युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक

Submitted by कुमार१ on 28 December, 2017 - 21:17

युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.

क्रिअ‍ॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.

या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती

शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.

अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.

शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.

मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अ‍ॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!

आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.

३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.

इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने ! हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !

जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *

क्रिअ‍ॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअ‍ॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअ‍ॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअ‍ॅटिनीन.

प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअ‍ॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअ‍ॅटिनचे क्रिअ‍ॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअ‍ॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.

उत्सर्जन

युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअ‍ॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.

आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअ‍ॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.

आता युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअ‍ॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअ‍ॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअ‍ॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.

प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअ‍ॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !

युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअ‍ॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.

तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.

समारोप

शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअ‍ॅटिनपासून रोज ठराविक क्रिअ‍ॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
****************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, कुमार१.
म्हणजे उच्च रक्तदाबाचा आणि क्रिअ‍ॅटिनीनचा सरळ संबंध नाही. किडनीचे विकार / तिची गाळणक्षमता कमी होणे आणि उच्च रक्तदाब याचा संबंध आहे. आणि असे काही शरीरात घडत आहे याकडे लक्ष वेधणारा घटक म्हणजे क्रिअ‍ॅटिनीनची अनैसर्गिक पातळी.
थोडक्यात, रक्तदाब, मधुमेह, यासारखे आजार किडनीचे आरोग्य / तिची गाळणक्षमता धोक्यात आणण्याइतके बळावणार नाहीत, आणि दीर्घकाळ घेतली जाणारी औषधे कुठले वाईट परिणाम करू शकतील याची माहिती घेणे -- ही काळजी घ्यायला हवी?

होमोसिस्टीनचा प्रश्न ६४३९७ वर लिहीते.

५ घामाला / अंगाला लघवी सारखा वास येणे हे कशामुळे होते?
६. घामाला उग्र वास असणे याचाही किडनीच्या आरोग्याशी संबंध असतो का? म्हणजे रक्तातील जे दूषित घटक किडनी गाळू शकत नाही ते त्वचा बाहेत टाकते असे काही? की पाणी कमी पिणे, स्वच्छतेच्या अभावामुळे घामाचे विघटन करणारे बॅक्टेरिआ वाढणे अशीच (तुलनेने कमी धोकादायक) कारणे यामागे असतात?
७. युरीन इन्फेक्शनवर इलाज चालू असणार्‍या पेशंटच्या छातीत / पाठीत पाणी जमणे, याचा कसा संबंध असतो?

@कारवी:

थोडक्यात, रक्तदाब, मधुमेह, यासारखे आजार किडनीचे आरोग्य / तिची गाळणक्षमता धोक्यात आणण्याइतके बळावणार नाहीत, आणि दीर्घकाळ घेतली जाणारी औषधे कुठले वाईट परिणाम करू शकतील याची माहिती घेणे -- ही काळजी घ्यायला हवी? >>>> बरोबर.

* घामाला / अंगाला लघवी सारखा वास येणे हे कशामुळे होते? >>>>
साधारण ही लक्षणे बालकांमधील जन्मजात विकार – ज्यामध्ये एखादे enzyme शरीरात नसते – अशांमध्ये दिसून येतात. उदा. ‘PKU” या आजारात बालकाला उंदरासारखा वास येतो.

** घामाला उग्र वास असणे याचाही किडनीच्या आरोग्याशी संबंध असतो का? >>> माझ्या मते नाही.

* स्वच्छतेच्या अभावामुळे घामाचे विघटन करणारे बॅक्टेरिआ वाढणे अशीच (तुलनेने कमी धोकादायक) कारणे यामागे असतात? >>>> +११

* युरीन इन्फेक्शनवर इलाज चालू असणार्‍या पेशंटच्या छातीत / पाठीत पाणी जमणे, याचा कसा संबंध असतो?
>>>
युरीन इन्फेक्शन जर क्षयरोगाच्या (TB) जन्तूने झाले तर असे प्रकार होऊ शकतात. पण, एकाच रुग्णात तीनही एकदम होईल असेही नाही. AIDS च्या रुग्णाला जर TB झाला तर या गोष्टी व्हायची शक्यता वाढते.

मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. गोळी चालू आहे. तर किडनी फंक्षन नीट चालू आहे का ते बघायला कोण्ती टेस्ट करू? काय रिझल्ट येतो ते इथेच लिहीन.

अमा,
१. रुटीन लघवी तपासणी
२. युरिया व क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी मोजणे
या प्राथमिक चाचण्या आहेत.

खूप चांगली माहिती मिळते आहे. धन्यवाद डॉ.
एक शंका आहे:
रुटीन लघवी तपासणी साठी दिवसाच्या कोणत्या वेळची लघवी द्यावी ?

