स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ३

Submitted by सव्यसाची on 4 November, 2017 - 13:01

आषाढ पौर्णिमा (गुरु पौर्णिमा - ९ जुलै) - मनाली, लाहुरी

आता बाहेर मस्त गुलाबी थंडी होती. दिल्लीचा भयंकर उकाडा संपला होता. नंतर औत बोगद्यात शिरताना इथूनच आपल्याला दुचाकीवरून परत यायचे आहे असे अक्षयला सांगितले. आता फोन करून निशितला आम्ही कुठे आहोत ते कळवले. तो म्हणाला या तुमच्या गाड्या तयारच आहेत. गाडीने आम्हाला माल रस्त्याजवळच्या एका पेट्रोल पंपावर सोडले. तिथले प्रसाधनगृह चांगले आहे हे बघताच आम्ही आमचे प्रातर्विधी आटोपून घेतले. चला आता आम्ही पूर्ण सज्ज होतो. झोपही छान झाली होती. लगेच गॅरेजमध्ये पोचलो. गाड्या तयारच होत्या. आम्ही लगेच त्या चालवून पाहिल्या. माझी गाडी थोडीशी उजवीकडे खेचली जात होती. हे मी त्याला सांगितले पण अर्थातच त्याने ते नाकारले. ही एकच खोट सोडल्यास बाकी गाड्या एकदम उत्तम होत्या. गाड्या अगदीच नवीन होत्या. जेमतेम तीन-चार हजार किलोमीटर्स झाले होते. आता आमची खोगीरं बसत आहेत की नाही ते पाहीलं आणि नेमकं कॅरीअर्स काढावी लागतील हे लक्षात आलं. मग ती काढून होईस्तो आम्ही निशितबरोबर एका पराठा धाब्यावर गेलो. रस्त्याच्या कोपऱ्यावर छोटासा धाबा आहे. त्याच्या बाजूलाच निशितचे कार्यालय होते. तिथे त्याला उरलेले पैसे देऊन टाकले आणि निवांतपणे धाब्यावर पराठे हाणले. खाता खाताच माझ्या लक्षात आले की मागच्या वेळेस अतुल अक्षयने मला इथेच सोडले होते. माझे पराठे खाऊन होईपर्यंत ते कुठेतरी जाऊन आले होते. मी गेलो नव्हतो कारण माझा पाय प्लास्टरमध्ये होता. काय मजेशीर नशीब असतं !

परतलो व गाडीवर सामान चढवले, चिलखते घातली, त्याच्याकडचे शिरस्त्राण घेतले. हे मात्र अगदी वाईट परिस्थितीतले होते. पाच-सात शिरस्त्राणे तिथे शीर कापून ठेवल्यासारखी ठेवली होती. त्यात ३ जणांना तर काचच नव्हती आणि मला तर काच फार गरजेची वाटते. एकाच्या काचेतून काहीच दिसत नव्हते. म्हणून जे उरले होते ते शिरस्त्राण घेतले. याची काच अर्धवट दाखवत होती. आता गॉगल घालावाच लागणार असे दिसले. खरतर मला अजिबात गॉगल घालून चालवायला आवडत नाही. त्यामुळे मी नेहमीच शिरस्त्राणाच्या काचेवर भिस्त ठेवून असतो. ही नीट बसत असेल आणि एकदम स्वच्छ असेल तर दिसतेही चांगले आणि हवाही लागत नाही. पण आता नाविलाज को क्या विलाज ! पण मी साधा पंधरा वीस रुपयांचा गॉगल आणला होता व खरा रायडिंगचा चष्मा घरीच ठेवला होता. विनाशकाले विपरीत बुध्दी ! मग काय आता बांधा रुमाल आणि चढवा गॉगल. अक्षयने बिनकाचेचेच शिरस्त्राण घेतले होते. त्याला चालणार होते. आमच्या एक लक्षात आले की शिरस्त्राण तरी आपलेच आणले पाहिजे. असो. पुढच्या वेळेस. आता लगेच सकाळच्याच पेट्रोल पंपावर इंधन भरायला गेलो कारण गाडी मध्ये काहीच इंधन नव्हते. इंधन भरले आणि मग खऱ्या अर्थाने श्रीगणेशा केला.

