहिती दिलीत डॉक्टर. धन्यवाद.
एक शंका आहे की मूत्रपिंडाची चाळणी बिघडायला लागते तेव्हा सुरवातीला काहीच लक्षणे नसतात का ज्यामुळे ते लक्षात येईल?

हा लेख पण छान व माहिती पूर्ण. माझे वडील क्रॉनिक किड नी पेशंट होते एक किडणी तर अ तरूण वयातच काढली होती. त्यामुळे साधारण माहिती आहे. घरी अजून एक किडनी फेल्युअरने वारली तेव्हा रोज नाहीतर एक दिवस आड
क्रिएटिनिन चेक करवून घेत होते.

एस व अमा, आभार

मूत्रपिंडाची चाळणी बिघडायला लागते तेव्हा सुरवातीला काहीच लक्षणे नसतात का >>>>
चांगला प्रश्न.

चाळणी यंत्रणेचा glomerulonephritis हा जो आजार आहे त्यात खालील लक्षणे असू शकतात :
१. कमी लघवी होणे
२. वाढलेला रक्तदाब
३. पायावर वा डोळ्यांभोवती सूज (इडीमा)
४. कमरेत दुखणे
५. मूत्र तपासणीत प्रोटीन वा लालपेशी आढळणे.

उत्तम माहीती.
मला एक विचारायचंय.
आता क्विक वेट लॉस साठी किंवा जिम मध्ये मसल कंटेंट साठी प्रोटीन पावडर्स सुचवतात. यांच्या किंमती पण बर्‍याच असतात.सुताराकडच्या मोठ्या फेविकॉल डब्याच्या साईझ च्या प्रोटीन पावडर डब्याला ८००० वगैरे.
या पावडरी घेण्यास टर्म अँड कंडिशन्स काय असतात? किडनी वर ताण किती पडतो? या पावडर रेकमेंड करणारे आणि विकणारे 'याने काहीही साईड इफेक्ट होत नाहीत' यावर ठाम असतात.

मी-अनु, आभार. तुमच्या प्रश्नावर मतांतरे आढळतील. डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि व्यावसायिक व्यायामवाले यांची मते जुळतीलच असे नाही !

काही माझी मते :
१. सामान्य माणसाला त्याची तंदुरुस्ती टिकवायला ‘पावडरी’ ची गरज नाही. उत्तम प्रथिनयुक्त समतोल आहार उत्तम !

२. मूत्रपिंड निरोगी असताना त्यावर पावडरीनी ‘ताण’ यायचे कारण नाही. जास्त युरिआ तयार होऊन उत्सर्जित होईल, इतकेच.
३. स्पर्धात्मक तंदुरुस्तीत करिअर करायचे असल्यास तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा .

मी_अनु, मी अशा पावडरी काही काळ वापरल्या आहेत. नुसत्या फिटनेससाठी पावडरीची गरज नाही, ह्या डॉक्टर कुमार ह्यांच्या मताशी मीही सहमत आहे. चांगल्या प्रोटीन इनटेकचा वापर गरजेनुसार वजन वाढवण्यास वा कमी करण्यास व्यायामाच्या जोडीने होऊ शकतो, हेही खरे. पण तेवढा व्यायाम असायलाच हवा. तेवढा व्यायाम असेल, आणि मूत्रपिंड निरोगी असेल, तर पावडरीने ताण यायला नको. ह्या काळात युरिआचे प्रमाण वाढले होते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे, पण वापर थांबवल्यावर ते पुन्हा व्यवस्थितही झाले. त्यामुळे त्याबद्दलही डॉक्टरांशी सहमत. पण हे तज्ञांच्या सल्ल्यानेच करा, व व्यायाम तेवढ्या प्रमाणात चालू राहू द्या, असे सुचवतो. योग्य व्यायाम न केल्यास यू आर प्रोबॅबली बायिंग जस्ट मोअर युरिआ विदाऊट एनी बेनिफिट्स टू बॉडी.

धन्यवाद डॉ कुमार, भाचा.