रुटीन लघवी तपासणी साठी दिवसाच्या कोणत्या वेळची लघवी द्यावी ? >>>>
सकाळी उठल्यावरची पहिली.
लघवीची सुरवातीची धार बाहेर सोडावी व मधली धार बाटलीत पकडावी

असे उपयुक्त धागे वाचले की मायबोलीवर आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
पण बाकी निरर्थक धाग्यांचा कचरा पाहिला की मन खट्टू होते.
माफ करा कुमार मी अवांतर पोस्ट टाकली, पण अगदीच रहावले नाही.

दक्षिणा, आभार व सहमती.
मला सुदधा आरोग्य-लेखन करणेच बरे वाटते आहे.
अधिक काय लिहू? ☺

या दोन पदार्थांच्या निमित्ताने काही मूत्रविकारांवर चर्चा केली याचे समाधान आहे.
मुतखडे व प्रोस्टेट या नेहेमी च्या आजारांवर चर्चा होणे स्वाभाविक होते
तसेच मूत्रपिंड विकार व उच्च रक्तदाब यांचे एकमेकांशी असलेले दुष्टचक्राचे नाते समजावता आले

या मालेतील पुढचा लेख काही दिवसांनी लिहीन. त्यामध्ये एक महत्त्वाचे प्रथिन आणि एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय यांचे विवेचन असेल
तोपर्यंत रजा घेतो.
धन्यवाद!

@ साद
मुतखड्यांचे प्रकार असतात. काहींमध्ये युरिक ऍसिड जास्त असते. अशा रुग्णांनी त्याची रक्तपातळी तपासून घ्यावी.

जर ‘युरीक असिड’ ची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढलेली असेल तर शाकाहारी होण्याचा फायदा होतो. अर्थात अंडे जरूर खावे .

डा. कुमार आपले लेख वाचुन आमच्या ज्ञानात खुपच भर पडते, आणि दुसरे असे कि आपलि समजुन सान्गन्याची पध्द्त खुपच चान्गली आहे. या लेखाने फ़ार अवघड असा विषय अगदी सहज डोक्यात शिरला...
आपले खुप खुप धन्यवाद...
यापुढे ही आपल्या कडुन अशाच अवघड विशयावरिल अवजड ज्ञान सोप्या भाशेत आम्हाला वाचायला मिळत राहो,हि विनंती_/\_

रघुनाथन, आभार !
तुमच्या सारख्या जाणकार वाचकांच्या पाठबळावर च ही लेखमाला चालू आहे

ब्लड रिपोर्ट मधल्या रेफ.रेज चेंज केल्या जातात का?
ऑक्टोबर मध्ये टेस्ट केली तेव्हा ब्लड युरीया ची नॉर्मल रेफ. रेंज ७.९-२० अशी दाखवली होती आणि डीसेंबर मध्ये टेस्ट केली तेव्हा ब्लड युरिया ची नॉर्मल रेंज ७-२५. असे केल्या ने डिसेंबर मधले रीडींग्ज आधीच्या (ऑक्टोबर च्या नॉर्मल रेफ रेंज) रेंज नुसार जास्त आहे. आणि डीसेंबर च्या रीपॉर्ट नुसार नॉर्मल आहे.कोणी या बद्दल सांगू शाकेल का?

ब्लड रिपोर्ट मधल्या रेफ.रेज चेंज केल्या जातात का? >>>
होय शक्य आहे. चाचणी करण्याची पद्धत (किट) बदलल्यास त्या बदलतात.
शेवटी रुग्ण तपासणी आणि रिपोर्ट्स हे एकत्रित बघून डॉ मत बनवतात. तेव्हा थोड्या फरकाने बिचकू नये

युरिया व क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी बरोबर काही वेळेस युरिक ऍसिडची तपासणी पण करायला का सांगतात ?
किडनी आजारात हे तिन्ही वाढते का?

साद,
प्रत्येक मूत्रविकारात तिन्ही नाही सांगत. २ प्रसंगात युरिक ऍसिडची पातळी वाढते:
१. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
२. गाउट : यात वाढलेल्या युरिक ऍसिडमुळे सांधे व मूत्रपिंड या दोन्हीवर दुष्परिणाम होतो

आधुनिक मूत्रपिंडशास्त्राचे पितामह म्हणून गौरविलेले डॉ. Donal O'Donoghue यांचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले. त्यांना संशोधन कार्याबद्दल २०१८ मध्ये ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर हा मानाचा पुरस्कार मिळाला होता.

आदरांजली.

खूपच चांगली माहिती दिली आहे सर. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली.
Creatinine आणि हिमोग्लोबिन यात काय relation आहे? Creatinine वाढले की हिमोग्लोबिन कमी होते का?
असे हिमोग्लोबिन कमी झाले तर त्यावर काय उपाय करतात? सतत बाहेरून रक्त चढवणे कितपत योग्य आहे?

