युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक

Submitted by हेमंतकुमार on 28 December, 2017 - 21:17

युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.

क्रिअ‍ॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.

या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती

शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.

अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.

शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.

मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अ‍ॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!

आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.

३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.

इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने ! हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !

जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *

क्रिअ‍ॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअ‍ॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअ‍ॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअ‍ॅटिनीन.

प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअ‍ॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअ‍ॅटिनचे क्रिअ‍ॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअ‍ॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.

उत्सर्जन

युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअ‍ॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.

आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअ‍ॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.

आता युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअ‍ॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअ‍ॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअ‍ॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.

प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअ‍ॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !

युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअ‍ॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.

तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.

समारोप

शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअ‍ॅटिनपासून रोज ठराविक क्रिअ‍ॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
****************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

of the most common reasons for a nephrology consult is an elevated creatinine. An elevation in the serum creatinine concentration usually reflects a reduction in the glomerular filtration rate (GFR). Given the association of elevated creatinine and risk of cardiovascular mortality, it is important to keep in mind that at times the elevation of the creatinine is not representative of a true reduction in GFR. There are various causes of factitious elevation of creatinine. They can be broadly grouped into increased production of creatinine, interference with the assay and decreased tubular secretion of creatinine.

पूर्ण माहिती देण्याचे का टाळले जाते.
किडनी खराब झाली आणि दुसऱ्याची किडनी transplant केली तर ती व्यक्ती पाच वर्ष जिवंत राहण्याची शक्यता असते.
डॉक्टर ह्या वर मत व्यक्त करतील च.
ते पण जिवंत माणसाची किडनी घेणार की मृत माणसाची हा वेगळा फॅक्टर आहे
30 वर्षाच्या व्यक्ती ची किडनी खराब झाली आणि त्याला त्याच्याच कुटुंबातील जिवंत माणसाने किडनी दिली तर तो वय वर्ष 35 पर्यंत जगेल.
पन्नास वर्ष जगणार नाही..
. आपले आहे तेच अवयव सांभाळा
माझे मत चुकीचे असू शकते डॉक्टर योग्य ते मत व्यक्त करतील.

मूत्रपिंडाचे विकार अनेक प्रकारचे आहेत.
त्यांचे निदान करण्यासाठी क्रिएटिनिनची (एकदा) मोजणी ही केवळ एक चाचणी नव्हे. त्याच्या जोडीला, मुख्य म्हणजे रुग्णाच्या शारीरिक तपासणीचे निष्कर्ष आधी पाहिले जातात. त्यानंतर लघवी आणि रक्तवरील अन्य तपासण्या केल्या जातात. याखेरीज प्रतिमा तंत्रांचाही गरजेनुसार वापर केला जातो. या सर्वांची सांगड घातल्यावरच या विकाराचे निदान केले जाते.

दीर्घकालीन मूत्रपिंडविकार ठरवताना क्रिएटिनिनची पातळी सलग तीन महिने पाहिली जाते.

अर्धवट माहिती लिहून गैरसमज पसरवू नयेत.

किडनी खराब झाली आणि दुसऱ्याची किडनी transplant केली तर ती व्यक्ती पाच वर्ष जिवंत राहण्याची शक्यता असते.
>>
हे फारच मोघम विधान आहे.

प्रत्यारोपित केलेले मूत्रपिंड संबंधित रुग्णामध्ये किती काळ टिकेल हे अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्यारोपण झाल्यानंतर दीर्घकाळ इम्मुनोसप्रेसिव औषधे दिली जातात; त्यांचे अनेक प्रकार आहेत.

अशा काही औषधांच्या वापरानंतर (रुग्णाला जर अन्य कुठले वेगळे आजार झाले नाहीत आणि मृत्यू झाला नाही तर) प्रत्यारोपित मूत्रपिंडाचे आयुष्य अगदी साडेचौदा वर्षांपर्यंत देखील आढळून आलेले आहे.

लोकांची मानसिकता काय असते ते लिहल आहे
>>>
होय ना. एखाद्याचे क्रिएटिनिन वाढले असेल तर फक्त त्या एका चाचणीच्या निष्कर्षावरून कोणताही डॉक्टर रुग्णाला त्याचे निदान सांगत नाही किंवा तशी भीती घालत नाही.

भीती निर्माण होणे बरोबर to धंदा वाढणे. >>>
भीती, धंदा हे त्या प्रतिसादातील शब्द अस्थानी आहेत.

डॉक्टर, अ‍ॅडमिनना या धाग्यावरचे असंबद्ध, माहितीपेक्षा मतप्रदर्शन करणारे प्रतिसाद उडवायची विनंती करता येईल.

