तिरामिसु (Tiramisu)

Submitted by रूनी पॉटर on 9 September, 2009 - 20:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी (पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळा करुन घेणे)
१/२ कप/११० ग्रॅम साखर.
८ औंस/२२५ ग्रॅम मस्करपोने चीज
१ मोठा मग तयार espresso coffee (साखर किंवा दूध न घालता).
२ टेबलस्पून Cognac किंवा Brandy (ऐच्छिक), काही जण रम वापरतात.
२०-२५ लेडीफिंगर बिस्कीटे किंवा १ पाकीट
२ टेबलस्पून कोको पावडर (वरुन सजवायला)

क्रमवार पाककृती: 

खर तर तिरामिसुची कृती फार सोपी आहे थोडक्यात सांगायचे तर कॉफीत बुडवलेली बिस्किटे आणि क्रीम यांचे एकावर एक आपल्याला हवे तेवढे थर दिले की झाले तिरामिसु तयार.. ह्याच्यापलीकडे का..ही नाही. पण असे सांगीतले तर लोकांना खर वाटत नाही, एवढा छान पदार्थ असा कसा पटकन होईल असे म्हटल्यावर काय करणार म्हणून ही घ्या कृती अगदी सविस्तर. Happy

१. एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पिवळा भाग, सगळी साखर, Cognac आणि १/२ टेबलस्पून तयार कॉफी एकत्र करा. नंतर (इलेक्टीकल) हँड मिक्सरने ते चांगले २-३ मिनीट फेटून घ्या.

२. आता वरच्या मिश्रणात सगळे मस्करपोने चीज टाकुन परत हँड मिक्सरने ३-५ मिनीटे फेटा. सगळे मिश्रण एकजीव व्हायला हवे (until consistency is smooth). हे भांडे बाजुला ठेवुन द्या.

३. आता दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पांढरा भाग आणि चिमुटभर साखर टाका आणि हँड मिक्सरने भरपुर फेटा. त्याचा मस्त पांढरा फेस (stiff peaks) व्हायला हवा. भांडे उलटे केले तरी हा फेस खाली पडणार नाही इतक्या वेळ फेटावे. माझा मिक्सर खूप पॉवरफुल नाहीये त्यामुळे मी १२-१४ मिनीटे फेटते. तुम्हाला कदाचित यापेक्षा जास्त किंवा कमी वेळ लागेल तुमच्या मिक्सरच्या क्षमतेप्रमाणे.

४. आता हा फेटलेला अंड्याचा पांढरा भाग हलक्या हाताने लाकडी चमचा वापरून दुसर्‍या (मस्करपोने असलेल्या भांड्यात) मिश्रणात मिसळा. मिसळतांना फोल्डींग मेथड वापरावी. हे अगदी हलक्या हाताने करावे.

५. आता एका पसरट भांड्यात/ताटलीत सगळी कॉफी ओतावी. कॉफी अगदी कडक गरम असू नये, कोमट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त गरम असावी.

६. एक चौकोनी काचेचा कॅसरोल किंवा ज्या भांड्यात तिरामीसु करायचय ते भांडे घ्यावे. नंतर एक एक करुन लेडीफिंगर्स
आडवी धरुन कॉफीत बुडवावीत. बिस्कीट पूर्ण बुडायला हवे. ही बिस्कीटे फार नाजूक असतात त्यामुळे झटकन बाहेर काढावीत आणि लगेच कॅसरोलच्या तळाशी ठेवावीत. एका शेजारी एक असा बिस्किटांचा एक थर तयार झाला की त्यावर भांड्यातले अर्धे मिश्रण हलक्या हाताने ओतावे आणि ते लाकडी चमच्याने सगळीकडे सारखे पसरवावे (दुसरा थर).

७. आता परत त्या मिश्रणाच्या थरावर वर कॉफीत बुडवलेल्या बिस्किटांचा थर द्यावा (तिसरा थर). बिस्कीटे अगदी शेजारी शेजारी चिटकून ठेवावीत थर लावतांना आणि मग त्या थरावर उरलेले सगळे मिश्रण ओतावे (चौथा थर). काहीजण यावर बिस्कीटांचा अजून एक थर (पाचवा) पण देतात आणि त्यावर परत क्रीमचा (सहावा) पण माझ्याकडचे भांडे एवढे खोल नाही त्यामुळे मी एकुण चारच थर देते. तिरामिसु करतांना सगळ्यात खालचा थर नेहमी लेडीफिंगर बिस्कीटांचा तर सगळ्यात वरचा थर नेहमी क्रीमचा असावा

८. आता कॅसरोल किमान ४-५ तास तरी फ्रीजमध्ये ठेवावा. सर्व्ह करायच्या आधी चाळणीने त्यावर कोको पावडर टाकायची आणि मग सगळ्यांना तिरमिसु सर्व्ह करायचे. माझ्याकडे आत्ता फोटो नाहीये पुढच्यावेळी केले की काढेन आणि टाकेन.