प्राजू धन्यवाद.
तुमचे दोन प्रश्न स्वतंत्रपणे घेतो.
१. क्रिएटिनिन आणि हिमोग्लोबिन या दोन रेणूमध्ये तसा थेट संबंध नाही, परंतु एकातील बदलाचा दुसऱ्यावर कसा परिणाम होतो ते पाहणे रंजक आहे.

जेव्हा मूत्रपिंड विकाराने मूत्रपिंडाची गाळण क्षमता कमी कमी होत जाते तेव्हा एका स्थितीमध्ये मूत्रपिंडाच्या बऱ्याच अन्य कार्यांवर देखील परिणाम होतात.
निरोगी मूत्रपिंडातून erythropoietin नावाचे एक हार्मोन स्त्रवते. या हार्मोनमुळे लाल पेशींची निर्मिती चेतवली जात असते. दीर्घकालीन मूत्रपिंडविकारात रक्तातील क्रिएटिनिनची पातळी अर्थातच वाढू लागते. याचा अर्थ मूत्रपिंडाची कार्यक्षमता आता ढासळत चाललेली असते. त्या स्थितीत ते हॉर्मन खूप कमी स्त्रवल्यामुळे लाल पेशींचे उत्पादन कमी होते आणि परिणामी आपल्याला हिमोग्लोबिनची पातळी कमी झालेली दिसते.

२.
आधी आपण बाहेरून रक्त कधी चढवतात त्याची तीन महत्त्वाची कारणे पाहू :

१. खूप प्रमाणात झालेला रक्तस्त्राव : जेव्हा 30 टक्‍क्‍यांहून अधिक रक्त शरीरातून निघून गेलेले असते तेव्हा.
२. तीव्र ॲनिमिया : याची अशी स्थिती, की जेव्हा रुग्णाला दम लागणे आणि अन्य काही लक्षणे दिसू लागतात तेव्हा.
३. लालपेशींच्या नाशाचे काही तीव्र आजार.

रुग्णाला बाहेरून रक्त कधी द्यायचे आणि किती प्रमाणात द्यायचे हे अर्थातच रुग्णाच्या शारीरिक तपासणी नंतर डॉक्टर ठरवतात. हे तारतम्य डॉक्टरजवळ व्यवस्थित असते.

लालपेशींच्या काही जनुकीय आजारांमध्ये रुग्णाला वारंवार बाहेरून रक्त चढवावे लागते आणि त्याचे दुष्परिणाम अर्थातच होतात ( महत्वाच्या इंद्रियांत लोह साठणे).
अशा आजारांसाठी आता नव्या पर्यायी उपचारपद्धती विकसित झालेल्या आहेत.

धन्यवाद कुमार सर. नीट समजले.
माझ्या घरी एक क्रोनिक किडनी आजाराचा पेशंट आहे. हे सगळे जवळून गेले २ वर्षे पाहत आहे. डायलिसिस आठवड्यातून दोनदा चालू आहे. सतत HB कमी होत असते व सतत रक्त चढवावे लागते. म्हणून हा प्रश्न विचारला.

माझ्या घरी एक क्रोनिक किडनी आजाराचा पेशंट आहे.
>>>
तुमच्या विचारलेल्या प्रश्नावरूनच माझ्या डोळ्यापुढे हे चित्र उभे राहिले होते ! कुटुंबीयांपैकी जेव्हा एखादा अशा आजाराने त्रस्त होतो तेव्हा बाकीच्यांच्या आरोग्यज्ञानात आपसूक भर पडत जाते. त्या कुतुहलातून असे प्रश्न मनात येतात.

माझ्यातर्फे त्यांना आयुष्य सुसह्य होण्यासाठी शुभेच्छा !

Creatinine वाढले म्हणजे किडनी खराब हे लोकांच्या डोक्यात पक्क बसले आहे .आणि डॉक्टर लोक पण ते लोकांच्या डोक्यातून काढत नाहीत.
भीती निर्माण होणे बरोबर to धंदा वाढणे.
Creatinine वाढण्याचा एकमेव अर्थ किडनी खराब आहे असा होत नाही.
बाकी पण अनेक कारणं असतात

कन्फर्म टेस्ट भारतात उपलब्ध पण नसेल.
असा अंदाज आहे

Creatinine वाढले म्हणजे किडनी खराब हे लोकांच्या डोक्यात पक्क बसले आहे .आणि डॉक्टर नी ते लोकांच्या डोक्यातून काढले पाहिजे
Creatinine वाढण्याचा एकमेव अर्थ किडनी खराब आहे असा होत नाही.
बाकी पण अनेक कारणं असतात
किडन्या खराब झाल्या आहे ह्या बाबत

कन्फर्म टेस्ट भारतात उपलब्ध आहे का?
ह्या वर डॉक्टर नी भाष्य करावे

Pages