तुमच्या विचारलेल्या प्रश्नावरूनच माझ्या डोळ्यापुढे हे चित्र उभे राहिले होते ! कुटुंबीयांपैकी जेव्हा एखादा अशा आजाराने त्रस्त होतो तेव्हा बाकीच्यांच्या आरोग्यज्ञानात आपसूक भर पडत जाते. त्या कुतुहलातून असे प्रश्न मनात येतात.

माझ्यातर्फे त्यांना आयुष्य सुसह्य होण्यासाठी शुभेच्छा !
>> अतिशय धन्यवाद. हा लेख वाचून आणि तुमच्याशी बोलून बरीच माहिती मिळाली. at least आमच्या पेशंट च्या शरीरात काय काय होत असेल ते समजले.

डायलिसिस चालू असेल तर periodically फॉस्फरस आणि पोटॅशिअम च्या पातळ्या सतत का तपासाव्या लागतात? सतत ब्लड टेस्ट्स चालू असतात.
आणि डायलिसिस चालू असताना पचन संस्थेवरती परिणाम होतो का?

प्राजू
या आजाराने बाधित असलेल्या कुटुंबीयाचे तुम्ही अगदी बारकाईने निरीक्षण करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. त्यातून तुमच्या मनात काही प्रश्न अगदी नैसर्गिकरित्या येत आहेत तेही खूप चांगले आहे. हे कौतुकास्पद आहे !

जरा वेळाने प्रश्न सविस्तर घेतो

१.
रक्तातील पोटॅशियम व फॉस्फरस पातळी

मुळातील मूत्रपिंड आजाराने आधीच पोटॅशियम पातळी बऱ्यापैकी वाढलेली असते.
ती एका मर्यादेच्या पलीकडे गेल्यास हृदयासाठी धोकादायक असते
( https://www.maayboli.com/node/68990 इथे सविस्तर पाहता येईल).

म्हणून ती तातडीने नॉर्मलला आणावी लागते. डायलिसिस उपचार जर व्यवस्थित लागू पडले तर ती पातळी नियंत्रणात राहतेच. परंतु जर या उपचारांना रुग्ण पुरेशी दात देत नसेल तर ती वाढीवच राहते. म्हणून ती वारंवार तपासणे आवश्यक ठरते.

फॉस्फरस
मूत्रपिंडांची गाळण क्षमता खूप कमी होते तेव्हा फॉस्फरसचे उत्सर्जन होऊ न शकल्यामुळे तो रक्तात वाढू लागतो. त्याच्यामुळे अन्य काही घडामोडी होऊन हाडांवर परिणाम होतो आणि ती पोखरली जातात.
(osteodystrophy).
म्हणून ती पातळी पण वारंवार तपासणे आवश्यक

२. डायलिसिस चालू असताना पचन संस्थेवरती परिणाम

डायलिसिस चालू असणाऱ्या बऱ्यापैकी रुग्णांना बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटदुखीचा त्रास होतो. परंतु याची कारणमीमांसा पुरेशी स्पष्ट झालेली नाही.

<< Creatinine वाढले म्हणजे किडनी खराब हे लोकांच्या डोक्यात पक्क बसले आहे .आणि डॉक्टर नी ते लोकांच्या डोक्यातून काढले पाहिजे
Creatinine वाढण्याचा एकमेव अर्थ किडनी खराब आहे असा होत नाही.
बाकी पण अनेक कारणं असतात
किडन्या खराब झाल्या आहे ह्या बाबत
कन्फर्म टेस्ट भारतात उपलब्ध आहे का?
ह्या वर डॉक्टर नी भाष्य करावे
>>

हेमंत सर,
कृपया डॉक्टरवर विश्वास ठेवायला शिका, तो एक प्रोफेशनल आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघा. जर एखादा डॉक्टर आवडला नाही, त्याचा/तिचा सल्ला पटला नाही तर दुसर्‍याकडे जा. पण एखाद्या प्रोफेशनलपेक्षा स्वतःला फार ज्ञान आहे, असा आभास नको. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच. धन्यवाद.

उपाशी बोका
विश्वास ठेवला की अर्धा आजार बरा होतो.
आमचे family डॉक्टर आहेत आणि त्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवतो.
इथे विश्वास चा प्रश्न नाही
आणि मी अविश्वास डॉक्टर वर दाखवला नाही.
प्रश्न विचारला आहे.. किडनी खराब झाली आहे ह्याची कन्फर्म टेस्ट भारतात उपलब्ध आहे का?
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अगदी क्षय रोग कधी कधी शोधून पण सापडत नाही.
जास्त करून हाडांचा .

