स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग १०

Submitted by सव्यसाची on 12 November, 2017 - 08:46

आषाढ कृष्ण सप्तमी (१६ जुलै) - चंद्रताल

आज निवांतपणे उठून पहिल्या हॉटेलवर चविष्ट पराठे आणि आम्लेट पाव याचा समाचार घेतला. मग मजल दरमजल करत निघालो. आज फार अंतर खरंच कापायचे नव्हते. थोड्याच वेळात सुंदर हिरवागार घाट सुरू झाला. हाच तो कुंझुम घाट. आमच्या या वारीतला सगळ्यात उंच घाट. घाटाच्या टोकावर एक नेहमीप्रमाणे देवीचे देऊळ आहे. फक्त हे देऊळ आणि आजूबाजूचा परिसर बऱ्यापैकी मोठा होता. उंची काहीतरी पंधरा हजार पाचशे आहे. इथल्या हिरवळीवर याक चरत होते. अक्षय त्यांच्यापाठोपाठ फिरत होता. मी दुचाकीवर बसून होतो. चारी बाजूला पर्वत, त्यांची हिमाच्छादित शिखरे आणि शांतता.


-

हे दृश्य आता इतकं सवयीचं झालं होतं की मुंबईत परतल्यावर त्या काँक्रीटच्या जंगलात कसं वाटेल याचा विचारही करवेना. अर्धा-पाऊण तास इथे काढल्यावर आम्ही दरी उतरू लागलो. रस्ता फारच अरुंद आणि घसरडा होता. त्यामुळे गाडी सांभाळून चालवावी लागत होती. अर्धा घाट उतरल्यावर एक आणखीनच चिंचोळा रस्ता उजवीकडे जात होता. हाच आम्हाला त्या प्रसिद्ध चंद्रतालकडे नेणार होता. मी हे ठिकाण मनात व्यवस्थित नोंदवून ठेवले. तसेच फोटोही काढून ठेवला. आम्हा दोघांना उद्या एकटेच या वाटेने परत यायचे होते. खरतर वारी ठरली त्यावेळेस टाबोला थांबायचे ठरले नव्हते. आमची तिकिटे काढून झाली व नंतर नायक म्हणाला की रस्ता खडतर असल्यामुळे टाबोला मुक्काम करावा असे स्थानिकांनी कळवले आहे. त्यामुळे आपला मनालीचा मुक्काम दोन वरुन एका रात्री वर आला आहे. म्हणजेच आम्हा दोघांना उद्या मनाली गाठली की लगेच संध्याकाळची बस पकडून दिल्लीला जायचे होते. त्यामुळे आमचे नियोजन असे होते की उद्या भल्या पहाटे सव्वापाचला चालू पडायचे. सात तास नक्कीच लागतील. तेव्हा एक वाजेपर्यंत मनालीमधे पोचल्यावर गाड्या परत देऊन होईपर्यंत तीन-साडेतीन तर सहज होतील. मग सहाची बस पकडायची होती. आणि हे सगळे अंतर आम्हाला एकट्यानेच पार करायचे होते. कारण बाकी मंडळी उशिरा निघणार होती. ती मनालीमधेच राहणारही होती. परवा ती मंडळी चंडीगडला जाऊन विमान पकडणार होती. त्यामुळे आमच्या बरोबर दुरुस्ती वाहनदेखील असणार नव्हते. म्हणजे पहिल्या दिवशी जसे आम्ही एकटेच होतो तसेच उद्याही. तो चिंचोळा मार्ग म्हणजे जेमतेम एक सोळा आसनांची बस जाऊ शकेल एवढाच होता. मोठी 52 आसनांची बस तर जाऊच शकली नसती. एकदोन थोडेसे खडतर ओढे पार करावे लागले आणि उद्या काय वाढून ठेवले आहे याची चुणूक मिळाली. बारा साडेबारापर्यंत मुक्कामी पोहोचलो. आजचे देखील तंबू उत्तम स्थितीतले होते. गेल्या गेल्या गरम गरम शेवया खायला मिळाल्या. तंबूची जागा चक्क नदीच्या पात्रात होती. आत्ता पात्र कोरडे होते. पण नंतर जेव्हा केव्हा पाऊस पडत असेल तेव्हा हा सगळा भाग पाण्याखाली जात असणार. येताना पादत्राणे ओढ्यात भिजल्यामुळे आल्या आल्या गोष्टी वाळत टाकल्या. आकाश एकदम निरभ्र होते. तेव्हा लगेच चंद्रताल वर जाऊन यावे असे ठरले.

