स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ७

Submitted by सव्यसाची on 8 November, 2017 - 00:34

आषाढ कृष्ण चतुर्थी (१३ जुलै) - काजा

आज जरा आरामात उठलो. गेले दोन दिवस पहाटे उठत होतो. आज फक्त पाचपन्नास किलोमीटरच जायचे होते. वाटेत आज धनकर गुहा बघायची होती. मुख्य रस्ता सोडून थोडेसेच आत गेल्यावर या गुहेपाशी पोचलो. पण आम्हाला ऐन गुहेपाशीच काम चालू असल्यामुळे शंभर मीटर तरी अलीकडेच थांबावे लागले. हे अंतर चढत जायचे होते. कोणालाच त्या विरळ हवेत एवढी इच्छा नव्हती. त्यामुळे दुचाकी वर टांग टाकून परत निघालो. आता झपाट्याने काजा गाठले. लगेच इंधन भरून घेतले कारण मुंबईला असताना इथे इंधनाची टंचाई आहे असे समजले होते. आम्ही दुपारच्या जेवणासाठी गावात गेलो. एका ठिकाणी पहिल्या मजल्यावर एका स्थानिक माणसाचेच उपाहारगृह होते. तिथे थुकपा चांगला मिळेल अशी आशा होती. पण त्यांनी एकतर तासापेक्षा जास्त वेळ लावला व शेवटी भरपूर शेवया असलेलेच सूप आणून दिले. त्यात भाज्यांचा पत्ताच नव्हता. लडाख मधे किती मस्त सूप मिळाले होते. असो. जेवण झाल्यावर मी आणि अक्षय थोडे बाजारात फिरून आलो. कालपर्यंत शिरस्त्राणाची काच वर करूनच वापरल्यामुळे माझे ओठ फुटले होते. आज मात्र आमच्या कालच्या प्रयत्नांमुळे काच व्यवस्थित खाली करून चालवू शकलो. केवढं हायसं वाटलं होतं. कष्ट पडत होतेच पण तरी काच खाली ठेवता येत होती. ओठांना लावायला मलम घ्यायला गेलो. दुकानवालीला छोटी डबी पहिजे असं म्हटल्यावर ती थोडी विचारात पडली. मग तिने एक बदामाच्या आकाराची फक्त दहा रुपयांची स्ट्रॉबेरी चवीची डबी पुढे केली. थोडे हसायलाच आले पण म्हटले मला चालेल. लाजेपायी उगाच साठ-सत्तर रुपयांची डबी कोण घेणार. कारण घरी असल्या मलमांच्या सत्राशेसाठ बाटल्या पडल्या आहेत. आता निवासस्थानी येऊन निवांत झोपलो.
उठल्यावर खिडकीतून नजर टाकली तर स्पिती नदीकाठी एक मोठे मैदान होते व तिथे समालोचनासहित कबड्डीचे सामने चालू होते. अंघोळ वगैरे करून ताजेतवाने झालो. दाढी पण केली. आता आम्ही विचारपूस करत करत त्या मैदानात पोचलो. नदीकाठी एकूणच फार छान वातावरणात हे सामने चालू होते. पंचक्रोशीतल्या शाळांमधील भरपूर खेळाडू दिसत होते. आम्ही एक सामना पाहिला.

मग गावात परत जायचे असल्यामुळे निघालो. वाटेत एका दुकानात स्पितीचे शीतपेटीला चिकटवायचे लोहचुंबकवाले स्टिकर्स घेतले. इथे हाऊ वुई गॉट लेहड प्रकारचे सदरे नव्हते. त्यामुळे त्यांची खरेदी झाली नाही. हां, गाड्यांना लावायचे ते पताकावाले दोर होते. ते घेतले. गावात पोचल्यावर मस्त रमतगमत फेरफटका मारला. एक बुलेटची दुरुस्ती करणारा तज्ञ एका कोपऱ्यात पहिला. तिथे एक चांगलं हॉटेलही होतं. तिथे एका ठिकाणी भाड्याने द्यायच्या बुलेट ठेवलेल्या दिसल्या. सहज जाऊन विचारले. त्यांचे भाडेही आमच्या गाडी एवढेच होते. आम्ही एक आयफोन ते पेनड्राईव्ह जोडणारी केबलपण शोधत होतो. माझ्या अँड्रॉइड फोनवरून काल-परवा फारच सहजपणे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे असलेल्या केबलने पेनड्राइव्हवर ट्रान्स्फर केले होते. पण माझी केबल आयफोन ला बसेना. म्हणून हा खटाटोप ! पण ही केबल काही तिथे मिळाली नाही. तसं हे शहर खूपच लहान आहे, जरी आमच्या या वारीतले हे मुख्य शहर होते. लडाखचे जसे लेह तसेच हे स्पितीचे. पण लेह खूपच मोठे आहे.

आता परत निवासस्थानी येऊन भोजनगृहात गप्पा मारत बसलो. मग तिथे असलेल्या एकदोन जोडप्यांशी पीन दरी व इतर जागांविषयी गप्पा मारल्या. ते उद्या तिकडे जाणार होते. आम्ही आज तिकडे जाऊ शकलो असतो पण आमच्या नियोजनात ती दरी बसत नव्हती. मग खोलीत जाऊन मित्राच्या मॅकबुकवर अक्षयचे फोटो ट्रान्स्फर करता येतात का ते पाहू लागलो. आधी तर त्याला आयट्यून आहेका हे पाहावे लागले. मग आयट्यून सगळे फोटो एकदम टाकू देईना. या आयफोन ची नाना लफडी ! मी तर कंटाळूनच गेलो. अक्षयला म्हटलं मी जातो जेवायला. थोड्यावेळाने सगळेच खाली आले व झकास जेवलो. अक्षय परत फोटोसाठी झटापट करू लागला. झोपायला आला तेव्हा विचारले तर म्हणाला अर्धवटच झाले. म्हटलं जाऊ दे मरू दे झोप आता. आयफोनचे हे नखरे फार आहेत. पण एक-दोन चांगल्या गोष्टी पण दिसल्या. त्याचं ऊर्जेचे व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे. आणि फोटो तर नेहमीच सरस येतात.

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users