स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग २

Submitted by सव्यसाची on 3 November, 2017 - 04:27

आषाढ शुद्ध चतुर्दशी (८ जुलै) - दिल्ली

सकाळी अक्षय मित्राबरोबर त्याच्या गाडीने माझ्या घरी आला. मग आम्ही तिघे विमानतळावर निघालो. आंतरराष्ट्रीय विमानतळावर जायचे होते. पण नेहमीप्रमाणे चुकून आधी स्थानिक विमानतळावर गेलो व तिथून आंतरराष्ट्रीय ! Happy त्यामुळे वेळ कमी पडेल की काय ही धाकधूक, पण पोचलो व्यवस्थित. आत शिरलो आणि थक्कच झालो. इतकं मस्त विमानतळ बांधलं आहे हे नुसते ऐकून होतो. ते प्रत्यक्षात पाहिलं. पण चेकइनची रांग बघून घाबरलो. थोडा वेळ त्या रांगेत उभे राहिल्यावर आपले आपण चेकइन करायचे चालू झालेले दिसले. मग मी लगेच तिकडे जाऊन आमचे तिकीट छापले. अक्षयला बोलावून आमची खोगीरं तिथल्या ललनेकडे सोपवली. आता आम्ही एकदम सडेफटिंग झालो. माझ्याकडे फक्त कमरेचा पाऊच होता. शेवटी एकदाचा स्पिती खोऱ्याकडे निघालो होतो. सुरक्षा चाचणीतून बाहेर पडून, कॉफी किती महाग आहे ते बघून एका ठिकाणी विसावलो. Happy

मी लगेच भ्रमणध्वनी चार्जिंगला लावला. हो पुढे कुठे सोय मिळेल की नाही माहीत नव्हते. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा चार्ज करायला लावायचे ठरवले होते. एअर इंडियाचे विमान थोडे उशिरा सुटले पण वेळेत पोचले. विमानात पावभाजी खायला मिळाली. दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे ती तिखट पाव भाजी खावी लागली. मग विमानातच ती लगेच परत देऊन आलो Happy हो, आपण कोणाचे काही जास्त वेळ ठेवत नाही.

दिल्लीला उतरलो आणि बराच वेळ चालत रहावे लागले कारण फिरते पट्टे बंद होते. सामान सुखरूप मिळाले. बाहेर पडलो आणि दिल्लीच्या त्या भयानक उकाड्यात फरफट सुरू झाली. तरी बरं समोरच मेट्रो स्थानक होते. ते वातानुकूलित होते. म्हणजे निदान तिकीट काढायच्या ठिकाणी तरी. मी दिल्ली मेट्रोचा नकाशा बघून तीन तीन गाड्या कराव्या लागतील असं ठरवलं होतं. पण तिकीट देणाऱ्याने सोपा मार्ग सांगितला ज्यामुळे दोनच गाड्या कराव्या लागल्या. माझ्या हे आधी लक्षात कसे नाही आले हेच कळले नाही. परफेक्शन सुध्दा १०० टक्के पर्फेक्ट नसतं ना Happy आम्हाला आर के आश्रम इथे जायचे होते. तिकीट काढून खाली फलाटावर आलो व लक्षात आले की वातानुकूलन चालू नाही. म्हणजे परत घामाच्या धारांना सुरुवात. एक गाडी पकडून द्वारका स्थानकात गेलो. तिथून दुसरी गाडी पकडून जवळपास पावणेदोन तास प्रवास करून आश्रमला पोचलो. मेट्रोच्या गाड्या आतून फारच मस्त आहेत. गाडीतील वातानुकूलन चालू होते.

