युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक

Submitted by कुमार१ on 28 December, 2017 - 21:17

युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.

क्रिअ‍ॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.

या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती

शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.

अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.

शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.

मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अ‍ॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!

आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.

३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.

इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने ! हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !

जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *

क्रिअ‍ॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअ‍ॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअ‍ॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअ‍ॅटिनीन.

प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअ‍ॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअ‍ॅटिनचे क्रिअ‍ॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअ‍ॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.

उत्सर्जन

युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअ‍ॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.

आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी

वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअ‍ॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.

आता युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअ‍ॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअ‍ॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअ‍ॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.

प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअ‍ॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !

युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअ‍ॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.

तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअ‍ॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.

समारोप

शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअ‍ॅटिनपासून रोज ठराविक क्रिअ‍ॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअ‍ॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
****************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोके का दुखते ? >>>
नियमित डायलेसिस करणाऱ्या जवळजवळ निम्या लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो. काहींच्या बाबतीत तो तीन दिवसांपर्यंतही टिकूनही राहतो.

याची दोन कारणे आहेत :
१. रक्तातील युरियाची पातळी बरीच वाढलेली असणे
२. डायलेसिस पूर्वी आणि नंतर जो रक्तदाबात फरक पडतो त्याचाही याच्याशी संबंध आहे.

डों. HUS झालेल्या नातेवाईक मुलाला डिस्चार्ज मिळाला 2 आठवड्यापूर्वी. 2 महीने जास्त काळजी घेण्यास सांगितले आहे. त्याला नंतरही भविष्यात kidney चा त्रास होऊ शकतो का? त्यासाठी त्याची विशेष अशी काही काळजी घ्यावी लागेल का?

स्वाती,
HUS या आजाराचे काही प्रकार आहेत. त्यापैकी सर्वात जास्त आढळणारा जो आहे त्याच्या रुग्णांचे भवितव्य सर्वसाधारण चांगले राहते. खालील काळजी घेतलेली बरी असते:

१. आहारात मिठाचे प्रमाण कमीत कमी ठेवणे
२. हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी लोह आणि फॉलिक ऍसिड घेणे
३. पौष्टिक आहारावर भर असावा
४. जसे मुलाचे वय वाढत जाईल तसे वजनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे.

आजाराच्या अन्य प्रकारांबाबत संबंधित डॉक्टर सूचना देतीलच

किडनी, लीवर बिघडण्याचे दुष्टचक्र कुठून सुरू होते हे वेगळे सांगायला नको. मग डॉ बदलला की तो सांगतो/विचारतो "कुणी सांगितली ही *** औषधं घ्यायला?" पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
जड धातुवाली आयुर्वेदिक औषधं कोण सतत घेत असतो आणि त्यांनाच हे होतं हा पहिला मुद्दा. म्हणजे इतरांना कसा त्रास होतो?
थोडक्यात माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी /माझ्या नातेवाईकांना अमुक महागडे उपचार घेऊ शकतो यात धन्यता मानणे सुरू झाल्यामुळे मार्केट तिकडे वळले हे उघड आहे.
थोडा धीर आणि सावधता बाळगली तर दुष्टचक्रातून दूर राहू शकतो.

कुमार सर ह्यावेळी, हिमोग्लोबिन ९.८ व क्रिएटिनाइन जे पहिले ०.६ ०.७ होते ते ०.९ आले आहे. किडनीच्या अजून काही टेस्ट करू का?

०.९ हे रेंजमध्ये आहे की.
काही त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर चाचण्या.

हिमोग्लोबिन ९.८ >>> हे अजून दोन ग्रॅम तरी सुधारावे

हे अजून दोन ग्रॅम तरी सुधारावे>> खाण्यात पालक बीट करत होते तेव्हा १२ च्या लेव्हल ला आले होते. मध्यंतरी एक सॉलिड डिप्रेशन अ‍ॅटेक आला
तेव्हा कंफर्त फूड दही भात साखी पोहे आलू पराठे दोसे इडली मेनली कार्ब्ज खाल्ले गेले. आता परत लेव्हल सुधारली पाहिजे.

एक विनंती: लिव्हर च्या रोगांबद्दलही एक धागा वेगळा काढावा. धन्यवाद.