थोड्याच वेळात गाड्या घेऊन निघालो. वाटेत एक बऱ्यापैकी दम काढणारा ओढा आहे असे कळले होते. त्यामुळे एकेकट्याने आपापली गाडी घेऊन जायचे ठरवले. त्या ओढ्यातून जाताना थोडे कष्ट पडलेच. पण नंतर बऱ्यापैकी सोपा रस्ता होता. तुरळक लोक चालत जाताना दिसत होते. त्यातल्या दोन मुलींनी अक्षयाला थांबवले व वाहन तळापर्यंत सोडण्याची विनंती केली. मग त्या दोघी अक्षयच्या मागे व त्यांचा भाऊ माझ्या मागे असे आम्ही पुढे निघालो. मंडळी मुंबईचीच होती व परवा इथूनच लडाखला जाणार होती. वाहनतळावरून पुढे अडीच किलोमीटर चालत जावे लागते. उंचावरील ठिकाण असल्यामुळे चालताना दम लागू शकला असता म्हणून सावकाश चालत होतो. पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर होता की अक्षय पळतपळत एका टेकडीवर चढला. त्याला वाटले त्या टेकडीवरून तलाव दिसेल. पण त्याच्या पुढच्या टेकडीवर जेव्हा आम्ही चढलो तेव्हा डावीकडे एक छोटा तलाव व उजवीकडे चंद्रताल दिसू लागला. चंद्रतालचे निळेशार पाणी पाहून डोळे निवले.

चंद्रतालच्या काठाकाठाने चालायला छोटी पायवाट आहे. मी आणि अक्षय वरून फोटो काढून झाल्यावर खाली धावत सुटलो. सह्याद्रीतल्या भ्रमंतीचा या धावण्यासाठी चांगलाच उपयोग झाला. सगळ्यांच्या आधी आम्ही खाली पोचलो. आणि त्या सुंदर निळ्या पाण्यात पाय बुडवून फिरू लागलो. तिथे सुरुवातीला तर चक्क पुळण आहे. अचानक आमच्या दोघांच्या मनात पाण्यात डुबकी मारायचा विचार बळावला. पाणी तर गोठवणारे होते. पण बाहेरील वातावरण स्वच्छ आणि उबदार होते. कारण आभाळ वगैरे काही आले नव्हते. की पाऊस पडला नव्हता. इतकी योग्य संधी पुन्हा आली नसती. मग काय ! कपडे काढून पाण्यात सूर मारला. लगेचच लक्षात आले की हालचाल केली नाही तर नुसते डुंबता येणार नाहीच. अंगात उष्णता येण्याकरता जोरजोरात हातपाय हलवून पोहणे गरजेचे होते. एक छोटीशीच गोलाकार फेरी मारून आलो व बाहेर पडलो. उगाच फार वेळ पोहत राहण्याचा धोका पत्करण्यात अर्थ नव्हता.


-

-

-

बाहेर येऊन कपडे चढवून आम्ही उजव्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने चालू लागलो. काही ठिकाणी पायाखाली मखमली हिरवळ होती. तर काही ठिकाणी काटेरीपण होती. आम्ही अनवाणी चालत होतो. काय तुफान मजा येत होती. पाण्याचा तळ दोन फुटांपर्यंत अगदी सहज दिसत होता. त्या वातावरणात खूप वेळ फिरत राहिलो. बरेच फोटो काढले. मग पुन्हा पुळणीवर येऊन सगळ्या मंडळींबरोबर फोटोसेशन झाले. इथून उडी मार, अशीच मार, पाय असाच वर घे, हात असेच वर फेक, डोकं मागे झुकू दे.. ! काय नि काय ! तिथून हलावेसे अजिबात वाटत नव्हते. आणि निसर्गाने पण चांगलीच साथ दिली होती. पण अंधार पडायच्या आत निवासस्थानी परतणे अत्यंत गरजेचे होते. तेव्हां नाइलाजाने आम्ही सगळे परत निघालो. आजचा दिवस अर्थातच या पूर्ण वारी मधला सगळ्यात उच्च आनंदाचा दिवस ठरला. दुसरा सगळ्यात चांगला दिवस म्हणजे सांगला आणि चिटकूलला गेलो होतो तो. येताना परत त्या मगाचच्याच मुली आणि त्यांच्या भावाला आम्ही गाडीवरून वाटेत लागणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी सोडले. त्या मुलींवरून अक्षयला तलावावर व निवासस्थानीदेखील भरपूर चिडवण्यात आले हे सांगणे न लगे !