मुंबई मध्ये पण अनेक टेस्ट उपलब्ध नाहीत.
बाकी शहरांचा तर विचार पण करू नका.
मी अशी लोक बघितली आहेत
चुकीचे निदान चुकीचे उपचार .
असे खूप मोठ्या प्रमाणात घडते.
समाजात जे घडतं ते नाकारता येत नाही.

चुकीचे निदान आणि त्या मुळे चुकीचे उपचार हे घडते.
मी दोन तीन वेळा अनुभव घेतला आहे
ECG technician नी सेन्सॉर नीट योग्य जागी योग्य पद्धती नी नं लावल्या मुळे चुकीचा रिपोर्ट आला.
दुसऱ्या लॅब मध्ये वेगळाच रिपोर्ट आला .नॉर्मल .

एका दिवसात ecg बदलत नाही.
X Ray, सिटीस्कॅन ,monograohy, ब्लड टेस्ट चे रिपोर्ट वाचणे आणि बाकी लक्षण ,इतिहास ह्या गोष्टीं शी तुलना करून निदान करणे हे सर्वांना जमत नाही.
रिपोर्ट फक्त स्थिती दाखवतात ती यंत्र आहेत.
निदान डॉक्टर ना करायचे असतें
म्हणून तर काहीच डॉक्टर प्रसिद्ध असतात ना .

मूत्रपिंडाचा आजार अगदी लवकरच्या स्थितीत कधी समजेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे खरा. इथे एक लक्षात घेतले पाहिजे. मूत्रपिंडाचे गाळण यंत्रणा आणि tubules यंत्रणा असे दोन कार्यकारी विभाग असतात. या दोन्हीचे अनेक प्रकारचे आजार आहेत.

ज्या आजाराची शंका वाटत असेल त्यानुसार रक्त किंवा लघवीवर कोणती चाचणी / ण्या करायची / च्या हे ठरवावे लागते. त्यामुळे कुठलीही फक्त एकच चाचणी निष्कर्ष देऊ शकत नाही.

क्रिएटिनिनच्या मर्यादा लेखात स्पष्ट केलेल्या आहेत, तरीसुद्धा आजही त्याची रक्तातील मोजणी ही प्राथमिक चाचणी समजली जाते. त्याहून अधिक संवेदनक्षम रेणूंचा शोध घेतला जात आहे. त्यांची ही यादी:

* microRNAs
• NGAL
• IL-18
• Kidney injury molecule 1 (KIM-1)
• IGFBP7) x TIMP-2
• Calprotectin
• Urinary angiotensinogen
• Urinary microRNA
• Cystatin C

हे संशोधन बराच काळ चालेल.

कुमार sir
तुमची उत्तर योग्य च असतात आणि मला पूर्ण पटतात.
मी तुमच्या मताला विरोध नाही करत.
पण काही आयडी चा तसा गैर समज होत आहे.

डायलिसिस पेशंटना हृदयविकार >>
होय, त्यात तथ्य आहे.

या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात सुमारे 50% रुग्णांना हृदयविकार होतो.
तेव्हा डायलिसिस दरम्यान कितीही प्रयत्न केला तरी वाढलेले पोटॅशियम डोके वर काढते.
त्यामुळे हृदयतालातील बिघाड आणि वेळप्रसंगी हृदयक्रिया बंद (arrest) होऊ शकते.

कुमार सर, पोटॅशिअम आणि फॉस्फरस विषयी तुम्ही दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे. मनापासून धन्यवाद.

अगदी खरं आहे प्राजू.
अशा घरांमध्ये संपूर्ण कुटुंबाचे मनोधैर्य टिकून राहणे ही एक परीक्षा पाहणारी गोष्ट असते. काहींच्या बाबतीत डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचाही सल्ला दिलेला असतो. परंतु त्यासाठी योग्य दाता मिळणे, आर्थिक तरतूद असे अनेक मुद्दे कुटुंबियांच्या मनात घोंगावत असतात.

माझ्या एका डॉ मित्राचे १९८० च्या दशकात त्याच्या ऐन पंचविशीत मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते.
त्यानंतर जे काही मर्यादित आयुष्य त्याला मिळाले ते तो अगदी समरसून जगला. त्याची चिकाटी आणि झुंज वाखाणण्यासारखी होती.
त्याबद्दल सवडीने लिहीन

माझ्या त्या मित्राचे नाव सुनील होते असे समजू.
तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अभ्यासात हुशार आणि क्रिकेटमध्येही तरबेज. कॉलेजच्या संघात तो चांगला जलदगती गोलंदाज होता. एकदा असाच एक सामना संपवून तो स्वच्छतागृहात आला आणि लघवी करताना त्याला एकदम तिचा लाल रंग जाणवला. तोपर्यंत त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. तो क्षणभर हादरलाच.

