शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला परिचय. योग्यवेळी उत्तम उपयुक्त शब्दकोश हाती न लागल्यानेही आयुष्यातील बरीच वर्षे वाया जातात.
अंतर्नाद मासिक?
तीन प्रकारचे शब्दकोश वापरावे लागतात.
१) फोनेटिक उच्चार दिलेले
२) इटिमॅालजी ( रूट) असणारे
३) थिसॅारस ( अँटनिमसह)

शिवाय वाक्यात उपयोग करून दिलेले उत्तमच

शरद, आभारी आहे.
अंतर्नाद मासिक? >> तुमची शंका समजली नाही.

छान लेख. आवडला.

तुम्ही लिहिलेल्या शब्दकोशातल्या सगळ्या गंमतीजंमती फारच मजेशीर आहेत.

माझ्याबाबतीत शब्दकोशाची झालेली अजून एक गंमत आठवली. समजा एखाद्या भाषेतील शब्दकोशात एखादा शब्द आपण शोधत आहोत. पण तो शब्दच जरका परकीय भाषेतील असेल तर तो त्यात शोधूनही सापडत नाही.

हे माझ्या अनुभवास आले, जेव्हा माझ्या तरुणपणी माझ्यात उर्दू शिकण्याचे वेड शिरले होते. त्याकरिता मी उर्दू मदर्शाची आणि उर्दू बालभारतीची १ली ते ४थी ची पुस्तके आणली होती. त्या बरोबरच खास भेंडीबाजार येथून उर्दू-हिंदी चा एक जाडजूड शब्दकोशही विकत घेतला होता. उर्दू पुस्तकाचा अभ्यास करतेवेळी मला एक शब्द अडला. तो शब्द मला शब्दकोशात शोधूनही सापडेना.
मग मी माझ्या एका उर्दू जाणणाऱ्या मुस्लिम मित्राला विचारले. त्यावर तो शब्द वाचून तो लगेच म्हणाला. "अरे ये तो उर्दूमें बुलेटिन लिखा है! बुलेटिन का मतलब जानने के लिए तुम्हें इंग्लिश डिक्शनरी देखना पडेगा" आणि मी कपाळावर हात मारून घेतला. Rofl

वरच्या बुलेटिन प्रमाणेच अडचण इं शब्दकोशांत येतेच. मी दिलेल्या चारही प्रकारचे उपयोग द्यायचे म्हटले तर दहा किलोंचे होतील. म्हणूनच चार वेगळे घ्यावे लागतात॥ शालेय / नवशिक्यांसाठी सर्वच शब्दार्थ गरजेचे नसतात. एकदम वेबस्टर घेऊन काय करणार?उदा लॅटिन शब्दसमुह deja vu,caveat,videlesit किंवा फ्रेंच la carte .

idioms and phrases ,proverbs हे सुद्धा वाचनासाठी लागतात परंतू त्यांचा वापर करायचा नसतो वारंवार.

छानच लेख Happy आवडला.
(आमचा काय इतका व्यासंग्/अभ्यास नाही बोवा, तरी लेख आवडला, कारण बरेचदा शब्दकोष उघडुन त्यात रमलो आहे. अजुनही फावला वेळ कधी मिळालाच, तर उघडुन बसतो.
अशाच पद्धतीचि ती एन्सायक्लोपिडियाची वेगवेगळ्या कंपन्यांची मुलांकरताची रंगित पुस्तके फार आवडतात, चित्रे बघत बसतो, खुप नविन बघायला मिळते. Happy )

लेख आवडला.

Srd,

Déjà vu हे फ्रेंच आहे. लॅटिन नव्हे. शिवाय à la carte असा तो शब्दसमूह आहे. फक्त la carte नव्हे.
तसंच तुम्हांला बहुतेक videlicet म्हणायचं आहे.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
फूल्स्केपचा नक्की अर्थ काय मग? >>> 'फूल्स्केप' अशा उच्चाराचा इंग्लिश शब्दच नाही ! तो आपला अशुद्ध उच्चार आहे.