आता पुढचे आठ नऊ दिवस या दुचाकी वरच. तिथे जायच्या आधी मला असे वाटत होते की आपल्याला बुलेटची सवय व्हायला निदान एक दिवस तरी जाईल. पण आज मी बसलो आणि युनिकॉर्न इतक्याच सराईतपणे चालवायला सुरुवात केली. पाच मिनिटे पण लागली नाहीत. फक्त एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पहिल्या गिअरवरती बुलेटची ताकद कमी आहे. त्यामुळे चढ चढताना थोडा त्रास होऊ शकेल. माझ्या युनिकॉनवर मी बऱ्यापैकी चढ आरामात चढून जातो. असो. पुढे बघू.
आता डावीकडे व्यास नदी, उजवीकडे डोंगर, बऱ्यापैकी थंडी !

दुचाकी चालवायला अतिशय उत्तम वातावरण होते. आम्हाला जवळ पास एकशे सत्तर किलोमीटर पार करायचे होते. त्यात जलोडी नावाची एक मोठी खिंड पार करायची होती. विचार असा होता की सहा तास लागतील आम्ही बारा वाजता सुरू केले होते. म्हणजे सहा साडेसहा पर्यंत दिवसाउजेडी मुक्कामी पोचायला हरकत नव्हती आमच्याबरोबर आज दुरुस्ती वाहन नव्हते. त्यामुळे झटपट अंतर कापणे गरजेचे होते. वाटेत एका ठिकाणी दोन लिटरच्या दोन शीतपेयाच्या बाटल्या उचलल्या. पुढे याचाच उपयोग आम्ही इंधन भरून घेण्याकरता करणार होतो. आणि तसंही आता चांगलंच उकडायला लागलं होतं त्यामुळे मी तर जॅकेट काढून ठेवले होते. तर ते पेय पिऊनपण घेतले थोडेसे. आता नुसत्या लांब बाह्यांच्या सदऱ्यावर चालवायला सुरुवात केली. लडाखच्या अनुभवावरून आम्ही गरम कपड्यांची जय्यत तयारी केली. होती. पण सगळं ओमफसच झालं पुढेदेखील वारीभर. फारशी थंडी अशी कुठे नव्हती की जिथे सतत 2 पूर्ण बाह्यांचे सदरे आणि वर जॅकेट लागेल. मधून मधून जॅकेट काढावेच लागत होते.

व्यास नदीच्या कधी उजवीकडून कधी डावीकडून जाताना खूप मजा येत होती. एकदोन जलविद्युत केंद्रे देखील पाहिली. पुढे पुढे रोजच एक तरी जलविद्युत केंद्र दिसत असे. पण मग प्रश्न पडला की इतकी केंद्रे असूनही हिमाचल प्रदेशमध्ये विजेचा तुटवडा का? लवकरच औत बोगदा पार केला. पुढे असलेल्या तिठ्यावर फोटो काढले. आता त्या सुंदर घनगंभीर आवाजाच्या व्यास नदीचा सहवास संपला व तिर्थ नदीकाठचा प्रवास सुरू झाला. लगेचच दोन वेळा ती तीर्थ नदी झटपट ओलांडून तिथे असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन भरून घेतले. टाकी दरवेळेस काठोकाठ भरायची असे ठरवले होते. आता एकदम निमुळता घाटरस्ता सुरू झाला. जेमतेम एक मोठी गाडी जाऊ शकेल एवढाच होता पण गर्दी अजिबात नव्हती. त्यामुळे मस्त रमतगमत गाडी चालवता येत होती. आता चांगलीच भूक लागली होती. मस्त छोटी छोटी गावे लागत होती. बंजरला पोचायच्या थोडंसंच आधी एक हॉटेल दिसले. आम्ही तिथे थांबलो पण तीन मजले वर चढून जावे लागले. कारण राहण्याची सोय खाली व जेवायची सोय वरती होती. पण इतके वर चढून गेल्याचे सार्थक झाले. अतिशय सुंदर गच्चीत स्वच्छ चकचकीत व्यवस्था होती. बाजूने तीर्थ नदी शांतपणे वाहत होती.

इतके अप्रतिम स्थळ जेवायला मिळालेच नसते आणि जेवण तर काय फारच चविष्ट होते. गरम गरम फुलके व भरली भेंडी ! जेवण जरी झटपट मिळाले तरी आम्ही जवळपास तासभर तिथे होतो.