स्थानकाबाहेर पडलो आणि मेकमायवर दिलेल्या माहितीप्रमाणे पालिका बाजार या ठिकाणी पोचलो. तिथे कोणालाच देव हिमाचल या कंपनीची माहिती नव्हती. खूप शोधाशोध केली. मग उपलब्ध असलेल्या एकमेव फोनवर फोन केला. त्याने काहीतरी त्रोटक माहिती सांगितली त्यावर परत त्या बाजारात फेरी मारली. पण व्यर्थ ! शेवटी तिथल्याच एका साध्या माणसाने अमूक अमूक गाळा बघा असे सांगितले. एव्हाना जवळपास अर्धा तास निघून गेला होता. नशिबाने तिथेच बऱ्यापैकी स्वच्छ असे स्वच्छतागृह होते. जिथे मी जवळपास दोन वेळा अंघोळच केली. आता हा शेवटचा पर्याय बघावा नाहीतर सरळ मेकमायला जाब विचारावा असे ठरवले होते. त्याठिकाणी शिरून देव हिमाचल असे विचारल्यावर हो हेच असे कळल्यावर जीव भांड्यात पडला. देव हिमाचल आणि हिमालयन नोमेड ह्या एकाच कंपनीच्या दोन बसेस आहेत. देव मध्ये शंभर दोनशे रुपये जास्त घेऊन तुम्हाला एक पांघरूण, चार्जिंगची सोय, एक बाटली पाणी या सोयी पुरवल्या जातात. आम्ही ताबडतोब तेथे सामान टाकून जेवायला बाहेर पडलो. त्यांनी सांगितलेल्या जवळच्याच एका गल्लीत सबवे सापडलं आणि धन्य झालो. दोघांनी फूटभर लांबीचे बर्गर खाल्ले आणि मग घाईघाईने परतलो. आता म्हटले जरा वातानुकूलित खोलीत बसून राहू तर त्या माणसाने सगळ्या प्रवाशांना बाहेर काढून रस्त्यावर आणले. म्हणतो आता बस येईलच. तिथे कुठेही बसायला जागा नव्हती. त्यामुळे जवळपास शे-दोनशे प्रवासी उभेच होते. आणि वातावरणात तर रण पेटले होते. मला देव हिमाचलकडून बसचा नंबर मेसेज केला गेला होता. पण अर्थातच आमची खरी बस वेगळ्याच नंबरची आहे असे त्या माणसाने सांगितले. तासभर घामाने चिंब भिजल्यावर आणि संताप संताप झाल्यावर आमची बस आली. सामान खालच्या कप्प्यात टाकून बसमध्ये येऊन बसलो. बस अतिशय उत्तम स्थितीत होती. हात ठेवायच्या कठड्याखालीच चार्जिंगची सोय होती. आणि ती चालतही होती. वरती माळ्यावर स्वच्छ पांघरुणे होती. एक पाण्याची सीलबंद बाटली देखील मिळाली. एकूण कबूल केलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि इतर खोट काढायला काहीही जागा नव्हती. लौकरच वातानुकूलित वातावरणात स्थिरावलो. फोन लगेच चार्जिंगला लावला.

आता बाहेरील दिल्ली बघायला सुरुवात केली. एक पाटी वाचली; दरवाजेही दरवाजे ! म्हटलं हे काय भरपूर दरवाजे असं म्हणायचं आहे की काय ! चुकून या दुकानात झालं असेल. पण नाही दुसरीकडे कुठेतरी आरसेही आरसे असं काहीतरी वाचलं आणि म्हटलं ही इथली पद्धतच दिसते. म्हणजे, आपल्याकडे वडेच वडे असं एखाद्या वड्याच्या गाडीवर लिहिले तर कसे दिसेल? आम्ही बराच वेळ ज्या मेट्रोने आलो होतो त्याच दिशेने मेट्रोला संलग्न चाललो होतो. म्हटलं आता विमानतळापर्यंत जातो कि काय ? पण नशिबाने अर्ध्या तासानंतर कुठेतरी उजवीकडे वळून आम्ही चंदीगडच्या दिशेला निघालो. वाटेत कश्मीरी गेट नावाचे मेट्रो स्थानक लागले. अक्षयला म्हटलं आपल्याला येताना इथेच यायचे आहे. आता मी झोपेच्या तयारीला लागलो. एव्हाना साडेसहा वाजले होते व आमचे पोट तुडुंब होते. आता आम्ही हायवेला लागलो होतो. सकाळी लवकर उठलो असल्यामुळें झोपही पटकन लागली. शिवाय जेवढी मिळेल तेवढी झोप घेणे गरजेचे होते. कारण रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी आम्हाला लगेच दुचाकी चालवायला सुरुवात करायची होती. त्यामुळे डोक्यावरून पांघरूण ओढून झोपून गेलो. रात्री साडेनऊ वाजता बस एका खूप मोठ्या हॉटेलपाशी थांबली. मग उत्तम पैकी सूप आणि पुलाव घेतला. आता जे झोपलो ते सरळ सकाळी सातच्या दरम्यान गाडी थांबली तेव्हा जाग आली.

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users