वाढणी/प्रमाण: 
४-६ लोकांना किंवा खाल तसे.
अधिक टिपा: 

१. लेडीफिंगर्स आणि मस्करपोने चीज शक्य असेल तर इटालिअन ब्रँडचेच वापरावे. इटालीयन ग्रोसरीच्या दुकानात मिळते. लेडीफिंगर हे बिस्किटाच्या प्रकाराचे नाव आहे ब्रँडचे नाही. मी होल फुड्स मधून लेडीफिंगर्स आणले होते ३६५ की अश्याच कुठल्यातरी ब्रँडचे, अजिबात आवडले नाही.
२. एस्प्रेसो कॉफी करणे शक्य नसेल तर साधी काळी कॉफी वापरता येईल पण चवीत फरक पडतो.
३. काही जण लेडीफिंगर्स ऐवजी पाउंड केकच्या पातळ चौकोनी चकत्या वापरतात. चवीतला बदल मला फारसा आवडला नाही म्हणून मी लेडीफिंगर्सच वापरते.
४. मी वापरलेला कप मेजरींग कप होता.
५. पार्टीसाठी करतांना हा प्रकार मी आदल्या दिवशीच करुन फ्रीज मध्ये ठवते, जितका जास्त वेळ तो फ्रीज मध्ये रहातो तितकी चव चांगली येते.
६. अंड्याचा पांढरा भाग १२-१४ मिनीटे फेटणे हा भाग कधी कधी कंटाळवाणा होवू शकतो तो नवर्‍याला किंवा दुसर्‍या कोणालातरी करायला द्यावा :). माझ्यामते तिरामिसु इतकी सोपी आणि हमखास यशस्वी होणारी कुठलीच कृती नाही.

माहितीचा स्रोत: 
इटालीयन रुममेट
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाई, तिने ते "शाकाहारी अंड्यांचे प्रकार" मध्ये टाकलंय Happy

रुनी, फोल्डिंग मेथड म्हणजे काय ?

सगळ्यांना धन्यवाद.
भाई, मी शाकाहारी आहे आणि फक्त अंडी खाते इतर मांसाहार काही करत नाही त्यामुळे जरा गोंधळले होते की नक्की कश्यात टाकायचे, आता ते मांसाहारीमध्ये केलय. तिथे एक मिश्राहार किंवा शाकाहार + अंडी असा वर्ग हवा :).
मिलींदा आता लिंक्स दिल्यात फोल्डींग मेथड आणि इतर एक दोन शंका येवु शकेल अश्या ठिकाणी.
अ‍ॅशबेबी,
मला भारतात हे साहित्य कुठे मिळेल माहित नाही, कदाचित मोठ्या मोठ्या सुपरमार्केट मध्ये मिळतही असेल.

रुनी किती छान लिहिली आहेस रेसिपी. मला तिरामसु आवडतं. पण इतक कच्चं अंड असतं माहित नव्हतं. अ,न्ड्याचा वास नाही न येत?

आर्च नाही येत अंड्याचा वास अजिबात, मला तरी कधी आला नाही. कॉफी, cognac यामुळे आणि अंड भरपुर फेटल्यामुळे असेल पण अंड्याचा वास येत नाही. तू खाल्ले असशील ना बर्‍याच वेळा तुला आवडते म्हणजे, मग तुला जाणवला का अंड्याचा वास?

रुनी, बाहेरचा खाल्ला आहे त्यात येत नाही वास. पण त्यात अंड असतं हे माहित नव्हतं. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे कॉफी आणि cognac मुळे वास मारला जात असेल अंड्याचा. आता एकदा करून बघायला पाहिजे.

रुनी खरेच एकदम छान सविस्तर लिहिले आहेस. << पण असे सांगीतले तर लोकांना खर वाटत नाही, एवढा छान पदार्थ असा कसा पटकन होईल असे म्हटल्यावर >> एवढ्या रेसीपी वाचुनहि मला धाडस नव्हते होत करायचे :). आता करुन नक्की कळवते..

हायला. असं करतात होय तिरामिसू. तुझ्यामुळे कळलं रुनी.
इथे काही रेस्त्रॉमधे भयाण अस्तं तिरामिसू. बहूधा साहित्य नीट मिळत नसावे असं ही कृती वाचून वाटतय. पण मी चांगलं तिरामिसू खाल्लय आधी. जिभेवर विरघळतं अगदी.

चिन्नु तुझीपण कृती लिहीना बिनाअंड्याची.
रैना, अगा बर्‍याच वेगवेगळ्या पद्धतीने करतात तिरामिसु, गुगल केल्यावर शेकडो कृती सापडतील वेगवेगळे क्रीम वापरुन करायच्या. मी रुममेट्कडून ही शिकले म्हणून मग हिच कृती वापरते गेली ५-६ वर्ष. यात कधी कधी एकच बदल माझ्याकडून केला जातो तो म्हणजे क्रीम मध्ये टाकण्याऐवजी आयरीश कॉफी सारख कॉफीत cognac टाकुन वापरणे . त्याने क्रीम थोडे जास्त thick होते.
तू म्हणतेस तसे इथे पण बर्‍याच ठिकाणी खूप ड्राय तिरामिसु मिळत, माझ्यामते तोंडात टाकल्यावर आपोआप विरघळणे हीच तिरामिसुची लिटमस टेस्ट आहे.