मग मात्र अक्षयला म्हटले आता आपल्याला पाय उचलायला पाहिजे आहेत. दिवसाउजेडी घाट पार करून जायलाच पाहिजे. नाईलाजाने निघालो. आता त्या छोट्याश्या लाघवी तीर्थ नदीचा सहवास संपला. आता आम्ही खिंड चढू लागलो. पाचदहा मिनिटातच होता नव्हता तो ही डांबरी रस्ता संपला व दगडधोंड्यांचा, मातीचा रस्ता सुरू झाला. पाऊसही भुरु भुरु पडू लागला. मी लगेच पावसाळी पोशाख चढवला. यातला वरचा सदरा हा अतुलच्या बायकोचा होता. म्हणजे एकदम गुडघ्यापर्यंत लांब आणि ढगळ. त्यामुळे माझ्या जॅकेट वरूनही तो मला चढवता येत होता. आणि यावेळेस हाताची चिलखतेही नसल्यामुळे हे शक्य होत होते.

मस्त धुकं पडलं होतं. पण त्यामुळेच अंधारही दाटला होता. इथे चांगल्यापैकी चढ होता आणि मला जाणवलेला बुलेटचा पहिल्या गिअरचा कमी ताकदीचा त्रास कधीही होऊ शकेल असे वाटू लागले. आता आम्ही चांगल्याच दाट जंगलातून जात होतो. आणि तरीही अधून मधून एक एक दोन दोन घरे दिसत होती. आम्ही एका वेगळ्याच धुंद वातावरणात, तंद्रीत चालवत होतो. तेवढ्यात पुढे वाहतूक ठप्प झालेली दिसली. रस्त्याचे डांबरीकरण चालू होते म्हणून थांबवण्यात आली होती. पण त्यांनी दुचाकी उजवीकडे खाली उतरवून शेवटी परत वर काढा असा इशारा केला. सर्वात शेवटी परत रस्त्यावर चढवताना दुचाकी निघाली नसतीच पण मी अर्ध्या क्लचवर ताकद मिळवून चढवली. माझी युनिकॉर्न इथे पहिल्या गियर वर सहज चढली असती. पुढे बघतो तर लगेचच आम्ही खिंडीच्या वरच्या टोकाला पोचलो. तिथे एक देवीचे मंदिर होते.

दोन्ही बाजूला असलेल्या घरांच्या पडवीमध्ये बरीच माणसे बसलेली होती. ही सगळी त्यांना घेऊन जाणाऱ्या भाड्याच्या गाडीसाठी थांबलेली होती. यात जवळपास ७० % बायकाच होत्या. खूप पूर्वी हिमालयात ट्रेक करताना पुरुष मस्त तंगड्या वर करून हुक्का ओढत ऊन खात बसलेले व बायका तुफान काम करताहेत या बघितलेल्या गोष्टीची आठवण झाली. आम्ही मस्त फोटोसेशन केले. एका फिरंगी गटाला मार्गदर्शन केले व निघालो. आता म्हटले कुठेही न थांबता तडक निवासस्थान गाठायचे. कारण डोंगरदऱ्यात अंधार लवकर पडतो. पाऊस अगदी बारीक पडतच होता. आम्ही एका झेन अवस्थेमध्ये चालवत सुटलो व एका वळणावर मला अपेक्षित असलेले इंधनगृह दिसले. आमचे निवासस्थान पुढेच अगदी नेमक्या तिठ्यावर होते, जिथे नारकंडहून येणारा रस्ता मिळतो. त्यामुळे उद्या आमच्या मंडळाच्या इतर सभासदांना आम्हाला भेटणे सहज सोपे होते. खोली बुक केली होती तेव्हा जीएसटीचे लफडे नव्हते. आता नुकतेच चालू झाले होते. पण तरीही त्याने त्याच भावाने खोली दिली. आधी एक खोली दिली त्यातला हीटर चालत नव्हता आणि आम्हाला तर गरम पाण्याच्या अंघोळीची नितांत आवश्यकता होती. मग त्याने दुसरी खोली देऊ केली. ती खालच्या मजल्यावर असल्यामुळे कोंदट आणि भरपूर डास असलेली होती. मग त्याने तिसरी खोली दाखवली त्यातला पंखा फक्त एकाच, कमी वेगाने चालत होता. पण म्हटले जाऊ दे आत्ता उकडतंय पण नंतर गारवा येईल. आता आम्ही जवळपास छत्तीस तासानंतर सचैल स्नान केले. अंग एकदम हलके फुलके होऊन गेले. मस्तपैकी जेवणावर ताव मारला. नितीनला फोन करून कळवून ठेवलं. तो म्हणाला आम्हाला निदान दहा तरी वाजतील. म्हटलं चला आज निवांतपणे दहा-बारा तास झोपता येईल. खोलीत आलो तोपर्यंत वातावरण पण थोडे गार झाले होते. अशी काही झोप लागली म्हणून सांगू !

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users