सर्व्हिक्स कॅन्सर हा विषय इथे उचित आहे का? असल्यास हा कर्करोग कसा चार हाताच्या अंतरावर ठेवायचा याबद्द्दल काही टिप्स, संशोधन आहे का प्लीज? माझ्या मैत्रिणीच्या ओळखीत कुणाला तरी ४ थ्या स्टेजचा निघाला आहे. सिम्प्टम्स काही नसतात का कोण जाणे पण एवढ्या पुढे गेलाच कसा.
मला ते कोणतेतरी इन्जेक्शन घेण्याची इच्छा होती पण डॉक्टर म्हणाल्या, वय उलटून गेले आहे. पॅप स्मिअर रेग्युलर करते. अजुन काय करता येइल?

सामो ,
नाही; त्या विषयावरील चर्चा इथे आहे
https://www.maayboli.com/node/65597
ती एकदा नजरेखालून घाला व त्यानंतर काही तिकडे बोलता येईल.
***********

हा धागा वर आलाच आहे तर आजच्या जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त संबंधित रुग्णांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

किडनी असेल किंवा यकृत
ते त्यांचे काम करत असतात.
युरिया,रक्तात योग्य ठेवणे.
किंवा creatine रक्तात योग्य ठेवणे हे त्यांचे काम .
पण त्याची निर्मिती प्रमाण बाहेर झाली आणि त्यांचे विसर्जन करण्याची दोन्ही अवयव ची कुवत नसेल तर त्याचे प्रमाण शरीरात वाढणार च.
ह्याचा अर्थ यकृत किंवा किडनी योग्य काम करार नाही असा का काढला जातो

पण त्याची निर्मिती प्रमाण बाहेर झाली आणि त्यांचे विसर्जन करण्याची दोन्ही अवयव ची कुवत नसेल तर त्याचे प्रमाण शरीरात वाढणार च.
>> U & Cr ची फक्त निर्मिती वाढली आहे असे कमी वेळा असते.
उलटपक्षी, बऱ्याच वेळेला असे असते की :

मूत्रपिंडाच्या गाळण यंत्रणेला किंवा अन्य भागांना इजा/ आजार होतो. (nephritis )
असे झाले की, U & Cr चे निर्मितीप्रमाण नेहमीइतकेच असले तरी ते आजारामुळे उत्सर्जित होत नाही.

नमस्कार डॉक्टर कुमार.
एक शंका आहे आणि तुमच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल याची खात्री आहे म्हणून इथे विचारते आहे.
माझ्या चुलत बहिणीला कच्चे किंवा उकडलेले बीट खाल्ले की लालसर रंगाची लघवी होते. बाकी तिने पालक सूप / खूप जांभळे/ काळी द्राक्षे इ. खाऊन पाहिले पण त्यावेळेस रंग नेहमीचाच राहिला. पण बीट खाल्ले की लगेच रंग लाल होतो.
असे का होत असेल? तिची किडनी बीटचा रंग filter करू शकत नाही की काय? काही काळजीचे कारण असेल का?

धनवंती, प्रश्न चांगला आहे.

समाजातील १०-१४% निरोगी लोकांत ही "समस्या" आढळते. त्यामुळे काळजी नसावी. बीटामधील एक रंगद्रव्य मूत्रपिंडाच्या गाळण यंत्रणेला पार करून लघवीत उतरते.

मात्र २ आरोग्यसमस्या असल्यास ही घटना अधिक प्रमाणात दिसते:
१. लोहन्यूनता
२. पचनाचे काही आजार.

तुमच्या बहिणीने एकदा हिमोग्लोबिन बघून घ्यावे व ते उत्तम असल्यास विसरून जावे!

फक्त
एक काळजी काही प्रसंगी घ्यायची. काही कारणास्तव लघवीची तपासणी करायला सांगितली असता 24 तास आधी बीट खायचे नाही.

बीटाच्या विविध जाती असतात त्यानुसारही लघवीच्या रंगात बऱ्यापैकी फरक पडतो.
गंमत म्हणून अशा केसमध्ये एक प्रयोग करून पाहता येईल.

समजा,
आपल्या नेहमीच्या भाजीच्या दुकानातून आणलेल्या बीटामुळे लघवी नेहमीच रंगीत होते. मग कधीतरी सेंद्रिय किंवा महागड्या भाज्या मिळणाऱ्या दुकानातून बीट आणून खाऊन पाहायचे
तसेच, जेव्हा केव्हा देश विदेशात भ्रमण होईल तेव्हा दूरच्या भौगोलिक प्रांतातील बीट खाऊन पाहायचे.

यातून काही फरक जाणवल्यास ती स्वतःसाठीच गंमत असेल !