नाय बा, मी वापरणार नव्हते. हल्ली एकदम 'जादूची कांडी' टाईप जाहीरात होते म्हणून जिज्ञासा वाटली.

डॉक, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व दर्जेदार लेख. धन्यवाद.

त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !
>>>> बाकी हे अगदी मार्मिक !

साद, सचिन व भा चा, आभार!
सचिन, गाउट हा 'युरीक अ‍ॅसिड’ वाढल्याने होतो, युरीआ नव्हे !

कुमार जी नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर लेख. अगदी साध्या सोप्या भाषेत.
युरिया तर माहिती होते, पण क्रिअ‍ॅटिनीन हा शब्द अलिकडेच ऐकण्यात आला. ओळखिच्या एका पेशंटला अनेक वर्ष गर्भाशयाचा कॅन्सर होता आणि अलिकडे किडण्यांचे कार्य पुर्णपणे थांबले होते आणि क्रिअ‍ॅटिनीन चा आकडा ११-१२ च्या पुढे गेला होता. त्या गेल्या.
दरम्यान उत्सुकतेपोटी मी ही माझे रिपोर्ट्स तपासले. क्रिअ‍ॅटिनीन चे प्रमाण सामान्य माणसात दिड पेक्षा अधिक असेल तर काळजी घेणे आवश्यक ठरते.
अतिशय उपयुक्त माहिती कुमारजी, इथे शेअर केल्याबद्दल अभार.

बुननु व दक्षिणा, उत्साहवर्धनाबद्दल आभार
वाचकांच्या सहभागानेच चर्चा परिपूर्ण होते

छान लेख, कुमार१. धन्यवाद.

काही शंका आहेत,
१. क्रिअ‍ॅटिनीन आणि उच्च रक्तदाब याचा कसा परस्परसंबंध असतो? इथे अवांतर आहे पण होमोसिस्टीन आणि हृदयविकार याबद्दलही सांगाल का? याच लेखमालेत पुढे येणार असेल तर नंतर वाचेन.
२. औषधांचा साईड इफेक्ट म्हणून क्रिअ‍ॅटिनीन वाढते, ते कसे होते?
३. काही औषधे (उदा, झोलेड्रॉनिक अ‍ॅसिड आयव्ही) घेण्यापूर्वी क्रिअ‍ॅटिनीन तपासावे लागते व ते सुरक्षित मर्यादेच्या खाली असावे लागते, ते का?
४. क्रिअ‍ॅटिनीन तपासणीचा अहवाल साधारण महिन्याभरापर्यंत ग्राह्य धरला जातो, असे आम्हाला डॉक्टर म्हणाले होते. वर अमा म्हणतात की त्यांनी दर दिवसाआड तपासणी केली.
तर तपासणी किती दिवसांनी पुन्हा करावी? निरोगी व्यक्तींनी काळजी म्हणून केल्यास आणि विशिष्ट आजार / औषधे चालू असणर्‍यांनी अशा दोन्ही गटांसाठी सांगा.
धन्यवाद.

कारवी, आता फक्त पहिली शंका घेतो.
उच्च रक्तदाबाने glomerulus वर परिणाम होतो. >> चाळणी यंत्रणेचे काम कमी होऊ लागते >> रक्तातील creatinine वाढते .
बाकी उद्या सकाळी......☺

कारवी, आता फक्त पहिली शंका घेतो. ............बाकी उद्या सकाळी..... >>>> सावकाश सांगा, घाई नाही अजिबात Happy
उच्च रक्तदाबाने glomerulus वर परिणाम होतो >>>>>> रक्तातील creatinine वाढते >>>> त्यानंतर रक्तातील creatinine वाढते तसे >>>>> रक्तदाब अजून वाढतो .... असे दुष्ट्चक्र असते का तेही सांगा

@कारवी ,

क्रिअ‍ॅटिनीन आणि उच्च रक्तदाब याचा कसा परस्परसंबंध असतो? >>> खूप चांगला प्रश्न. ‘दुष्टचक्र’ हे निम्मे उत्तर तुम्ही दिलेलेच आहे. त्याबद्दल कौतुक. आता सविस्तर बघू.

