स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ५

Submitted by सव्यसाची on 6 November, 2017 - 03:08

आषाढ कृष्ण द्वितीया (११ जुलै) - नाको

सकाळी आम्ही दोघे उठून निघेपर्यंत बाकीची मंडळी गाड्या काढून पुढे निघून गेली होती. आम्ही घाईघाईत दुचाकीपाशी जाताना मी दुचाकीची चावी कुठेतरी हरवली. एकदम ब्रह्मांडच आठवलं ! मग शोधाशोध ! तंबूपासून दुचाकीपर्यंतचा रस्ता चाळून काढला तेव्हा ती मिळाली. जीव भांड्यात पडला. आता लगबगीने दुचाकी काढून पळवत सुटलो. झुंजूमुंजू नुकतेच झाले होते. पण तरी दिवे लावावे लागत होते. कारण भरपूर धुकं आणि अगदी बारीकसा पाऊस होता. आत्ता आम्ही सगळं सामान बरोबर घेतला नव्हतं कारण परत कॅम्पवर येऊन नाश्ता करायचा होता. मारवाडी लोकांपैकी एक दोन जणच तिकडे निघाले होते. पाचदहा मिनिटातच उजाडले आणि फारच अवर्णनीय हिमालय दिसू लागला. अगदी आपण जुन्या चलतचित्रांमध्ये पहायचो तसा. सगळीकडे एकदम शांत होते. मस्त मस्त फुलं फुलली होती. अधूनमधून एखादे हिरवेगार शेतही दिसत होते. अधून मधून पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. 4 गुरांना घेऊन जाणारा गुराखी दिसला. सकाळच्या व्यायामाला बाहेर पडलेले आपले सैनिकही दिसले. वर्णनातीत वातावरण होते.


-

चिटकूलला पोचलो तर पुढे गेलेली मंडळी चहा बिस्कीट हाणताना दिसली. गरज होतीच त्यामुळे आम्हीदेखील आडवा हात मारला. इथून फक्त तीन किलोमीटर पुढे आपल्याला जाता येते. तिथे जाऊन चौकीवर सैनिकांना भेटून आलो. ते म्हणाले डोकलामच काय घेऊन बसलात, इथे आम्ही दहा वर्षांपूर्वी जिथे जाऊ शकायचो त्यापासून दहा किलोमीटर तरी मागे आलो आहोत. चीन सगळीकडेच आपल्याला मागे रेटतो आहे. आता आम्ही देखील मागे फिरलो. हो चिन्यांशी आत्ता लढणे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते Happy परत येताना आमचा हा विचार पक्का होत नव्हता की कोणाला चिटकूलला रहा असे सांगावे की सांगलाला. अर्थात चिटकूलला निवासस्थाने अगदी एक-दोनच आहेत.

कॅम्पवर परतलो तोपर्यंत इतर मंडळी उठली होती आणि त्यांचा नाश्ता चालला होता. आम्हीपण जोरदार नाश्ता केला आणि लगेच इतक्या नितांतसुंदर स्थानाला अलविदा केला. अक्षयचं खोगीर कुठेतरी खाली घासत होतं त्यामुळे त्याने आता ते दुरुस्ती गाडीत टाकलं. फक्त शेवटच्या दिवशी त्याने ते परत दुचाकीवर घेतलं. सांगला उतरून परत तिठ्यावर आलो जेथे एक मोठे जलविद्युत केंद्र आहे. इथून आम्हाला पुन्हा मुख्य रस्त्याला लागून काजाच्या दिशेला जायचे होते. काही मंडळी अजून यायची होती. त्यामुळे आम्ही साकव ओलांडून पलीकडे गप्पा टप्पा करत बसलो. एकाची हिमालयन दुचाकी होती. या दुचाकीवर लावायच्या इतर गोष्टी त्याच कंपनीकडून घ्याव्या लागतात. तसे त्याने इंधनाचे ५ लिटरचे दोन डबे टाकीच्या आजूबाजूला बसवून घेतले होते. त्याची गाडी म्हणे पुण्यात फक्त २५ किलोमीटर प्रतिलिटर जायची. म्हणजे इथे कदाचित २० पण देईल. त्यामुळे त्याचे आपण दुरुस्ती गाडीत देखील इंधन भरून ठेवूया का असे सारखे चालू होते. त्याची भीती रास्तच होती. कारण रेकाँग पीओ या जागेनंतर काजापर्यंत मधे कुठे पेट्रोल पंप नव्हता.

आता जरा रखरख जाणवू लागली होती. धूळही भरपूर उडत होती. डांबरी रस्ता हा प्रकार कालच संपला होता. आता बऱ्याचदा धुळीचाच किंवा डांबर पूर्ण गेलेला असाच रस्ता दिसत होता. असेच बराच वेळ गेल्यावर एक वर वर जाणारा घाट सुरु झाला आणि लक्षात आले की हा शेवटचा घाट आजचा. ह्या घाटाच्या टोकावरून दरीकडचे खुपच छान दृश्य दिसत होते.

तिथून आम्ही लवकरच नाको या गावी अगदी नाको तलावाला लागूनच असलेल्या निवासस्थानी पोचलो. आमच्या खोलीसमोर तलाव व पुढे दूरवर हिमाच्छादित शिखरे दिसत होती.

संधिप्रकाश पसरला होता. डावीकडे उंच डोंगर दिसत होता. आता आम्ही आधी अंघोळी करून घेतल्या. ताजेतवाने झाल्यावर चहा आणि भजी हा कार्यक्रम झाला. थोडा वेळ गप्पा मारल्यावर जेवणाची आरोळी आली आणि आम्ही वर टेकडीवर चालत जाऊन जेवायच्या ठिकाणी पोहोचलो. पाच-दहा मिनिटेच चालायचे होते. पण तरी धाप लागली. उंचीचा परिणाम जाणवत होता. जेवायच्या इथे एक मोठा कुत्रा होता. तिबेटी मास्टिफ नावाचा. जवळपास वासराएव्हढा तरी मोठा होता. गर्दी वाढू लागली म्हणून त्याला बाहेर नेण्यात आले. जेवणाची जागा छोटीशीच पण स्वच्छ होती. आणि जेवणही चांगले होते. जेवण करून आल्यावर जेमतेम दहा मिनिटे बाहेर बसलो आणि लगेच पडी टाकली. काय सही झोप लागली !

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मित्रांनो ! माझी लडाखवारी देखील जरूर वाचा. संदर्भपण लागेल काही काही व्यक्तींचा.