अग रुनि, काही विशेष कृती नाही ग. ब्लॅक कॉफीमध्ये लेडी फिन्गर्स बुडवून ते आणि चीज चे लेयर्स बनवते झालं. सर्व करतांना व्हाईट आणि डार्क चॉकलेट शवे करून घातले किंवा वर थोडीशी कॉफी पावडर डस्ट केली की छान दिसते.

बाकि कुठे नाहीत पण मी मुंबईत बिनवासाची अंडी बघितली होती. ( हो ब्रँडेड होती, आणि शिजवताना खरेच वास येत नव्हता. ) अंड्या ऐवजी चायना ग्रास किंवा कॉर्नफ्लोर वापरता येईल.

मी Cognac किंवा Brandy ह्यातील काहिच टाकत नाहि,पण तरिहि अंड्याचा वास येत नाहि.कदाचित कॉफीमुळे येत नसावा.मी व्हीपींग क्रीमपण टाकते. मस्त होतं तिरमिसु.

स्वाती तुझ्याकडे ट्रेडर जो, होल फुड्स आहेत का? तिथे मिळेल. कधी कधी सेफवे, जायंट मध्ये पण मिळते. हे चीज नेहमीच्या दुध-दह्याच्या विभागात नाही मिळणार वेगळा चीजचा विभाग असतो तिथे मिळेल.

रुनि मस्तच आहे तुझी कृती. करुन बघेन.
मस्कर्पोने नसेल तर क्रीम चीज वापरुन करता येते. (संजीव कपूर म्हणतो.)संजीव कपूरच्या रेसिपीने तिरामिसु केले होते. मस्त झालेले.

शनिवारी नवर्याच्या वाढदिवसाला तिरामिसु केलं. सहीच झालं.
It was a big hit. धन्स!
मी सगळं कृतीच्या दुप्पट प्रमाणात घेतलं.

आत्ताच शिकले फोटो टाकायला. हा घ्या मागच्य वर्षीच तिरामिसु. मुरला असेल मस्त!
tiramisu_0.jpg

च्च. एव्हढे कष्ट करण्यापेक्षा सरळ दुसर्‍या कुणालातरी करायला सांगावे नि आपण आयते खावे. माझी ही रेसिपि सर्व पदार्थांना तितक्याच सहजतेने चालते. माझी बायको हुषार आहे, नाहीतर दर वेळी तिला सांगितले असते की अजून १०० टक्के चांगली नाही जमली, पुनः करून बघायला पाहिजे!

म्हणून पूर्वी सांगून ठेवले होते, स्त्रियांना शिक्षण देऊ नका. आता बसा वाट बघत. ती करेल तेंव्हाच खायला मिळणार!

रूनी.. काल केलं तिरामिसु.. भारी रेसिपी आहे !!! तू दिलेल्या प्रमाणाने केलं आणि मस्त झालं एकदम..
आम्ही Cognoc किंवा ब्रँडी नाही घातली.. तरी अंड्याचा वास अजिबात येत नाहीये.. कॉफी ब्लॅकच वापरली..
फक्त चिजच्या मिश्रण बाहेर मिळणार्‍या तिरामिसु पेक्षा थोडसं पात्तळ झालं.. कदाचित अंड्याचं पांढरं पुरेसं फेटलं गेलं नाही... हँडमिक्सर नसल्याने हातानेच फेटलं होतं..
तू लिहिलेल्या नको त्या सल्ल्यामुळे ते अंड फेटून फेटून माझ्या हाताचा हातोडा झालाय.. Proud

चला आज मी पण प्रयोग करणार....परागच्या अनुभवामुळे हँड मिक्सरची सोय कारायला हवी असे दिसते...

हो हॅण्ड मिक्सी मस्ट आहे असं दिसतंय. कारण नाहीतर हाताने कितीही फेटले तरी ती स्टीफ पीक्स वगैरे येत नाहीत, नुस्ता तुरळक / माफक (!)फेस येतो आणि क्रीम पातळ होते - स्वानुभव!!

कारण नाहीतर हाताने कितीही फेटले तरी ती स्टीफ पीक्स वगैरे येत नाहीत, >>>> हो !! फेस येतो भरपूर.. घट्ट पण होतं ते. पण पीक्स वगैरे येत नाहित..
मै.. युट्यूबवर व्हिडीयो आहे एक.. त्या तो माणूस हाताने करून आणतो ते पीक्स.. पण किती वेळ लागलाय ते माहित नाही.. Happy

Pages