à la carte चा उच्चार काय आहे? >>> आपण साधारण 'अ ला कार्ट' असा करतो. एका इंग्लिशच्या प्रां. कडून मी असा ऐकला. पण, योग्य त्या कोशात बघावा लागेल.

चिनूक्स, बरोबर. त्या बुलेटिनप्रमणेच हे जे शब्दसमुह आहेत ते नवशिक्यांना कळण्यास काहीच कल्पना येत नाही की लॅटिन/फ्रेंच वगैरे आहेत. एखाद्या शब्दकोशात ती यादी appendix मध्ये असेल तर त्या शंभरेक शब्दांचा कायमचा गुंता सुटतो.
ROGET'S THESAURUS हा आम्हाला कोणी शाळेत असताना सुचवला नाही. फार उपयुक्त आहे.
अजून बरंच आहे.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.

मॅडम शब्दाबद्दल अगदी अगदी झालं. पण मग त्याला दुसरा शब्द काय वापरू शकतो हा ही विचार आला. >>> खरं म्हणजे मराठीत तरी 'बाईसाहेब' रुढ करता येइल - इछाशक्ती असेल तर !

मराठीत ठीक आहे .इंग्लिश वातावरणात म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काय म्हणता येईल हे विचारत आहे.
हा इश्यू एकदा एच आर मिटिंग मध्ये निघाला होता.तेव्हा नावाने हाक मारा हा पर्याय निघाला.पण भारतीय सेट अप मध्ये अजूनही सर मॅडमची चलती असल्याने तो पर्याय मनावर घेतला गेला नाही

छान लेख.
फक्त भाषा ही प्रभावी असते त्यामुळे शब्दांचे अर्थ सुद्धा बदलत असतात त्यामुळे सगळ्यांना आक्षेप घेण्याऐवजी जसे काही शब्दकोषांमध्ये जूने इंग्लीश (Old English) वगैरे लिहिलेले असते त्यानुसार ते बदलत राहणे जास्ती उपयोगी असेल.

भारतीय सेट अप मध्ये अजूनही सर मॅडमची चलती असल्याने तो पर्याय मनावर घेतला गेला नाही >>> एकूणच या दोन शब्दांना भारतात चुकीच्या तर्‍हेने वापरले आहे. 'सर' हा नावाआधी लावायचा 'किताब' आहे. आपण 'जोशी सर' वगैरे करून त्याचे सामान्यीकरण केले आहे.

<एकूणच या दोन शब्दांना भारतात चुकीच्या तर्‍हेने वापरले आहे. 'सर' हा नावाआधी लावायचा 'किताब' आहे. आपण 'जोशी सर' वगैरे करून त्याचे सामान्यीकरण केले आहे.>

नाही. Sir आणि sire हे दोन्ही शब्द इंग्लंडात तेराव्या शतकात प्रचलित होते. कालांतरानं sireमधला e वगळला जाऊन sir हाच शब्द उरला. मूळ अर्थ - वतनदारासाठीचं आदरार्थी संबोधन. पण अगदी पंधराव्या शतकातल्या पाककृतींच्या पुस्तकांतही हा शब्द सर्वसामान्य आदरार्थी संबोधन म्हणूनच येतो. Sir आणि sire या दोन्ही शब्दांचं मूळ sieur या फ्रेंच शब्दात आहे. हेही आदरार्थी संबोधनच आहे. हा शब्द senior या लॅटिन शब्दापासून आला असावा. मात्र आता आपण monsieur हा शब्द वापरतो. म्हणजे my sir. उच्चार - मसिय.
थोडक्यात, sir हे आदरार्थी संबोधनच आहे, जे जगभर त्याच अर्थाने वापरलं जातं. भारतीयही हा शब्द योग्यरीत्या वापरतात.