हे घ्या पुस्तकातले वाक्य : Hypertension is both a cause and consequence of Kidney disease.
आता दोन्हीकडून बघू:
१. उच्च रक्तदाब >> चाळणी यंत्रणेच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या कडक होतात (nephrosclerosis) >> >> रक्तप्रवाह कमी होतो >> मूत्रपिंडाच्या महत्वाच्या भागाचा कार्यनाश >> विकार. >> वाढलेले क्रिअ‍ॅटिनीन

२. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (म्हणजेच वाढलेले क्रिअ‍ॅटिनीन) >> रक्तात पाणी व सोडियम जास्त साठते >> volume वाढतो >> उच्च रक्तदाब.

३. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार >>> Angiotensin चे प्रमाण वाढणे >>> उच्च रक्तदाब ( हे समजायला वैद्यकीय पार्श्वभूमी लागेल)

काही औषधे (उदा, झोलेड्रॉनिक अ‍ॅसिड आयव्ही) घेण्यापूर्वी क्रिअ‍ॅटिनीन तपासावे लागते व ते सुरक्षित मर्यादेच्या खाली असावे लागते, ते का? >>>>

झोलेड्रॉनिक अ‍ॅसिडचा एक महत्वाचा दुष्परीणाम म्हणजे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेचा बिघाड करणे (nephrotoxicity).
अशा प्रकारचे कोणतेही औषध घेताना बेसलाइन क्रिअ‍ॅटिनीनची पातळी बघणे आवश्यक. आधीच वाढलेले असेल तर निर्णय बदलावा लागू शकतो.

होमोसिस्टीन आणि हृदयविकार याबद्दलही सांगाल का? >>>>>

याची चर्चा आपण सवडीने माझ्या कोलेस्टेरॉलच्या धाग्यावर करूयात . इथे सगळी खिचडी नको.
( (https://www.maayboli.com/node/64397).

चांगली उपयुक्त माहिती मिळाली डॉक्टर.
माझ्या आई ला मधुमेह आहे मागच्या एक वर्ष पासून क्रिआटिनिन वाढल्याचं आणि त्यामुळे किडनी ची काम करण्याची क्षमता कमी झाल्याचं निदान झालं. प्रोटिन्स चा प्रमाण कमी करायला सांगीतलं. याच्यावर काही उपाय असतात का कारण औषध असं काही दिली नाहीत. डॉक्टर प्रमोद त्रिपाठींच्या फ्रीडम फ्रॉम डायबिटीस ची मेंबर होऊन डाएट वगैरे व्यवस्थित फोल्लोव करते. पण किडनी क्षमता कमी झाल्याचं ऐकून खूप काळजी वाटायला लागलीय. क्रिआटिनिन कमी होऊ शकेल ना?

आऊ, आभार आणि तुमच्या आईना शुभेच्छा !

दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराच्या (CKD) १ ते ५ अशा स्टेजेस असतात. त्या ‘चाळणी यंत्रणेची क्षमता (GFR) मोजून निश्चित केल्या जातात. स्टेज १ ही ‘ठीक’ स्थिती तर स्टेज ५ ही सर्वात वाईट असे असते. त्यानुसार ‘क्रिअ‍ॅटिनीनची पातळी वाढत जाते.

तेव्हा प्रत्यक्ष रुग्ण तपासणी आणि सर्व रिपोर्ट्स पाहिल्यावरच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येते. तुमच्या डॉ. च्या सल्ल्यानेच उपाययोजना , पथ्यपाणी चालू ठेवा. बरे वाटेल.

डॉक्टर,
मुलांमध्ये घश्याच्या इन्फेक्शन नंतर किडनीचा त्रास होऊ शकतो हे खरे आहे का? नात्यात 1 केस ऐकली होती.

साद, बरोबर आहे.
काही मुलांना Streptococcus या जंतूचा संसर्ग झाल्यानंतर २-३ आठवड्यांनी मूत्रपिंड विकार होतो.
या प्रकाराला immune complex चा आजार म्हणतात.

प्रथम हे जंतू घसा किंवा त्वचेचा दाह घडवतात.
गरीब देशांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

Pages