खूप खूप धन्यवाद सर _/\_
तिला हे कळवले आहे. काळजी मिटली Happy
Hb तपासायला सांगते.
पुन्हा एकदा धन्यवाद, खूप पटकन प्रतिसाद दिल्याबद्दल.

>>>बीटामधील एक रंगद्रव्य मूत्रपिंडाच्या गाळण यंत्रणेला पार करून लघवीत उतरते.>> महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
धन्यवाद.

The Kidney Project
या नावाने एक महत्त्वाकांक्षी दीर्घकालीन प्रकल्प अमेरिकेत एका दशकापासून चालू आहे. त्यातील दुसरा टप्पा सध्या पूर्ण झाला आहे. त्यामध्ये कृत्रिम मूत्रपिंडाची प्राथमिक प्रारूपे तयार करून त्यांची चाचणी झाली. आतापर्यंत preclinical या पातळीवरील संशोधन झालेले आहे. आता प्रत्यक्ष रुग्णप्रयोग करण्यासाठी (टप्पा-३) पुढील तंत्रज्ञान विकसित करायचे आहे. त्यासाठी सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे.

* सध्या या उपचाराकडे डायलिसिस आणि खऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यांच्या दरम्यानची उपचार पायरी (bridge) म्हणून पाहिले जात आहे.

* डायलिसिसपेक्षा या पद्धतीत होणारे फायदे असे आहेत :
१. रुग्ण कुठल्याही निर्बंधाविना नेहमीचा आहार घेऊ शकतो
२. या उपचारानंतर शरीराची प्रतिकारशक्ती दाबणारी किंवा रक्तपातळ करणारी औषधे द्यावी लागत नाहीत.
* अजून ३-४ वर्षांत पुढील संशोधनातली प्रगती समजेल.

https://pharm.ucsf.edu/kidney/newsletter/2023/winter#:~:text=Research%20....

मी ७२ वर्षाचा आहे सर.
गेली ५ वर्षे क्र्याटीनिन १.२ ते १.३ मध्ये वर खाली होतय... मी बीपी ची एम गोळी ट्रिप्टोम र ४० गेली १० वर्षे घेत आहे.
क्र्य्~एटिनिन मुळे माझ्या डॉक्टरांनी पेन किलर्स ( ऑकेजनल देखील) वर बंधने घातली आहेत. मला गुडघ्याचा त्रास आहे.
क्रियॅटिनिन डेंजरस झोन मध्ये आहे का? मला कोणताही लघवीचा त्रास नाही

रेव्यु
फक्त serum creatinine या एका रिपोर्टवरून मत देता येत नाही. इतरही काही निकषांचा विचार करून मूत्रपिंडासंबंधी estimated GFR किती, हा निष्कर्ष काढावा लागतो.
तसेच दीर्घकालीन मधुमेह आहे किंवा नाही आणि इतरही गोष्टी पाहायला लागतात.

तुमच्या प्रश्नाचे खरे उत्तर तुमचे डॉक्टरच देऊ शकतात. याहून अधिक व्यक्तिगत चर्चा आपण येथे करत नाही.

शुभेच्छा !

>>> कृत्रिम मूत्रपिंडाची प्राथमिक प्रारूपे >>> चांगली माहिती.
सारखं डायलिसिस करून वैतागलेले लोक पाहिलेत.

कुमार सर क्रिएटिनिन १.८ मग १.४ व आत्ता केले तर २.७ वर गेले आहे. नेफ्रोलो जिस्ट ची अपोइंट मेन्ट घेतली आहे. पण घाबरायला झाले आहे.

२.७ >>>
होय, हे परिस्थिती बिघडल्याचे लक्षण आहे खरं.
तुम्ही त्यांना दाखवून घेत आहात हे चांगले आहे. बघूया आता त्यांचे काय म्हणणे आहे ते
दरम्यान शुभेच्छा देतो !

जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त सर्व संबंधित रुग्णांना शुभेच्छा !

महाराष्ट्रातील वास्तव ( बातमी छापील मटा 14 मार्च 2024) :
१. गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातील 1731 रुग्णांना मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत प्राण गमवावे लागले आहेत.
२. सध्या राज्यात सहा हजार रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत.

अपेक्षा :
१. अवयवदानासंबंधी जनजागृती वाढावी
२. कृत्रिम मूत्रपिंड संशोधन गेली अनेक वर्षे चालू आहे. त्यास गती मिळावी.
(Submitted by कुमार१ on 20 December, 2023 - 13:57)

Pages