Madam हा शब्दही पूर्वी राजघराण्याशी संबंधित किंवा श्रीमंत स्त्रियांसाठी वापरला जाई. पंधराव्या - सोळाव्या शतकानंतर तो सर्वच स्त्रियांसाठी वापरला जाऊ लागला. कुंटणखान्याच्या मालकिणीला madam असं संबोधणं हे तसं आधुनिक आहे. या कारणासाठी हा शब्द न वापरणं हे योग्य नाही. आपण 'आंटी' हा शब्दही वेगळ्या अर्थी वापरतो.

थोडक्यात, sir हे आदरार्थी संबोधनच आहे, जे जगभर त्याच अर्थाने वापरलं जातं. भारतीयही हा शब्द योग्यरीत्या वापरतात. >>> असहमत.
ते 'संबोधन' आहे. (A respectful form of address to a man). Oxford मधील अजून दोन अर्थही 'a title before the name' हेच सांगतात. तेव्हा जोशी सर असे नावानंतर लावणे मला चूक वाटते.

ऋ, आभार !

मस्त लेख. खरोखर सुंदर!
‘CAPTCHA’ बद्दल अधिक वाचले- अलन ट्युरिंग वगैरे. छानच. हा ‘CAPTCHA’ काही वेळेस बरा असतो तर कधीकधी छळतो सुद्धा! तेव्हा त्यातील अक्षरे व अंकांच्या तंगड्या अगदी एकमेकात घुसलेले असतात आणि मग जाम ओळखू येत नाहीत.
‘CAPTCHA’ वाचताना मन एकदम भूतकाळात गेले. आठवा पंचवीसेक वर्षांपूर्वीचा काळ जेव्हा संगणक आपल्याकडे नवेनवे होते. त्याच्या प्रशिक्षणाच्या जाहिराती सतत आपल्या डोळ्यासमोर आदळत असत. त्यात ‘BASIC’ असे लिहिलेले कायम दिसे. पहिल्यांदा तो शब्दच वाटायचा – असेल काहीतरी संगणक शिक्षणातील मूलभूत अभ्यास (बेसिक) वगैरे. जेव्हा ‘सर्च’ केले तेव्हा कळले की तो शब्द नसून Beginner’s All purpose ………Code चा शॉर्टफॉर्म आहे तेव्हा कुठे माझे ‘बेसिक’ पक्के झाले. Bw

मी आता वर्ड रेफ्रेन्सर चाळून पाहिलं. तिथे जी उदाहरण दिली आहेत त्यात नावाआधी सर लावलं आहे म्हणजे सर विल्यम स्कॉट , सर रिचर्ड. कुमार यांनी म्हंटल्याप्रमाणे जोशी सर सारखं बेनेडीक्त सर वगैरे तिथे नाही.त्यामुळे जोशी सर, चिराग सर वगैरे म्हणतो ते चूक असावं .

बाकी sir ह्या शब्दाचा उगम फ्रेंच मध्ये monseir आणि स्पॅनिश मध्ये señor असा दाखवतोय

तसेच मॅडम या शब्दाचे तीन अर्थ दाखवतोय.
१)polite term of address to a woman, originally used only to a woman of rank or authority:
Madam President; May I help you, madam?

२) the woman in charge of a household:
Is the madam at home?

३)the woman in charge of a house of prostitution.

त्यामुळे मॅडम शब्दाबद्दल चिनूक्सने लिहिलेलं योग्य वाटतेय.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
जाई, सहमत.
फक्त “ओ, काळे मॅडम ” अशी हाक मारणे चूक आहे. काळेबाईंशी बोलताना " मॅडम, तुम्हाला थोडा वेळ आहे का?” असे पाहिजे.
माझा परदेशातील हॉस्पिटलमधला अनुभव सांगतो. बरोबर काही ब्रिटीश डॉ. होते. आशियाई विद्यार्थी जेव्हा इंग्लंडच्या पदव्युत्तर परीक्षाना बसतात, तेव्हा त्यांना आधी सूचना दिली जाते की ब्रिटीश परीक्षकाला अभिवादन करताना ‘डॉ.’ किंवा ‘प्रोफेसर’ असेच म्हणा; ‘सर’ म्हटलेले चालत नाही.

Pages