मग डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या झाल्या आणि एका दुर्धर मूत्रपिंड आजाराचे निदान झाले. त्यानंतर जे शक्य होते ते कामचलाऊ उपचार एक-दोन वर्ष देण्यात आले. परंतु त्या आजारावरील अंतिम उपाय नव्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण हाच होता.

त्याच्या सुदैवाने खुद्द त्याची आईच त्याच्यासाठी दाता म्हणून जुळून आली. यथावकाश ती प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईत पार पडली. दरम्यान तो एमबीबीएस झाला. त्यात त्याला गुण खूप चांगले होते पण एकंदरीत शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन त्याने एमडी साठी तुलनेने बैठे काम असणारा अभ्यासक्रम निवडला. दरम्यान त्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला बऱ्याच प्रकारची औषधे नियमित स्वरूपात घ्यावी लागत. ती बऱ्यापैकी महाग होती. त्याला मिळणाऱ्या विद्यावेतनाच्या रकमेपेक्षा औषधांचा खर्चच तिप्पट होता. दर सहा महिन्यांनी त्याला मुंबईला फॉलोअप साठी जावे लागे. तेव्हा एक दोन दिवस रुग्णालयात राहावे देखील लागे.

त्याचा आजार लक्षात आल्यापासून पुढच्या तीन-चार वर्षांमध्ये त्याने मूत्रपिंडावर जे काही वैद्यकीय साहित्य तेव्हा उपलब्ध होते ते सर्व वाचून काढले होते आणि या विषयावरचा तो स्वतच एक प्रबंध झाला होता ! तो सर्वसामान्य जीवनात अतिशय हसतमुख असे. देश-विदेशात होणारा कुठलाही क्रिकेटचा सामना त्याला अगदी प्रिय असायचा. त्या सामन्याच्या दरम्यान तो कायम खिशात ट्रांजिस्टर घेऊनच वावरत असे. सामन्यात जर भारत जिंकण्याच्या दिशेने जात असेल तर सुनील कमालीचा आनंदी होई आणि या उलट जर आपण हरणार असू तेव्हा मात्र तो “गेली मॅच, गेली मॅच” असा खिन्न पुकारा करीत राही.

आमच्या मित्र परिवारात त्या अनुषंगाने अन्य प्रसंगात पण “आली मॅच” आणि ”गेली मॅच” हे दोन वाक्प्रचारच रूढ झाले होते. जमेल तितका त्याने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. त्याच्या काही मित्रांच्या ओल्या पार्ट्या होत. त्याला जरी मद्यपान करायचे नसले तरी तो तशा पार्टीला एका उंची मद्याच्या रिकाम्या बाटलीत त्याच रंगाचे छानसे सरबत घेऊन जाई आणि त्या पार्टीत सामील होई. याला त्याचे मित्र “सरबत सामील होणे” असे म्हणत असत !

त्याची एमडी ची पहिली दोन वर्षे ठीक गेली. अजून एक वर्ष पूर्ण करता तर परीक्षेला बसू शकला असता. पण तसे व्हायचे नव्हते. त्याने जाणीवपूर्वक लग्न केलेले नव्हते. त्याकाळी प्रत्यारोपण झाल्यानंतरच्या विविध सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असायच्या. त्यानंतर आयुष्यमर्यादा साधारण पाच वर्षे असे समजले जायचे. ते त्याने मनातून पक्के जाणले होते.
आणि मग ..
असाच एकदा तो मुंबईला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाला. दुर्दैवाने त्या मुक्कामात त्याला कुठलातरी जंतुसंसर्ग झाला. त्यातून शरीरात झपाट्याने दाह प्रक्रिया पसरत गेली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु तो त्यातून वाचू शकला नाही.. अखेर 'मॅच गेली' होती, नव्हे संपलीच ती.

आजही आम्हा मित्रांना त्याचा हसतमुख आणि समरसून जगणारा चेहरा आठवतो आणि डोळे पाणावतात.

खूप दुःखदायक .
एक होतकरू तरुणाच्या आयुष्याची ट्रॅजेडी.

अखेर 'मॅच गेली' होती, नव्हे संपलीच ती.......खूप वाईट वाटले वाचून.

काही मर्यादित आयुष्य त्याला मिळाले ते तो अगदी समरसून जगला. ... मित्राला सलाम!

ओहह डॉक्टर, खूप वाईट वाटलं मित्राबद्दल वाचून.

काही मर्यादित आयुष्य त्याला मिळाले ते तो अगदी समरसून जगला. ... मित्राला सलाम! >>> अगदी अगदी.

Pages