आता आम्ही तंबूबाहेर हिरवळीवर गप्पांचा फड नेहमीप्रमाणे चालू केला. आजची संध्याकाळ फारच सुंदर सोनेरी पण मनाला काहूर लावणारी होती. भोवतालचा अत्यंत सुंदर निसर्ग, ते पर्वत, त्यांच्यावरील ते बर्फ, दगडगोट्यांनी आणि पांढऱ्या वाळूने भरलेले नदीचे पात्र, स्तब्ध शांतता, हळूहळू येणारी संध्याकाळ आणि मग अंधार ! एक वेगळच वातावरण तयार झालं होतं. थंडी चांगलीच पडली होती. बरीच मंडळी कानटोपी हातमोजे पायमोजे चढवून बसली होती. मला एवढी थंडी वाजत नाही त्यामुळे मी बराच वेळ सदऱ्यावरच होतो. मला वाटतं आम्हाला खूपच भूक लागली होती. आणि जेवायला अजून वेळ होता त्यामुळे आम्ही परत शेवयांवर ताव मारला.

आता अंधारही पडला होता आणि वारादेखील जोराचा सुटला होता. त्यामुळे चांगलीच थंडी वाजू लागली. मग पेयपानाचा कार्यक्रम एका तंबूत सुरू झाला. आज पहिल्यापासूनच गाणी म्हणायला सुरुवात झाली. पहिल्यांदा अर्थातच किशोरकुमार आणि मग इतर. नायकाकडे एक माईक होता त्यामुळे सगळ्यांनी त्यावर आपला आवाज साफ करून घेतला. वातावरण जबरदस्त भारून टाकणारे झाले होते. वारी बऱ्यापैकी संपत आली होती. आम्ही तर उद्या यांना सोडून पुढे निघून जाणार होतो. एकूणच जोरदार मैफिल रंगली होती. मी पण आज दो घुंट मुझे भी पिला दे शराबी असं म्हणत मोजून दोन घोट घेतले. आता जेवण तयार आहे अशी बातमी आली. मी आणि अक्षय दहा-पंधरा मिनिटांनंतर जेवायला गेलो कारण आम्हाला लवकर झोपायचे होते. आमचं जेवण होईस्तोवर इतर पण जेवायला आले. आता आम्ही त्यांचा निरोप घेतला. उद्या सकाळी सगळे उठले असतीलच असं सांगता येत नाही. तंबूत येऊन पावणे पाचचा गजर लावून झोपी गेलो. झोपायच्या आधी सॅकमधील सगळं सामान पहिल्या दिवशी भरलं होतं तसंच खोगीरात भरून टाकल. आता उद्या काय होतय, वेळेत पोचतो की नाही त्याची चिंता होती. कारण याच दिवशी सगळ्यात जास्त ओढे लागणार होते. त्यामुळे कसोटीचे क्षण नेमके शेवटच्या दिवशी वाढून ठेवले होते.

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast!

मस्त...

फोटो टाकताना कितीही अंतर सोडले तरी ते चिकटतात हा स्वानुभव. ते चिकटू नयेत म्हणून एकतर नंबर तरी द्यावे नाहीतर शीर्षक तरी.

खरंय आउटडोअर्स आणि साधना. मी ब्रॅकेट टाकायचा प्रयत्न केला पण ती पद्धत चालत नाहीये. मोकळ्या रेषा कितीही सोडल्या तरी त्या नाहीश्या होतात. पण आकडे टाकणे किंवा शीर्षक ही चांगली युक्ती आहे..

अर्धा घाट उतरल्यावर एक आणखीनच चिंचोळा रस्ता उजवीकडे जात होता. हाच आम्हाला त्या प्रसिद्ध चंद्रतालकडे नेणार होता >>

IMG_1197.JPG

लॅण्ड्स्लाईड झाल्या मुळे आमचा चंद्रताल राहिला तो राहिलाच... फोटो बघुन जळफळाट होत आहे.

हो मी ते वाचलं होतं तुझ्या इथेच टाकलेल्या वर्णनात. खरंच छान आहे चंद्रताल. आमचं पॅंगॉन्ग तळं असंच हुकणार होतं खूप बर्फवृष्टीमुळे. पण थोडक्यात बचावलो होतो.